चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ जुलै २०१९

Date : 8 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रिझव्‍‌र्ह बँकेच्या केंद्रीय मंडळास अर्थमंत्री आज मार्गदर्शन करणार :
  • रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाला उद्देशून अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी अर्थसंकल्पोत्तर बैठकीत भाषण करणार आहेत. यात ‘अर्थसंकल्पाची वैशिष्टय़े व आर्थिक शिस्तीसाठी आराखडा’ या विषयांवर त्या मार्गदर्शन करतील. सरकारने वित्तीय तूट एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या ३.३ टक्क्य़ांपर्यंत दाखवली  असून अंतरिम अर्थसंकल्प अंदाजानुसार सहा हजार कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे.

  • फेब्रुवारीत अंतरिम अर्थसंकल्पात वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षांसाठी  ३.४ टक्के दाखवली होती. सरकारने वित्तीय तूट कमी करण्यासाठी पावले उचलली असून २०२०-२१ पर्यंत तूट ३ टक्क्य़ांवर आणण्याचा इरादा आहे. अर्थमंत्री सीतारामन या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणांची माहिती देतानाच त्यामागचे हेतू स्पष्ट करून सांगतील.

  • देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करण्याचा उद्देश अर्थसंकल्पात असून विमा, हवाई वाहतूक, माध्यमे ही क्षेत्रे परदेशी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहेत. त्याशिवाय बँकेतर वित्त संस्थांना संजीवनी देण्यात आली आहे. बँकेतर वित्तीय संस्थांकडून उत्तम दर्जाची मालमत्ता विकत घेताना सरकारी बँकांना १ लाख कोटींची हमी देण्यात आली आहे. रिझव्‍‌र्ह बँक ही गृहवित्त आस्थापने व नॅशनल हाउसिंग बँक  यांच्यातील नियंत्रक आहे. चालू वर्षांत सरकारला रिझव्‍‌र्ह बँकेकडून ९० हजार कोटींचा लाभांश अपेक्षित आहे.

देशातील पोलीस दलांत ५.२८ लाख पदे रिक्त :
  • देशाच्या पोलिस दलात  ५.२८ लाख पदे रिक्त असून त्यात उत्तर प्रदेशातील १.२९ लाख, बिहारमधील ५० हजार व पश्चिम बंगालमधील ४९ हजार पदांचा समावेश आहे,असे गृह मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

  • पोलिसांची सर्व राज्यात एकूण २३७९७२८ पदे मंजूर  असून त्यातील १८५१३३२ पदे  १ जानेवारी २०१८ अखेर भरण्यात आली आहेत. त्या तारखेला ५,२८,३९६ पदे रिक्त होती असे दिसून येते. उत्तर प्रदेशात ४१४४९२ पदे मंजूर असताना २८५५४० पदे भरली गेली आहेत, तर १२८९५२ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्रात २४०२२४ पैकी २६१९५, मध्य प्रदेशात ११५७३१ पैकी २२३५५ पदे रिक्त आहेत. भरतीची संथ प्रक्रिया, निवृत्ती व अकाली मृत्यू यामुळे पोलिसांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आहे.

  • बिहारमध्ये ७७९९५ पदे भरलेली असून एकूण पदसंख्या १२८२८६ आहे त्यात ५०२९१ पदे रिक्त आहेत. पश्चिम बंगालमध्ये १४०९०४ पदे मंजूर असून ४८९८१ पदे रिक्त आहेत. तेलंगणात ७६४०७ पदे मंजूर असून ३०३४५ रिक्त आहेत. नागालँड मध्ये २१२९२ पदे मंजूर असताना त्यापेक्षा ९४१ जास्त पदे भरली आहेत. तामिळनाडूत १२४१३० पदे मंजूर असताना २२४२० रिकामी आहेत.

आधार क्रमांकाने विवरणपत्र भरणाऱ्यांना पॅन क्रमांक आपोआप मिळणार :
  • आधार क्रमांकाच्या मदतीने  विवरण पत्र  भरणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीकर विभागाकडून नवीन पॅन क्रमांक स्वत:हून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी यांनी सांगितले.

  • ज्या करदात्यांकडे पॅन क्रमांक नाही त्यांना आधार क्रमांकाच्या मदतीने प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची मुभा देण्याची घोषणा केंद्राय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.  करविवरण पत्र भरण्यासाठी आधारची बायोमेट्रिक ओळख पुरेशी आहे, असे सांगण्यात आले होते.

  • पॅन (पर्मनंट अकाउंट नंबर) ही व्यवस्था अजून बाद झालेली नाही, अर्थसंकल्पात जरी आधार क्रमांकाच्या आधारे विवरणपत्र भरण्यास मुभा दिली असली तरी जे लोक आधार क्रमांकाने प्राप्तिकर विवरणपत्र भरतील त्यांना पॅन क्रमांक प्रदान केला जाईल. दोन पद्धतीने विवरण पत्र भरण्याची मुभा ही अतिरिक्त सुविधा आहे.  आधार व  पॅन यांची एकमेकांना जोडणी सक्तीची केलेली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅन नाही व आधार क्रमांकाने विवरणपत्र भरले आहे त्यांना पॅन क्रमांक देऊन तो आधारशी जोडण्यात येईल, असे प्रमोद चंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

  • प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासाठी आधार क्रमांक चालणार असेल तर आता पॅन नंबर बाद समजायचा का, या प्रश्नावर मोदी यांनी सांगितले, की आधार व पॅन या दोन्हींचा वापर करता येणार असला तरी पॅन क्रमांकही महत्त्वाचा आहे. पॅन क्रमांक बाद झालेला नाही. केवळ अतिरिक्त सुविधा म्हणून आधार क्रमांकास  परवानगी देण्यात आली आहे. यात प्राप्तिकर अधिकारी त्यांचे अधिकार वापरून पॅन क्रमांक संबंधित व्यक्तीला स्वत:हून जारी करू शकतात. पॅन क्रमांक न देता आधार क्रमांकाने विवरण पत्र भरले तर संबंधित अधिकारी पॅन क्रमांक देऊन तो आधारला जोडून टाकतील.

