चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०८ ऑगस्ट २०१९

Date : 8 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गेल्या १७ वर्षांत यंदा राज्यसभेची कामगिरी ठरली सर्वोत्कृष्ट; तब्बल ३१ विधेयके मंजूर :
  • गेल्या १७ वर्षात यंदा पहिल्यांदाच राज्यसभेची कामगिरी ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. कारण, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यसभेकडे मंजुरीसाठी आलेल्या ३३ विधेयकांपैकी तब्बल ३१ विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे सुमारे १०५ टक्क्यांनी विधेयकांच्या मंजुरी प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे.

  • या मंजूर विधेयकांमध्ये जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९, मुस्लिम महिलांचे वैवाहिक हक्क संरक्षण विधेयक २०१९ (तिहेरी तलाक) या महत्वाच्या विधेयकांचा समावेश आहे. या अधिवेशनाचा कार्यकाळ संपताना राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू यांनी सांगितले की, गेल्या पाच अधिवेशनांमध्ये सभागृहाची मंजुरी क्षमता ही ७.४४ टक्क्यांहून ६५.६० टक्क्यांवर पोहोचली. गेल्या पाच वर्षातील ही आकडेवारी १०० टक्क्यांहून अधिक आहे.

  • या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत ३६ तर राज्यसभेत ३१ विधेयके मंजूर झाली आहेत. ही ३१ विधेयके ३५ बैठकांमध्ये मंजूर करून घेण्यात आली. राज्यसभेची ही गेल्या १७ वर्षातली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. एकूण ५२ सत्रांमध्ये ही कामगिरी केली गेली. २४९ सत्रांपैकी कामकाजाचे अडीज दिवस हे गोंधळामुळे वाया गेले, यामध्ये सभागृहाच्या कामकाजाची १९ तास १२ मिनिटे वायाला गेली.

  • नायडू म्हणाले, या अधिवेशनात मंजूर झालेली विधेयके ही देशात सामाजीक, आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्या परिणाम करणारी महत्वाची विधेयके होती. यांपैकी तिहेरी तलाक विधेयक जे गेल्या ६० वर्षांत हिंदू कोड बिलानंतर मंजूर झालेले सर्वाधिक महत्वाचे सामाजीक सुधारणा विधेयक होते. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक हे देखील एक ऐतिहासिक विधेयक होते.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा आज ‘भारत रत्न’ पुरस्काराने होणार गौरव :
  • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार ‘भारत रत्न’ देऊन गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भारतरत्नने आजवर ४५ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • प्रणव मुखर्जी यांच्या नावाची भारतरत्नसाठी घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, हजारिका आणि देशमुख यांच्यासह १२ जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे. सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर १९५५ पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.

  • हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले. चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१० मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग चौथी व्याजदरकपात :
  • मुंबई : मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत खालावत्या कर्ज मागणीला उभारी देण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात थेट ०.३५ टक्के कपात केली.

  • याचा कित्ता गिरवून सणांच्या तोंडावर गृह, वाहन कर्जे व्यापारी बँकांकडून स्वस्त होण्याची आता प्रतीक्षा आहे. स्टेट बँकेने लगेचच कर्जस्वस्ताई करून अन्य बँकांना मार्ग मोकळा करून दिला आहे.

  • रिझव्‍‌र्ह बँकेने चौथ्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर ०.३५ टक्के कमी करत ५.४० टक्के असा गेल्या जवळपास दशकातील किमान स्तरावर आणून ठेवला. यामुळे व्यापारी बँकांचा कर्जभार कमी होणार असून त्याचा लाभ कर्जदारांना होणार आहे. पतधोरणापूर्वीच स्टेट बँक, एचडीएफसीने काही प्रमाणात दरकपात केली. मात्र आता अन्य बँकांनाही दरकपातीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्ज मागणीला उठाव नसल्याने नव्या दरकपातीने या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.

संयुक्त राष्ट्रांची स्पष्ट प्रतिक्रिया नाही ; पाकिस्तानची पंचाईत :
  • संयुक्त राष्ट्रे : जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र दर्जा काढून घेतानाच त्याचे विभाजन करण्याच्या निर्णयावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी कुठलीही स्पष्ट प्रतिक्रिया न दिल्याने पाकिस्तानची पंचाईत झाली आहे.

