चालू घडामोडी - १६ नोव्हेंबर २०१८

Date : 16 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
काश्मीर सांभाळण्याची पाकची कुवत नाही - शाहिद आफ्रिदी :
  • लंडन : काश्मीर सांभाळण्याची पाकिस्तानची कुवत नाही. काश्मीरची मागणी करण्याऐवजी पाकिस्तानमधील परिस्थितीकडे लक्ष दिले जावे, असं खळबळजनक वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत आफ्रिदी बोलत होता.

  • "काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी संवेदनशील आहे. काश्मीरचा आपल्या देशात समावेश व्हावा अशी इच्छा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील नागरिक आणि राजकर्त्यांची इच्छा आहे. परंतु स्वतःचा देश सांभाळणे पाकला जड जात आहे," असं वक्तव्य करुन शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घरचा आहेर दिला आहे.

  • आफ्रिदी पुढे म्हणाला की, देशाची परिस्थिती ठीक नसताना काश्मीरची मागणी करणे योग्य नाही. तसेच काश्मीरचा भारतातही समावेश केला जाऊ नये. त्याऐवजी काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करावे. तसे केल्यास तिथली माणुसकी कायम राहील. जे लोक मरत आहेत ते मरणार नाहीत.

अॅपलचे फोन वापरू नका, अन्यथा...! फेसबुकची कर्मचाऱ्यांना तंबी :
  • सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांना अॅपलचा आयफोन वापरावर बंदी आणली आहे. हे कर्मचारी आता अँड्रॉईडचा मोबाईल वापरत आहेत. हे आदेश खुद्द फेसबुकचा मालक मार्क झकरबर्गने दिले असून अॅपलच्या सीईओनी फेसबुकवर टीका केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

  •  न्यूयॉर्क टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. अॅपलच्या सीईओ टीम कूक यांनी MSNBC मध्ये एका मुलाखतीदरम्यान फेसबुकवर टीका केली होती. केम्ब्रिज अॅनालिटीका प्रकरणी कूक यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी आम्ही असतो तर अशी परिस्थिती होऊच दिली नसती. खासगी आयुष्यात अॅपल कधीच घुसली नाही. खासगीपणा हा मानवी अधिकार आहे आणि स्वातंत्र्यही. फेसबुक युजर्सच्या माहितीद्वारे पैसा कमावते. अॅपल असे कधीच करत नाही. 

  • टीम कूक यांच्या या वक्तव्यानंतर  मार्क झकरबर्ग नाराज असून त्यांनी थेट आपल्या कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. अॅपलचा फोन वापरायचा असेल तर नोकरी सोडा, अन्यथा अँड्रॉइडचा फोन वापरण्याची तंबीच त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. तसेच अॅपलपेक्षा अँड्रॉइडवर फेसबुकची अॅप वापरणाऱ्यांची संख्याही जादा असल्याचे म्हटले आहे. 

  • दरम्यान, या पार्श्वभुमीवर या अमेरिकेच्या दोन मोठ्या कंपन्यांमधील वाद आणखी काही महिने सुरु राहण्याची शक्यता आहे.

भारतमातेचा जयघोष करणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे: उपराष्ट्रपती :
  • फक्त ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’ असा जयघोष करणे म्हणजे देशप्रेम नाही. प्रत्येकाने स्वत:चे काम प्रामाणिकपणे केले तर ते खरे देशप्रेम ठरते, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. भारतात गुरुची जागा गुगल कधीच घेऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

  • उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे गुरुवारी मुंबईत होते. जमनालाल बजाज वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते उपस्थित होते. या प्रसंगी नायडू म्हणाले, फक्त ‘भारत माता की जय’ बोलणे किंवा चित्रपट पाहून आल्यावर सिनेमागृहाबाहेर जय हिंदच्या घोषणा देणे म्हणजे देशप्रेम नाही.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मते देशप्रेम म्हणजे प्रत्येकाने स्वत:चे काम प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करणे हे आहे. भारत माता की जय म्हणजे देशातील १३० कोटी जनतेचा विकास करणे. देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा हाच खरा अर्थ आहे, असे त्यांनी सांगितले.

  • नायडू यांनी भाषणात ‘स्वदेशी’वरही भर दिला. परकीय गुंतवणुकीच्या काळात आपण देशातील छोट्या उद्योजकांनाही मदत केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आधी एकत्रित कुटुंबपद्धती होती. आता देशात विभक्त कुटुंबपद्धती वाढली आहे. यामुळे समाजाची पिछेहाट होत आहे. गुरुची जागा गुगल कधीच घेऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘टॉक्सिक’ हा ऑक्स्फर्डच्या मते २०१८चा प्रातिनिधिक शब्द :
  • लंडन : जगप्रतिष्ठित ऑक्स्फर्ड शब्दकोशाने २०१८चा ‘वार्षिक शब्द’ म्हणून ‘टॉक्सिक’ या शब्दाची निवड केली आहे. जो शब्द त्या वर्षांतील समाजवास्तवाचे प्रतिनिधित्व करतो त्याची निवड दरवर्षी ऑक्स्फर्ड दरवर्षी ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून करते.

