चालू घडामोडी - १३ डिसेंबर २०१७

Date : 13 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चंद्र व मंगळावर माणूस पाठवण्यासाठी नासाने मोहिमा सुरू कराव्यात – ट्रम्प :
  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन अवकाश धोरणावर स्वाक्षरी केली असून, त्यात नासाला चंद्र व मंगळावर अवकाशवीर पाठवण्यासाठी तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. अमेरिका अवकाश संशोधनात नेहमीच आघाडीवर राहील असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

  • १९७२ मधील अखेरच्या चांद्रमोहिमेनंतर अमेरिकी अध्यक्षांना पुन्हा चंद्र गाठण्याचे धोरण प्रथमच निश्चित केले आहे. नासाने याआधीच्या काळात चांद्रमोहिमा करण्याचे सोडून दिले होते.

  • ट्रम्प यांनी अवकाश धोरण जाहीर करताना असे सांगितले, की या धोरणाद्वारे मी अमेरिके च्या नासा या अवकाश संशोधन संस्थेला पुन्हा एकदा चंद्रावर लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहे.

  • १९७२ नंतर समानव चांद्रमोहिमा थांबल्या होत्या, आता त्या सुरू कराव्यात. १९६० ते १९७० दरम्यान अमेरिकी अवकाशवीर चंद्रावर गेले होते. या वेळी आम्ही चंद्रावर केवळ ध्वजच लावणार नाही तर तिथे पदचिन्हे उमटवून मंगळ मोहिमेचीही पायाभरणी करू. कदाचित इतर ग्रहांवरही स्वारी करू, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

  • प्रेरणादायी भविष्यासाठी मी जाहीर केलेले अवकाश धोरण हे एक मोठे पाऊल आहे व अवकाश क्षेत्रात अमेरिकेची अस्मिता पुन्हा प्रस्थापित करणारी आहे. अवकाश क्षेत्रात बरेच काही करता येण्यासारखे आहे. 

नॉर्वेमध्ये इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक :
  • भारतामध्ये सध्या 2जी, 3जी आणि 4जी सारखा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. आपल्याला हा स्पीड जास्त वाटतोही मात्र, भारत जगाच्या इंटरनेट स्पीडच्या तुलनेत 'स्लो' असल्याची माहिती समोर आली आहे. जगातील पहिल्या 100 देशांच्या यादीतही भारताला स्थान मिळालेले नाही.

  • 'ओक्ला' या संस्थेने मोबाईल इंटरनेट स्पीडबाबत सर्वेक्षण केले होते. यामध्ये ही बाब पुढे आली आहे. इंटरनेटच्या स्पीडमध्ये सध्या भारत जगात 109 व्या स्थानावर आहे. तर ब्राँडबँड स्पीडमध्ये 76 व्या स्थानी आहे. या वर्षाच्या सुरवातीला भारतातील मोबाईल डाऊनलोडिंगचा सरासरी स्पीड 7.65 एमबीपीएस इतका होता. वर्षभरात या स्पीडमध्ये वाढ झाली आहे.

  • नोव्हेंबरमध्ये इंटरनेटचा स्पीड 8.80 एमबीपीएस इतका होता. आताच्या आणि सुरवातीच्या इंटरनेट स्पीड लक्षात घेता इंटरनेटच्या स्पीडमध्ये 15 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. मात्र, इतर देशांत इंटरनेटचा स्पीड चांगलाच 'हाय' आहे.

  • नॉर्वेमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड सर्वाधिक म्हणजे 62.66 एमबीपीएस आणि नेदरलँडमध्ये 53.01 एमबीपीएस आहे. तर आईसलँडमध्ये 52.78 एमबीपीएस इतका आहे.

चंद्रपूरचे प्रसिद्ध लेखक विनायक तुमराम यांना साहित्य अकादमी पुरस्कार :
  • चंद्रपूर : प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्ग धर्म’ या वैचारिक ग्रंथाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘फणिश्वरनाथ रेणू’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • २५ हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

अॅथलेटिक्स स्पर्धेत संजीवनीला सुवर्णपदक :
  • आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या संजीवनीने प्रतिस्पर्ध्याना संधी न देता 15 मिनिटे 51.58 सेकंदात शर्यत जिंकली. अल फलाह विद्यापीठाच्या वर्षा देवीला 16 मिनीटे 50.23 सेकंदात रौप्य तर दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ च्या डिम्पल सिंगला 16 मिनीटे 56.88 सेकंदात ब्राँझ पदक जिंकले.

