चालू घडामोडी - १० जुलै २०१८

Date : 10 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुगललाही न सापडणारं 'जिओ इन्स्टिट्यूट' देशात सर्वोत्तम :
  • नवी दिल्ली : गुगलला फक्त जगातलंच नाही, तर जगाबाहेरचंही सगळं ठाऊक आहे, असं तुम्हाला वाटतं का? तर तुमचा समज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने खोटा ठरवला आहे. जगात अशी एक गोष्ट आहे, जी गुगललाही माहित नाही, मात्र ती भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आहे. आणि या संस्थेचं नाव आहे 'जिओ इन्स्टिट्यूट'

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील तीन आणि खाजगी क्षेत्रातील तीन अशा भारतातील एकूण सहा प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये आयआयटी मुंबईचा समावेश आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिओ इन्स्टिट्यूट अशा संस्थेचाही यात समावेश आहे.

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करुन या शैक्षणिक संस्थांच्या नावांची घोषणा केली. तज्ज्ञांच्या समितीने देशातील सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या सहा शैक्षणिक संस्थांची निवड केली आहे.

  • आयआयटी मुंबई (महाराष्ट्र), आयआयटी दिल्ली (दिल्ली) आणि आयआयएससी बंगळुरु (कर्नाटक) यांचा समावेश आहे.

गुगलकडून बंगळुरुच्या २२ वर्षीय आदित्यला १.२ कोटींचं पॅकेज :
  • मुंबई बंगळुरुच्या आदित्य पालिवाल या विद्यार्थ्याला गुगलने एक कोटी 20 लाखांचं वार्षिक पॅकेज दिलं आहे. आदित्य बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेचा (IIIT-B) विद्यार्थी आहे.

  • आदित्य पालिवाल या जुलैपासूनच गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन विभागात काम करणार आहे. कॉलेजच्या दीक्षांत सोहळ्यात रविवारी त्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. मूळचा मुंबईकर असलेल्या आदित्यने इंटिग्रेटेड एमटेकचं शिक्षण घेतलं आहे.

  • ‘गुगलने माझी निवड केल्याने मी खुश आहे. गुगलमध्ये काम करताना अनेक नव्या गोष्टी शिकता येतील,असं मला वाटतं,’ अशी आशा आदित्य पालिवालने व्यक्त केली आहे.

  • कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन विभागासाठी गुगलने जगभरातील तब्बल 3098  विद्यापीठांतून पहिल्या स्तरात 50 हजार विद्यार्थ्यांची निवड केली. दुसऱ्या स्तरात गुगलने या विभागासाठी सहा हजार विद्यार्थ्यांची निवड केली होती. आता गुगलने याच संशोधन विभागासाठी अंतिम 50 विद्यार्थ्यांची निवड केली, ज्यामध्ये आदित्यनेही बाजी मारली.

  • कॉम्प्युटर लँग्वेज कोडिंगची प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या एसीएम इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रामिंग कॉन्टेस्ट (ICPC) 2017-18 मध्ये आदित्य फायनलिस्ट ठरला होता

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी छगन भुजबळ आता मैदानात :
  • नागपूर : मेरिटमध्ये येऊनही ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीने नोकरी नाकारली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी मांडली आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भुजबळ सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहेत.

  • विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा देऊन ते मेरिटने पास झाले. यादीत त्यांचं नाव आलं. मात्र नोकरी देताना त्यांची धनगर, माळी, कुंभार, सोनार अशी जात पाहिली आणि खुल्या प्रवर्गातून परीक्षा दिली असल्यामुळे नोकरी नाकारली. हायकोर्टाच्या आदेशानुसार कुणीही खुल्या प्रवर्गातून परीक्षा देऊ शकतो, त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा, असं भुजबळ म्हणाले.

  • दरम्यान, विविध मुद्द्यांवरुन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला. किसान मोर्चा असो, किंवा सरकारवर वाढलेलं कर्ज असो, या सर्व मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करणार असल्याचं भुजबळांनी सांगितलं.

  • शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. पाय रक्ताळले. एका महिन्यात कारवाई करु असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. पण आतापर्यंत काहीही केलं नाही, असं भुजबळ म्हणाले.

सहा उच्चशिक्षण संस्थांना ‘श्रेष्ठत्वा’चा दर्जा :
  • नवी दिल्ली : केंद्र सरकारने सहा उच्च शैक्षणिक संस्थांना ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’ दर्जा दिला असून, यात रिलायन्स फाऊंडेशनच्या अजून अस्तित्वात न आलेल्या ‘जिओ इन्स्टिटय़ूट’चाही समावेश आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तीन सार्वजनिक आणि तीन खासगी उच्चशिक्षण संस्थांची ‘श्रेष्ठत्व’ दर्जासाठी निवड केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी ही घोषणा केली.

  • जिओची निवड ‘ग्रीनफील्ड’ प्रकारात केल्याचा खुलासा विद्यापीठ अनुदान मंडळाने केला आहे. उच्चशिक्षण संस्था उभ्या करू इच्छिणाऱ्या खासगी संस्थांनाही ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’ दर्जा मिळवण्यासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याअंतर्गत रिलायन्स फाऊंडेशनचा विचार केला गेला आहे.

  • या ‘श्रेष्ठत्व’ दर्जा मिळालेल्या संस्थांना पुढील पाच वर्षांत १ हजार कोटींचा विशेष निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र सरकारने ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’साठी शिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. देशातील ‘शैक्षणिक श्रेष्ठते’चा दर्जा असण्याची क्षमता असलेल्या १० सरकारी आणि १० खासगी अशा २० संस्थांची निवड करण्यास समितीला सांगण्यात आले होते. मात्र ‘श्रेष्ठता’ दर्जा देता येईल अशा वीस संस्था समितीला न सापडल्याने फक्तसहा शिक्षण संस्थांचीच निवड करण्यात आली आहे.

