चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ ऑगस्ट २०१९

Date : 16 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इस्रोच्या प्रमुखांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान :
  • इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. सिवन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकारने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. गुरूवारी त्यांना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

  • विज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • के सिवन यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. त्यांनी तामिळनाडूतील एका सरकारी शाळेतून तामिळ भाषेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते शेतात आपल्या वडिलांचीही मदत करत असत. याच कारणामुळे त्यांना आपल्या घराजवळच असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला होता.

  • त्यांनी गणित हा विषय घेऊन आपलं बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं. हलाकीच्या परिस्थितीमुळे लहानपणी त्यांना पायात कधीही चपला किंवा बूट घालता आले नव्हते. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण धोतर घालूनच जात होतो, असंही त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. एमआयटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पँट परिधान केली होती.

पर्यटकांनाही मोदींप्रमाणे घेता येणार ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’चा अनुभव, उत्तराखंड सरकारची योजना :
  • उत्तराखंड पर्यटन विभागाने आता जास्तीत जास्त पर्यटकांना जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाकडे आकर्षित करण्यासाठी नवीन कल्पना अंमलात आणण्याचे ठरवले आहे. या राष्ट्रीय उद्यानामध्ये ‘मोदी ट्रेल’ विकसित केला जाणार आहे. उत्तराखंड पर्यटन विभागाने यासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी घोषणा केली असून लवकरच या संदर्भातील काम पूर्ण करणयात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमातील विशेष भागामध्ये साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाटेने गेले तो मार्ग ट्रेकिंगसाठी ‘मोदी ट्रेल’ नावाने विकसित केला जाणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांनाही मोदींप्रमाणे या जंगलाचा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ अनुभव घेता येणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी (१२ ऑगस्ट रोजी) प्रदर्शित झाला.

  • “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स ज्या मार्गाने जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये गेले तो मार्ग ‘मोदी ट्रेल’ नावाने विकसित केला जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानामध्ये भटकंतीसाठी येणाऱ्यांना या मार्गाने जाण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या ट्रेलची वेगळी जाहिरात आणि प्रसिद्धीही केली जाणार आहे,” अशी माहिती उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्यपाल महाराज यांनी दिली.

  • “जंगलामधील भटकंतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी साहस आणि शौर्य दाखवले. मोदी ज्या मार्गाने गेले तो ट्रेकिंगचा मार्ग योग्य पद्धतीने विकसित केल्यास उद्यानाकडे अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होईल. पर्यटकांनाही मोदी ट्रेलवरुन भटकंती करायला आवडेल. वाघांसाठी आधीच जगप्रसिद्ध असलेल्या या राष्ट्रीय उद्यानाला या मोदी ट्रेलचा नक्कीच फायदा होईल,” असा विश्वास महाराज यांनी व्यक्त केला.

बीपिन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ :
  • लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

  • तीन महिन्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये ही समिती सरकारला आपला अहवाल सोपवेल. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत देशाचे २६ वे लष्करप्रमुख आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये ते निवृत्त होतील. तेच देशाचे पहिले सीडीएस असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. सीडीएस तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना वरिष्ठ असतील कि तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांच्या समान त्यांचा दर्जा असेल ते अजून स्पष्ट झालेले नाही. सीडीएसचा कार्यकाळ किती असेल ते सुद्धा अजून स्पष्ट नाही असे हिंदुस्थान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

  • संरक्षण तज्ञांनी आतापर्यंत अनेकवेळा सीडीएस नियुक्तीची मागणी केली होती. १९९९ साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिल युद्धानंतर सर्व प्रथम ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदाची शिफारस करण्यात आली होती. सीडीएस पंतप्रधान आणि सैन्य दलांमध्ये दुवा साधण्याचे काम करेल. तिन्ही सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

वॉर रुममधून अभिनंदन यांना मार्गदर्शन करणाऱ्या IAFच्या महिला अधिकाऱ्याला ‘युद्ध सेवा मेडल’ :
  • बालाकोट एअर स्ट्राइक आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबरच्या डॉगफाइटमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आयएएफच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती. त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना मार्गदर्शन केले होते. युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

  • मी २६ आणि २७ फेब्रुवारीच्या दोन्ही मिशनमध्ये सहभागी झाले होते. विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान आकाशात झेपावल्यानंतर त्यांच्याबरोबर माझा संवाद चालू होता असे मिंटी अग्रवाल यांनी सांगितले. २७ फेब्रुवारीच्या सकाळी एकूण सात फाईटर कंट्रोलर डयुटीवर तैनात होते. मिंटी अग्रवाल या त्या टीममध्ये होत्या. पाकिस्तानी फायटर विमानांना रोखण्यासाठी आकाशात झेपावलेल्या इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांच्या त्या कंट्रोलर होत्या.

