चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० ऑगस्ट २०१९

Date : 20 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
किरीट सोमय्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती :
  • भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यायांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. एवढंच नाही तर डॉ. सुभाष भामरे, प्रवीण पोटे पाटील, अशोक कांडलकर या सगळ्यांचीही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली.

  • भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), मा. योगेश गोगावले (पुणे) व अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • चंद्रकांत पाटील यांनी भाजपा, प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे. तसेच काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत ज्यामध्ये पुणे शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ, पुणे शहर  सरचिटणीसपदी गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे आणि यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी  माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमांच्या संपर्क प्रमुखपदाच्या जबाबदारीसह  केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरीष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराज कुलकर्णी, भालचंद्र शीरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर यांना नवनियुक्त प्रवक्ते म्हणून नेमण्यात आले आहे.

चांद्रयान २ उद्या करणार चंद्राच्या कक्षेत प्रवेश :
  • समस्त देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान २ मोहिमेसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. चांद्रयान २ ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक मंगळवारी लिक्विड इंजिन प्रज्वलित करतील. सकाळी ८.३० ते ९.३० च्या दरम्यान ही प्रक्रिया पार पडेल. ही एक अवघड प्रक्रिया आहे असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगितले.

  • चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान २ ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. विक्रम लँडर २ सप्टेंबरला चांद्रयान २ पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके ३-एम १ प्रक्षेपकाद्वारे २२ जुलैला चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली.

  • बंगळुरुतील इस्त्रोच्या केंद्रातून चांद्रयान २ वर लक्ष ठेवण्यात येत आहे. यानाच्या सर्व सिस्टिम व्यवस्थित सुरु असल्याचे १४ ऑगस्टला इस्त्रोकडून सांगण्यात आले. भारताची ही दुसरी चंद्र मोहिम असून चंद्राच्या दक्षिण भागावरील माहित नसलेल्या गोष्टी शोधून काढण्याचे या मोहिमेचा उद्देश आहे.

व्होडाफोन-आयडियाच्या सीईओ पदाचा बालेश शर्मा यांनी दिला राजीनामा :
  • व्होडोफोन- आयडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा बालेश शर्मा यांनी वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिला आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, त्यांच्या जागी व्होडाफोन समूहाचे भारतातील प्रतिनिधी रवींद्र टक्कर यांना तत्काळ प्रभावाने एमडी आणि सीईओपदी नियूक्त करण्यात आले आहे.

  • बालेश शर्मा यांनी वैयक्तीक कारणांमुळे व्होडाफोन-आयडियाच्या सीईओपदावरून पायउतार होऊ द्यावी, ही केलेली विनंती मान्य करण्यात आली असल्याचे व्होडाफोन-आयडिया लिमिटेडच्या बोर्डाने आज जाहीर केले. तसेच, शर्मा हे लवकरच व्होडाफोन ग्रुपमध्ये नवी जबाबदारी स्वीकारतील, याबाबत लवकरच घोषणा केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

  • व्होडाफोन-आयडियाच्या विलिनीकरणापासून शर्मा हे सीईओ पदावर होते. त्या अगोदर त्यांच्याकडे सीओओ पदाची जबाबदारी होती. तसेच, व्होडाफोन-आयडियाने सांगितले की, बालेश यांनी संयुक्त व्यवसायाची रणनीती तयार होण्यापासून चालविली आहे.

  • रवींद्र टक्कर हे सध्या व्होडाफोन-आयडिया आणि इंडस टॉवरचे बोर्ड मेंबर आहेत. शिवाय भारतातील व्होडाफोन समूहासाठी देखील ते जबाबदार आहेत. २०१७ पासून ते या पदावर आहेत. सध्याच्या त्यांच्यावरील जबाबदारी पूर्वी ते व्होडाफोन रोमानियाचे तीन वर्षे सीईओ आणि लंडनमध्येही व्होडाफोन पार्टनर मार्केटचे सीईओ होते. ते १९९४ पासून व्होडाफोन समुहामध्ये आहेत. शिवाय मागील २५ वर्षांमध्ये व्होडाफोनच्या ऑपरेटिंग कंपन्यांमध्ये अनेक ठिकाणी नेतृत्वाच्या पदांवरील कामाचा त्यांना टेलिकॉम क्षेत्रातील अनुभव आहे.

