क्लेमसन, दक्षिण कॅरोलिनाः वाऱ्याच्या वेगाने धावणारा जमैकाचा विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट निवृत्त झाल्यानंतर, ट्रॅक अँड फिल्डवरचा नवा हिरो कोण, याबद्दल तमाम क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती. त्या सगळ्यांना आता नवा 'युसेन बोल्ट' सापडला आहे आणि तो आहे अमेरिकेचा सुस्साट धावपटू क्रिस्टियन कोलमन. 60 मीटरची इनडोअर शर्यत अवघ्या 6.37 सेकंदांत पूर्ण करून त्यानं नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. स्वाभाविकच, आता तो 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये काय किमया करतो, याकडे सगळ्यांच्या लक्ष लागलंय.
अमेरिकेचाच धावपटू मॉरिस ग्रीनने दोन वेळा 60 मीटरची शर्यत 6.39 सेकंदांत पूर्ण केली होती. 1998 मध्ये त्याने हा विक्रम रचला होता. त्यानंतर, तब्बल 20 वर्षांनी तो मोडण्याचा पराक्रम अमेरिकेच्याच क्रिस्टियन कोलमननं करून दाखवलाय.
21 वर्षीय कोलमनने गेल्या वर्षी यूएस इनडोअर स्पर्धेदरम्यान जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं. 100 मीटरची शर्यत 9.82 सेकंदांत पूर्ण करत त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती. आणखी थोडी मेहनत घेतल्यास तो युसेन बोल्टच्या विक्रमाच्या जवळ जाऊ शकतो किंवा तो विक्रम मोडूही शकतो, असं अनेकांना वाटलं होतं. त्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू असल्याचे संकेत या 60 मीटर शर्यतीने दिले आहेत.
दक्षिण कॅरोलिना येथील क्लेमसन युनिव्हर्सिटीत ही स्पर्धा झाली. अंतिम फेरीच्या 2 तास आधी झालेल्या फेरीत कोलमननं 6.47 सेकंदांत 60 मीटरचं अंतर पूर्ण केलं होतं. पण, अंतिम फेरीत सगळं तंत्र जुळून आलं आणि कोलमन नवा विक्रमवीर ठरला.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी पॅलेस्टाइनला भेट देणार आहेत. पॅलेस्टाइनला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान होणार आहेत. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतामध्ये रालोआ सरकार स्थापन झाल्यावर भारताने इस्रायलशी संबंध वेगाने वृद्धिंगत केले तसेच प्रत्येक भेटीनंतर किंवा करारानंतर त्याची जाहीर प्रसिद्धी केली.
यामुळे पॅलेस्टाइनशी भारताच्या असणाऱ्या संबंधांवर परिणाम होईल अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅलेस्टाइन दौऱ्यामुळे ती शंका दूर होण्यास सुरुवात होईल.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला जाण्यापुर्वी पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. जुलै महिन्यात पंतप्रधान मोदी इस्रायलला गेल्यावर त्यांनी पॅलेस्टाइला जाणे टाळले होते. त्यामुळे पॅलेस्टाइनसह भारतामध्ये माध्यमांमध्ये विविध प्रकारच्या शंका उपस्थित करत चर्चा सुरु झाल्या होत्या.
इस्रायलला अधिक जवळ करून पॅलेस्टाइनबाबात भारताने आजवर घेतलेली भूमिका बदलली जाईल अशी चर्चा सुरु झाली. पंतप्रधान मोदींवर काही राजकीय पक्षांनी टीकाही केली होती. त्याचबरोबर सहा महिन्यांच्या आतच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सहा दिवसांचा भारत दौरा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडी तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
मात्र आता पंतप्रधान मोदी पॅलेस्टाइनला जात असल्यामुळे या चर्चांना विराम मिळेल. जेरुसलमेला इस्रायलची राजधानी असा दर्जा देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला तेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रमध्ये या ठरावाविरोधात म्हणजेच पॅलेस्टाइनच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळेही भारताने पॅलेस्टाइनकडे दुर्लक्ष केलेले नाही हा संदेश जगभरात गेला होता.
वेलिंग्टन- न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेकिंडा आर्डेर्न या लवकरच सहा आठवड्यांची मातृत्त्व रजा घेणार आहेत. आपण गरोदर असून जून महिन्यापर्यंत आपण कार्यरत राहू असे त्यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यांच्या रजेच्या काळामध्ये उपपंतप्रधान विन्स्टन पिटर्स हे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळतील असेही त्यांनी सांगितले. जेकिंडा 37 वर्षांच्या आहेत.