विजेवरील वाहनांना प्राधान्य – राजीव कुमार :
  • विजेवरील वाहनांना प्राधान्य देऊन या क्षेत्रात देशी उद्योगांनी जगात नेतृत्व करावे असाच हेतू ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पात विजेवरील वाहनांच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जावरच्या व्याजात दीड लाखांची प्राप्तिकर वजावट जाहीर केली होती.

  • कुमार यांनी सांगितले, की अर्थसंकल्पात विद्युत वाहनांना प्रोत्साहनासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे आता वाहन उद्योगास योग्य तो संदेश मिळाला असेल. २०२३ पर्यंत सर्व तीन चाकी वाहने विजेवर चालवण्याचा इरादा असून २०२५ पर्यंत दीडशे सीसीपेक्षा कमी क्षमतेची सर्व दुचाकी वाहने ही विजेवरची असतील.

  • गेल्या महिन्यात सरकारच्या वैचारिक गटाने दोन व तीन चाकी वाहन निर्मात्या कंपन्यांना विद्युत वाहनांकडे वळण्यासाठी २०२५ पर्यंत मुदत दिली आहे. सर्व तीन चाकी विजेवर आणायच्या याची मुदत काय असावी यावर खुलेपणाने चर्चा होऊ शकते, पण हे उपाय केले  पाहिजेत  कारण तसे केले तरच त्यात गुंतवणूक येईल. विद्युत वाहनात भारत जगाचे नेतृत्व करू शकतो. पेट्रोल व डिझेलवर लावलेला एक रुपयांचा अधिभार याच दृष्टीने आहे असेही तुम्ही समजू शकता, असे कुमार म्हणाले.

  • निर्गुतवणुकीबाबत कुमार यांनी सांगितले, की २०१९-२० मध्ये यासाठी १.०५ लाख कोटींचे उद्दिष्ट ठेवले असून ते साध्य करण्यासारखे आहे. मंत्रिमंडळाने आधीच २४ सार्वजनिक उद्योगांच्या विक्रीस मंजुरी दिली आहे. नफ्यातील सार्वजनिक उद्योगांच्या खासगीकरणात आपल्याला धोका वाटत नाही कारण त्याबदल्यात चांगली किंमत मिळू शकते. परदेशातून कर्ज घेऊन १९८०-९० मध्ये कर्जाच्या सापळ्यात अडकलेल्या लॅटिन अमेरिकेचे प्रारूप आम्ही अवलंबलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानवर 'आर्थिक' सर्जिकल स्ट्राईक, 200 टक्के आयात शुल्क करण्याबाबत आज संसदेत प्रस्ताव :
  • नवी दिल्ली: पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लावलेल्या आयात बंदीच्या नियमावर आज संसदेत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत या संदर्भात एक वैधानिक प्रस्ताव मांडणार आहेत.

  • या प्रस्तावामध्ये  पाकिस्तानमधून होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या उत्पादनाच्या आयातीवर 200 टक्के दराने सीमा शुल्क लावण्याच्या निर्णयावर एकमताने शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गेल्या 16 फेब्रुवारीला संसदेत तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या संदर्भात घोषणा केली होती.

  • पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तूंवर भारतानं थेट 200 टक्के आयात शुल्क लादल्याने आता पाकिस्तानला भारतात व्यापार करणं कठिण होणार आहे, या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

  • पुलवामा हल्ल्यानंतर  पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला होता.  सोबतच पाकिस्तानवरून येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या उत्पादनावर  200टक्के  सीमा शुल्क लावण्याचा निर्णय देखील घेतला होता.

  • वाणिज्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार 2018-19 मध्ये पाकिस्तानमधून 3476 कोटींची आयात व्हायची मात्र फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हा आकडा आता केवळ 18 कोटींवर आला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४९७: वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला.

  • १८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.

  • १८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

  • १९३०: किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये  इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.

  • १९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.

  • १९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.

  • २००६: मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • २०११: रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.

जन्म 

  • १७८९: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८५८)

  • १८३१: कोकाकोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८८)

  • १८३९: रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९३७)

  • १८८५: ह्यूगो बॉस चे स्थापक ह्यूगो बॉस यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९४८)

  • १९१४: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१०)

  • १९१६: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार गो. नी. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून१९९८)

  • १९२२: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००९)

  • १९४९: आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा जन्म.

  • १९७२: भारताचे क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६९५: डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक क्रिस्टियन हायगेन्स यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १६२९)

  • १८३७: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)

  • १९६७: ब्रिटिश अभिनेत्री विवियन ली यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९१३)

  • १९८४: पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९१० )

  • १९९४: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किमसुंग २रे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

  • १९९४: मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.

  • २००१: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर याचे निधन.

  • २००३: संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.

  • २००६: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक प्रा. राजा राव यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)

  • २००७: भारताचे ९वे पंतप्रधान चंद्रा शेखर यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९२७)

  • २००८: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन.

  • २०१३: भारतीय लेखक सुन्द्री उत्तमचंदानी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९२४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.