चालू घडामोडी - १६ जानेवारी २०१८

Date : 16 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वरिष्ठ अधिका-यांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नाही :
  • मुंबई : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता केली आहे. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणार नाही, अशी ठाम भूमिका सीबीआयने उच्च न्यायालयात सोमवारी घेतली.

  • कनिष्ठ अधिका-यांच्या आरोपमुक्तीच्या आदेशाला सीबीआयने आव्हान दिले आहे. मात्र वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणार नाही, असे अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंग व संदेश पाटील यांनी सीबीआयतर्फे न्या. रेवती मोहिते-डेरे यांना सांगितले.

  • सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी २०१६ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने गुजरातचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक डी.जी. वंजारा, राजस्थानचे आयपीएस अधिकारी दिनेश एम.एन. आणि गुजरातचे आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांची आरोपातून मुक्तता केली. त्यांच्यावर खटला भरण्यासाठी सीबीआयने पूर्वमंजुरी घेतली नसल्याने विशेष न्यायालयाने या तिघांना आरोपमुक्त केले.

  • या निर्णयाला सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. दिनेश एम.एन. व पांडियन यांना नोटीस पाठवली असून वंजारा यांनाही नोटीस पाठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधू शकत नसल्याचे शेख याचे वकील गौतम तिवारी यांनी न्यायालयाला सांगितले. याआधीही न्यायालयाने सीबीआयला वंजारा यांच्या ठावठिकाण्याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. परंतु, सीबीआयने चुकीचा पत्ता दिल्याची बाब तिवारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. (source :lokmat)

विराटने १५० रन्स पत्नीला केले डेडिकेट, वेडिंग रिंगला किस करून साजरा केला आनंद :
  • सेंच्युरिअन- सेंच्युरिअनमध्ये सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कॅप्टन कोहलीच्या विराट खेळीमुळे टीम इंडियाला पुन्हा ट्रॅकवर आणून ठेवलं. पहिल्या डावात आफ्रिकेच्या 335 धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था 5 आऊट 182 अशी बिकट झाली होती.

  • पण, विराट कोहलीने हार्दिक पंड्या आणि आर. अश्विन यांना साथीला घेत भारतीय संघाचा डाव सावरला. विराटने मॉर्ने मॉर्केलला चौकार ठोकत दिमाखात १५० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर विराटने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. त्याने दीडशतक पूर्ण झाल्यानंतर आपल्या वेडिंग रिंगला किस केलं. विराटच्या या कृतीने त्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावरही विराटच्या या कृतीची चर्चा रंगली आहे.

  • डिसेंबर महिन्यात कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. तेव्हापासून विराट आणि अनुष्का सातत्याने चर्चेत आहेत. आफ्रिकेतील पहिल्या कसोटीत विराटला योग्य खेळी करता आली नाही.

  • तसंच, दुसऱ्या कसोटीतील संघ निवडीवरूनही त्याच्यावर टीका करण्यात आली. पण, विराटने त्याच्या उत्कृष्ट बॅटिंगने सगळ्या चर्चांना व  टीकेला पूर्णविराम देत उत्तर दिलं. 150 रन्स पूर्ण झाल्यानंतर विराट मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर लगेच बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव 307 धावांवर आटोपला. (source :lokmat)

31 जानेवारीला चंद्र लाल, चंद्रग्रहण; अवकाशात अद्भूत दृश्य :
  • मुंबई : खगोलप्रेमींसाठी 2018 वर्षातील जानेवारी महिना पर्वणीचा आहे. कारण या महिन्यात दिसणारा चंद्र नेहमीप्रमाणे नसेल. खगोलप्रेमींना सुपरब्लू, ब्लू मूनसह चंद्रग्रहण आणि लाल चंद्रही पाहायला मिळणार आहे. खगोलीय भाषेत याला 'ब्लड मून' म्हटलं जातं.

  • 31 जानेवारी रोजी चंद्र लाल रंगाचा असेल. पण याचवेळी खग्रास चंद्रग्रहण असा 20 वर्षात एकदा येणारा दुर्मिळ योगही आहे. पृथ्वीच्या कक्षेतून फिरताना चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ पोहोचलेला असतो आणि त्याचवेळी चंद्रग्रहण झालं तर लाल चंद्राचा योग जुळून येतो. खगोल शास्त्रज्ञांनी याला 'स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स' असं नाव दिलं आहे.

