चालू घडामोडी - १५ एप्रिल २०१८

Date : 15 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच माझ्यासारखा माणूस पंतप्रधान होऊ शकला -नरेंद्र मोदी :
  • अॅट्रोसिटी कायद्यावरून केंद्र सरकार दलित विरोधी आहे अशी टीका विरोधकांकडून होत असताना आणि आंदोलन होत असतानाच आज आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यासारखा माणूस फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळेच पंतप्रधान होऊ शकला असे म्हणत दलित बांधवांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • छत्तीसगढ येथील बिजापूर याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. बिजापूर मागास राहिले कारण याआधीच्या सरकारने विकास होऊ दिला नाही असा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयुष्यमान भारत योजनेचेही उद्घाटन केले. तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांना जशास तसे उत्तरही दिले. मी एका गरीब आईचा मुलगा. अतिशय मागास समाजातून आलेला. आज माझ्यासारखा गरीब माणूस पंतप्रधान होऊ शकला त्याचे कारण फक्त बाबासाहेब आंबेडकरच आहेत.

  • दलितांना समाजातील शोषित वर्गाला बळ देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचा आदर्श समोर ठेवतच आयुष्यमान भारत योजना सुरु करण्यात आली आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. समाजातील वंचित, शोषित महिलांना बळ मिळावे यासाठी ५ मे पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

‘आयुष्यमान भारत’च्या पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन :
  • जांगला (बिजापूर, छत्तीसगड): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेच्या पहिल्या आरोग्य केंद्राचे शनिवारी येथे उद्घाटन केले. इतरही अनेक विकास कामांचे उद्घाटन, या वेळी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली.

  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची याप्रसंगी उपस्थिती होती. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २०२२ पर्यंत देशात १.५ लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा चौथा छत्तीसगड दौरा ठरला आहे. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या आधी मे २०१५ मध्ये त्यांनी दंतेवाडाला भेट दिली होती.

  • सात गावांतील बँक शाखांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. इंडिया बीपीओ प्रोत्साहन योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ग्रामीण बीपीओ केंद्राला त्यांनी भेट दिली. या बीपीओ केंद्राला बस्तर इंटरनेट योजनेच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरविण्यात येत आहे.

‘विहिंप’च्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे यांची वर्णी :
  • नवी दिल्ली विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया यांना जोरदार झटका बसला आहे. कारण आज पार पडलेल्या निवडणुकीत विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत.

  • विष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत.

  • तब्बल 52 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत आज कोकजे 131 मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण 273 प्रतिनिधींपैकी 192 प्रतिनिधींनी मतदान केलं. या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला आहे.

  • गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे भाजप आणि तोगडिया यांच्यातील संबंध दुरावल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे तोगडिया यांना पदावरुन हटवण्यासाठीच ही निवडणूक झाल्याचं बोललं जात आहे.

'राष्ट्रकुल'मध्ये सायनाला सुवर्ण, तर सिंधूला रौप्य :
  • सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालनं पी.व्ही. सिंधूला हरवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट सरळ जिंकून सायनानं बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

  • एकूण 56 मिनिट चाललेल्या या सामन्यात सायनाने पी.व्ही. सिंधूचा थेट पराभव केला. सायनाने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली होती. तिने 8-4 ची आघाडी मिळवत सिंधूला एकही गुण घेऊ दिला नाही. पण तरीही सिंधूनेही प्रयत्नांची पराकाष्टा करत 18-20 असा स्कोर केला. पण पुढच्याच क्षणात सायनाने एक गुण मिळवत 21-18 असा अशी आघाडी मिळवली.

  • तर दुसऱ्या डावात सिंधूने पुनरागमन करत 7-5 अशी आघाडी मिळवली. पण सायनाने खेळ पलटत 8-10 असा स्कोर केला. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दोघींनीही 20-20 असे समसमान गुण मिळवले होते. पण पुढील काही क्षणातच सायनाने बाजू पलटत, पी.व्ही सिंधूचा पराभव केला.

  • दरम्यान, या सामन्यात सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला, तरी भारताला पारड्यात रौप्य पदकही मिळालं आहे. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे आता भारताच्या पारड्यात सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्हीही पदकं पडली.