ऑकलंड येथिल निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना जेकिंडा म्हणाल्या, "आपल्या कुटुंबातील येणाऱ्या या नव्या सदस्याची काळजी माझे यजमान क्लार्क गेफोर्ड घेतील. पदावरती असताना आई होण्याची ही जगातील पहिलीच वेळ नाही, याआधीही अशी उदाहरणे घडल्याचे मला माहिती आहे." यापुर्वी 1990 साली पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना बेनझीर भुट्टोसुद्धा आई झाल्या होत्या.
जोकिंडा आर्डेर्न गेल्या वर्षी आघाडी सरकार स्थापन करुन सत्तेमध्ये आल्या. गेल्या शंभर वर्षांच्या काळामध्ये झालेल्या पंतप्रधानांमध्ये त्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या असून.
न्यूझीलंडचे नेतृत्त्व करणाऱ्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. जगभरामध्ये काही महत्त्वाच्या देशांमध्ये पंतप्रधानपदी तरुण व्यक्ती बसल्या आहेत. त्यामध्ये कॅनडाचे जस्टीन ट्रुडेऊ, फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रोन, आयर्लंडचे लिओ वराडकर यांचा समावेश आहे.
लाहोर : शहीद भगतसिंग यांना पाकिस्तानातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘निशान-ए-हैदर’ने सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पाकिस्तानात जोर धरत आहे. निशान-ए-हैदर हा पुरस्कार पाकिस्तानात सर्वोच्च मानला जातो. भगतसिंग यांना हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी येथील भगतसिंग मेमोरीयल फाऊंडेशनने केली आहे.
भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने पाकिस्तानच्या पंजाब प्रांत शासनाला या संबंधात नव्याने याचिका दिली आहे. 'भगतसिंह यांच्यासारखा शूर व्यक्ती उपखंडात कोणीही झाला नाही, अशा शब्दांत पाकिस्तानचे संस्थापक कैद-ए-आझम मोहम्मद अली जिन्ना यांनी या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली होती.' असं या याचिकेत म्हटलं आहे.
“भगतसिंग हे आमचे नायक आहेत, त्यांच्या शूरतेबाबत लिहिताना महान पराक्रमी मेजर अजीझ भट्टी यांनी त्यांना आमचे नायक आणि आदर्श असल्याचं घोषीत केलं होतं, त्यामुळे भट्टी यांच्या प्रमाणेच निशान-ए-हैदर मिळण्यासाठी भगतसिंग हे पात्र आहेत, असं भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने म्हटलं आहे. शादमान चौकाला तात्काळ भगतसिंग यांचं नाव दिलं जावं, यासाठी पंजाब सरकारने विलंब करू नये. अशी मागणीही संघटनेने केली आहे.
दुसरीकडे हाफिज सईद आणि त्याचं संघटन शादमान चौकाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करत आहे.
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १५ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्या, शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांत या महिलांनी विक्रम केला आहे.
राज्यातील १५ महिलांमध्ये पहिल्या महिला प्रवासी रेल्वेचालक सातारा येथील सुरेखा यादव, बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे, अग्निशमन अधिकारी हर्षिनी कण्हेकर, आॅटोरिक्षाचालक शीला डावरे, आमदार डॉ.भारती लव्हेकर, चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ अरुणा राजे पाटील, भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडलजी, कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाºया स्नेहा कामत, गुप्तहेर रजनी पंडित, असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आॅफ इंडियाच्या अध्यक्ष स्वाती परिमल, अंधांसाठी मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाºया उपासना मकाती, टेस्ट ट्यूब बेबीची प्रसूती करणाºया स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.इंदिरा हिंदुजा, डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योध्यांचा परिचय करून देणारी कलाकार १८ वर्षीय तारा आनंद यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका महाराष्ट्र कन्या दुगार्बाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. भारतरत्न मदर तेरेसा, कल्पना चावला, बचेंद्री पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी.व्ही सिंधू, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
भारतीय हवाई हद्दीत विमानाचे उड्डाण सुरू असताना माहितीचे महाजाल आणि भ्रमणध्वनी संपर्क सेवा उपलब्ध करून द्याव्या, अशी शिफारस भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केली आहे.
