चालू घडामोडी - १५ डिसेंबर २०१७

Date : 15 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आयएनएस ‘कलवरी’ नौदलात दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण :
  • ‘आयएनएस कलवरी’ या पाणबुडीचे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. १५ वर्षांनंतर नौदलाच्या ताफ्यात नवीन पाणबुडी दाखल झाली असून आयएनएस कलवरीसोबत एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलवरी पाणबुडीचे लोकार्पण केले.

  • नौदलाच्या ताफ्यातून काही पाणबुड्या निवृत्त झाल्या तर काहींचे आयुष्यमान संपल्याने त्यांची जराजर्जर अवस्था होती. या पार्श्वभूमीवर १५ वर्षानंतर भारतीय नौदलात गुरुवारी नवीन पाणबुडी दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत या पाणबुडीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

  • आयएनएस कलवरीचे लोकार्पण करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी देशाच्या जनतेकडून नौदलाचे अभिनंदन करतो. कलवरीच्या निर्मितीमध्ये मदत करणाऱ्या फ्रान्सचे मी आभार मानतो. भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

  • टायगर शार्क म्हणजेच कलवरी भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ वे शतक हे आशियाचे आहे. २१ व्या शतकातील विकासाचा मार्ग हिंद महासागरातून जाईल असे सांगितले जाते. (source : loksatta)

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बात्रा यांची निवड :
  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे.

  • आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ६० वर्षीय बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला होता. आयओएच्या निवडणुकीतून मी माघार घेत असून, अध्यक्षपदासाठी बात्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहे, अशा आशयाचे पत्र खन्ना यांनी आयओए निवडणूक आयोगाला लिहिले होते.

  • मात्र हे पत्र खन्ना यांनी ३ डिसेंबरची माघार घेण्याची मुदत उलटल्यानंतर पाठवले होते. त्यामुळे औपचारिकता म्हणून झालेल्या निवडणुकीत बात्रा यांना १४२ मते पडली, तर खन्ना यांना १३ मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी मेहता हे एकमेव उमेदवार असल्यामुळे सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पद सांभाळणार आहेत.

  • भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष बिरेंद्र बैश्य हेसुद्धा सुरुवातीला अध्यक्षपदासाठी उत्सुक होते. मात्र त्यांनी अचानक माघार घेतली. दिल्ली उच्च न्यायालयामुळे निवडणुकीपुढे अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते. (source : loksatta)

एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय ? 
  • मुंबई : एबीपीने ज्या सीएसडीएससोबत एक्झिट पोल केला आहे, त्याच सीएसडीएसने (सेंटर फॉर स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) देशातील पहिला एक्झिट पोला केला होता. तेव्हा टी. एन. शेषन निवडणूक आयुक्त होते. हा एक्झिट पोल दूरदर्शनसाठी करण्यात आला होता.

  • एक्झिट पोल कसा असतो : प्रत्येक निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर तुम्ही एक्झिट पोल पाहत असाल. मात्र मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजेच एक्झिट पोल नेमका कसा केला जातो, एक्झिट पोल म्हणजे काय, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • एक्झिट पोल मतदानाच्या दिवशीच केला जातो. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं हे विचारलं जातं. त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत, याची माहिती अगोदरच घेतलेली असते, त्यानुसार ठराविक मतदार केंद्र निवडली जातात. सांख्यिकी पद्धतीने मतदान करुन येणारा पंधरावा माणूस, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. त्याचं विश्लेषण करुन आकडेवारी निश्चित करतात.

  • प्रत्येक मतदारसंघातलं कोणतं मतदान केंद्र निवडायचं हे सांख्यिकी पद्धतीनेच (सॅम्पल सिलेक्शन) ठरवलं जातं. मतदान करुन आल्यानंतर तुमच्यावर पहिला अर्धा तास प्रभाव कायम असतो की, तुम्ही कुणाला मतदान केलंय. त्यामुळे तिथे खरं उत्तर दिलं जातं, याला मानसशास्त्रीय आधार असल्याचं मानलं जातं.(source : abpmajha)

भारत-श्रीलंकेदरम्यानचा ‘रामसेतू’ मानवनिर्मितच, अमेरिकेच्या सायन्स चॅनेलचा दावा :
  • वॉशिंग्टन  : भारत आणि श्रीलंका दरम्यान जोडणारा रामसेतू मानवनिर्मित असल्याच्या शक्यतेवर आता अमेरिकेच्या विज्ञानविषयक वाहिनीने शिक्‍कामोर्तब केलं आहे. ‘नासा’च्या उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांचा पुरावा यासाठी ग्राह्य धरण्यात आला आहे.

