लक्झरी वस्तू बनवणारी कंपनी LVMHचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. त्यामुळे आता जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वोच्च स्थानी अमेझॉनचे मालक जेफ बेजोस दुसऱ्या स्थानी बर्नार्ड अरनॉल्ट तर तिसऱ्या स्थानी बिल गेट्स विराजमान आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सने ही यादी जाहीर केली आहे. या इंडेक्समध्ये सहभागी असलेल्या जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींची संपत्ती अमेरिकेचा शेअर बाजार बंद झाल्यानंतर दररोज अद्ययावत केली जाते.
या यादीनुसार, बर्नार्ड अनरॉल्ट (वय ७०) यांची संपत्ती ७.४५ लाख कोटी रुपये इतकी झाली. एलव्हीएचएम कंपनीच्या शेअर्समध्ये १.३८ टक्के तेजी आल्याने मंगळवारी त्यांची संपत्ती १०८ अब्ज डॉलर (७.४५ लाख कोटी) इतकी झाली होती. तर बिल गेट्स यांची संपत्ती १०७ अज्ब डॉलर (७.३८ लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.
बिल गेट्स हे सात वर्षांत पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. या इंडेक्सनुसार, या वर्षी बर्नार्ड यांच्या संपत्तीत सर्वाधिक ३९ अब्ज डॉलरची (२.६९ लाख कोटी) वाढ झाली आहे. बर्नाल्ड यांची संपत्ती ही फ्रान्सच्या जीडीपीच्या ३ टक्क्यांइतकी आहे. गेल्या महिन्यांत बर्नार्ड हे सेंटीबिलेनिअर कँपमध्येही सामील झाले होते. यामध्ये जगातील केवळ तीनच व्यक्ती आहेत त्या म्हणजे जेफ बेजोस, बिल गेट्स आणि बर्नाल्ड अरनॉर्ल्ट.
बर्नार्ड यांच्याजवळ एलव्हीएमएच कंपनीचे सुमारे ५० टक्के शेअर्स आहेत तर फॅशन हाऊस ख्रिश्चिअन डायरचे सुमारे ९७ टक्के शेअर्स आहेत. फ्रान्सच्या ऐतिहासिक नोट्रेडेम कॅथेड्रल चर्चमध्ये आग लागल्याने चर्चचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर या चर्चच्या उभारणीसाठी बर्नार्ड आणि त्यांच्या कुटुंबाने ६५ कोटी डॉलरची मदत केली होती. तर बिल गेट्स यांनी आजवर ३५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम दान केली आहे. तर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी आपल्या पत्नीसोबत झालेल्या घटस्फोटावेळी तडजोडीसाठी ३६.५ अब्ज डॉलरचे शेअर दिल्यानंतरही ते श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहेत.
तीन दिवसांपूर्वीच तांत्रिक बिघाडामुळे इस्त्रोला चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द करावे लागले होते. आता येत्या २१ किंवा २२ जुलैला चांद्रयान-२ अवकाशात झेपावू शकते. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो या दोन तारखांवर विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. १५ जुलैला सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. पण क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाली. त्यामुळे ५६ मिनिटे आधीच उड्डाण रद्द करण्यात आले.
२१ जुलैला रविवारी दुपारी किंवा २२ जुलैची मध्यरात्रीची वेळ उड्डाणासाठी ठरवली जाऊ शकते. इस्त्रोने अद्याप प्रक्षेपणाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. GSLV MK 3 प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये ही तांत्रिक अडचण नेमकी कुठे निर्माण झाली होती. ते इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या निप्पल जॉईंटमधून गळती झाली. निप्पल जॉईंटमधल्या गळतीमुळे हेलियम गॅस बॉटल पुरेसा दबाव निर्माण करु शकली नाही.
इंधन आणि ऑक्सिडायझर दबाव निर्माण करण्यासाठी हेलियम गॅस बॉटलचा वापर केला जातो. चांगली बाब म्हणजे गळती दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण रॉकेट खोलण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे जुलै महिन्यातच पुन्हा चांद्रयान-२ चे अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे असे एका वरिष्ठ वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. हे नेमकं कशामुळे घडलं ते समजत नाही तो पर्यंत धोका कायम आहे. दुरुस्ती करणे शक्य आहे पण गळती कशी झाली ते समजलं नाही तर पुन्हा ही समस्या उदभवण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सत्य आणि न्यायाचाच विजय आहे. तथ्यांवरील विस्तृत अभ्यासावर आधारित निर्णयासाठी आयसीजेचे अभिनंदन.
मला खात्री आहे की, जाधव यांना नक्कीच न्याय मिळेल. अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुनावलेल्या निकालावर दिली आहे.
