पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) शनिवार (१३ जुलै) ते सोमवार (१५ जुलै) दरम्यान राज्य सेवा मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेशपत्र आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.
मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ प्रवेशपत्र परीक्षेसाठी सोबत असणे अनिवार्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
उमेदवाराने प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा केंद्रावर, तर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. . तसेच परीक्षेला येताना मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून आवश्यक आहे.
इंग्लंड : ऑइन मॉर्गनच्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. तर विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची इंग्लंडची आजवरची ही चौथी वेळ ठरली. त्यामुळे आता रविवारी लॉर्डसवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड अशी अंतिम लढत रंगणार आहे.
बर्मिंगहॅममधील आजच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 224 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडने या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग करताना 33 व्या षटकातच आठ विकेट्स राखून विजय साजरा केला.
सलामीवीर जेसन रॉयची 65 चेंडूत 85 धावांची खेळी इंग्लंडच्या विजयात निर्णायक ठरली. रॉयच्या या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. जॉनी बेरस्टॉने 34, जो रुटने 49 आणि ऑइन मॉर्गनने 45 धावांची साथ दिली.
लातूर : युरोपमधील सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम भारतातील दहा जणांच्या पथकाने केलं आहे. या दहा जणांच्या पथकाने माऊंट एलब्रुस हा युरोपमधील सर्वात उंच पर्वत सर केला आहे. माऊंट एलब्रुसवर पहिल्यांदाच तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत गाण्याचा मान या दहा जणांना मिळाला आहे.
युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत माउंट एलब्रुस आहे. निद्रिस्त ज्वालामुखी असलेल्या हा पर्वत सर करण्यात भारतातील दहा गिर्यारोहकांना यश आले आहे. यात महाराष्ट्रातील दीपक कोनाळेचा समावेश आहे. दीपक कोनाळे हा लातूरचा रहिवासी आहे. माउंट एलब्रुस हे युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत मानला जातो.
या पर्वताची उंची पाच हजार 642 मीटर आहे. सतत बदलणारं वातावरण, उणे 25 अंश तापमान, वारे या सर्वांचा सामना करत भारतातील हे पथक सहा तारखेला शिखरावर पोहोचलं होते. ही मोहीम एक तारखेपासून सुरु झाली होती. मोहिमेत सहभागी झालेल्या पथकात महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश,आंध्रप्रदेश या राज्यातील गिर्यारोहकांचाही समावेश होता, ज्यात दोन मुलीही सहभागी होत्या.
नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आपला अहवाल एका आठवडय़ात सादर करावा, यावर स्वीकारार्ह तोडगा काढण्यात आला नाही तर २५ जुलैपासून या प्रकरणाची दररोज सुनावणी घेण्यात येईल, असे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश (निवृत्त) आणि मध्यस्थ समितीचे अध्यक्ष एफएमआय खलिफुल्ला यांना १८ जुलैपर्यंत आपला अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे.
या प्रश्नावर मध्यस्थांमार्फत स्वीकारार्ह तोडगा काढता येणे शक्य नाही असे सादर करण्यात आलेला अहवाल तपासून पाहिल्यानंतर आढळले तर सर्वोच्च न्यायालय २५ जुलैपासून या प्रकरणावर दररोज सुनावणी घेईल, असे घटनापीठाने स्पष्ट केले.
मध्यस्थीच्या आजमितीपर्यंतच्या प्रक्रियेच्या प्रगतीची आम्हाला माहिती देण्याची आणि ही प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यावर आहे त्याची माहिती देण्याची विनंती विनंती न्या. खलिफुल्ला यांना करावी असे आम्हाला योग्य वाटले, असे पीठाने म्हटले आहे. या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नझीर यांचाही समावेश आहे. न्या. खलिफुल्ला पुढील गुरुवापर्यंत अहवाल सादर करतील व त्या दिवशी पुढील आदेश देण्यात येतील, असे पीठाने म्हटले आहे. या प्रकरणातील मूळ पक्षकारांचे वारस गोपाळसिंह विशारद यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.