  • बहुतांश चंद्रग्रहणं ही खंडग्रास स्वरुपाची असतात. पण 31 जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतात हे चंद्रग्रहण अर्धच दिसणार आहे. सकाळी 6.20 वाजता चंद्र ग्रहणाला सुरुवात होईल. तर 9.30 वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. खग्रास चंद्रग्रहण फक्त पॅसिफिक महासागरातून दिसणार आहे.(source :abpmajha)

विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन
  • पुणे - विधान परिषदेचे माजी सभापती  ना. स. फरांदे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूतून रक्तस्राव सुरू झाला होता. यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

  • ना.स. फरांदे यांचा राजकीय प्रवास - मूळचे सातारा जिल्ह्यातील अोझरडे येथील असलेले फरांदे यांचे उच्च शिक्षण सोलापूर येथे झाले. सुरूवातीला त्यांनी धुळे व नंतर नगर जिल्हयातील कोपरगाव येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कोपरगावला प्राध्यापक असताना ते राजकारणात आले. नगर जिल्हा भाजपाचे ते अध्यक्ष होते. नंतर त्यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही सूत्रं सांभाळली.

  • नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले. विधान परिषदेचे उपसभापती व सभापती ही दोन्ही पदे त्यांनी भूषविली. त्यांनी नगरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. पण त्यात अपयश आले. 

एका नव्या युगाची सुरुवात, भारत- इस्रायलमध्ये 9 करार :
  • नवी दिल्ली- सहा दिवसांच्या भारताच्या दौ-यावर असलेल्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा दुसरा दिवस फार विशेष ठरला आहे. नेतान्याहू आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

  • भारत आणि इस्रायलदरम्यान 9 सामंजस्य करारांवर सहमती झाल्याची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी एकमेकांवर जोरदार स्तुतिसुमनं उधळली आहेत. मोदी इस्रायलच्या दौ-यावर होते, त्यावेळी त्यांचा कार्यक्रम हा एखाद्या रॉक कॉन्सर्टसारखाच झाला होता, असंही बेंजामिन नेतान्याहू म्हणाले आहेत.  

  • दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संयुक्तरीत्या काम करण्यावर सहमती झाली आहे. सायबर सुरक्षेशिवाय चित्रपट निर्मिती, पेट्रोलियम, इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्ट इस्रायल यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत. मला आशा आहे की, दोन्ही देशातील लोक एकमेकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतील. 

  • भारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे, अशी भावना यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्यानंतर मी भारताचा दौरा केला. माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी इस्रायलच्या नागरिकांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

  • दोन्ही देशांमध्ये समृद्धी, शांती आणि  प्रगतीसाठी मिळून काम करूया, असं यावेळी नेतन्याहू यांनी म्हंटलं. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नेतन्याहू व त्यांच्या पत्नीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. 

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला.

  • १६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.

  • १९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.

  • १९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.

  • १९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.

  • १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण.

  • १९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन.

  • १९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द.

  • १९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.

  • १९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.

  • १९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड.

  • १९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

  • २००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या पीपल्स कारचे अनावरण.

जन्म

  • १८५३: मिचेलीन टायर्स कंपनी चे संस्थापक फ्रेन्च उद्योगपती आंद्रे मिचेलिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)

  • १९२०: कायदेपंडित आणि अर्थतज्ञ नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)

  • १९२६: संगीतकार ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी २००७)

  • १९४६: चित्रपट अभिनेते कबीर बेदी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०९: समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८४२)

  • १९६६: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)

  • १९६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)

  • १९८८: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)

  • १९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या.

  • २०००: मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत त्रिलोकीनाथ कौल यांचे निधन.

  • २००३: सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक रामविलास जगन्नाथ राठी यांचे निधन.

  • २००५: संगीतकार, पेटीवाले मेहेंदळे उर्फ श्रीकृष्ण हरी मेहेंदळे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.