तसेच पंतप्रधान मोदींनी हे देखील सांगितले की, आमचे सरकार सदैव प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत राहील.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने जुन्या स्थलांतर व्यवस्थेत बदल करताना यापुढे गुणवत्तेवर आधारित कायदेशीर स्थलांतराचे प्रमाण ५७ टक्के करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे, यात कौटुंबिक व मानवतावादी आधारावर स्थलांतराचाही समावेश आहे.
ट्रम्प प्रशासनाचे सल्लागार व अध्यक्षांचे जावई जॅरेड कुशनर यांनी सांगितले,की स्थलांतर धोरण हे बुद्धिमान व गुणवत्ताधारक लोकांना प्राधान्य देणारे राहील. त्यातून दहा वर्षांत ५०० अब्ज डॉलर्सच्या करमहसुलाची वसुली होण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत मदत करणाऱ्या लोकांची संख्या त्यामुळे वाढणार आहे, हे लगेच घडणार नसून त्याला वेळ लागेल. ट्रम्प यांच्या आदेशानुसार कुशनर यांनी स्थलांतर सुधारणा प्रकल्पाची धुरा खांद्यावर घेतली असून सुधारणा आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचे कुशनर यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले,की अमेरिकेची सध्याची स्थलांतर व्यवस्था स्पर्धक देशांच्या तुलनेत कालबाह्य़ झालेली आहे. सध्या कायदेशीर स्थलांतर व्यवस्थेत केवळ १२ टक्के लोक गुणवत्तेच्या आधारे कायदेशीर स्थलांतराचा दर्जा मिळवत आहेत, त्याउलट कॅनडात ५३ टक्के, न्यूझीलंड ५९ टक्के, ऑस्ट्रेलिया ६३ टक्के, जपान ५२ टक्के असे हे प्रमाण आहे. आम्ही अमेरिकेत गुणवत्ताधारित स्थलांतराचे प्रमाण ५७ टक्के करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
द हेग : कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात बुधवारी भारताला मोठे यश मिळाले. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि त्यांना राजनैतिक संपर्काची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने पाकिस्तानला दिले.
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना ‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचे भारतात तीव्र पडसाद उमटले. भारताने या निर्णयाविरोधात ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्या. अब्दुलक्वी अहमद युसूफ यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय पीठाने या प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांची बाजू ऐकून घेऊन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी निर्णय राखून ठेवला होता. अखेर दोन वर्षे आणि दोन महिने चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने बुधवारी भारताच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करण्याचे निर्देश पाकिस्तानला देतानाच न्यायालयाने व्हिएन्ना कराराच्या उल्लंघनाबाबतचा भारताचा मुद्दाही ग्राह्य़ धरला.
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन
महत्वाच्या घटना
१८५२: इंग्लंडमधे निवडणुकांत गुप्त मतदान वापरण्यास सुरूवात झाली.
१८५७: मुंबई विद्यापीठाची स्थापना.
१९२५: अॅडॉल्फ हिटलर यांनी माइन काम्फ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक प्रकाशित केले.
१९६८: कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना.
१९७६: मॉन्ट्रिअल ऑलिम्पिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रथमच १० पैकी १० गुण मिळवले.
१९८०: भारताने एस. एल. व्ही.-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
१९९६: उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
१९९६: तामिळ टायगर्स नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.
जन्म
१६३५: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १७०३)
१८४८: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१५)
१९०९: भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक बिश्नु डे यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९८३)
१९१०: भारतीय उद्योजिका दप्तेंद प्रमानिक यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८९)
१९१८: नोबेल पारितोषिक विजेते दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला तथा मदीबा यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)
१९२७: पाकिस्तानी गझलगायक गझलसम्राट मेहदी हसन यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून २०१२)
१९३५: ६९वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा जन्म.
१९५०: व्हर्जिन ग्रुपचे स्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.
१९७१: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.
१९७२: अभिनेत्री सौंदर्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००४)
१९८२: अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड २००० विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म.
मृत्यू
१८१७: इंग्लिश लेखिका जेन ऑस्टीन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७५)
१८९२: पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८०८)
१९६९: लेखक, कवी, समाजसुधारक लोकशाहीर अण्णाणाऊ साठे यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९२०)
१९८९: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक डॉ. गोविंद भट यांचे निधन.
१९९४: ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा यांचे निधन.
२००१: सांगलीच्या राजमाता पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन यांचे निधन.
२००१: वेस्ट इंडीजचे कसोटीपटू रॉय गिलख्रिस्ट यांचे निधन. (जन्म: २८ जून १९३४)
२०१२: चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे निधन.
२०१३: भारतीय कवी, गीतकार, आणि अभिनेते वाली यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.