कोलकाता : दोन समांतर संघटना स्थापन केल्याबद्दल भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक तिरंदाजी महासंघातर्फे गुरुवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. या महिन्याअखेपर्यंत सर्व काही सुरळीत करण्याचे निर्देश महासंघाकडून देण्यात आले आहेत.
सोमवारपासून बंदीचा निर्णय लागू होणार असून १९ ते २५ ऑगस्टदरम्यान माद्रिद येथे होणाऱ्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना देशाच्या तिरंग्याखाली खेळता येणार आहे. ‘‘जागतिक तिरंदाजी महासंघाने जून महिन्यातच भारतीय तिरंदाजी संघटनेवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता,’’ असे महासंघाचे महासचिव टॉन डायलीन यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
जागतिक महासंघाच्या कार्यकारी मंडळाने भारतीय संघटनेला जुलैपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. पण आतापर्यंत कोणतीही पावले उचलली न गेल्याने महासंघाने अखेर निलंबनाची निर्णय घेतला. ‘‘ऑगस्ट महिन्यापर्यंत समाधानकारक तोडगा न काढल्यास, आशियाई अजिंक्यपद आणि आशियाई पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांच्या सहभागाबाबत कार्यकारी मंडळ अंतिम निर्णय घेऊ शकते,’’ असेही डायलीन यांनी सांगितले.
याप्रकरणी न्यायालयाचा निकाल येणे अपेक्षित असल्यामुळे भारतीय संघटनेने जागतिक महासंघाकडे काही दिवसांची मुदत मागितली होती, मात्र ती फेटाळण्यात आली आहे. न्यायालयात सुनावणी होण्याच्या एक दिवसआधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्थान मिळवता येणार आहे. आतापर्यंत तीन भारतीय पुरुष खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले असले तरी एकाही महिला खेळाडूला टोक्यो ऑलिम्पिकसाठी जागा मिळवता आलेली नाही.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना गुरूवारी ‘भारत रत्न’ या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रणव मुखर्जींना हा पुरस्कार देण्यात आला.
आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भारतरत्नने आजवर ४५ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रणव मुखर्जी यांच्या नावाची भारतरत्नसाठी घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, हजारिका आणि देशमुख यांच्यासह १२ जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम ३७० रद्द करणे का आवश्यक होते ते सांगताना जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन नव्या केंद्रशासित प्रदेशाच्या विकासाची रुपरेखा मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानकडून जी आक्रमक भाषा सुरु आहे किंवा त्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्यावर काहीही भाष्य केले नाही.
देशाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, शामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी आणि कोटयावधी देशवासियांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरचा काय फायदा झाला? हे आतापर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाही असं मोदी म्हणाले. पाकिस्ताने कलम ३७० चा दहशतवादासाठी शस्त्रासारखा वापर केला अशी टीका त्यांनी केली.
कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय काही लोकांना योग्य वाटतो तर काही जणांना हा निर्णय पटलेला नाही. लोकशाहीमध्ये असे होणे स्वाभाविक आहे. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ज्यांना पटलेला नाही त्यांनी सुद्धा देशहिताला पहिले प्राधान्य द्यावे. जम्मू-काश्मीर, लडाखच्या विकासात सहकार्य करावे असे आवाहन मोदींनी केले.
जम्मू-काश्मीरमध्ये सर्वोत्तम टुरिस्ट डेस्टिनेशन बनण्याची क्षमता आहे. मला यासाठी देशवासियाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. परिस्थिती सामान्य झाली तर काश्मीरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल. यामुळे रोजगार वाढेल. चित्रपट सृष्टीने काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा असे मोदी म्हणाले.
दिल्ली : कोणत्याही देवतेचे जन्मस्थान कायद्यानुसार एखादी व्यक्ती किंवा पक्षकार म्हणून कसे गृहीत धरणार, असा प्रश्न गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.
राजकीयदृष्टय़ा संवेदनशील असणाऱ्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या प्रकरणात ‘राम लल्ला विराजमान’ यांना सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न विचारला.
