चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ ऑगस्ट २०१९

Date : 17 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतातल्या 'या' राज्यात आहे महात्मा गांधींचं भव्य मंदिर; दररोज तीनदा होते पूजा :
  • महात्मा गांधींना देशाचे राष्ट्रपिता संबोधले जाते. भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

  • कर्नाटकातल्या मंगळुरूमध्येही गांधीजींचं एक मंदिर आहे. गांधींचं हे मंदिर विशेष आहे. या मंदिरात गांधीजींची मूर्ती असून, दिवसातून तीनदा तिथे पूजा केली जाते.

  • महात्मा गांधींची अनुयायी या मंदिरात येतात आणि त्यांनी दाखवलेल्या अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात.

  • 1948मध्ये मातीतून गांधीजींची मूर्ती साकारण्यात आली होती. 2006मध्ये जनतेच्या मागणीखातर मंदिराचं निर्माण करण्यात आलं.

  • तसेच गांधीजींच्या मूर्तीसमोर दररोज दिवा लावला जातो. गांधी जयंतीला या मंदिरात विशेष पूजेचं आयोजन केलं जातं. फळ आणि गोडधोडासह गांधीजींच्या प्रतिमेला ब्लॅक कॉफी अर्पण केली जाते. त्यानंतर ते भक्तांमध्ये प्रसादाच्या स्वरूपात वाटण्यात येते.

काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत गुप्त चर्चा - संपूर्ण जगाचं परिषदेकडे लक्ष :
  • नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने वेगेवगळ्या देशांकडे धाव घेतली आहे. संयुक्त राष्ट्र संघातही हा मुद्दा घेऊन जाण्यासाठी खटाटोप केले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याप्रकरणी विशेष सत्र बोलवण्याची विनंती संयुक्त राष्ट्राला केली होती.

  • पाकने सुरक्षा समितीचा अध्यक्ष देश पोलंडला पत्रही लिहीलं होतं. या कामात पाकला नेहेमीप्रमाणेच चीनची साथ मिळाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) बंद दाराआड चर्चा व्हावी, अशी मागणी चीनने केली होती. चीन या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य आहे. त्यानुसार उद्या या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • रशियाने भारताने घेतलेला निर्णय घटनात्मक असल्याचे सांगत भारताला पाठिंबा दिला आहे, तर संयुक्त अरब अमिरातीनेही हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे मान्य केले आहे. तर भारताने आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचं उल्लंघन केलं नसल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत पाकिस्तान युद्ध झालं तर त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल, असे म्हणत एकप्रकारे धमकी दिली आहे.

  • या आधी 1971 च्या बांग्लादेश युद्धाच्या वेळी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात चर्चिला गेला होता, त्यातूनच पुढे सिमला कराराची बीजं रोवली गेली होती. आता सुरक्षा परिषदेत उद्या गुप्त चर्चा झालीच तर त्यात नेमकं काय होईल याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष असणार आहे.

ग्रीनलँड बेट विकत घेण्याचा ट्रम्प यांचा विचार :
  • वॉशिंग्टन : डेन्मार्कचा स्वयंशासित असलेला ग्रीनलँड हा प्रदेश विकत घेण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडला आहे. हा प्रदेश बर्फाच्छादित असून ट्रम्प यांनी त्यांच्या सल्लागारांना तो विकत घेण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत. दी वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत माहिती दिली असून चर्चेत सहभागी व्यक्तींचा हवाला दिला आहे.

  • ग्रीनलँड हा नैसर्गिक साधनांनी परिपूर्ण प्रदेश असून त्याचे भूराजकीय महत्त्वही मोठे आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वयंशासित भाग असून त्याचे क्षेत्रफळ ७७२००० चौरस मैल म्हणजे २० लाख चौरस किलोमीटर आहे. हे बेट १८ व्या शतकातील असून तेथे ५७ हजार लोक राहतात. ते तेथील मूळ इन्युट समुदायाचे आहेत. ग्रीनलँड बेट विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाबाबत व्हाइट हाऊसने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • डेन्मार्कच्या दूतावासानेही एएफपी या वृत्तसंस्थेने प्रतिक्रिया मागितली असता ती दिलेली नाही. ट्रम्प यांच्या सल्लागारांनी त्यांना असे सांगितले होते,की कॅनडाच्या ईशान्येला असलेले ग्रीनलँड बेट साधनसंपत्तीने परिपूर्ण असून ते अमेरिकेसाठी फायद्याचे आहे. काहींच्या मते अध्यक्ष ट्रम्प यांनी मांडलेली ती एक कल्पना आहे. व्हाइट हाऊस बाहेरील सूत्रांनी सांगितले,की ट्रम्प यांना तेथे कायदेशीर ताबा हवा असावा. अमेरिकेचा खुला हवाईतळ हा ग्रीनलँडमध्येच आहे.

