बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने बंद केलेले हवाईक्षेत्र पुन्हा खुले करण्यात आले असून मंगळवारपासून भारत-पाकिस्तान दरम्यान हवाई वाहतूक सेवा पूर्ववत झाली. नागरी विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र साडेचार महिन्यांनी खुले झाले आहे.
पाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे, की पहाटे १२.४१ वाजेपासून हवाई क्षेत्र नागरी विमानांसाठी खुले करण्यात येत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या मार्गावर ही वाहतूक खुली करण्यात आली आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्यानंतर भारतानेही आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे.
सरकारी सूत्रांनी सांगितले, की पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्यानंतर आता भारतानेही आपले हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी पाकिस्तानला खुले केले आहे. बंद असलेले हवाई मार्ग वापरण्याची परवानगी मिळताच विमान कंपन्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पाकिस्तानने सर्व विमान कंपन्यांच्या विमानांना पहाटे १२.४१ पासून परवानगी दिल्याने आता नवीन मार्ग वापरण्यास सुरुवात झाली.
पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर त्यांच्या देशातून जाणारे हवाई मार्ग भारताला बंद केले होते. त्यानंतरच्या काळात एकूण ११ मार्गापैकी दक्षिण पाकिस्तानातून जाणारे दोन मार्ग खुले करण्यात आले होते. पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्याने इंडिगो कंपनीला दिल्ली-इस्तम्बूल थेट सेवा सुरू करता आली नव्हती. त्यांना ही सेवा कतारमधील दोहा येथे इंधन भरून लांबच्या मार्गाने द्यावी लागत होती.
राज्य विधानसभेच्या सदस्यत्वाचे दिलेले राजीनामे स्वीकारण्याचे आदेश कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बंडखोर आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या याचिकांवरील सुनावणी मंगळवारी पूर्ण केली. बंडखोर आमदारांचे राजीनामे, त्यांना अपात्र ठरवण्याबाबत जैसे थे स्थिती ठेवावी असा आदेश पीठाने दिला होता तो कायम ठेवावा, अशी मागणी बंडखोर आमदारांच्या वतीने युक्तिवाद पूर्ण करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी केली.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तर १५ बंडखोर आमदारांना पक्षादेशाच्या आधारावर सभागृहात हजर न राहण्याची मुभा द्यावी, कारण सत्तारूढ आघाडीचे सरकारच अल्पमतामध्ये गेले आहे, असेही रोहतगी म्हणाले.
बंडखोर आमदारांचे राजीनामे व अपात्रता याबाबत प्रथम अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगणे आणि त्यानंतर जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश देणे असे दोन अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नाहीत, असे कुमारस्वामी यांनी न्यायालयास सांगितले. अध्यक्षांनी या प्रश्नावर नियोजित वेळेत निर्णय घ्यावा अशी सक्ती अध्यक्षांवर करता येऊ शकत नाही, असे कुमारस्वामी यांच्या वतीने युक्तिवाद करताना वकील राजीव धवन म्हणाले.
घरात पंखे, दिवे, एसी आणि इतर वीजेवर चालणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरण्यासाठी आता ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना वीज पुरवठा होणार आहे. अर्थात केंद्र सरकार आता घरगुती वीज वापरासाठी प्रिपेड सुविधा देशभरात लागू करण्याच्या तयारीत असून वीज वापरानंतर पैसे भरण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील घरांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत.
केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी या योजनेबाबत सांगितले की, भारत आता वीज क्षेत्रात एक नवी व्यवस्था निर्माण करु पाहत आहे, यामध्ये वीज ग्राहकांना आधीच वीज मंडळाकडे पैसे भरावे लागतील त्यानंतरच त्यांना वीज वापरता येणार आहे. तसेच राज्यांना समाजातील गरीब वर्गाला मोफत वीज देण्याचा पर्यायही खुला असणार आहे. मात्र, यासाठी त्यांना आपल्या बजेटमधून वीज वापराचे पैसे भरावे लागतील. अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.
वीज निर्मितीसाठी मोठा खर्च होत असतो, त्यामुळे ग्राहकांनी यापुढे वीज वापरानंतर पैसे देता येणार नाहीत तर आधीच पैसे दिल्यानंतर वीज वापरता येईल. गुंतवणूक केल्याशिवाय तुम्हाला वीज निर्मिती करता येत नाही. त्यामुळे मोफत वीज असा काहीही प्रकार नसतो. त्यामुळे राज्य सरकारांनी जरी जनतेला मोफत वीज देण्याचे आश्वासन दिलेले असले तरी या आश्वासनांची पूर्तता करताना त्यांनी आपल्या बजेटमधून वीजेचा खर्च करावा, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
लोकसभेत सोमवारी एनआयए संशोधन विधेयक 2019 पारित करण्यात आले. मोठ्या चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक पारित करण्यात आले. या विधेयकामुळे एनआयएची कक्षा रूंदावणार आहे. दरम्यान, आज संपूर्ण जगाला आणि भारताला दहशतवादाचा सामना करायचा असल्याचे गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. तपास यंत्रणांना अधिक सक्षम करणं हे या विधेयकाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
काय आहेत महत्त्वाच्या बाबी - या विधेयकामुळे एनआयएच्या कक्षा देशातच नाही तर देशाबाहेरही रूंदावणार आहेत. देशाबाहेर भारतीयांवर दहशतवादी हल्ले झाल्यास, तसेच भारतीय हितसंबंध असलेल्या ठिकाणी हल्ले झाल्यास सदर ठिकाणी एएनआयला तपास करता येणार आहे. दरम्यान, एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला आपण दहशतवादी नसल्याचेही सिद्ध करावे लागणार आहे.
