चालू घडामोडी ०९ जून २०१८

Date : 9 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ८९.४१ टक्के :
  • दहावीचा निकाल जाहीर- पुणेमहाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.  राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली

  • कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला.

  • विद्यार्थ्यांना दुपारी 1 वा. बोर्डाच्या http://www.mahresult.nic.in/   या वेबसाईटवर निकाल पाहता येईल.

  • SMS सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करायचा आहे. राज्यातील सुमारे 17 लाख 41 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

  • विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरुन गुणपत्रिका प्रत डाऊनलोड करुन घेता येईल. गुणपत्रिकेची मूळ प्रत संबंधित शाळांमध्ये वितरीत केली जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनकडे रवाना :
  • किंगदावो (चीन) - शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेन शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनकडे रवाना झाले आहेत. दहशतवादी नेटवर्कविरुद्ध देशांनी आणि जागतिक पातळीवर एकत्रित कारवाई करावी, अशी भूमिका यावेळी भारत मांडेल.

  • चीनचं प्राबल्य असलेल्या या गटाचा भारत गेल्या वर्षी पूर्ण सदस्य बनला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत शनिवारी चर्चा करण्याची शक्यता आहे.  

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधला नवा ग्रह; पृथ्वीपासून ६०० प्रकाशवर्षे दूर :
  • चेन्नई : अंतराळ विज्ञानामध्ये भारतीय संशोधकांनी नेहमीच महत्त्वाचे शोध लावलेले आहेत.अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) या संस्थेतील संशोधकांनी आता एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे.

  • हा ग्रह पृथ्वीपासून ६०० प्रकाशवर्षे दूर आहे. संशोधकांनी शोधलेल्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या २७ पट असून, ग्रहाची त्रिज्या आहे पृथ्वीच्या सहापट. हा ग्रह सूर्याच्या भोवती एखाद्या ताऱ्याप्रमाणे फिरत आहे, असे संशोधकांचे मत पीआरएलच्या संकेतस्थळावरील माहितीत नमूद करण्यात आले आहे.

  • माऊंट अबूच्या गुरुशिखर येथील १.२ मी दुर्बिण व भारतीय बनावटीच्या पीआरएल अ‍ॅडव्हान्स रॅडिकल वेलॉसिटी आॅल स्काय सर्च (पारस) या दोन्हींच्या मदतीने हा शोध लावला आहे.

  • - या शोधामुळे काही मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताने स्थान मिळवले आहे. या ग्रहाचे नाव एपिक २११९४५२0१ किंवा के२-२३६ असे ठेवले आहे. या ग्रहाचे तापमान खूपच अधिक म्हणजे ६00 अंश सेल्सियस आहे. त्याच्यावर जीवसृष्टी असणे शक्यच नाही.

पेट्रोल-डिझेलऐवजी विमानाचे इंधन स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा घाट :
  • नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलचे दर कमी होण्यासाठी त्यावर जीएसटी लाववा, अशी मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र विमानाचे इंधन जीएसटीखाली आणायच्या विचारात आहे. शिवाय नैसर्गिक वायूही जीएसटीखाली आणण्यात येणार आहे.

  • जीएसटी कौन्सिलचे सहसचिव धीरज रस्तोगी यांनी तसे सांगितल्याची माहिती पीएचडी चेम्बर आॅफ कॉमर्सने दिली. विमानांना लागणारे इंधन जीएसटीखाली आणावे, अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अर्थ

  • मंत्रालयाला केलीच होती. ती मागणी जीएसटी कौन्सिलच्या लवकरच होणाऱ्या बैठकीत मान्य होईल, असे दिसते.

  • रेल्वेलाही डिझेल लागत असून, ते स्वस्त झाल्यास रेल्वेवरील ताणही कमी होईल. असे असताना विमानाच्या इंधनासाठी घाई का, असा प्रश्न विचारला जात आहे.

  • डिझेलला जीएसटी लागू केल्यास त्याचे दर खूपच कमी होतील. त्यामुळे बसचा प्रवास तसेच मालवाहतूकीचे दरही कमी होतील आणि त्याचा थेट फायदा लोकांना होईल. तसेच सर्व राज्यांच्या एसटी महामंडळांचा तोटाही कमी होईल.

ग्रामीण डाक सेवकांना भरघोस पगारवाढ मंजूर, तीन लाख कर्मचाऱ्यांना लाभ :
  • नवी दिल्ली : भारतीय टपाल विभागात खातेबाह्य कर्मचारी म्हणून ग्रामीण व दुर्गम भागांत काम करणा-या ग्रामीण डाकसेवकांच्या सुधारित वेतनश्रेणी व भत्त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

  • देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामीण डाकसेवकांना याचा लाभ होईल. यामुळे चालू आर्थिक वर्षात १,२५७ कोटींचा बोजा पडेल. यापैकी ८६० कोटी थकबाकी वगैरेसाठी एकदाच खर्च करावे लागतील तर आणखी ३६० कोटींचा दरवर्षी वाढीव खर्च होईल.