  • ग्रीनलँडमध्ये हिरवाई आहे अशातला भाग नाही, तेथील ८५ टक्के भाग हा १.९ मैल जाडीच्या (तीन किलोमीटर) बर्फाने आच्छादलेला आहे. त्या बर्फात जगातील १० टक्के पाणी आहे. जगातील सर्वात मोठे बेट असलेल्या ग्रीनलँडला हवामान बदलांचा फटका बसला असून वैज्ञानिकांच्या मते तेथील  बर्फ वितळत आहे. त्यामुळे जगातील किनारी भाग पाण्याखाली जातील. जुलैत ग्रीनलँडमधील बर्फ वितळले असून १२ अब्ज टन बर्फ सागरात आले आहे. ट्रम्प यांनी २०१७ मध्ये पॅरिस हवामान करारातून माघार घेतली होती. ते सप्टेंबरमध्ये कोपनहेगनला भेट देणार आहेत.

चोरीला गेलेल्या प्राचीन मूर्ती इंग्लंडकडून भारताला परत :
  • भारतातून अनेक वर्षांपूर्वी चोरीला गेलेली आणि दोन हजार वर्षे प्राचीन असलेली एक तर सतराव्या शतकातील एक अशा दोन कृष्ण मूर्ती इंग्लंडने भारताला परत केल्या आहे. एक मूर्ती चुनखड्यापासून तर दुसरी मूर्ती नवनीत कृष्ण ही आहे. नवनीत कृष्ण ही मूर्ती कांस्य धातूची आहे तसेच ती सतराव्या शतकातली आहे असेही समजते आहे. तर चुनखड्यापासून तयार करण्यात आलेली मूर्ती ही दोन हजार वर्षे प्राचीन आहे असेही सांगण्यात आले आहे.  भारताच्या उच्चायुक्त रुची घनश्याम यांच्याकडे या मूर्ती सुपूर्द करण्यात आल्या. १५ ऑगस्टच्या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी या दोन्ही मूर्ती परत करण्यात आल्या. अमेरिका आणि ब्रिटनच्या एका सर्च टीमने या दोन्ही मूर्तींचा शोध लावला.

  • १५ ऑगस्टच्या दिवशी लंडन येथे असलेल्या गांधी हॉल ऑफ इंडिया हाऊसमध्ये झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर या दोन्ही मूर्ती सुपूर्द करण्यात आल्या. या मूर्तींचं मूल्य ठरवता येणार नाहीत कारण त्या अमूल्य आहेत. या कलाकृती भारतात परत येणं हे अमेरिका आणि ब्रिटन यांचं भारतासोबत असलेल्या मैत्री प्रतीक आहे असं मत घनश्याम यांनी व्यक्त केलं. हिंदुस्थान टाइम्सने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

  • प्राचीन वस्तूंची तस्करी करणाऱ्या सुभाष कपूर यांनीच या मूर्ती चोरल्या असाव्यात असा आरोप होता. मात्र लंडनमध्ये ज्या एका व्यक्तीकडे ही शिल्प आढळली. या व्यक्तीचं नाव प्रशासनाने बाहेर येऊ दिलेलं नाही. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधून या दोन मूर्ती चोरीला गेल्या होत्या अशीही माहिती समोर आली आहे.

कुस्तीपटू बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन :
  • भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याला यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा हा भारतातील सर्वोच्च सन्मान आहे. गेल्या वर्षी बजरंगला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळू शकलेले नव्हते. पण गेल्या वर्षभरात त्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला यंदा सर्वोच्च पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

  • १२ सदस्यीय निवड समितीने त्याच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या समितीतीत सर्व सदस्यांनी एकमताने पुनियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत बायचूंग भुतिया, मेरी कोम यांसारखी क्रीडा क्षेत्रातील नावे आहेत.