एनआयएला दहशतवादा व्यतिरिक्त मानवी तस्करीशी निगडीत तपासाचे अधिकार देण्यात येणार असल्याचेही विधेयकात म्हटले आहे. एनआयएला अतिरिक्त अधिकार देण्यात आले आहेत. त्यांना आता सायबर गुन्ह्यांचाही तपास करता येणार आहे.
भारताबाहेर भारतीय नागरिकांविरोधात तसेच भारताचे भारताचे हितसंबंध बिघडतील अशी कृती करणाऱ्यांविरोधातही एनआयएला कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. एनआयएला बनावट नोटांसंबंधीत गुन्ह्यांच्या तपासाचेही अधिकार देण्यात आले आहेत.
एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स अॅक्ट, 1 9 08 च्या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांच्या तपासणीसाठी एनआयएला सक्षम करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : संसद अधिवेशन सुरु असताना दोन्ही सभागृहांत गैरहजर राहाणाºया केंद्रीय मंत्र्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले आहेत. अशा मंत्र्याची नावे मोदींनी भाजप नेतृत्वाकडून मागवून घेतली. कर्तव्य टाळणाºया भाजप सदस्यांना मोदी यांनी खडसावण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.
भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत मोदी म्हणाले की, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ जुलै रोजी संपणार असले तरी गरज भासल्यास त्याची मुदत वाढविण्यातही येऊ शकते. संसदेत कामकाज सुरू असताना केंद्रीय मंत्र्यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून संसदेच्या एकातरी सभागृहात उपस्थित राहाणे आवश्यक आहे. त्यांना नेमून दिलेले कामकाज या मंत्र्यांनी पार पाडलेच पाहिजे.
या बैठकीनंतर त्यातील कामकाजाची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली. मोदी म्हणाले की, भाजप खासदारांनी आपापल्या मतदारसंघांच्या विकासासाठी तसेच क्षयरोग, कुष्ठरोग निवारणासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी झटावे. महात्मा गांधी यांनी त्या दिशेने केलेल्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी.
क्षयरोगाचे जगातून २०३० सालापर्यंत उच्चाटन करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. मात्र त्याच्या दोन वर्षे आधीच हे ध्येय भारताला साध्य करायचे आहे. सार्वत्रिक निवडणुकांत लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाजप खासदारांची संख्या मोठी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावण्याबरोबरच जनतेच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीही सजग राहावे. काम हीच या खासदारांची ओळख बनली पाहिजे.
नवी दिल्ली : भारताचा नेमबाज विजयवीर सिद्धू याने जर्मनीच्या सुहल येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक ज्युनिअर नेमबाजीत मंगळवारी राजकंवरसिंग आणि आदर्शसिंग यांच्यासोबतीने पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकले. विजयवीरचे हे तिसरे सुवर्ण ठरले.
भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून, ७ सुवर्णांसह एकूण १६ पदकांची कमाई झाली. भारताला दुसऱ्या दिवशी दुसरे पदक पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात हृदय हजारिका, यशवर्धन आणि पार्थ माखिजा यांच्या संघाने मिळवून दिले.
या तिघांनी १८७७.४ गुणांसह रौप्य जिंकले. चीनला सुवर्ण मिळाले. या दरम्यान चीनने विश्वविक्रमाची देखील बरोबरी केली. ज्युनिअर विश्व चॅम्पियन हृदयला दहा मीटर एअर रायफल प्रकारात धक्का बसला.
आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन
महत्वाच्या घटना
१८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
१८१९: अॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
१८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९१७: किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
१९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
१९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले.
१९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
१९७६: कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९९३: तेलुगू भाषेतील तेलुगू थल्ली हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.
१९९४: विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
२०००: अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्य शिखरमणी पुरस्कार जाहीर.
२००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.
जन्म
१८८९: अमेरिकन लेखक अर्लस्टॅनले गार्डनर यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९७०)
१९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९७८)
१९१८: ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष कार्लोसमनुएल अराना ओसोरिया यांचा जन्म.
१९१९: संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २००७)
१९२३: कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक जॉन कूपर यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २०००)
१९३०: दलित साहित्यिक बाबूराव बागूल यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च २००८)
१९५४: जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मेर्केल यांचा जन्म.
मृत्यू
१७९०: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अॅडम स्मिथ यांचे निधन. (जन्म: ५ जून १७२३)
१९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९१४)
१९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६)
२००५: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर एडवर्ड हीथ यांचे निधन.
२०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२८)
२०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.