भारतीय उपउच्चायुक्तांना पाकिस्तानचे चौथ्यांदा समन्स :
  • शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात पाकिस्तानने भारताचे उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांना लागोपाठ चौथ्यांदा बोलावून निषेध व्यक्त केला.

  • प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे दक्षिण आशिया महासंचालक महंमद फैजल यांनी म्हटले आहे की, ‘१८ ऑगस्टला भारताने हॉट स्प्रिंग व चिरीकोट भागात केलेल्या गोळीबाराचा आम्ही निषेध करीत आहोत. या गोळीबारात दोन वयस्कर नागरिक ठार झाले असून सात वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी झाला. भारताने २०१७ पासून शस्त्रसंधीचे उल्लंघन चालवले असून एकूण १९७० वेळा असे उल्लंघन केले आहे.’

  • नागरी भागात सुरू असलेला गोळीबार हा निषेधार्ह असून आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचे व कायद्यांचे त्यामुळे उल्लंघन होत आहे, त्यामुळे प्रादेशिक शांतता व सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. २००३ मधील शस्त्रसंधी कराराचा सन्मान भारताने केला पाहिजे तसेच यापूर्वीच्या घटनांची चौकशी करावी असे फैजल यांनी सांगितले.

  • पाकिस्तानने गौरव अहलुवालिया यांना बोलावून शस्त्रसंधी उल्लंघनाचा निषेध करण्याची ही चौथी वेळ होती. अहलुवालिया यांना १४,१५, १६ ऑगस्ट रोजी बोलावून समज देण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीची अकरा वर्ष पूर्ण :
  • टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची अकरा वर्षे पूर्ण केली आहे. विराटनं 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या दम्बुला वन डेत खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याला काल अकरा वर्ष पूर्ण झाली.

  • या अकरा वर्षांत बजावलेल्या कामगिरीसाठी भारतीय कर्णधारानं खास ट्विट करून देवाचे आभार मानले आहेत. अकरा वर्षांच्या कारकीर्दीत एवढी मोठी कामगिरी बजावू शकू, याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता, असं विराटनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  • भारतीय कर्णधारानं या ट्विटमध्ये आपल्या चाहत्यांनाही त्यांची स्वप्नं साकार व्हावीत यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आपलं लक्ष्य गाठण्यासाठी नेहमी योग्य मार्गानं वाटचाल करण्याचा सल्लाही त्यानं दिला आहे.विराटनं अकरा वर्षांच्या कालावधीत एक सर्वोत्तम फलंदाज ते सर्वोत्तम कर्णधार अशी मोठी झेप घेतली आहे. 2008 साली भारताला अंडर-19चा विश्वचषक जिंकून दिल्यानंतर विराट कोहली नावाचा एक नवा नायक भारतीय क्रिकेटला मिळाला. त्यानंतर विराटला सेहवागच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवलं. आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही

दिनविशेष :
  • जागतिक मच्छर दिन / भारतीय अक्षय ऊर्जा दिन

महत्वाच्या घटना 

  • १६६६  शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.

  • १८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.

  • १८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.

  • १९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

  • १९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली

  • १९६०: सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.

  • १९८८: ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.

  • १९९५: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.

  • २००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.

जन्म 

  • १७७९: स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झेलिअस यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८)

  • १८३३: अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९०१)

  • १८९६: भारतीय फुटबॉल खेळाडू गोस्त पाल यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७६)

  • १९४०: भारतीय-ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रेक्स सेलर्स यांचा जन्म.

  • १९४१: युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच सर्बिया यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च २००६)

  • १९४४: भारताचे ६वे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)

  • १९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५)

  • १९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे निधन. (जन्म: २४ मे १९२४)

  • १९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९३२)

  • १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन.

  • १९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९०७)

  • २०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे निधन.

  • २००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.

  • २०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)

  • २०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे निधन.

  • २०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)

  • २०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच आयंगर योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.