  • दुसरीकडे पुरुष एकेरी गटात वर्ल्ड नंबर वन किदांबी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वी ने 19-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. या पराभवामुळे श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

संविधानामुळेच देशाची प्रगती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :
  • नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आज देश प्रगतीकडे जात आहे त्याचे कारण आपले ‘संविधान’ आहे. यासाठी प्रत्येक भारतीयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

  • बाबासाहेबांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे,आदी उपस्थित होते.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आधारित राज्याची रचना व वाटचाल सुरू राहील. संविधानरुपी दिलेल्या प्रगती पथावरून राज्याचा विकाररथ पुढे जात असल्याचे नमूद करुन फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

  • दरम्यान, नागपूर शहरात डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या. नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमले होते.

आठ महिन्यांत २ हजार ५०० जणांना नवसंजीवनी :
  • मुंबई : मुंबईत आॅगस्ट महिन्यात सुरू करण्यात आलेल्या बाइक अ‍ॅम्बुलन्सच्या प्रकल्पाने अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. आठ महिन्यांत शहर-उपनगरांतील तब्बल अडीच हजार रुग्णांना या अ‍ॅम्बुलन्सच्या माध्यमातून नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. अल्पावधीतच या सेवेसाठीच्या १०८ क्रमांकावर दिवसाला शेकडो फोन येत आहेत. या माध्यमातून दिवसाला सुमारे १०० पेक्षा अधिक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जात आहेत.

  • विशेषत: शहर-उपनगरांतील रेल्वे स्थानकांचा परिसर, चिंचोळ्या गल्ल्यांतून कॉल येण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत भांडुप, मानखुर्द, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगाव, ठाकूर व्हिलेज, कलिना आणि खारदांडा या ठिकाणी मोबाइल अ‍ॅम्बुलन्स सेवेत आहेत. आॅगस्ट २०१७ ते मार्च २०१८ कालावधीत २५०० हून अधिक रुग्णांना या सेवेच्या माध्यमातून तत्काळ प्रतिसाद आणि प्राथमिक उपचार दिले आहेत. त्यात अपघातातील जखमी अशा रुग्णांची संख्या २६७ असून विविध वैद्यकीय आपत्कालीन मदतीसाठी १ हजार ३७९ रुग्णांना प्रतिसाद देण्यात

  • आला आहे. बाइक अ‍ॅम्बुलन्सवरील चालक डॉक्टर असल्याने कॉल येताच तत्काळ प्रतिसाद दिला जातो. रुग्णाची प्राथमिक तपासणी आणि प्रथमोपचार करून आवश्यकता भासल्यास त्या रुग्णाला पुढील उपचाराकरिता आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते.

  • गेल्या वर्षी सँडहर्स्ट रोडवर इमारत कोसळल्याच्या घटनेत नागपाडा पोलीस स्टेशनजवळ असलेल्या बाइक अ‍ॅम्बुलन्सने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि या ठिकाणी जखमी झालेल्या पाच रुग्णांना तातडीने प्रतिसाद दिला.

दिनविशेष :
  • जागतिक कला दिन / जागतिक सांस्कृतिक दिन

महत्वाच्या घटना

  • १६७३: मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.

  • १८९२: जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

  • १९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले.

  • १९२३: मधुमेह असणा-यांना इन्सूलिन वापरण्यासाठी सामान्यतः उपलब्ध झाले.

  • १९४०: दुसरे महयुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.

  • १९९७: मक्‍केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.

जन्म

  • १४५२: इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो डा विंची यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १५१९)

  • १४६९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)

  • १७०७: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)

  • १७४१: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)

  • १८९३: चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)

  • १८९४: सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रूश्चेव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)

  • १९०१: अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म.

  • १९१२: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी१९९७)

  • १९१२: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम सुंग (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९९४)

मृत्यू

  • १७९४: पंडीतकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.

  • १८६५: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

  • १९१२: आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी१८५०)

  • १९८०: फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेआँ-पॉल सार्त्र यांचे निधन. (जन्म: २१ जून १९०५)

  • १९९०: हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ग्रेटा गार्बो यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर१९०५)

  • १९९५: तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री पंडित लीलाधर जोशी यांचे निधन.

  • १९९८: कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ख्मेर रुजचा नेता पॉल पॉट यांचे निधन. (जन्म: १९ मे १९२५)

  • २०१३: संत साहित्याचे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.