चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ जुलै २०१९

Date : 9 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हज यात्रेकरुंच्या ‘झम झम’पाण्यावर बंदी नाही, एअर इंडियाचं स्पष्टीकरण :
  • सरकारी विमान सेवा पुरवणाऱ्या एअर इंडियाकडून हज यात्रेकरुंच्या पवित्र झम झम पाण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हज यात्रेकरु यात्रेवरुन परतताना त्यांच्या सामानासह पवित्र झम झम पाणी कॅनमधून घेऊन जाऊ शकतात असं एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे.

  • यापूर्वी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने, एअर इंडियाच्या जेदाह-हैदराबाद-मुंबई आणि जेदाह-मुंबई या दरम्यान उडणाऱ्या विमानांमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत झम झम पाणी आणण्यास बंदी घालण्यात आल्याचं वृत्त दिलं होतं. विमानांमध्ये झालेला बदल आणि मर्यादित आसन संख्या यामुळे झम झम पाण्यासाठी लागणारे कॅन पुरवता येणार नाही असं परिपत्रक 4 जुलै 2019 रोजी एअर इंडियाच्या जेदाह येथील कार्यालयातून जारी करण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं होतं. मात्र, असा कोणताही निर्णय घेण्यात आलं नसल्याचं स्पष्टीकरण एअर इंडियाकडून देण्यात आलं असून वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  • यंदा भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यामध्ये 30 हजारांची वाढ करण्यात आली असून दरवर्षी २ लाख भाविकांना आता हज यात्रा करता येणार आहे. गेल्या महिन्यात जी 20 समिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि सौदीचा युवराज मुहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यामध्ये 30 हजारांची वाढ करण्यात आली असून दरवर्षी 2 लाख भाविकांना आता हज यात्रा करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या विभागांमध्ये दोन वर्षांत ३.८१ लाख नवीन नोकऱ्या :
  • देशात बेरोजगारी वाढत असल्याची टीका होत असतानाच केंद्र सरकारी खात्यांमध्ये गेल्या दोन आर्थिक वर्षांत ३.८१ लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकारने अर्थसंकल्प २०१९-२० च्या कागदपत्रात माहिती दिली आहे.

  • १ मार्च २०१७ रोजी सरकारी आस्थापनातील कर्मचारी संख्या ३२३८३९७ होती ती १ मार्च २०१९ रोजी ३६१९५९६ झाली. याचा अर्थ सरकारी नोकऱ्या या काळात ३८११९९ ने वाढल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या कागदपत्रात  रोजगारवाढीची ही माहिती देण्यात आली आहे.

  • २०१६ मध्ये निश्चलनीकरणानंतर बेरोजगारी निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस व विरोधी पक्षांनी भाजपप्रणित एनडीए सरकारवर लोकसभा निवडणुकीवेळी केला होता.

  • अर्थसंकल्पाचा तपशील देणाऱ्या कागदपत्रात दिलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारी खात्यात अनेक रोजगार दोन वर्षांत निर्माण झाले आहेत. रेल्वे मंत्रालयात सर्वाधिक म्हणजे ९८९९९ रोजगार निर्माण झाले व त्यानुसार कर्मचारी भरतीही करण्यात आली. मार्च २०१७ अखेर रेल्वेची कर्मचारी संख्या १२.७ लाख होती ती १ मार्च २०१९ मध्ये १३.६९ लाख झाली आहे.

बाह्य़ग्रहाची वातावरणीय रचना उलगडण्यात यश :
  • पृथ्वी व नेपच्यून यांच्या मधल्या ग्रहांच्या आकाराच्या आपल्या ग्रहमालेबाहेरील दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. त्यातून या ग्रहाचे स्वरूप व त्याची निर्मिती यावर प्रकाश पडणार आहे.

  • अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेच्या स्पिटझर व हबल दुर्बीणींनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा एकही ग्रह आपल्या सौरमालेत नाही, पण या प्रकारचे ग्रह इतर ताऱ्यांभोवती दिसून येतात असे नासाने म्हटले आहे.

  • ग्लिस ३४७० बी (जीजे ३४७० बी) हा ग्रह पृथ्वी व नेपच्यूनच्या मधल्या आकाराचा असून त्याचा खडकाळ गाभा हा हायड्रोजन व हेलियमच्या वातावरणात गुरफटलेला आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा जास्त तर नेपच्यूनपेक्षा  कमी आहे. असे अनेक ग्रह नासाच्या केप्लर  दुर्बीणीने शोधून काढले आहेत. २०१८ मध्ये या केपलर दुर्बीणीचे काम बंद झाले आहे.

  • आपल्या दीर्घिकेतील ८० टक्के ग्रह हे या वस्तुमानाच्या टप्प्यात येतात. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. जीजे ३४७० बी या ग्रहाच्या वातावरणाचे घटक उलगडताना या ग्रहाचे स्वरूप व मूळ याबाबतही माहिती मिळत आहे. ग्रहांची निर्मिती कशी होते यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे. हा ग्रह ताऱ्याच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालत असून तो गुरूच्या पेक्षा ३१८ पट जड आहे.

  • कॅनडातील माँट्रियल विद्यापीठातील बिजोर्न बेनेक यांनी सांगितले की, तेथील वातावरण हे हायड्रोजन व हेलियमचे आहे. आपल्या सौरमालेतील ग्रहात असा प्रकार आढळून येत नाही. हबल व स्पिटझर दुर्बीणींनी जी ३४७० बी या ग्रहाच्या माध्यमातून प्रथमच वातावरणाचा अभ्यास केला आहे. यात ग्रहाची बारा अधिक्रमणे व २० ग्रहणे तपासण्यात आली होती. कुठल्याही ग्रहाची वर्णपंक्तीय वैशिष्टय़े प्रथमच शोधण्याची ही पहिली वेळ आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७३: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.

  • १८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.

  • १८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.

  • १८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.

  • १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

  • १९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

  • २०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.

  • २०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

जन्म 

  • १६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन यांचा जन्म.

  • १७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म.

  • १८१९: शिवणयंत्राचा संशोधक एलियास होव यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८६७)

  • १९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)

  • १९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १९६४)

  • १९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन यांचा जन्म.

  • १९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर२०१४)

  • १९३८: चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)

  • १९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म.

  • १९५०: युक्रेन चे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म.

  • १९७१: नेटस्केप चे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)

  • १९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८५५)

  • १९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)

  • १९९३: संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.

  • २००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.