चालू घडामोडी - १० फेब्रुवारी २०१८

Date : 10 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंद्रा नूयी आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक :
  • मुंबई : 'पेप्सिको'च्या अध्यक्ष आणि सीईओ इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या पहिल्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंद्रा नूयी या जून महिन्यापासून आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारतील.

  • आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्याचा निर्णय आयसीसी कौन्सिलनं गेल्या वर्षी जून महिन्यात घेतला होता. आयसीसीच्या शुक्रवारच्या बैठकीत त्या पदावर इंद्रा नूयी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • इंद्रा नूयी हे उद्योगविश्वातलं एक मोठं नाव आहे. जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत फॉर्च्युन मॅगझिननं त्यांचा सातत्यानं समावेश केला आहे.

  • पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि सीईओ या नात्यानं त्यांच्यावर फूड अँड बेव्हरेज विभागाची जागतिक जबाबदारी आहे. सदर विभागात 22 ब्रँड्सचा समावेश असून, प्रत्येक ब्रँडच्या उद्योगात वर्षाला अंदाजे एक अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असते.(source :abpmajha)

ना स्मार्टफोन, ना इंटरनेट; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा स्मार्टनेस :
  • मॉस्को: सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन आणि इंटरनेट या गोष्टी म्हणजे मुलभूत गरज बनली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातही या गोष्टी अनिवार्य झाल्या आहेत. 

  • मग एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हटला तर त्याने टेक्नोसॅव्ही असावे, अशी लोकांची साहजिक अपेक्षा असते. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या सगळ्याला अपवाद ठरणारे आहेत. व्लादिमीर पुतिन हे अजूनही स्मार्टफोन वापरत नाहीत. तसेच ते इंटरनेटचा वापरही करत नाहीत.

  • काही दिवसांपूर्वी रशियात शास्त्रज्ञ आणि विद्वानांच्या मेळाव्यात त्यांनी याबद्दलचा खुलासा केला. याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांकडे स्मार्टफोन असेल, पण माझ्याकडे नाहीये, असे पुतिन यांनी सांगितले. एवढेच काय पुतिन 2005 पर्यंत साधा मोबाईलही वापरत नव्हते. 

  • गेल्यावर्षी एका शाळेच्या कार्यक्रमात पुतिन यांनी आपण खूपच कमीवेळा इंटरनेट वापरत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.(source :Lokmat)

'लोकांनी तुम्हाला राम मंदिर बांधायला निवडून दिलेय, तिहेरी तलाकचा कायदा करायला नव्हे' :
  • परभणी: देशातील जनेतेने अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भाजपाला निवडून दिलेय, तिहेरी तलाकचा कायदा करायला नव्हे, अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडीया यांनी सरकारवर हल्ला चढवला. तोगडीया हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत.  ते शुक्रवारी परभणी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

  • यावेळी त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदी आणि सरकारला लक्ष्य केले.‘जीएसटी’साठी मध्यरात्री संसदेत बैठक होते मग राम मंदिरासाठी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकार कोणाचेही येवो; पण राममंदिर झाले पाहिजे. कारण आम्हाला राम मंदिर प्रिय आहे, असे तोगडीया यांनी सांगितले.

  • मात्र, आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. परंतु राम मंदिराच्या उभारणीत येणारे अडथळे पाहता त्यासाठी सरकारने संसदेत कायदाच मंजूर केला पाहिजे. त्यामुळे राम मंदिराची उभारणी त्वरेने पूर्ण होईल. मात्र, या मंदिराच्या बाजूला मशिद असू नये, अशी मागणीही तोगडीया यांनी केली.

  • देशामध्ये हिंदू अल्पसंख्याक होण्याची भीती आहे. अशावेळी सत्तास्थानी हिंदूच असले पाहिजेत. पंतप्रधानांसारख्या जबाबदारीच्या पदावर हिंदू व्यक्तीच विराजमान व्हावी मग भलेही ती कोणत्या का पक्षाची असेना, असेही तोगडीया यांनी या वेळी स्पष्ट केले. डॉ. तोगडीया हे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रकाश लाखरा यांच्या विवाहासाठी येथे आले होते. औरंगाबादहून येथे आल्यानंतर दत्त नगरातील प्रल्हाद कानडे यांच्या निवासस्थानी त्यांनी शहरातील व्यापारी व इतर घटकांशी संवाद साधला.(source :Lokmat)

देशभरात ‘नीट’ परीक्षा होणार ६ मे रोजी; आॅनलाइन अर्जासाठी ९ मार्चपर्यंत मुदत :
  • नवी दिल्ली : एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता - प्रवेश परीक्षा ६ मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने ही घोषणा केली आहे. यासाठीचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार, ८ पासून सुुरू झाली आहे. ही प्रक्रिया ९ मार्चला रात्री ११.५० पर्यंत चालणार आहे.

  • आॅनलाइन फी जमा करण्याची मुदत १० मार्च राजी रात्री ११.५० पर्यंत आहे. आसाम, जम्मू-काश्मीर ङ्म मेघालय येथील अर्जदार वगळता उर्वरित सर्वांसाठी आधार नंबर जमा करणे अनिवार्य आहे. जर आधार नंबर, नाव, जन्मतारीख अथवा लिंग याबाबत माहितीत फरक आढळल्यास उमेदवार अर्ज दाखल करु शकणार नाहीत.

  • एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी वयोमर्यादा १७ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय प्रवेशाच्या वेळी १७ वर्षे असायला हवे अथवा ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी उमेदवार १७ वर्षांचा असायला हवा. या प्रवेश परीक्षेच्या वेळी अधिकाधिक वयोमर्यादा २५ वर्षे असायला हवी. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गासाठी तसेच अपंग व्यक्तीचे हक्क कायदा २०१६ नुसार त्यांना वयामध्ये ५ वर्षांची सूट असणार आहे.

  • कोण देऊ शकतो परीक्षा - विद्यार्थी भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, भौतिक, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये एकत्रित किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे. www.cbseneet.nic.in या बोर्डाच्या वेबसाइटवर विद्यार्थी फक्त आॅनलाइन अर्ज करु शकतात.(source :Lokmat)

तुमची आर्थिक मदत नको म्हणणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर पसरले हात :
  • इस्लामाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फटकारल्यानंतर आर्थिक मदत न घेण्याचा गवगवा करणा-या पाकिस्तानने पुन्हा एकदा अमेरिकेसमोर हात पसरले आहेत. पाकिस्तानने अमेरिकेच्या सीमेलगत कुंपण उभारण्यासाठी अमेरिकेकडे मदत मागितली आहे.

  • परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी, आर्थिक समस्यांमुळे अफगाणिस्तानला लागून असणा-या 2343 किमी लांब सीमारेषेवर कुंपण उभारण्याचं काम अद्याप पूर्ण होऊ शकलं नसल्याचं सांगितलं आहे. आतापर्यंत फक्त 10 टक्के भागातच कुंपण उभारण्यात आलं आहे. त्यांनी 2019 च्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. 

  • 'अमेरिकेला यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. यापेक्षा जास्त खर्च तर युद्दात होतो', असं ख्वाजा आसिफ बोलले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर डोंगर आहेत. यामुळे याठिकाणी कुंपण उभारण्याच्या कामात उशीर होत आहे.

  • 'सीमारेषेवरील भाग सर्वांसाठी खुला आहे. रोज 70 हजार लोक सीमारेषेवरुन ये-जा करत असतात. अशा परिस्थिती दहशतवाद्यांचा धोका असतो', असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं आहे. याशिवाय ख्वाजा आसिफ यांनी अफगाणी शरणार्थींना पुन्हा परत पाठण्यासाठीही मदत मागितली आहे. त्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे, सध्या पाकिस्तानात 20 लाखांहून अधिक अफगाण शरणार्थी आहेत. 

  • दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत रोखण्यात आली आहे. पाकिस्तानविरोधात अमेरिकेने केलेली ही मोठी कारवाई आहे. पाकिस्तानला खडसावल्यानंतर अमेरिकेनं तातडीनं कारवाई करत पाकिस्तान लष्कराला करण्यात येणा-या 255 दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत रोखली आहे.(source :Lokmat)

इस्रायलशी संबंध सुधारण्यासाठी मोदींची भूमिका महत्त्वाची - राष्ट्रपती महमूद अब्बास :
  • रामलल्लाह (वेस्ट बँक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-याच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी स्पष्ट केले आहे की, मध्य पूर्व शांतता प्रक्रियेत भारताच्या भूमिकेबाबत आपण मोदी यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच मोदी हे पॅलेस्टाइन व इस्रायल संबंध सुधारण्यासाठी व्यासपीठ व वातावरण निर्माण करतील, अशी खात्री आहे.

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिल्यानंतर या भागात तणाव आहे. या पार्श्वभूमीवर मोदी हे शनिवारी पॅलेस्टाइनला पोहचत आहेत.

  • या देशाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत. ट्रम्प यांच्या जेरुसलेमवरील भूमिकेला संयुक्त राष्ट्र महासभेत आव्हान देण्यात आल्यानंतर यात भारतासहित १२८ राष्ट्रांनी विरोधात मत दिले.

  • राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी म्हटले आहे की, आम्ही मोदींसोबत विविध विषयांवर चर्चा करू. यात शांतता प्रक्रिया, व्दिपक्षीय संबंध, या क्षेत्रातील परिस्थिती यांचा समावेश असेल. भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय सन्माननीय देश असल्याचे सांगून ते म्हणाले की, पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यात एक बहुपक्षीय मंच स्थापन करून त्यातून काही करार करण्यात भारताची महत्वाची भूमिका असू शकते.(source :Lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.

  • १९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.

  • १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.

  • १९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.

  • १९४९: पुणे विद्यापीठाची स्थापना.

  • १९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.

  • १९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.

  • २००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.

जन्म 

  • १८०३: दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८६५)

  • १८९४: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)

  • १९१०: साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००२)

  • १९४५: केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून २०००)

मृत्यू

  • १८६५: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिक लेन्झ यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४)

  • १९१२: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८२७)

  • १९२३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचे निधन. (जन्म: २७ मार्च१८४५)

  • १९८२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९३२)

  • २००१: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०४)

  • २०१२: एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.