चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ जुलै २०१९

Date : 19 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘गॉड ऑफ क्रिकेट’ला ‘हॉल ऑफ फेम’चा सन्मान :
  • क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. Hall of Fame या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे सचिनच्या आधी कुंबळे आणि राहुल द्रविडचा हॉल ऑफ फेममध्ये सहभाग झाला होता.

  • सचिनसह दक्षिण अफ्रिकाचे माजी वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीनसह तीन जणांना गुरूवार आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळालेला सचिन सहावा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना सहभागी केले होते.

  • सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने, कसोटी क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजाराहून अधिक धावांबरोबरच इतरही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याबाबत समिती सकारात्मक :
  • पुणे : इयत्ता दहावीला भाषा आणि समाजशास्त्र विषयासाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीचा प्राथमिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद आहे. या संदर्भात आणखी एक बैठक घेऊन अंतिम निर्णय होणार आहे.

  • राज्य मंडळाने गेल्या वर्षी गणित आणि विज्ञान वगळता अन्य विषयांसाठीचे अंतर्गत गुण बंद केले. त्याचा परिणाम म्हणजे दहावीचा निकाल १२.३१ टक्क्य़ांनी घटला. अंतर्गत गुण बंद केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनाही फटका बसला.

  • राज्यातील ९० ते ९५ टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली. तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयात राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळण्याच्या चर्चेने पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यानंतर अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

  • त्यानुसार शिक्षण विभागाने अन्य मंडळांच्या मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करून राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेतील मूल्यमापनासंदर्भात समिती नेमली. या समितीला दहा दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. समितीने पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ या सर्वाकडून सूचना मागवल्या.

Tiktok आणि Helo अॅपवर बंदीची शक्यता; सरकारने पाठवली नोटीस :
  • चिनी सोशल मीडिया अॅप टिकटॉक (Tiktok) आणि हेलो (Helo) यांच्या वापरावर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे. कारण, या अॅपच्या माध्यमातून देशविरोधी कृत्ये केली जात असल्याची तक्रार आल्याने केंद्र सरकारने या अॅपच्या अधिकाऱ्यांना २४ प्रश्नांची नोटीस पाठवली आहे. जर या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर या अॅप्सच्या वापरावर भारतात बंदी येऊ शकते.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘स्वदेशी जागरण मंच’ या संघटनेने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे Tiktok आणि Helo या चीनी मोबाईल अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. ही अॅप्स देशविरोधी कामांचा अड्डा बनल्याचा आरोप या संघटनेने केला होता. या तक्रारीची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून या अॅप्सच्या अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. यावर Tiktok चे म्हणणे आहे की, पुढील तीन वर्षात स्थानिक पातळीवर जबाबदारीसाठी तंत्रज्ञानासंबंधी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी कंपनी १०० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

  • Helo अॅपबाबत ‘स्वदेशी जागरण मंच’ने निवडणूक आयोगालाही पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, Helo अॅपद्वारे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ११ हजारांहून अधिक राजकीय जाहिरातींसाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या जाहिरातींमध्ये भारतातील वरिष्ठ नेत्यांच्या आक्षेपार्ह छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे.

  • भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या निवडणुकीच्यावेळी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्याचबरोबर, हे दोन्ही अॅप चीनी कंपनीचे असल्याने यामध्ये चीन सरकार हस्तक्षेपाद्वारे भारतीय नागरिकांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत येऊन पोहोचले आहे. याचा उपयोग भारतात सामाजीक अराजकता माजवण्यासाठी होऊ शकतो, असेही ‘स्वदेशी जागरण मंच’ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

संगणकाच्या मदतीने रूबिक क्युबचे कोडे सोडवण्यात यश :
  • लॉसएंजल्स : दिवसेंदिवस कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र विस्तारत असताना आता वैज्ञानिकांनी रूबिक क्युबचे तर्कावर आधारित कोडे सोडवण्यासाठी अलगॉरिथम विकसित केले आहे. सेकंदापेक्षाही कमी काळात हे कोडे संगणकाच्या मदतीने सोडवण्यात यश आले आहे. माणसाकडून कुठलेही प्रशिक्षण नसताना यंत्राच्या मदतीने हे कोडे सोडवता येते हे स्पष्ट झाले आहे.

