चालू घडामोडी - ०७ एप्रिल २०१८

Date : 7 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज, ११० लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू :
  • चीन आणि पाकिस्तानकडून मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदल आणखी शक्तिशाली होण्यासाठी सज्ज होत आहे. भारत सरकारने ११० लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलरच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल ठेवले आहे.

  • वायूदलाने शुक्रवारी सुरूवातीची निविदा म्हणजे आरएफआय (रिक्वेस्ट फॉर इन्फर्मेशन) जारी केले आहे. भारतीय वायूदलाला लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी बोईंग, लॉकहूड मार्टिन, साब आणि डेसॉल्टसारख्या कंपन्या पुढे येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हा लढाऊ विमानांचा जगातील सर्वांत मोठा व्यवहार असेल.

  • सर्व ११० लढाऊ विमाने ही एक किंवा दोन इंजिनची असतील. त्याची निर्मिती विदेशी कंपन्यांच्या सहकार्याने होईल. जगातील प्रमुख विमान उत्पादक कंपन्यांसाठी आरएफआय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदेशी कंपनी एका भारतीय कंपनीच्या भागिदारीत नवीन लढाऊ विमानांच्या उत्पादनात उतरतील.

  • या प्रकल्पावर सुमारे १.१५ लाख कोटी रूपये खर्च होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि चीनकडून मिळत असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय वायूदलाकडे किंमान ४२ फायटर स्क्वॉड्रनची आवश्यकता भासत आहे. पण आतापर्यंत ३१ फायटर स्क्वॉड्रनच आहेत. त्यातील प्रत्येकांत १८ जेट्स आहेत. अशात संरक्षण मंत्रालयाने वायूदलाला एक आणि दोन इंजिनच्या लढाऊ विमानांचा नवीन प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे.

आयपीएलच्या नव्या पर्वाला प्रारंभ :
  • दहा वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणानंतरही या लीगच्या प्रेक्षकक्षमतेचा झरा आटलेला नाही. त्यामुळे चाहतेही आयपीएलचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या माजी विजेत्यांचे पुनरागमन होत असल्याने त्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवारी आयपीएलच्या ११व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्यानंतर गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या दर्जेदार खेळाचा मनमुराद आस्वाद लुटला जाणार आहे.

  • यजमान मुंबईच्या कामगिरीपेक्षा दोन वर्षांनंतर लीगमध्ये खेळणाऱ्या चेन्नईकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या मिडास स्पर्शाने चेन्नईने दोन वेळा लीगचे जेतेपद पटकावले आहे आणि चार वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे झोकात पुनरागमन करण्याच्या निर्धाराने हा संघ मैदानात उतरणार आहे.

  • पुनरागमन करताना धोनीने आपले जुनेच सहकारी संघात कायम राहतील याची काळजी घेतली आहे. सुरेश रैना, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो हे धोनीचे हुकमी एक्के आहेत. त्यात मुंबईचा हरभजन सिंग यंदा चेन्नईकडून खेळणार असल्याने धोनीची गोलंदाजीची बाजू अधिक भक्कम झाली आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा फॅफ डय़ू प्लेसिस, सॅमी बिलिंग्स, शेन वॉटसन हेही चेन्नईचे हुकमी शिलेदार आहेत.

सतीश शिवलिंगमची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्णपदक :
  • नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सतीश शिवलिंगमने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरूषांच्या 77 किलो वजनी गटात सतीश शिवलिंगमनेही सुवर्ण कामगिरी केली आहे. 317 किलो वजन उचलत सतीशने सुवर्णपदक आपल्या नावे केलं. 

  • सतीश क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 173 किलो वजन उचलण्याच यशस्वी ठरला. त्यानंतर त्याने 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी करत पहिला क्रमांक मिळविला. शिवलिंगम स्नॅच राऊंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. सतीशने पहिल्या प्रयत्नात 136 किलो वजन उचललं. तर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 140 किलो वजन उचललं.  त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 144 किलो वजन उचललं. 

  • दरम्यान, याआधी दुसऱ्या दिवशी झालेल्या खेळात वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन पदकं मिळाली. संजिता चानूने सुवर्ण पटकावलं. तर पुरूष गटात वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरने सुवर्णपदकाची कमाई केली. आत्तापर्यंत वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला पाच पदकं मिळाली आहेत.

  • गुरूवारी गोल्ड कोस्ट खेळाच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूने महिला 48 किलो वजनीगटात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर गुरूराजने पुरूष 56 किलो वजनीगटात रौप्यपदक जिंकलं. 

मुंबई पालिकेला तीन राष्ट्रीय पुरस्कार :
  • मुंबई - युनेस्को व केंद्र सरकारच्या सहकार्याने वॉटर डायजेस्टद्वारे दिल्लीत आयोजित सोहळ्यात, मुंबई पालिकेला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी नुकतेच गौरविण्यात आले. बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट, वॉटर री-यूज प्रोजेक्ट आॅफ द ईअर आणि बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट या तीन गटांमध्ये महापालिकेला पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

  • नवी दिल्लीत आयोजित एका सोहळ्याच्या दरम्यान केंद्रीय जलसंसाधनमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे यांनी ते स्वीकारले. पाणीपुरवठा क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ‘वॉटर डायजेस्ट’ या पुरस्कार सोहळ्यास केंद्र सरकार व विविध राज्यांतील सरकारांमधील वरिष्ठ अधिकाºयांसह पाणीपुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.

  • बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट या गटात सर्वोत्कृष्ट कार्याचा पुरस्कार महापालिकेच्या गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या जलबोगद्यासाठी देण्यात आला आहे.

  • भिवंडी तालुक्यातील गुंदवलीपासून सुरू होणारा हा जलबोगदा कापूरबावडीमार्गे भांडुप संकुलापर्यंत पाण्याचे वहन करण्यासाठी बांधण्यात आला. १५.१० किमी लांबीचा, ६.२५ मीटर व्यासाचा हा जलबोगदा जमिनीखाली १२० मीटरवर असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सहा वर्षांत बांधण्यात आला आहे.

मिल्टन कीन्स येथे रंगणार OMPEGचा द्वितीय वर्धापनदिन :
  • लंडन :  यु.के. मधील काही धडाडीच्या उत्साही महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकत्र येऊन OMPEG ही महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संस्था लंडनमध्ये सन २०१६ला  स्थापन केली.

  • OMPEG (Overseas Maharashtrian Professionals and Entrepreneurs Group) या संस्थेचा उद्घाटन सोहळा १० एप्रिल २०१६ रोजी लंडन येथिल सडबरी गोल्फ क्लबवर संपन्न झाला होता. तसेच या संस्थेचा पहिला वर्धापनदिन दि. २९ एप्रिल २०१७ रोजी) मोठ्या दिमाखात लॉर्डसवर साजरा करण्यात आला होता!

  • OMPEG या संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन (दि. ७ एप्रिल रोजी) मिल्टन कीन्स फुटबॉल स्टेडियम वर साजरा करण्यात येत आहे. सदर लेखात जाणून घेऊयात OMPEGच्या वर्धापनदिनाच्या  सोहळ्याबद्दल!

वीरपत्नी स्वाती महाडिकांची प्रेरणादायी कहाणी दहावीच्या पुस्तकात :
  • मुंबई: दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात नवा कोरा आणि अभिमानास्पद धडा समावेश करण्यात आला आहे. मराठीच्या पुस्तकात वीरपत्नी  लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची यशोगाथा सांगण्यात आली आहे.

  • लेफ्टनंट  स्वाती महाडिक या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक हे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते

  • पतीच्या वीरमरणानंतर उच्चशिक्षीत स्वाती यांनीही खडतर प्रशिक्षण घेऊन, सैन्यात जाणंच पसंत केलं.  स्वाती महाडिक गेल्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांची प्रेरणादायी कहाणी दहावीच्या पुस्तकात सांगण्यात आली आहे.

  • सातारा आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. पती निधनाचे असीम दु:ख बाजूला ठेवून, पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम, अशी गौरवगाथा दहावीच्या पुस्तकात मांडण्यात आली आहे.

  • नुकतीच दहावीची नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकं बाजारात उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे दहावीचे उन्हाळी वर्गही सुरुवात होत आहेत. गेल्या वर्षापर्यंत दहावीच्या सर्व पुस्तकांचा संच 577 रुपयांना होता,  आता तो 614 रुपयांना उपलब्ध आहे. एका संचामागे  37 रुपयांची वाढ झाली आहे

१८ वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक :
  • मेलबर्न : ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर दीपक लाथरने भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. दीपकने पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली.

  • दीपकने स्नॅचमध्ये 136 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 159 किलो असं मिळून 295 किलो वजन उचललं. ही कामगिरी त्याला कांस्यपदक मिळवून देणारी ठरली.

  • हरियाणाच्या दीपक लाथरने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद मानण्यात येत आहे. तसंच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं हे चौथं पदक ठरलं. ही चारही पदकं वेटलिफ्टर्सनी मिळवली आहेत.

  • पहिल्या दिवशी मीराबाई चानूने सुवर्ण आणि गुरु राजाने रौप्यपदकाची कमाई केली होती. तर संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.

  • १९०६: माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.

  • १९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.

  • १९४०: पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.

  • १९४८: जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.

  • १९८९: लठ्ठा नावाच्या विषारी दारूने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.

  • १९९६: श्रीलंकेचे क्रिकेटपटू फलंदाज सनथ जयसूर्या यांनी सिंगरकरंडक स्पर्धेत १७ चेंडूंत अर्धशतक करण्याचा विश्वविक्रम केला.

जन्म

  • १५०६: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ – साओ जोआओ, चीन)

  • १७७०: स्वच्छंदतावादाचे प्रणेते आणि इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल१८५०)

  • १८६०: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१)

  • १८९१: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ – लंडन, इंग्लंड)

  • १९२०: भारतरत्‍न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)

  • १९२५: केंद्रीय कृषिमंत्री व कामगार नेते चतुरानन मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २०११)

  • १९३८: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२)

  • १९४२: हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म.

  • १९५४: हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.

  • १९८२: भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर सोंजय दत्त यांचा जन्म.

मृत्यू

  • १४९८: फ्रान्सचा राजा चार्ल्स (आठवा) यांचे निधन. (जन्म: ३० जून १४७०)

  • १९३५: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १८६७)

  • १९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० जुलै १८६३)

  • १९७७: चित्रपट अभिनेते, लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९१२)

  • २००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२२ – एर्नाकुलम, केरळ)

  • २००४: प्रसिद्ध ओडिसी नर्तक केलुचरण महापात्रा यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.