माहितीचे महाजाल अथवा भ्रमणध्वनी संपर्क सेवा किंवा दोन्ही सेवा उपलब्ध करून द्यावयाच्या किंवा नाही हा निर्णय एअरलाइन्सचा असेल. तथापि, तांत्रिकदृष्टय़ा या सेवा उपलब्ध करून देता येणे शक्य असल्याने आणि सुरक्षेच्या मुद्दय़ावर तोडगा निघू शकत असेल तर या दोन्ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाची कोणतीही आडकाठी असण्याची गरजच नाही. त्यामुळे माहितीचे महाजाल आणि भ्रमणध्वनी सेवा भारतीय हद्दीत उपलब्ध करून द्याव्या, असे ट्रायने म्हटले आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात या बाबत सर्व संबंधितांशी चर्चा सुरू करण्यात आली होती. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर सदर निर्णय घेण्यात आला. जमिनीवरील नेटवर्कशी सुसंगतपणा राहण्यासाठी भ्रमणध्वनीसाठी ट्रायने जास्तीत जास्त तीन हजार मीटर उंचीचे निर्बंध सुचविले आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याची मुभा विमानांत असेल तर वाय-फायमार्फत ऑनबोर्ड इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी, असे नियामकाने म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारत सरकारने गेल्या वर्षी ५0 विदेशी गुंतवणूक करार रद्द केले आहेत. मात्र आता नवे करार करताना भारताला अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या करारासाठी भारत सरकारने घातलेल्या जाचक अटी स्वीकारण्यास विदेशी सरकारे नकार देत आहेत.
भारताला विदेशी गुंतवणुकीची प्रचंड गरज असताना १९९0 च्या दशकात हे करार करण्यात आले होते. भारताला गरज असल्यामुळे तेव्हाचे करार भारताला प्रतिकूल होते, असे केंद्राचे म्हणणे आहे. कराराबाबत काही वाद निर्माण झाल्यास आंतरराष्टÑीय लवादाचा निर्णय मान्य करण्याची अट भारताने तेव्हा निर्विवादपणे मान्य केली होती.
लवादाचे हे जोखड झुगारण्यासाठी आता भारताने कराराचे नवा आराखडा तयार केला आहे. ब्राझिल आणि इंडोनेशिया यांसारख्या उगवत्या अर्थव्यवस्थांकडून असेच करार आराखडे वापरले जातात. कराराचे हे नवे प्रारूप विदेशी सरकारांच्या गळी उतरविणे मात्र भारताला जड चालले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
गेल्या १0 महिन्यांपासून संबंधित वाटाघाटीत सहभागी असलेल्या अधिकाºयाने सांगितले की, नव्या करारांच्या वाटाघाटीत भारताची स्थिती नगण्य ठरत आहे. आॅस्ट्रेलिया, इराण आणि युरोपीय देशांतील वाटाघाटीकर्त्यांच्या मते भारतात यायला गुंतवणूक तयार आहेत. तथापि, भारत करू इच्छित असलेल्या करारात गुंतवणूकदारांना पुरेसे संरक्षण नसल्यामुळे घोडे अडले आहे.
काही वाद उद्भवल्यास किमान पाच वर्षे भारतीय न्यायालयात खटला चालल्यानंतरच आंतरराष्टÑीय लवादाकडे जाता येईल, अशी एक अट भारतीय करार आराखड्यात आहे. ती गुंतवणूकदारांना विशेष जाचक वाटत आहे. करासंबंधीच्या वादात गुंतवणूकदारांना भारत सरकारविरुद्ध जाण्याची तरतूदही नव्या करार आराखड्यात नाही.
महत्वाच्या घटना
१७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
१८४१: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.
१९४४: दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.
१९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला.
१९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
१९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
१९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
१९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर.
१९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
जन्म
१८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
१८७१: टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
१८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.
१८९८: नात मास्टर आणि गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९७४)
१९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
१९६०: २१ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक आपा शेर्पा यांचा जन्म.
मृत्यू
१८९१: हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
१९३६: युनायटेड किंगडमचा राजा जॉर्ज पाचवा यांचे निधन. (जन्म: ३ जून १८६५)
१९५१: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर१८६९)
१९८०: दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
१९८८: स्वातंत्र्यसैनिक आणि पश्तून नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांचे निधन. (जन्म: ३ जून १८९०)
१९९३: अँग्लो-डच अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)
२००२: रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचे निधन. (जन्म: १० मे १९१८)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.