चालू घडामोडी आणि दिनविशेष - १३ जुलै २०१९

Date : 13 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सेरेनाचे २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचे ध्येय :
  • लंडन : विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रोमानियाची सिमोना हॅलेप विजेतेपदासाठी शनिवारी एकमेकींशी झुंजतील. सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सेरेनाला आता २४वे ग्रँडस्लॅम जेतेपद खुणावत आहे.

  • सेरेनाने गुरुवारी बाबरेरा स्ट्रायकोव्हाला सहज धूळ चारत ११व्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारली. हॅलेपने एलिना स्वितोलिनाचे आव्हान सहजपणे परतवून लावत अंतिम फेरीत खेळण्याचा मान पटकावला. सेरेना आणि हॅलेप यांच्यात १० लढती झाल्या असून त्यात ९ वेळा सेरेनाने विजय मिळवला आहे.

  • हॅलेपने चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून गेल्या वर्षी तिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले होते.

लवकरच विजेवर धावणारी वातानुकूलित एसटी :
  • मुंबई : सुकर आणि पर्यावरणस्नेही प्रवास होण्यासाठी एसटी महामंडळ विजेवर धावणाऱ्या १५० वातानुकूलित बस ताफ्यात दाखल करणार आहे. या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येत असून यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जुलैअखेर निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.

  • केंद्र सरकारने विजेवर धावणाऱ्या बसना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. या बसमुळे प्रदूषण कमी होण्याबरोबरच इंधनखर्चही कमी होणार आहे. त्यामुळे एसटीने या विजेवर चालणारी बस सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीला प्रत्येक बसच्या इंधनासाठी प्रति किलोमीटरमागे १ रुपये २० पैसे खर्च येतो. तर विजेवरील बससाठी हाच खर्च प्रतिकिमीसाठी ६४ पैसे होईल. सध्या मुंबई, ठाणे तसेच नागपूर शहरात अशा बस स्थानिक पालिकांकडून चालवण्यात येतात.

  • एसटी महामंडळानेही भाडेतत्त्वावर विजेवर चालणाऱ्या १५० वातानुकूलित बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

  • यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले की, विजेवर धावणाऱ्या बससाठी निविदा काढली असून जुलैअखेपर्यंत ती सादर करण्याची मुदत आहे. ज्या कंपन्या बस पुरवठा करतील त्यांच्याकडूनच या बससाठी लागणारी चार्जिगची सुविधा पुरवली जाणार आहे. २५० किलोमीटपर्यंतच्या अंतरापर्यंत धावू शकतील अशा बस घेण्यात येतील. या सर्व बस आसन प्रकारातील असतील.

२३ वर्षांत पहिल्यांदाच खासदारांनी करून दाखवला ‘हा’ पराक्रम :
  • 11 जुलै 2019 ही तारीख देशाच्या संसदेच्या इतिहासातील लक्षात ठेवण्यासारखी तारीख आहे. 11 जुलै रोजी सुरू झालेले लोकसभेचे कामकाज तब्बल 13 तास चालल्याची माहिती समोर आली आहे. सकळी 11 वाजता सुरू झालेले संसदेचे कामकाज रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी संपले.

  • गेल्या 20 वर्षांमध्ये संसदेचे सर्वाधिक कामकाज 11 जुलै रोजी झाल्याचे पहायला मिळाले. या दरम्यान, प्रश्नोत्तर आणि शून्य पहराव्यतिरिक्त अर्थसंकल्पातील रेल्वेशी निगडीत अनुदानाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सर्वाधिक वेळ देण्यात आला होता.

  • दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या सांगण्यावरून एकाच दिवसात अर्थसंकल्पातील रेल्वेच्या विषयांवर चर्चा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच जास्तीत जास्त खासदारांना यावेळी आपले म्हणणे मांडण्याचे, तसेच पहिल्यांदा संसदेत खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदारांनाही संधी देण्यात यावी, असे ठरवण्यात आले होते. दरम्यान, अनेकांना यावेळी बोलण्याची संधी दिल्याची माहिती सू्त्रांकडून देण्यात आली.

  • सभापतींच्या या सुचनेचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित सभापतींनी कामकाजाची पद्धतच बदलली. माझी पत्नी रूग्णालयात दाखल असतानाही मी आज संसदेत आहे. सर्व खासदारांचे त्यांच्या नव्या पद्धतीला समर्थन असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे खासदार जगदम्बिका पाल यांनी दिली.

रद्द केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून रेल्वेने कमावले १,५०० कोटी :
  • रेल्वेने रद्द केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा महसूल कमावला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात रेल्वेने रद्द केलेल्या तिकिटांच्या माध्यमातून 1,536.85 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तिकिटे रद्द केल्यानंतर तिकिटातून कापल्या जाणाऱ्या रकमेत कपात करण्याचा रेल्वे विचार करत आहे का? असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. अद्याप रेल्वेकडून यावर उत्तर मिळाले नाही.

  • मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी यासंदर्भात माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने निरनिराळ्या अर्जांअंतर्गत सदर माहिती दिल्याचे ते म्हणाले. अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर त्यातून रेल्वेला 1,518.62 कोटी रूपयांचा महसूल मिळाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • तर अनारक्षित तिकिट प्रणालीच्या (यूटीएस) माध्यमातून बुक करण्यात आलेल्या तिकिटांना रद्द केल्यामुळे रेल्वेला 18.23 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर कापल्या जाणाऱ्या रकमेत काही कपात करणार आहे का? असा सवालही रेल्वेला केला असल्याचे गौड म्हणाले. तसेच आपल्याला अद्यापही यावर रेल्वेच्या उत्तराची प्रतिक्षा आहे. तसेच आरक्षित तिकिटे रद्द केल्यानंतर कापली जाणारी रक्कम कमी केली पाहिजे, असेही ते म्हणाले.

ग्रीनकार्ड मर्यादा उठवण्याचे अमेरिकी काँग्रेसकडून स्वागत :
  • वॉशिंग्टन : ग्रीनकार्ड अर्जदारांच्या संख्येवरील सात टक्क्य़ांची मर्यादा उठवणारे विधेयक संमत करण्याच्या निर्णयाचे अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाचा फायदा भारतासह अनेक देशातील बुद्धिमान लोकांना होणार असून त्यांना अमेरिकेचे स्थायी नागरिकत्व मिळणार आहे.

  • अमेरिकी प्रतिनिधिगृहाने हे विधेयक बुधवारी संमत केले असून त्यात ग्रीनकार्ड धारकांवरील सात टक्क्य़ांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. हजारो बुद्धिमान व्यावसायिक लोक ग्रीनकार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत असून त्यात भारतीयांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. ग्रीनकार्ड मिळणे याचा अर्थ अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी परवानगी मिळणे असा आहे. त्याच्या माध्यमातून अमेरिकी नसलेल्या लोकांना अमेरिकेत कायम राहून काम करण्याची परवानगी दिली जाते.

  • स्थलांतर व नागरिकत्व उपसमितीचे अध्यक्ष झो लॉफग्रेन यांनी सांगितले,की अमेरिकी उद्योगांना स्पर्धात्मकतेत टिकण्यासाठी  बुद्धिमान लोकांना संधी द्यावी लागणार आहे. ग्रीनकार्डच्या माध्यमातून हे लोक अमेरिकेकडे आकर्षित होतील. जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील लोकांसाठी व्हिसा मर्यादा असल्याने अनेकांना संधी मिळत नव्हती.

  • कमी लोकसंख्येच्या देशातील जास्त लोकांना ती मिळत होती. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हे विधेयक मांडले हे कौतुकास्पद असून या विधेयकामुळे उद्योग विकास व अमेरिकेच्या आर्थिक विस्तारास चालना मिळणार आहे, असे अमेरिकी काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले. या विधेयकामुळे सर्वाना समान संधी मिळाली असून यात अमेरिकी कंपन्यांना फायदा होईल तसेच येणारे बुद्धिमान कर्मचारी त्यांच्या कुटुंबापासून दुरावणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार भारताचे मानवरहित रोव्हर :
  • नवी दिल्ली : अंतराळ संशोधनात मोठी झेप घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. अजुनही फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत मानवरहित रोव्हर उतरविणार आहे. ही अशा प्रकारची चंद्रावर आखलेली भारताची दुसरी मोहिम असेल. ती यशस्वी झाल्यास चांद्रसंशोधनाबाबत सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत भारत आणखी चार पावले पुढे जाईल.

  • इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशनने (इस्रो) स्वदेशी तंत्रज्ञानाने बनविलेले रोव्हर अवकाशात येत्या सोमवारी प्रक्षेपित केले जाईल. ते सहा किंवा सात सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची शक्यता आहे. १४.१ कोटी डॉलर खर्चाच्या या चांद्रयान-२ मोहिमेद्वारे चंद्राच्या जमिनीखालील खनिजांचा शोध घेण्यात येईल. या ग्रहाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करणे, तेथे पाण्याचा शोध घेणे अशी कामे मानवरहित रोव्हर करणार आहे.

  • चंद्राच्या पृष्ठभागावर जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचू शकलेला नाही तिथे भारताचा रोव्हर जाणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय मोदी सरकारने ठेवले असून अंतराळ संशोधन व सुरक्षाविषयक बाबींमध्येही आपला देश अग्रस्थानी असावा असे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

  • १८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

  • १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

  • १९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.

  • १९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

  • १९७७: रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.

  • १९८३: श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.

  • २०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.

जन्म 

  • १८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

  • १९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.

  • १९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.

  • १९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.

  • १९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

  • १७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.

  • १९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)

  • १९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.

  • १९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.

  • १९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)

  • २०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी१९१४)

  • २००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.

  • २०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.