गेले तीन दिवस अयोध्या खटल्याची सुनावणी होत आहे. सगळ्या कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी या खटल्याची सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. यापूर्वी ही सुनावणी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशीच होत असे.
हिंदू देव-देवतांना कायदेशीरदृष्टय़ा एक व्यक्ती म्हणून ग्राह्य़ धरता येते. जे संस्था आणि संपत्तीचे मालक असू शकतात. तसेच ते मालमत्ता आणि संस्थांचे मालक म्हणून ग्राह्य़ धरले जाऊ शकतात. मात्र एखाद्या देवतेचे जन्मस्थान ही स्वतंत्र्य व्यक्ती म्हणून कसे ग्राह्य़ धरणार, असा प्रश्न सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी वरिष्ठ वकील के. पारासरन यांना केला.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरात लवकर पारदर्शक वातावरणात निवडणुका घेतल्या जातील आणि तेथील तरुणांना आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्रीही होता येईल, असे सांगत अनुच्छेद ३७० रद्द झाल्याने काश्मीरचा वेगाने विकास होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली.
अनुच्छेद ३७० आणि ३५ अ रद्द झाल्यानंतर तीन दिवसांनी देशवासियांना उद्देशून ‘दूरदर्शन’वरून दिलेल्या विशेष संदेशात त्यांनी परिस्थिती निवळताच काश्मीरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मागे घेतला जाईल आणि ते स्वतंत्र राज्य म्हणून कार्यरत राहील, असे नमूद केले. अर्थात लडाख हा केंद्रशासितच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या अनुच्छेदामुळे दहशतवाद, भ्रष्टाचार आणि काही कुटुंबांच्या कब्जात असलेल्या राजकारणापलीकडे सर्वसामान्य लोकांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट या अनुच्छेदाचा आधार घेत पाकिस्तानला गैरमार्गाने गैरलाभ मिळवता येत होता. त्यांनी पसरवलेल्या दहशतवादापायी ४२ हजार निर्दोष नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि विकासापासून वंचित राहावे लागले. आता हा अनुच्छेद संपुष्टात आल्याने दीड कोटी काश्मीरवासियांचे वर्तमान तर सुधारेलच, पण भविष्यही सुधारेल. ही या प्रदेशासाठी नवी पहाट आहे, असे ते म्हणाले.
काश्मीरमधील नागरिकांना आता देशातील सर्व योजनांचा समान लाभ घेता येणार आहे. अन्य केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच येथील पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळणार आहेत. हा अनुच्छेद नसल्याने आता काश्मीरमधील पर्यटन तसेच अन्य उद्योगांना तसेच शेती क्षेत्राला मोठा वाव मिळेल. इथे केवळ देशातील चित्रपटांचेच चित्रीकरण होणार नाही, तर परदेशी चित्रपट निर्मातेही इथे चित्रीकरणासाठी येतील, असे ते म्हणाले.
महत्वाच्या घटना
११७३: पिसाच्या मनोर्याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
१८९२: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
१९२५: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकार्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
१९४५: अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.
१९६५: मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी राजीनामा दिला.
१९९३: छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन.
१९७५: पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
२०००: भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.
जन्म
१७५४: वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पिअर चार्ल्स एल्फांट यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १८२५)
१७७६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अॅमेडीओ अॅव्होगॅड्रो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै १८५६)
१८९०: संगीत सौभद्र मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ४ आक्टोबर १९२१)
१९०९: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)
१९२०: घाल घाल पिंगा वार्या, माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुम्ब यांचा जन्म.
१९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म.
१९९१: अभिनेत्री व मॉडेल हंसिका मोटवानी यांचा जन्म.
मृत्यू
११०७: जपानी सम्राट होरिकावा यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)
१९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन.
१९४८: हुगो बॉस कानी चे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८८५)
१९७६: ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)
१९९६: जेट इंजिन चे शोधक फ्रॅंक व्हाटलेट यांचे निधन. (जन्म: १ जुन १९०७)
२००२: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी१९१८)
२०१५: भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी काययार सिंहनाथ राय यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१५)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.