  • अमेरिकेतील एका विज्ञान विषयक 'सायन्स चॅनेल'च्या कार्यक्रमातून भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा प्राचीन रामसेतू पुन्हा प्रकाशझोतात आला. या कार्यक्रमात भारत आणि श्रीलंकादरम्यानचा रामसेतू प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचं मान्य करण्यात आलं. तसेच हा सेतू नैसर्गिक नसून, याचे बांधकाम मनुष्यांनी केले असल्याचा दावा यातून करण्यात आला आहे.

  • या कार्यक्रमात, रामायणात सांगण्यात येत असलेला रामसेतू खरा आहे का, असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावर वैज्ञानिकांनी होकारार्थी उत्तर दिलं. तसेच याबाबत ‘नासा’च्या उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या पडताळणीत भारत-श्रीलंका या दोन देशांमध्ये 30 मैल लांबपर्यंत समुद्रात दगड आढळून आला असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.(source : abpmajha)

‘आधार’ सक्तीचा आज होणार फैसला; पाच न्यायाधीशांचे घटनापीठ :
  • नवी दिल्ली : बँकेत खाते उघडणे, मोबाईलचे सीमकार्ड घेणे यासह विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी ‘आधार’ कार्डची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयास स्थगिती द्यायची की नाही, याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ उद्या शुक्रवारी देणार आहे.

  • ‘आधार’ सक्तीस आव्हान देणा-या याचिकांवर सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे गुरुवारी प्राथमिक सुनावणी झाली.(source : lokmat)

...तर पेट्रोल-डिझेल ७२% स्वस्त! जीएसटीच्या कक्षेत येण्याची शक्यता, जानेवारीच्या बैठकीत निर्णय अपेक्षित :
  • मुंबई : संपूर्ण देश एका कराच्या कक्षेत बांधला गेला असताना पेट्रोल-डिझेल मात्र अद्यापही जुन्या करांच्या कचाट्यात आहे. हे कर त्यांच्या मूळ किमतीवर १०० टक्के आहेत. आता मात्र हे दोन्ही इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरू असून, तसे झाल्यास त्यांचे दर ७२ टक्क्यांपर्यंत स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.

  • सध्या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण केल्यावर त्याची किंमत जवळपास ३० रुपये होते. या ३० रुपयांवर तब्बल ७२ टक्के (सुमारे २२ रुपये) केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाते. या सर्वांच्या किमतीवर राज्य सरकारचा व्हॅट असतो. राज्यात पेट्रोलसाठी २६ व २७ टक्के तर डिझेलवरील व्हॅटचा दर २१ आणि २४ टक्के आहे.

  • त्यानंतर केंद्रीय रस्ते निधी २ रुपये, राज्य सरकारचा अधिभार ९ रुपये, पंपमालकांचे कमिशन ३.१५ रुपयांसह पेट्रोल तब्बल ७२ ते ७५ रुपये प्रति लिटर दराने ग्राहकांना पडते. सूत्रांनुसार, जानेवारी महिन्यात जीएसटी परिषदेची बैठक आहे. या बैठकीत पेट्रोल-डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत आणले जाण्याची शक्यता आहे.

  • सध्या जीएसटीचा सर्वोच्च दर हा २८ टक्के आहे. त्या श्रेणीत जरी याचा समावेश केल्यास ७३ टक्के एक्साईज आणि साधारण २५ टक्क्यांच्या घरात असलेला व्हॅट रद्द होईल. त्यातून पेट्रोल आणि डिझेल किमान ७० टक्के स्वस्त होऊ शकेल, हे नक्की. (source : lokmat)

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय चहा दिन

महत्वाच्या घटना

  • १८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.

  • १९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.

  • १९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.

  • १९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.

  • १९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.

  • १९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

  • १९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

  • १९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.

  • २००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

जन्म

  • १८३२: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.  (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)

  • १८५२: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट१९०८)

  • १८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)

  • १९०३: स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)

  • १९३२: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.

  • १९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.

  • १९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)

  • १९३५: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.

  • १९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.

  • १९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.

मृत्य

  • १७४९: छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन. (जन्म: १८ मे १६८२)

  • १८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.

  • १९५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)

  • १९६६: मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१)

  • १९८५: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९००)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.