  • या वर्षी अनेक शहरांतले वातावरण प्रदूषणाने विषारी होते, राजकीय क्षेत्रही विषारी वक्तव्यांनी दूषित होते आणि ‘मीटू’सारख्या मोहिमेनेही विषारी पौरुषाचा प्रथमच उल्लेख केला. त्यामुळे हा शब्द या वर्षभरात विविध संदर्भात सातत्याने वापरात आल्याने त्याची निवड झाली.

  • ‘गॅसलाइटनिंग’, ‘इन्सेल’, ‘टेकलॅश’ आणि ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ हे शब्द निवड समितीसमोर अंतिम फेरीत आले होते. जगभर खळबळ उडवून दिलेल्या ‘मी टू’ मोहिमेने ‘टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी’ अर्थात विषारी पौरूष हा शब्द जन्माला घातला होता आणि तो सर्वाधिक प्रचलितही झाला. त्यामुळे या शब्दावर सर्वाचेच एकमत झाले. मात्र त्याचवेळी ‘टॉक्सिक’ हा शब्दच या वर्षांत कितीतरी संदर्भात वापरला गेल्याचा मुद्दा पुढे आला.

  • या वर्षांतील राजकीय नेत्यांची वाक् शैली विषारी झाली आहे, वातावरणाचा दर्जा विषारी झाला आहे आणि ‘मी टू’चा जन्म ज्या लिंगविखारी प्रवृत्तीविरोधात झाला त्या प्रवृत्तीतून बोकाळलेला विषारी मनोभाव.. अशा सर्वच पातळ्यांवर ‘टॉक्सिक’ हा शब्द अमर ठरला.

पृथ्वीच्या आणखी एका शेजाऱ्याचा शोध :
  • पॅरिस : खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या नव्या शेजाऱ्याचा शोध लावला आहे. हा नवा ग्रह पृथ्वीपासून अवघी सहा प्रकाश वर्षे दूर आहे. तो सूर्यमालेबाहेर असला तरी सूर्याच्या कक्षेजवळ आहे.

  • हा ग्रह अतिशीत आहे. त्यावर बर्फाचे जाड आवरण आणि त्या खाली पाण्याचा थर आहे. तेथील वातावरण अतिशीत असले तरी तेथे जीवसृष्टी असावी, अशी आशा संशोधकांना आहे. या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा 3.2 पटीने जास्त आहे. परंतु, ज्या सूर्याभोवती हा ग्रह फिरतो त्याचे वय आपल्या सूर्यापेक्षा दुप्पट असल्याने तो या ग्रहाला पुरेसा प्रकाश देऊ  शकत नाही.

  • या ग्रहाला बर्नार्ड स्टार बी या नावाने संबोधले जाते. तो पृथ्वीपासून जवळ असलेला दुसरा ग्रह आहे. त्याच्याविषयी माहिती देताना ‘इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडिज ऑफ कॅटालोनिया अ‍ॅण्ड स्पेन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स’च्या इग्नासी रिबास म्हणाले की हा ग्रह आपला शेजारी आहे. त्यावर जीवसृष्टीची शक्यता नाही.  तेथे वायू किंवा पाणी घनरूपात आहे.

  • .. अखेर संशोधनाला यश खगोल शास्त्रज्ञांनी १९९५मध्ये या ग्रहाविषयी संशोधन सुरू केले होते. त्याचा अभ्यास करण्यासाठी ५० संशोधक आणि २५ खगोल शास्त्रज्ञांच्या चमूने २० वर्षे संशोधन केले. विविध देशांतील दुर्बीणींनी घेतलेल्या छायाचित्रांनंतर या ग्रहाची गुपिते उलगडण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.

  • १८९३: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.

  • १९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.

  • १९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.

  • १९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.

  • १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

  • १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.

  • १९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.

  • १९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.

  • २०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.

  • २०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.

जन्म 

  • १८९४: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी१९७५)

  • १८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)

  • १९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)

  • १९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.

  • १९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००६)

  • १९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९९७)

मृत्यू 

  • १९५०: अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे एक संस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)

  • १९६७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९१७)

  • २००६: नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१२)

  • २०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.