  • हंगेरीच्या स्थापत्यशास्त्रज्ञाने १९७४ मध्ये रूबिक क्यूबचा शोध लावला होता. हे कोडे सोडवताना अनेकांना जड जाते. डीपक्युब ए या अलगॉरिथमच्या मदतीने हे कोडे सोडवण्यात यश आले असून कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी अलगॉरिथम तयार केला आहे. सेकंदापेक्षाही कमी काळात हे कोडे त्याच्या मदतीने सोडवण्यात आले. हे कोडे सोडवण्याच्या अब्जावधी शक्यता असताना त्याचा उलगडा करणे अवघड असते. यात घनाकृतीला सहा बाजू असतात व त्यातील संगती लावायच्या असतात.

  • जर्नल नेचर मशीन इंटेलीजन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार डीपक्युब ए या अलगॉरिथमच्या मदतीने हे कोडे सर्व चाचणी शक्यतांच्या मदतीने सोडवण्यात शंभर टक्के यश आले. त्यात कमीत कमी काळात सोडवणूक करण्याचा मार्ग वापरण्यात आला. अलगॉरिथमचा वापर हा टाइल पझल, लाइट आउट व सोकोबन या गेम्ससाठीही करता येतो. कृत्रिम बुद्धिमत्ता ही जगातील उत्तम बुद्धिबळ पटू , गो प्लेयर्स यांना हरवू शकते, पण रूबिक क्यूबचे कोडे संगणकाने सोडवणे अवघड होते त्यामुळे हा प्रयत्न करण्यात आला असे संगणक विज्ञान प्राध्यापक पिअरी बाल्डी यांनी म्हटले आहे.

  • रूबिक क्यूबचे कोडे सोडवण्यासाठी प्रतीकात्मक, गणिती व अमूर्त विचारांची गरज असते. याचाच अर्थ सखोल विचार करूनच ते सोडवता येते. विचार,कार्यकारणभाव, नियोजन व निर्णयक्षमता या घटकांना यात महत्त्व आहे. डीपक्यूब ए संगणकाला दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर पुढील अनेक चाली त्याने स्वत: शोधून काढल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेने केवळ वीस चालीत व कमीत कमी पायऱ्यांत हे कोडे सोडवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

राज्यातील 'या' पाच जिल्हा परिषदा बरखास्त, सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर राज्य सरकारला जाग :
  • अकोला : राज्यातील पाच जिल्हा परिषदा आज राज्य सरकारने बरखास्त केल्या. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदांचा यामध्ये समावेश आहे. यासोबतच या पाचही जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्याही बरखास्त करण्यात आल्या आहेत. आज राज्याच्या ग्रामविकास खात्याने यासंदर्भातले आदेश जारी केले. आता या पाचही जिल्हा परिषदांच्या 'प्रशासकपदी' संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंचायत समितीच्या प्रशासकपदी गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • या पाचही जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपला होता. परंतु, आरक्षण प्रक्रियेशी संबंधित न्यायालयीन याचिकांमुळे येथील निवडणूक प्रक्रिया प्रलंबित होती. या जिल्हा परिषदांमधील आरक्षण 50 टक्क्यांवर गेल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात येथील आरक्षण प्रक्रियेविरोधात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाने या कारणांमुळे निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. हा प्रश्न विधीमंडळात कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर निकाली निघणार होता. त्यामुळे निवडणूक होत नव्हती.

  • उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा प्रश्न सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेला. काल (17 जुलै, बुधवार) सर्वोच्च न्यायालयात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भात सुनावणी झाली.

मनोहर पर्रीकरांच्या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद :
  • पणजी : गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली.

  • मिरामार येथे माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मारकाशेजारी पर्रीकर यांचे स्मारक बांधण्याचा संकल्प सरकारने केला होता. त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद आताच करण्यात आली आहे.

  • दोन दिवसांपूर्वी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनीही हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा सरकार जर पर्रीकर यांच्या स्मारकाचे काम लवकर सुरू करणार नसेल तर लोकसहभागामधून स्मारक बांधून घेऊ, असा इशारा सरकारला दिला होता. त्यावर स्मारक सरकारच बांधेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता स्मारकासाठी अर्थसंकल्पीय तरतूदही करण्यात आली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.

  • १८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.

  • १९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली

  • १९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.

  • १९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.

  • १९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

  • १९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

  • १९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

  • १९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  • १९९२: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.

  • १९९३: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • १९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

जन्म 

  • १८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)

  • १८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८१)

  • १८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी१९८९)

  • १९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)

  • १९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)

  • १९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

मृत्यू 

  • १३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.

  • १८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)

  • १९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७५)

  • १९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.

  • २००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.