सहा नव्या पाणबुडयांच्या बांधणीसाठी मोदी सरकारने जागतिक युद्धनौका बनवणाऱ्या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. भारतातील जहाज बांधणींची क्षमता वाढवण्याबरोबरच नौदलाचा पाणबुडी ताफा बळकट करण्याचे सरकारचे उद्दिष्टय आहे.
तंत्रज्ञान हस्तांतरणातंर्गत डिझेल इलेक्ट्रीक पावरवर चालणाऱ्या पाणबुडया भारतात बनवण्याची अट आहे. त्यासाठी इच्छा असल्यास एस.एस, जर्मन थायसेनकर्प मरीन सिस्टम्स जीएमबीएच, स्वीडिश साब कोकम्स, स्पॅनिश नॅवानिया एसए आणि रशियन रोसोबोरोनेक्सपोर्ट ओजेएससी या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
६.६ अब्ज डॉलरचा हा कार्यक्रम असून आधीच तीन वर्ष विलंब झाला आहे. पाणबुडी बांधणीसाठी ज्या परदेशी कंपनीची निवड करण्यात येईल त्यांच्याबरोबर भारतीय कंपनी सुद्धा काम करेल. नव्या पाणबुडी प्रकल्पात ५० टक्के स्वदेशी तंत्रज्ञान असावे असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.
मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण यामध्ये महत्वाचे असेल. चीनच्या तुलनेत पाण्याखालच्या लढाईत भारताची क्षमता कमी आहे. भारताकडे १३ पाणबुडयांचा ताफा आहे. या सर्व पाणबुडया २० वर्ष जुन्या आहेत. २०३० पर्यंत २४ पाणबुडया बाळगण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
मुंबई : पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या सेवेत मराठा कोटय़ातील रिक्त ठेवलेल्या विविध पदांवर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे गेली पाच वर्षे शासकीय सेवेत काम केलेल्या सुमारे ३५० अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. त्यांच्या जागी मराठा समाजातील उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश सर्व शासकीय-निमशासकीय विभाग व कार्यालयांना देण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी यासंबंधी एक सविस्तर शासन आदेश जारी केला आहे. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या अध्यादेशाप्रमाणे शासकीय सेवेतील विविध पदांवर मराठा कोटय़ांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांना नव्या मराठा आरक्षण कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे. तसेच त्या कालावधीत न्यायालयाच्या स्थगितीमुळे भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. ती ‘एसईबीसी’ आरक्षण लागू करून पूर्ण करण्याच्या सूचनाही सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींनुसार ९ जुलै २०१४ रोजी मराठा समाजातील दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये १६ टक्के आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश काढण्यात आला. राज्यात त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली. ‘एसईबीसी’ कोटय़ाअंतर्गत शिक्षणातील प्रवेश तसेच शासकीय सेवेत विविध पदांसाठी झालेल्या नोकरभरतीत मराठा समाजातील पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
मराठा आरक्षण लागू करून नोकर भरती प्रक्रिया सुरू असतानाच, मुंबई उच्च न्यायालयात त्या अध्यादेशाला आव्हान देण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी त्या अध्यादेशाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे राज्य शासनाला भरती प्रक्रिया थांबवावी लागली. तसेच ज्यांना ‘एसईबीसी’ कोटय़ांतर्गत नियुक्त्या दिल्या, त्यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता.
महत्वाच्या घटना
१६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
१७९९: रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
१९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्घाटन झाले.
१९३५: प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९६१: पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.
१९६२: लंडनमधील मार्क्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.
१९७९: किरिबातीला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.
१९८५: पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.
१९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
१९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.
२००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.
जन्म
ख्रिस्त पूर्व १००: रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.
१८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्री थोरो यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १८६२)
१८५२: अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचा जन्म.
१८५४: संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९३२)
१८६३: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म.
१८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
१८६४: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)
१९०९: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)
१९१३: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २०१०)
१९२०: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००८)
१९४७: भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती यांचा जन्म.
१९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.
१९६५: क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.
मृत्यू
१६६०: बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.
१९१०: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रोलस् यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८७७)
१९४९: आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष डग्लस हाइड यांचे निधन.
१९९४: हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे निधन.
१९९९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२९)
२०००: मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन.
२०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)
२०१३: चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)
२०१३: बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १९२९)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.