  • १२ सदस्यीय निवड समिती खेलरत्न पुरस्कारासाठी आणखी एका आघाडीच्या क्रीडापडटूचे नाव सुचवू शकते. आजपासून खेलरत्न, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कारासाठी निवड समिताची २ दिवसाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीअंती शनिवारी काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात अशी माहितीही सांगण्यात येत आहे. दिव्यांग भालाफेकपटू दीपा मलिक हिचेही नाव खेलरत्न पुरस्कारासाठी चर्चिले जात आहे.

मराठवाडय़ासाठी १६,००० कोटींची ‘जलसंजाल’ योजना :
  • मराठवाडय़ातील दुष्काळाची तीव्रता वाढून त्याची वाटचाल वाळवंटीकरणाकडे होत असताना सरकारने या भागासाठी १६ हजार कोटी रुपयांची बंद नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच देशातील बहुतांश भागात तीन वर्षांत बंद नळातून  पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले असताना मराठवाडय़ाला पाणीपुरवठा करण्यासाठी ११ प्रमुख धरणातून हजारो कि.मीची बंद पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे ही धरणे जोडली जाणार आहेत. यात जलशुद्धीकरण प्रकल्प व पंपिंग स्टेशन या सुविधांचाही यात समावेश आहे.

  • मराठवाडयातील पाच जिल्ह्य़ांत मोसमी पावसाची तूट २० ते ४२ टक्के असून महाराष्ट्राच्या इतर भागात पूरस्थिती आहे.

  • सोळा हजार कोटींची नवी योजना ‘मराठवाडा जलसंजाल’ नावाने ओळखली जाणार असून त्याच्या पहिल्या निविदा या आठवडाभरात निघणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात ४५२७ कोटींच्या कामांचा समावेश आहे. मराठवाडय़ातील एकूण ११ प्रमुख धरणे यामुळे जोडली जाणार असून त्यासाठी १.६ मी. ते २.४ मी व्यासाची पाईपलाईन वापरली जाणार आहे. प्राथमिक जाळ्यात अतिरिक्त पाणीसाठा असलेल्या धरणातील पाणी फिरवले जाणार आहे. ते कमी पातळीच्या धरणात आणले जाईल. सध्या जायकवाडी या मोठय़ा धरणाचे दरवाजे थोडेसे उघडण्यात आले आहेत, पण इतर १०  धरणात पाण्याचा मृत साठाच शिल्लक आहे. आताच्या या प्रकल्पाचा हेतू हा  दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आहे.

  • या भागात नेहमीच दुष्काळ असतो, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलारसू यांनी सांगितले.  ते म्हणाले, की मराठवाडा जलसंजाल हे या भागाची परिस्थिती एकदम बदलून टाकील यात शंका नाही. पाइपलाइन व पंप हाऊस यामुळे हे संजाल हे वीज संजालासारखे काम करील. जास्त पाणी असलेल्या धरणांचे पाणी प्रक्रिया करून नंतर टंचाई असलेल्या तालुक्यांना दिले जाईल. जवळच्या धरणात आणून हे पाणी तालुक्यांना दिले जाणार आहे. ५ कि.मी ते १० कि.मी अंतरात यातील टॅपिंग केले जाईल. मराठवाडा जल संजालास कोकणातील पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणीही मिळणार आहे, जे सध्या अरबी समुद्रात वाहून जाते. कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणीही यात समाविष्ट केले जाईल.

दिनविशेष :
  • महत्वाच्या घटना 

  • १६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.

  • १८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.

  • १९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.

  • १९५३: नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.

  • १९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.

  • १९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.

  • १९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.

  • २००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

जन्म 

  • १७६१: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८३४)

  • १८४४: इथियोपियाचा सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म.

  • १८६६: हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)

  • १८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.

  • १८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)

  • १९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)

  • १९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)

  • १९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.

  • १९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.

  • १९४४: ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.

  • १९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.

  • १९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.

  • १९७२: बांगला देशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.

  • १८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)

  • १९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)

  • १९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.

  • १९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.