चालू घडामोडी आणि दिनविशेष - १४ जुलै २०१९

Date : 14 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
११ दिवसांत हिमा दासने केली सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक :
  • भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने ११ दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

  • जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. पाच आणि आठ जुलै रोजी हिमा दासने २०० मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.

  • वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत ११ दिवसांत भारताला तीन सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत.

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष :
  • लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वात बदल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • प्रदेशाध्यक्षांबरोबरच काँग्रेसने पाच कार्याध्यक्षांचीही निवड केली आहे. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

  • त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण यांनादेखील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पक्षाने राज्यातील नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ठरलं! या तारखेला चांद्रयान-२ मोहिमेला होणार सुरुवात :
  • भारताच्या बहुप्रतिक्षीत चांद्रयान-२ मोहिमेकडे भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या मोहिमेची जोरदार तयारी सुरु असताना शनिवारी या मोहिमेची सुरु होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी ही घोषणा केली.

  • डॉ. सिवन यांनी सांगितले की, चांद्रयान-२ मोहिमेला १५ जुलै रोजी मध्यरात्री २.५१ वाजता सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी GSLV MK-III या यानाचा वापर केला जाणार आहे. या यानाने यशस्वीरित्या उड्डाण केल्यानंतर त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचण्यास आणि चंद्रावर उतरण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागेल.

  • जर चांद्रयानाने चंद्रावर बर्फाचा शोध लावला तर भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती निर्माण होऊ शकते. या मोहिमेमुळे संशोधनाबरोबरच अंतराळ विज्ञानातही नवनवे मार्ग खुले होतील. प्रक्षेपणानंतर ५३ ते ५४ दिवसांत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ उतरेल त्यानंतर पढील १४ दिवस हे यान विविध माहिती घेण्याचे काम करेल, असे डॉ. सिवन यांनी सांगितले.

  • चांद्रयान-२च्या माध्यमातून इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. या ध्रुवावर आजवर जगातील कोणत्याच देशाचे यान पोहोचलेले नाही. जर आपण ही जोखीम यशस्वीरित्या पार करु शकलो तर वैश्विक वैज्ञानिक समुदायाला याचा फायदा होईल. या मोहिमेसोबत जोखीम आणि लाभ दोन्हीही जोडले गेले आहेत. चांद्रयान ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. यानंतर भारत चंद्राच्या जमिनीवर उतरणारा चौथा देश बनेल.

जगावर पुन्हा वैश्विक मंदीचे ढग - ‘या’ देशांच्या अर्थव्यवस्थेने दिले संकेत :
  • भारतासह आशिया आणि युरोपातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत घट होताना दिसते आहे. त्यामुळे एकरावर्षांपूर्वी आलेल्या जागतीक मंदीप्रमाणे पुन्हा मंदीचे ढग जगावर जमा झाले आहेत. याचे कारण म्हणजे, ६० टक्क्यांहून अधिक जागतीक जीडीपी हा केवळ आशियातील देशांमधून येतो.

  • वृत्तसंस्था ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आशियातील सर्व देशांमध्ये यावेळी अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा विकासदर खूपच खाली गेला आहे. त्यातच भारत आणि चीन या देशांचे सध्या अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरु आहे. यामुळे उद्य़ोंगावर मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत सिंगापूरचा विकास दर केवळ ३.४ टक्के होता, जो २०१२ नंतर सर्वाधिक खालच्या पातळीवर पोहोचला. तर दुसरीकडे चीनच्या आयातीतही गेल्यावर्षीच्या तुलनेत १.३ टक्के घट झाली आहे.

  • निर्यातीच्या आकडेवारीतही ७.३ टक्क्यांची घट झाली आहे. तर दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेत देखील या वर्षाच्या पहिल्या तिमाहित मोठी घट झाली होती. त्यानंतर याता चीन सोमवारी आपल्या जीडीपीची आकडेवारी प्रसिद्ध करणार आहे. त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होईल.

  • दरम्यान, मागणी नसल्याने जगातील अनेक कारखान्यांमध्ये उत्पादनही ठप्प झाले आहे. या कंपन्यांकडे जुना स्टॉकच इतका शिल्लक आहे की, त्याला बाजारातील मागणीनुसार बाहेर काढण्यातही अधिक वेळ लागत आहे. त्याचबरोबर चीन आणि भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात वाईट परिस्थिती असल्याचे चित्र आहे. भारतात सलग तिसऱ्या महिन्यांत गाड्यांच्या विक्रीत घट होताना दिसत आहे असेच चित्र चीनमध्येही आहे. जूनच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये वाहनांच्या विक्रीत ९.६ टक्के घसरण झाली आहे. चीनमध्ये गेल्या १२ महिन्यांत गाड्यांच्या वक्रीत सातत्याने घट नोंद केली जात आहे.

पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांनाही द्यावे लागेल अंशदान :
  • नवी दिल्ली : जे शेतकरी पेन्शन योजनेसाठी बँकेत अर्ज करतील, त्यांनाच केंद्र सरकार वृद्धावस्था पेन्शन योजनेचा लाभ देणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या योजनेबाबत सांगितले की, ही योजना ऐच्छिक असून शेतकऱ्यांनाही त्यासाठी अंशदान द्यावे लागणार आहे.

  • मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळात पेन्शन योजनेबाबत असे मानले जात आहे की, ज्या शेतकºयांचे वय ६० वर्षे आहे त्यांच्या खात्यात सरकार महिन्याला तीन हजार रुपये टाकणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकºयांना अर्ज करावा लागेल.

  • यासाठी बँकेत खाते सुरू करावे लागेल. तसेच, त्या खात्यात ठराविक रक्कम जमा करावी लागेल. केंद्र सरकारही शेतकºयांच्या रकमेएवढी रक्कम पेन्शन योजनेत जमा करेल. ज्या शेतकºयांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

  • काय आहे नेमकी योजना - केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, ही योजना छोट्या शेतकºयांना सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. कारण, वृद्धावस्थेत या शेतकºयांकडे कोणतीही बचत असत नाही. त्यामुळे आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागते.

  • योजनेनुसार शेतकºयाचे वय ६० वर्षे झाल्यानंतर दर महिन्याला किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही ऐच्छिक आणि अंशदान आधारित आहे. यात नोंदणीकृत शेतकरी आणि केंद्र सरकारचा हिस्सा समान असेल.

सतीश वेलणकर यांची भाजपच्या संघटन महासचिव पदी नियुक्ती :
  • नवी दिल्ली : भाजपच्या संघटनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. सतीश वेलणकर या मराठमोळ्या चेहऱ्याची भाजपचे नवे संघटन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रामलाल यांच्या जागी सतीश वेलणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामलाल यांनी स्वत: आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती अमित शाहांना केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

  • रामलाल परत संघामध्ये पूर्णवेळ काम करणार आहेत. रामलाल यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आरएसएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल भाजपमध्ये संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

  • मात्र आता रामलाल यांच्याजागी सतीश वेलणकर यांना भाजप संघटन महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सतील वेलणकर सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय संयुक्त महासचिव पदी आहेत.

  • रामलाल भाजपमध्ये प्रमुख रणनितीकार म्हणून संघ आणि पक्षातील दुवा होते. भाजपच्या महत्वाच्या बैठकांमध्ये ते उपस्थित असत. ही जबाबदारी आता वेलणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय गोपाल आर्य यांना पर्यावरण कार्यक्रमांचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

  • रामलाल यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून आपल्याला संघटन महामंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली होती. गेली 13 वर्ष आरएसएसमधील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या संघटन महामंत्रिपदाची जबाबदारी ते सांभाळत होते. वाढत्या वयामुळे आता या पदावर नवीन लोकांना संधी देण्यात यावी यासाठी रामलाल आग्रही होते.

येत्या सप्टेंबरमध्ये भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार :
  • नवी दिल्ली : येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार आहे. शिवाय दोन वर्षांच्या आत सर्व 36 राफेल विमानं भारताला मिळणार आहेत. फ्रान्स कंपनी दसॉल्ट एव्हिएशन राफेल विमानांची निर्मिती करत असून अत्याधुनिक अशा 2 इंजिनांनी राफेल विमान युक्त आहे.

  • पहिलं राफेल विमान येत्या सप्टेंबर महिन्यात भारताला मिळेल, असं संरक्षण उत्पादक विभागाचे सचिव अजय कुमार यांनी पीटीआयला सांगितलं. तसेच फ्रान्सचे भारतातील राजदूत अॅलेक्झँडर जीगलर यांनीही सांगितलं होतं की, अपेक्षित वेळेच्या आधी राफेल विमानं भारताला मिळतील. त्यामुळे भारताला राफेल विमान दोन महिने आधीच मिळणार आहे.

  • भारताने फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीकडून एकूण 36 विमानांची खरेदी केली आहे. पुढील दोन वर्षांना हे सर्व  विमानं भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल होतील. राफेल विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यात सक्षम आहे. तसेच या विमानमध्ये आण्विक अस्त्रांचा वापर करण्याचीही क्षमता आहे.

  • राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावरुन राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७८९: पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.

  • १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.

  • १९५८: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.

  • १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.

  • १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.

  • १९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.

  • २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.

  • २०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.

जन्म 

  • १८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म. (मृत्यू: १७ जून १८९५)

  • १८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.

  • १८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)

  • १८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)

  • १९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.

  • १९१७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)

  • १९२०: केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)

  • १९४७: मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांचा जन्म.

  • १९६७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी हशन तिलकरत्ने यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन.

  • १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे   निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)

  • १९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)

  • १९७५: संगीतकार मदनमोहन यांचे निधन. (जन्म: २५ जून १९२४)

  • १९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.

  • १९९८: मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)

  • २००३: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)

  • २००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२२)

  • २००८: सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.