  • भविष्यात लांब पल्याच्या शर्यतीत भारताचे आशास्थान असलेल्या संजीवनी जाधवने महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

  • आचार्य नागार्जूना विद्यापीठाच्या यजमानात्वाखाली ही स्पर्धा सुरू आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाशिकच्या संजीवनीचे हे पाच हजार मीटर शर्यतीतील हे सलग चौथे सुवर्णपदक आहे.

  • पुरूषांच्या शर्यतीत पंजाबच्या रणजीत कुमारने किसन तडवीला मागे टाकून 14 मिनिटे 39.19 सेकंदात सुवर्णपदक जिंकले. किसनला 14 मिनिटे 39.56 सेकंदात रौप्य मिळाले. गतवर्षी किसनने सुवर्णपदक जिंकले होते.

इव्हीएम सुरक्षितच, पराभूतांकडून आरोप: माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे वक्तव्य :
  • इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (इव्हीएम) विश्वासाहर्तेबाबत वाद सुरू असतानाच माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमुर्ती यांनी याबाबत महत्वपूर्ण भाष्य केले आहे. इव्हीएम मशीन्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

  • मशीन कधीच चूक करू शकत नाही. व्यक्तीकडूनच चूक होते, असे ते म्हणाले. इव्हीएमचा वापर सुरू झाल्यापासून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तक्रार केली. ते सर्व पराभूत पक्षाचेच उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटले.

  • मंगळवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, तक्रार करणाऱ्यांनी इतिहासात डोकावून पाहिले पाहिजे. जयललिता आणि अमरिंदर सिंग हे सर्वांत प्रथम सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पण पुढच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी मौन बाळगले. यावेळी अमरिंदर सिंग हे इव्हीएमच्या माध्यमातूनच सत्तेवर आले.

  • जोपर्यंत या मशीनमध्ये छेडछाड करता येऊ शकते, हे कोणी सिद्ध करून देत नाही. तोपर्यंत माझा यावर विश्वास आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे इव्हीएम सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे, असेही त्यांनी म्हटले. निवडणुकीत इव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या वृत्ताबाबत बोलताना ते म्हणाले, मशीन्स कधी चुकीच्या नसतात.

तब्बल 35 वर्षांनंतर सौदी अरेबियात पुन्हा सिनेमे प्रदर्शित होणार :
  • रियाद : सौदी अरेबियातील महिलांना गाडी चालवण्याची मुभा दिल्यानंतर, राजे मोहम्मद बिन सलमान यांनी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर सौदी अरेबियामध्ये सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शनावरील बंदी हटवण्यात आली आहे.

  • सौदी सरकारकडून आता लवकरच सिनेमागृहांसाठी परवाने देण्यास सुरुवात करणार असून, 2018 मधील मार्चमध्ये सौदी अरेबियातील सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित होतील.

  • सौदी अरेबियाचे सांस्कृतिक मंत्री अल अव्वाद यांनी सांगितलं की, “सिनेमागृहांना परवानगी दिल्याने, देशाच्या आर्थिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. तसेच त्यातून देशातील विविधतेचं दर्शन संपूर्ण जगाला होईल. यासाठी एक व्यापक सांस्कृतिक क्षेत्रा निर्माण करुन, त्याद्वारे आम्ही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहोत. तसेच, यातून सौदी अरेबियात मनोरंजनाचे नवीन पर्यायही उपलब्ध होतील.”

  • सौदी अरेबियात 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला सिनेमागृहांवर बंदी घालण्यात आली. तेथील मुल्ला-मौलवींनी धर्माचे दाखले देत, सिनेमागृहांवर बंदी आणण्यासाठी दबाव टाकला होता.

  • त्यातच 2017 च्या जानेवारीमध्ये मुख्य मुफ्ती अब्दुल-अजीज-अल-अल-शेख यांनी सिनेमागृह पुन्हा सुरु करण्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. जर देशात सिनेमागृह पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. तर ते समाजाच्या नैतिक मुल्यांना पायदळी तुडवतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९३०: प्रभात चा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.

  • २००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.

  • २०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.

  • २०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.

जन्म

  • १७८०: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८४९)

  • १८०४: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)

  • १८१६: सीमेन्सचे संस्थापक वर्नेर व्हॅन सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १८९२)

  • १८९९: छायालेखक (cinematographer) पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)

  • १९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन २००५)

  • १९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.

  • १९५५: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा जन्म.

मृत्य

  • १७८४: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १७०९)

  • १९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८६१)

  • १९३०: सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ फ्रिट्झ प्रेग्ल यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)

  • १९६१: अ‍ॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ग्रँडमा मोझेस यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन.

  • १९८६: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९५५ – पुणे)

  • १९९४: सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)

  • १९९६: स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये यांचे निधन.

  • २००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे  संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.