चालू घडामोडी - २० फेब्रुवारी २०१८

Date : 20 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात आणखी २५ हजार आधार केंद्रे सुरू होणार :
  • नवी दिल्ली : सर्व सेवा मिळण्यासाठी आधार अनिवार्य केले जात असतानाच दुसरीकडे आधार केंद्रे बंद होत आहेत. यामुळे सरकारने सहा ते नऊ महिन्यांत २५ ते ३५ हजार आधार केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. यातील बहुतेक केंद्रे ही टपाल कार्यालये वा बँकांमध्ये असतील.

  • आधारच्या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार बँकांमध्ये आधार अनिवार्य आहे. आम्ही बँकांना कळवले आहे की तुम्ही ग्राहकांना आधार मागत असाल तर त्यांना आधारची सुविधाही दिली पाहिजे. तुमच्या शाखेत आधारचे यंत्र बसवावे. ज्या ग्राहकांकडे/खातेदारांकडे आधार नाही वा त्यांच्या नावात काही विसंगती आहे, तर ती दुरुस्ती बँकांनीच करून घ्यावी.

  • टपाल कार्यालयातही आधार केंद्रे सुरू होणार आहेत. जे बँकेत जाऊ शकत नाहीत, त्यांना जवळच्या टपाल कार्यालयातून आधार क्रमांक मिळवता येईल व विसंगतीही दुरुस्त करून घेता येईल.

  • जवळपास १५ हजार बँक शाखा व सुमारे १६-१८ हजार टपाल कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू करण्याचे आधार प्राधिकरणाचे लक्ष्य आहे. टपाल कार्यालये व बँकांनी म्हटले आहे की, त्यासाठी वेगळा कर्मचारीवर्ग आधारचे यंत्र व वेगळी जागाही तयार करावी लागेल. हा खर्च कोण करणार, हा प्रश्न आहे.

शिवरायांच्या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनातील कमतरता पूर्ण - कोविंद :
  • नवी दिल्ली : छत्रपती शिवरायांची प्रतिमा मला आत्ता भेट दिली, या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनात जी कमतरता मला अनेकदा जाणवत होती ती पूर्ण झाली. अतिशय उत्कृष्ट अशी ही शिवरायांची प्रतिमा राष्ट्रपती भवनातच राहून या वास्तूची शोभा वाढवत राहील असे भावपूर्ण उद्गार देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

  • दिल्लीत प्रथमच साजऱ्या झालेल्या भव्य शिवजयंती सोहळ्यात कोविंद बोलत होते. शिवजयंतीचा उत्साह रायगडापासून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत पोहचवण्यासाठी यंदा प्रथमच राजधानीत अशा भव्य शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • सकाळी महाराष्ट्र सदनातून भव्य शोभायात्रा निघाली, त्यानंतर दिल्लीतल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम पार पडला. छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी दुसरं तिसरं कुणी नव्हे तर देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत, नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा उपस्थित होते.

  • राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने या शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

प्रिन्स करिम आगा खान यांचा भारत दौरा सुरू :
  • नवी दिल्ली : जगभर पसरलेल्या शिया इस्माईली समाजाचे ४९ वे धर्मगुरू प्रिन्स आगा खान भारत दौºयावर असून, धर्मगुरूपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतल्याला ६0 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम होणार आहेत. ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत.

  • प्रिन्स आगा खान शिया समाजाच्या लोकांची भेट घेतील. हीरक महोत्सवानिमित्त डॉकयार्ड रोड येथे कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी करण्यात येत असून, डॉ. सुलतान प्रधान यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या साह्याने तीन वर्षांत ती संस्था सुरू होईल. जगभर पसरलेल्या या समाजाची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास आहे.

  • आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क (एकेडीएन)द्वारे ६० देशांमध्ये विधायक कामे करते. त्यात अनेक खासगी, आंतरराष्ट्रीय तसेच बिगर सांप्रदायिक संस्थांचा समावेश आहे. आरोग्य, शेती, ग्रामीण भागाचा विकास, आर्किटेक्चर आदी विविध क्षेत्रामध्ये या संस्था काम करतात. २०१५ मध्ये भारत सरकारने आगा खान यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

  • प्रिन्स आगाखान यांच्या हस्ते २१ फेब्रुवारीला दिल्लीत सुंदर नर्सरीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सुंदर नर्सरी हा १६व्या शतकातील उद्यानांचा समूह असून, तो हुमायूनच्या कबरीला लागून आहे. या नर्सरीला युनेस्कोने जागतिक वारसा बहाल केला आहे.

सुजल पिळणकर 'मुंबई श्री' किताब विजेता :
  • मुंबई : तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत मुंबई श्रीची थरारक शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. एकापेक्षा एक शरीर सौष्ठवपटूंनी रंगलेल्या मुंबई श्रीच्या अंतिम फेरीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने बाजी मारत 'मुंबई श्री'चा किताब पटकावला.

  • जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर. एम. भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली. फिजीक्स फिटनेस प्रकारात प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.

  • बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनने आयोजनाची संधी युवासेना आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेला दिली होती. भव्यदिव्य मुंबई श्री स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.

  • ग्रोवेल्स मॉलमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी संघ निवडल्यामुळे सेंट्स लॉरेन्स हायस्कूलच्या पटांगणावर फक्त अव्वल आणि दमदार खेळाडूंचे पीळदार दर्शन मुंबईकरांना अनुभवायला मिळालं. परीक्षकांनी खेळाडूंच्या प्रत्येक पीळदार अंगाचं गुणात्मक निरीक्षण करुन निकाल जाहीर केला आणि त्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शिक्कामोर्तब केलं

  • या धमाकेदार मुंबई श्रीचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसुळ, पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम, माजी आमदार कॅ.अभिजीत अडसुळ, शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे, मदन कडू यांच्या उपस्थितीत पार पडला.

सिंगापूर प्रत्येक नागरिकास देणार बोनस :
  • सिंगापूर : सिंगापूर सरकारने अर्थसंकल्पातील शिलकी रकमेतून देशातील २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकाला ‘बोनस’ देण्याची घोषणा केली आहे. नागरिकांना त्यांच्या करपात्र उत्पन्नानुसार १०० ते ३०० सिंगापूर डॉलर (४९00 रुपये ते १४ हजार ७00 रुपये) एवढी रक्कम बोनस म्हणून मिळेल.

  • वित्तमंत्री हेंग स्वी किएत यांनी १० अब्ज सिंगापुरी डॉलर शिलकीचा अर्थसंकल्प मांडताना सुमारे ७०० दशलक्ष सिंगापुरी डॉलर नागरिकांना ‘बोनस’ म्हणून वाटण्याची घोषणा केली. सुमारे २७ लाख नागरिकांना तो मिळेल. चालू वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी त्याचे वाटप होईल.

  • या बोनसचे वर्णन मंडारियन भाषेत ‘हाँगबाओ’ असे केले आहे. याचा अर्थ विशेष आनंदाप्रसंगी दिली जाणारी रोख बक्षीस रक्कम. सिंगापूरच्या आर्थिक प्रगतीत प्रत्येक नागरिकास सहभागी करून घेण्याची सरकारची प्रतिबद्धता यातून दिसून येते, असे हेंग म्हणाले.

जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी :
  • नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन चौथ्यांदा राज्यसभेच्या खासदारपदी नियुक्त होण्याची चिन्हं आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन जया यांचं नामांकन करण्याची शक्यता आहे.

  • जया बच्चन 2004 मध्ये समाजवादी पक्षाकडून पहिल्यांदा उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आल्या. सध्या त्या तिसऱ्यांदा खासदारपदी नियुक्त झाल्या आहेत. जया बच्चन यांची तिसरी टर्म 3 एप्रिल 2018 रोजी संपणार आहे.

  • तृणमूलकडून खासदारकीच्या उमेदवारांमध्ये जया बच्चन यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अंतिम निर्णयानंतर जया बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. 18 मार्च रोजी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • बंगालशी जया बच्चन यांचं असलेलं नातं आणि राज्यातील लोकप्रियता पाहता त्यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.

  • एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील 10 जागांचा समावेश आहे. भाजपला याचा फायदा होण्याचा अंदाज आहे.

नीरव मोदीप्रकरणी काँग्रेसचे ३० आमदार निलंबित :
  • छत्तीसगड- नीरव मोदी प्रकरणात छत्तीसगड विधानसभेतील काँग्रेसच्या 30 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेले आमदार हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या विरोधात सभागृहात विरोध प्रदर्शन करत होते.

  • राज्यात गुंतवणूक करणा-या रमन सिंह यांच्या मालकीच्या मेटल्स अँड मायनिंग कॉर्पोरेशननं रिओ टिंटो कॉर्पोरेशनला आमंत्रण दिल्याचा कारणावरून विरोधक आमदारांनी छत्तीसगड विधानसभेत मोठा गोंधळ घातला.

  • रिओ टिंटो कॉर्पोरेशनचं पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी यांच्याबरोबर लागेबांधे असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. दुसरीकडे नीरव मोदीवर 114 अब्ज रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय.

  • नीरव मोदीनं 17 बँकांमध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होतोय. नीरव मोदीनं हवाला रॅकेटसाठी या पैशाचा वापर केल्याचीही शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७९२: अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.

  • १९७८: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.

  • १९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.

  • २०१४: तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.

जन्म

  • १८४४: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६)

  • १९०१: इजिप्त चे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९८४)

  • १९०४: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९८०)

  • १९२५:  जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी१९९०)

  • १९५१: इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०५: भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.

  • १९१०: इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली यांचे निधन.

  • १९५०: स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १८८९)

  • १९७४: नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन.

  • १९९३: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन.

  • १९९४: घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.

  • १९९७: पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.

  • २००१: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.