  • गट्रेस यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना असे सांगितले होते की, सध्या काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे त्यावर आमचे लक्ष आहे. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णयही आम्हाला समजलेला आहे. आम्ही यानंतरच्या घटनांवर लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांनी अशा परिस्थितीत संयम राखणे गरजेचे आहे.

  • भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन आहे असे संयुक्त राष्ट्र सचिवांना वाटत नाही का, असे खोदून खोदून विचारले असता त्यांचे प्रवक्ते डय़ुजारिक यांनी सांगितले की, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला समजले आहे, पण सध्यातरी सरचिटणिसांनी परिस्थितीवर लक्ष असल्याचे म्हटले आहे त्यावर तुम्ही समाधानी रहा.

  • पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पाठवलेले पत्र तुम्हाला मिळाले का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, कुरेशी यांनी भारताने कलम ३७० रद्द करण्यापूर्वीच एक पत्र संयुक्त राष्ट्र सरचिटणीस तसेच आमसभा अध्यक्षांना लिहून भारत कलम ३७० रद्द  करण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी वातावरणनिर्मिती करीत असल्याचे कळवले आहे, अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत हे आम्हालाही प्रसारमाध्यमातून समजवे आहे. असे पत्र मिळाल्याची कुठलीही खातरजमा आता तरी आम्ही करू शकत नाही. जेव्हा ते पत्र मिळेल तेव्हा त्याचा अभ्यास करून पोच दिली जाईल.

सुषमा स्वराज यांनी दिली होती ‘या’ क्रिकेटपटूला भारतीय नागरिकत्वाची ऑफर :
  • भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले.  त्या ६६ वर्षांच्या होत्या. ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे त्यांचे निधन झाले. मंगळवारी रात्री त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तर जनसामान्यांनी त्यांच्याबाबतच्या आठवणी सोशल मिडीयावर शेअर केल्या. तशातच अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान याला सुषमा स्वराज यांनी भारतीय नागरिकत्व बहाल करण्याचे केलेले ट्विटदेखील पुन्हा एकदा चर्चेत आले.

  • IPL 2018 मध्ये हैदराबाद विरूद्ध कोलकाता या क्वालिफायर सामन्यात रशिद खान याने दमदार कामगिरी केली होती. त्याने त्या सामन्यात ४ षटकात १९ धावा देत ३ गडी टिपले होते. याशिवाय ३४ धावांची तुफानी खेळी करत त्याच्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले होते. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी रशिद खान याला भारताचे नागरिक करून घ्या. त्याचा भारताला खूप फायदा होईल, अशा आशयाचे ट्विट केले होते.

  • महत्वाचे म्हणजे त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी या ट्विटची दखल घेत रशिद खानला भारतीय नागरिकत्वाची ऑफर दिली होती. मी सगळे ट्विट वाचले आहेत. नागरिकत्वाची कामे ही परराष्ट्र मंत्रलयाच्या आखत्यारित येतात, असे त्यांनी ट्विट केले होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १५०९: कृष्णदेव राय हे विजयनगर चे सम्राट बनले.

  • १६४८: स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.

  • १९०८: विलब राइट यांनी पहिले उड्डाण केले.

  • १९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.

  • १९६३: इंग्लंडमधे १५ जणांच्या टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.

  • १९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.

  • १९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.

  • १९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.

  • १९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

  • २०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.

  • २००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

जन्म 

  • १०७८: जपानी सम्राट होरिकावा यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)

  • १८७९: अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे सहसंस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)

  • १९०२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९८४)

  • १९१२: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)

  • १९१२: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)

  • १९२५: शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे यांचा जन्म.

  • १९२६: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९४)

  • १९३२: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९९८)

  • १९३४: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१४)

  • १९४०: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २००७)

  • १९५०:  प्लेस्टेशन चे निर्माते केन कुटारगी यांचा जन्म.

  • १९५२: भारतीय क्रिकेटपटू सुधाकर राव यांचा जन्म.

  • १९६८: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ऍबे कुरिविला यांचा जन्म.

  • १९८१: स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८२७: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १७७०)

  • १८९७: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८४८)

  • १९९८: लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन.

  • १९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.