  • आकाशात नेमकी काय स्थिती आहे. पाकिस्तानी फायटर विमान कुठे, कुठल्या दिशेला आहेत त्याची माहिती त्या भारतीय वैमानिकांना देत होत्या. मिंटी अग्रवाल यांनीच विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना माघारी फिरण्यास सांगितले होते. पण पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांमध्ये कम्युनिकेशन सिस्टिम जॅम करण्याची यंत्रणा असल्यामुळे अभिनंदन यांच्यापर्यंत तो संदेश पोहोचलाच नाही. अभिनंदन यांचे विमान आकाशात झेपावल्यानंतर काय चित्र आहे याची मी त्यांना कल्पना दिली होती असे मिंटी अग्रवाल यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रानं काश्मीर मुद्द्याची दखल घ्यावी, पाकच्या कांगाव्यानंतर चीनची मागणी :
  • बीजिंगः भारतानं जम्मू-काश्मीरमधलंकलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. पाकिस्तान वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला फार कोणाचं पाठबळ अद्याप मिळालेलं नाही. परंतु पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीननंही पाकिस्तानच्या आवाजाला प्रतिसाद देत काश्मीरच्या मुद्द्याची दखल घेण्याचं आवाहन केलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं या मुद्द्यावर बैठक बोलवावी, अशी मागणी चीननं आता केली आहे. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तानच्या तक्रारी ऐकाव्यात, असं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात 16 ऑगस्ट रोजी यूएनएससीमध्ये बैठक होणार आहे.

  • मीडिया रिपोर्टनुसार, चीनकडून अधिकृतरीत्या पोलंडला पत्र लिहिण्यात आलं आहे. ऑगस्टमध्ये काऊन्सिल चेअरमनचं अध्यक्षपद त्यांना मिळणार आहे. या प्रकरणात संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याच्या मते, चीनच्या या मागणीचा विचार केला जात आहे. तत्पूर्वी चीनकडून या मुद्द्यावर भारत-पाकिस्ताननं शांतता ठेवण्याची आशा व्यक्त करण्यात आली होती. या मुद्द्यावर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही संयुक्त राष्ट्राला चिठ्ठी लिहिली आहे. त्यानंतर त्यांनी चीनमध्ये जाऊन तिकडच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेटसुद्धा घेतली होती.

  • भारतानं 370 कलम रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा संयुक्त राष्ट्रांच्या नियमांच्या विरोधात आहे, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे अध्यक्ष जोआना रोनेका यांना लिहिलेल्या पत्रात भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यावरील बैठकीत भाग घेण्यासाठी आग्रह केला आहे. दरम्यान, याआधी कलम 370 रद्द केल्याप्रकरणी पाकिस्तानद्वारे लिहिलेल्या पत्रावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदचे अध्यक्ष जोआना रोनेका यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तसेच, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिओ गुटेरस यांनीही याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.

  • १९४६  कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.

  • १९४६: सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली.

  • १९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९६०: सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.

  • १९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.

  • २०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

जन्म 

  • १८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)

  • १९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)

  • १९१३: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९२)

  • १९४८: भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म.

  • १९५०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म.

  • १९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.

  • १९५४: पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.

  • १९५७: भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

  • १९५८: अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म.

  • १९६८: भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

  • १९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्म.

  • १९७०: अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७०५: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १६५४)

  • १८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली. (जन्म: १८ फेब्रुवारी१८३६ – कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल)

  • १८८८: कोका-कोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३१)

  • १९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८७०)

  • १९७७: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९३५)

  • १९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.

  • १९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)

  • २०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ – नवी दिल्ली)

  • २००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.

  • २०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.