  • पगाराची फेरचना करताना आता ग्रामीण डाक सेवकांची ‘ब्रँच पोस्ट मास्टर’ व ‘असिन्टंट ब्रँच पोस्ट मास्टरसह इतर’ अशी वर्गवारी केली गेली आहे. जे ब्रँच पोस्ट मास्टर दिवसाला किमान चार तास काम करतात, त्यांना १२ हजार तर दिवसाला पाच तास काम करणा-यास १४,५०० रुपये इतका पगार (टाइम रिलेटेड कन्टिन्युइटी अलाऊंस-टीआरसीए) मिळेल. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर व अन्य डाकसेवकांसाठी ही वेतनश्रेणी अनुक्रमे १० हजार व १२ हजार रुपये असेल.

  • तसेच यांना महागाईभत्ता स्वतंत्रपणे मिळेल. अन्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणे त्यात वेळोवेळी वाढ होईल. तसेच सात हजार रुपये कमाल ‘टीआरसीए’ गृहित धरून वर्षातून एकदा सानुग्रह अनुदान दिले जाईल. वाढीव पगाराची १ जानेवारी २०१६ पासूनची थकबाकी एकरकमी दिली जाईल.

  • यामुळे ग्रामीण सेवकांना ‘टीआरसीए’मध्ये वर्षाला तीन टक्के वाढ मिळेल. ती विनंतीनुसार दरवर्षी १ जानेवारी वा १ जुलैपासून मिळेल. याशिवाय जोखीम व खडतर कामाचा नवा भत्ताही सुरु करण्यात आला आहे. सध्या मिळणाºया अन्य भत्त्यांचे दरही वाढविले आहेत.

तीन वर्षांत घरोघरी येणार विजेचे प्रीपेड मीटर, केंद्र सरकारचा प्रस्ताव :
  • नवी दिल्ली : येत्या तीन वर्षांत देशातील सर्व ग्राहकांच्या वीज जोडण्यांना ‘स्मार्ट प्रीपेड’ मीटर बसविण्याची सक्ती करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. अशी मीटर बसवली की ग्राहकाला त्याच्या संभाव्य वीज वापरापोटी ठराविक रक्कम वीज पुरवठा कंपनीकडे आधीच भरावी लागेल. त्यामुळे वीजबिलांची थकबाकी हा विषय इतिहासजमा होईल.

  • विजेच्या मीटरच्या उत्पादकांची एक बैठक केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केली होती. त्यात ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आर. के. सिंग म्हणाले की, येत्या तीन वर्षांत विजेचे मीटरिंग म्हणजेच वीजवापराची जोडणी व शुल्कआकारणी स्मार्ट व प्रीपेड होणार आहे.

  • त्यामुळे विजेचे बिल ग्राहकाच्या घरी पाठविणे इतिहासजमा होईल. अशा स्मार्ट प्रीपेड वीज मीटरचे उत्पादन वाढविणे व त्यांच्या किंमती कमी करणे ही काळाची गरज आहे.

  • आगामी काळात अशा मीटरची मागणी वाढणार असल्याने उत्पादकांनी तेवढी मीटर बनविण्याची तयारी करावी, असा सल्ला मंत्र्यांनी दिला. भविष्यातील एका ठराविक दिवसापासून प्रत्येक वीज जोडणीस स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे सक्तीचे करण्याचा विचार मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी करावी, असेही त्यांनी सुचविले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

  • १६९६: छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव शिवाजी असे ठेवले.

  • १७००: दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

  • १८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १९००: भारतीय राष्ट्रवादी बिरसा मुंडा यांचे ब्रिटिशांच्या तुरुंगात निधन झाले.

  • १९०६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण.

  • १९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.

  • १९३१: रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.

  • १९३४: डोनाल्ड डक पहिल्यांदा द व्हाइज लिटिल मर्न मध्ये दिसले.

  • १९४६: राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.

  • १९६४: भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.

  • १९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.

  • १९७४: सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.

  • १९७५: ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.

  • १९९७: सुखोई-३० के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.

  • २००१: भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.

  • २००६: १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.

जन्म

  • १८४५: भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९१४)

  • १८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म.

  • १९१२: संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)

  • १९३१: भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट २००६)

  • १९४९: सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म.

  • १९८१: इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म.

मृत्यू

  • १७१६: शिख सेनापती बंदा सिंग बहादूर यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १६७०)

  • १८३४: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचे निधन. (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)

  • १८७०: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)

  • १९००: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. (जन्म: १५ नोव्हेंबर१८७५)

  • १९४६: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १९२५)

  • १९८८: अभिनेते गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ विवेक यांचे निधन.

  • १९९३: बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक सत्येन बोस यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९१६)

  • १९९५: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ एन. जी. रंगा यांचे निधन.(जन्म: ७ नोव्हेंबर १९००)

  • १९९७: इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.

  • २०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.