  • जगातील पहिल्या २०० शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील एकाही शिक्षण संस्थेचा समावेश नाही. भारतातील शिक्षण संस्थांचा दर्जा जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याच्या क्षमतेचा नसल्याने केंद्र सरकारने उच्चशिक्षण क्षेत्राचा दर्जा सुधारण्याचा निर्णय घेतला. 

जगातील सर्वांत मोठी मोबाइल फॅक्टरी: ३४ एकर क्षेत्र, ७० हजार नोकऱ्या अन् बरंच काही :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांच्या हस्ते नोएडातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगच्या मोबाइल फॅक्टरीचे उद्घाटन पार पडले. ही फॅक्टरी जगातील सर्वांत मोठी मोबाइल फॅक्टरी असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा प्रकल्प सुरु होणार असल्याचे समजते. मागील काही दिवसांपासून या फॅक्टरीबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. मात्र ही फॅक्टरी नक्की असणार कशी हे जाणून घेऊयात अगदी थोडक्यात…

  • नोएडातील सेक्टर ८१मध्ये सॅमसंगची ही फॅक्टरी १९९५ बांधण्यास सुरुवात झाली. या मूळ फॅक्टरीचा विस्तार कऱण्यात येणार आहे. १९९५ साली या फॅक्टरीची पहिली वीट रचली गेली. आणि १९९७ ला या फॅक्टरीमधून सॅमसंगचा पहिला टिव्ही विक्रिसाठी बाहेर आला.

  • २००३ साली याच फॅक्टरीमधून सॅमसंगचा भारतातील पहिला फ्रिज तयार करण्यात आला नोएडामधील याच फॅक्टरीमध्ये २००५ साली पहिले मोबाईल युनिट सुरु करण्यात आले २०१२ साली या फॅक्टरीमध्ये सॅमसंगच्या गॅलेक्सी एस थ्री या स्मार्टफोनची निर्मिती सुरु झाली.

  • विस्तार झाल्यानंतर ही फॅक्टरी एकूण ३५ एकर क्षेत्रात पसरलेली असेल. या फॅक्टरीमुळे ७० हजार जणांना रोजगार मिळणार आहे. सॅमसंगच्या देशात दोन फॅक्टरी आहेत एक नोएडामध्ये दुसरी तामिळनाडूमधील श्रीपेरींबदरूमध्ये

  • सॅमसंग कंपनी दरवर्षी भरतामध्ये ६७ लाख फोन्सची निर्मिती करते. एकूण ६७ लाख मोबाईल फोन उत्पादनापैकी ५० लाख फोनची निर्मिती ही नोएडाच्या या फॅक्टरीमधून होते. फॅक्टरीचा विस्तार झाल्यानंतर दर वर्षी या फॅक्टरीमधून १ कोटी २० लाख फोन्स निर्माण करण्याचा कंपनीचा विचार आहे.

  • स्मार्टफोनच्या क्षेत्रात भारत ही जगातील दुसरी मोठी बाजारपेठ आहे. जगभरातील एकूण स्मार्टफोन विक्रीपैकी १० टक्के स्मार्टफोन भारतात विकले जातात. म्हणूनच सॅमसंगने भारतामध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे

  • सध्या भरतामध्ये २९.९ कोटी स्मार्टफोन युझर्स आहेत. वर्षाअखेरीसपर्यंत हा आकडा ३४ कोटींहून अधिक असेल तर पुढील पाच वर्षात म्हणजे २०२२ साली भारतातील स्मार्टफोन युझर्सची संख्या ४४ कोटी २० लाखाहूंन अधिक असेल. हिच गोष्ट लक्षात घेऊन सॅमसंगने भारतीय ग्राहकांसाठी फोन तयार कऱण्याच्या उद्देशाने हा विस्तार केल्याची चर्चा आहे.

  • २०१६-१७च्या सॅमसंगच्या एकूण ५० हजार कोटींच्या उत्पादन विक्रीतून मिळालेल्या नफ्यापैकी ३४ हजार कोटी स्मार्टफोन उद्योगातून मिळाले आहेत.

  • २०१६-१७ मध्ये सॅमसंगच्या भारतातील उलाढालीमध्ये २७ टक्क्यांनी वाढ झाली. या विस्तारासाठी सॅमसंगने ४ हजार ९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.

  • १९१३: कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.

  • १९२३: मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.

  • १९२५: अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.

  • १९२५: तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.

  • १९४०: बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.

  • १९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

  • १९६२: टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.

  • १९७३: बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.

  • १९९२: मादकद्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

  • १९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.

  • १९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.

  • २०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

जन्म 

  • १९०३: साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.

  • १९१४: सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९२)

  • १९२१: स्माईली चे निर्माते हार्वे बॉल यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००१)

  • १९२३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर१९८७)

  • १९३४: पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक डॉ. रजनीकांत आरोळे यांचा जन्म.

  • १९४०: अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५५९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५१९)

  • १९६९: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. (जन्म: ३० मे १८९४)

  • १९७०: आईसलँडचे १३वे पंतप्रधान ब्यार्नी बेनेडिक्ट्सन यांचे निधन.

  • १९८९: साम्यवादी विचारवंत साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचे निधन.

  • १९९५: गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर यांचे निधन.

  • २०००: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०९)

  • २००५: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)

  • २०१३: भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.