चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जुलै २०१९

Date : 15 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंग्लंडचा ‘सुपर’ विजय! क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता :
  • विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

  • नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

  • या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

अंधांना चलनी नोटा ओळखता येण्यासाठी नवे अ‍ॅप :
  • अंधांना चलनी नोटा सहज ओळखता याव्यात, यासाठी एक अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) रिझर्व बँक ऑफ इंडियाने विकसित करण्याचे ठरवले असून सध्यातरी रोखीच्या व्यवहारांना महत्त्व असल्याने त्याचा वापर करता येणार आहे.

  • सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५००, २००० या नोटा चलनात असून एक रुपयाची नोट केंद्राने जारी केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे, की नोटा ओळखणे अंधांना सोपे नसते. त्यामुळे या नोटांमधील खुणांच्या माध्यमातून त्या ओळखणे आवश्यक असते त्यासाठी १०० व त्यावरील चलनाच्या नोटात अंधांसाठी खास ओळख पटवणाऱ्या सुविधा आहेत पण त्या त्यांना माहिती नाहीत. नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरणानंतर पाचशे व हजाराच्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाचशे व दोन हजाराच्या नवीन नोटा चलनात आल्या.

  • अंधांना या नोटा ओळखता याव्यात यासाठी रिझर्व बँक प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी मालिका व महात्मा गांधी नवी मालिका यातील नोटांच्या प्रतिमा  घेऊन प्रस्तावित मोबाइल अनुप्रयोगासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

  • या अनुप्रयोगात ध्वनीच्या माध्यमातून सूचनेचा पर्याय राहील. त्यात प्रतिमा योग्य प्रकारे घेतली तर ती नोट कुठल्या किमतीची आहे हे समजू शकेल. देशात ८० लाख अंध लोक असून त्यांना या अनुप्रयोगाचा फायदा होणार आहे. जून २०१८ मध्ये बँकेने अंधांना नोटा ओळखता याव्यात, यासाठी उपकरण किंवा अनुप्रयोग तयार करण्याचे सूतोवाच केले होते. दुकानदारांनीच अंधांना असा प्रकारचे अ‍ॅप (अनुप्रयोग) उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही आधी बँकेने मांडली होती.

तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्द, इस्रो लवकरच नवीन वेळ जाहीर करणार :
  • भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली घोषणा केलेली आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. मात्र ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.

  •  

  • लॉन्चिंग नंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होतं. इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.

  • चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे.

विश्वचषकातील निवृत्त एकादश :
  • चार वर्षांपूर्वी मेलबर्नला झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर कर्णधार मायकल क्लार्कने निवृत्ती पत्करली. त्याच्या निवृत्तीमागे विश्वचषकाची स्वप्नपूर्ती हे कारण होतेच. परंतु वाढत्या वयामुळे मंदावणाऱ्या हालचालींनीसुद्धा त्याची निवृत्ती जवळ आली आहे, हे स्पष्ट दिसत होते.

  • यंदाच्या विश्वचषकानंतरही अनेक खेळाडू निवृत्त झाले आहेत, तर काही लवकरच निवृत्तीची घोषणा करण्याच्या उंबरठय़ावर आहेत. परंतु या सर्व खेळाडूंची एकत्र मोट बांधूनही सर्वोत्कृष्ट ‘निवृत्त एकादश’ संघ तयार होऊ शकतो.

  • भारतीय क्रिकेटला सर्वोच्च यश मिळवून देणारा महानायक म्हणजे महेंद्रसिंह धोनी. ३८ वर्षीय धोनीने भारताला अनेकदा बिकट परिस्थितीतून विजयाची दिशा दाखवली. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तो भारताला विजयी करण्यात अपयशी ठरला.

  • विश्वचषकातील नऊ सामन्यांत दोन अर्धशतकांसह धोनीने २७३ धावा केल्या. २०२३च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे वय ४२ झाले असेल. त्यामुळे त्याच्या सध्याच्या खेळाकडे पाहता तो आणखी चार वर्षे खेळणे कठीण वाटते. मात्र ‘निवृत्त एकादश’चे नेतृत्व व यष्टीरक्षण अशी दुहेरी भूमिका सांभाळण्यासाठी धोनीशिवाय दुसरा अचूक पर्याय असू शकत नाही.

आयपीएलमध्ये लवकरच आणखी दोन संघ खेळणार :
  • मुंबई : जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीग आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. येत्या 2021 मध्ये आयपीएलमध्ये 10 संघ खेळण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएलमध्ये 8 संघ खेळतात. अहमदाबाद, पुणे आणि रांची किंवा जमशेदपूर यामधील दोन संघ 2021 च्या आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.

  • अहमदाबादसाठी अदानी ग्रुप, पुणेसाठी आरपीजी संजीव गोयंका ग्रुप आणि रांची किंवा जमशेदपूरसाठी टाटा ग्रुप रेसमध्ये आहे. याआधी 2011 मध्ये आयपीएलमध्ये 10 संघ खेळले होते. मात्र काही विवादांनंतर दोन संघ बाद करण्यात आले आणि ही संख्या पुन्हा आठवर आली होती.

  • दोन नवीन संघ आयपीएलमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठीची योजन तयार झाली असून याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. चर्चा सुरळीत पार पडली तर 2021 मध्ये आयपीएलमध्ये दहा संघ खेळताना दिसतील. याबाबत आयपीएल संघ मालक आणि अधिकारी यांच्यात लंडनमध्ये एक बैठक पार पडली. जर नवीन दोन संघ दाखल झाले तर आयपीएलला याचा फायदाच होईल, यावर सगळ्यांचं एक मत झालं आहे.

  • अदानी ग्रुपने 2010 मध्ये अहमदाबादची फ्रॅन्चाईजी घेण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र ते यशस्वी झाले नाहीत. 2011 मध्ये सहारा ग्रुपने पुणे वॉरिअर्स संघ विकत घेतला होता. मात्र 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सला आयपीएलमधून हटवण्यात आलं आहे.

  • पुणे वॉरिअर्सने आयपीएलच्या 2011, 2012, 2013 या सीजमध्ये भाग घेतला होता. 2011 मध्ये कोच्ची टस्कर संघही आयपीएलमध्ये सामील करण्यात आला होता. कोच्ची टस्करला त्याच वर्षी आयपीएलमधून हटवण्यात आलं होतं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.

  • १६७४: मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.

  • १९२६: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.

  • १९२७: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.

  • १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

  • १९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.

  • १९९६: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • १९९७: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

जन्म 

  • १६०६: डच चित्रकार रेंब्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १६६९)

  • १६११: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)

  • १९०३: खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७५)

  • १९०४: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)

  • १९०५: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहंमद अली यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)

  • १९१७: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूरमोहंमद तराकी यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)

  • १९२७: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०१०)

  • १९३२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)

  • १९३३: भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.

  • १९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९)

  • १९४९: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १२९१: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचे निधन. (जन्म: १ मे १२१८)

  • १५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)

  • १९०४: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६०)

  • १९१९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर१८५२)

  • १९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे  निधन. (जन्म: २१ सप्टेंबर  १८८२)

  • १९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)

  • १९७९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.

  • १९९१: जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.

  • १९९८: स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन.

  • १९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.

  • १९९९: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.

  • २००४: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.