चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ सप्टेंबर २०१९

Date : 6 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्मिथचे कारकीर्दीतील तिसरे द्विशतक :
  • मँचेस्टर : ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने दुखापतीतून सावरत पुनरागमन करताना कारकीर्दीतील दमदार तिसरे द्विशतक झळकावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात पहिला  डाव ८ बाद ४९७ धावांवर घोषित केला.

  • बुधवारच्या ३ बाद १७० धावसंख्येवरून खेळाला सुरुवात झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडचा (१९) बळी गमावला. त्यानंतर मॅथ्यू वेडलाही (१६) मोठी खेळी करण्यात अपयश आले. ५ बाद २२४ अशी स्थिती असताना स्मिथने कर्णधार टिम पेनच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १४५ धावांची अभेद्य शतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले. क्रेग ओव्हरटर्नने पेनला ५८ धावांवर माघारी  पाठवून इंग्लंडला सहावे यश मिळवून दिले.

  • परंतु स्मिथने मात्र शतकानंतरही समाधान न बाळगता द्विशतच्या दिशेने कूच केली. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर दोन धावा काढून स्मिथने द्विशतक साकारले. विशेष म्हणजे तिन्ही द्विशतके त्याने इंग्लंडविरुद्धच झळकावली असून या मालिकेतही आता त्याच्या नावावर तीन शतके जमा आहेत. अखेरीस जो रूटने स्मिथच्या मॅरेथॉन खेळीला लगाम लावला. २४ चौकार व २ षटकारांसह २११ धावा काढून स्मिथ माघारी परतला.

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार :
  • नवी दिल्ली : देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. अहमदनगरमधील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाळेतील डॉ. अमोल बागुल, मुंबईतील ऑटोमिक एनर्जी सेंट्रल स्कूलचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्यातील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी या महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

  •  ‘शिक्षकां’ना उपरोधिक धन्यवाद - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिक्षक दिनानिमित्त ‘शिक्षकां’ना धन्यवाद दिले. आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्यांच्याकडून मी शिकत गेलो त्या सर्वाचे धन्यवाद, असे ट्वीट राहुल यांनी केले. या ‘शिक्षकां’मध्ये समाजमाध्यमांवरून मला ट्रोल करणारी फौज, अजेंडा घेऊन वावरणारे पत्रकार आणि माझे राजकीय विरोधक या सगळ्यांनी माझ्यावर केलेला शाब्दिक प्रहार, खोटा प्रचार, माझ्याविरोधात व्यक्त केलेला संताप मला खूप काही शिकवून गेला आणि मला अधिक मानसिकदृष्टय़ा अधिक सक्षम बनवून गेला, असे उपरोधात्मक ट्वीट राहुल गांधी यांनी केले.

  • प्लास्टिक नको! – शिक्षकांना आवाहन - रशियाच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांसाठी संदेश दिला आहे. एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. त्यासाठी जनमोहीम उभारण्यासाठी शिक्षकांनी सहभागी व्हावे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. दिल्लीत विविध मंत्रालयातही आता प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर कमी करण्यावर भर दिला जात आहे. भाजपच्या मुख्यालयातही प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांऐवजी स्टीलचे मोठे जग आणि कागदी पेले ठेवले जात आहेत.

वाहूतक नियमभंग - दोन राज्यातून चार दिवसांत १.४१ कोटींची दंडवसुली :
  • वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागत आहे. नियम लागू करण्यात आल्यानंतर तब्बल १.४१ कोटी रूपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. हरियाणा आणि ओडिसा या राज्यातून केवळ चार दिवसांत एक कोटी ४१ लाख २२ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • वाहतुकीचे नियमभंग होण्याच्या प्रकारांना चाप बसावा या उद्देशाने मोटार वाहन कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ओडिशा राज्यात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यापासून सुमारे ४,०८० चलनांद्वारे ८८ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ४६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. हरियाणामध्ये ३४३ जणांकडून सुमारे ५२ लाख ३२ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये नवा कायदा लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सुमारे ३,९०० जणांवर कारवाई केल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

  • नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता भरघोस वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.

रशियाच्या अति पूर्वेकडच्या विकासासाठी भारत देणार १ अब्ज डॉलरचे कर्ज :
  • अति पूर्वेकडच्या भागाच्या विकासासाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून काम करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. मोदी सध्या दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या भागाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांनी एक अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचीही घोषणा केली आहे.

  • दोन्ही बाजूंच्या सरकारी संवादापुरती भारत आणि रशियामधील मैत्री मर्यादीत नाही.लोकांचे परस्परांशी असलेले नाते, दृढ आर्थिक संबंधही त्यामध्ये आहेत असे मोदी इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत म्हणाले. रशियाच्या अति पूर्वेकडच्या भागाबरोबर भारताचे फार जुने नाते आहे. व्लादिवोस्तोकमध्ये दूतावासा सुरु करणारा भारत पहिला देश आहे असे मोदी म्हणाले. सोवितय रशियाच्यावेळी जेव्हा इतर परदेशी नागरिकांवर व्लादिवस्तोकमध्ये बंदी होती तेव्हा भारतीयांसाठी प्रवेश खुला होता. संरक्षण आणि विकासासंबंधीचे मोठ्या प्रमाणावर सामान व्लादिवस्तोकच्या माध्यमातून भारतात पोहोचत होते. याच भागीदारीचा वृक्ष आजही आपली मुळे घट्ट करीत आहे.”, असेही मोदींनी म्हटले आहे.

  • “मी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी भारत-रशिया सहकार्यासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार, हे संबंध केवळ राजकीय पातळीवर न राहता उद्योग क्षेत्रातील सहकाऱ्यापर्यंत नेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही आम्ही ‘सबका साथ-सबका विकास आणि सबका विश्वास’ या मंत्राद्वारे नवभारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करीत आहोत. २०२४ पर्यंत भारताला ५ ट्रिलिअन इकॉनॉमी बनवण्याच्या अभियानातही आम्ही स्वतःला वाहून घेतले आहे” असे मोदींनी सांगितले.

उत्सुकता… शनिवारी चंद्रावर फडकणार तिरंगा :
  • जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-२ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांशी चांद्रयान-२ शनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल. यानाचे लँडिंग झाल्यावर दोन तासांनी म्हणजे ५.३० ते ६.३० च्यादरम्यान विक्रम लँडरमधून प्रग्यान रोव्हर बाहेर पडेल. हा काळ शास्त्रज्ञांसाठी आव्हान ठरणार आहे.

  •  

  • श्रीहरीकोटा येथील डीप स्पेस सेंटरमधील अँटिनाद्वारे यानाचे नियंत्रण सुरू आहे. चांद्रयान-२ चे स्वतंत्रपणे भ्रमण सुरू असून शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा त्याचा १५ मिनिटांचा प्रवास चित्तथरारक असेल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी म्हटले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत.

  • पूर्वनियोजित मार्गावरून या यानाने तीन लाख ८४ हजार कि.मी.चे अंतर कापले आहे. विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद सहा कि.मी. किंवा प्रतितास २१ हजार ६०० कि.मी. असा आहे. त्यानंतर १५ मिनिटांनी विक्रमचा वेग दोन मीटर प्रतिसेकंद राहणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील भारताचे हे प्रथमच अवतरण असेल. यापूर्वी चंद्रावर मानव अथवा यंत्र केवळ अमेरिका, रशिया आणि चीननेच उतरविले आहे.

  • चांद्रयान-२चा आतापर्यंतचा प्रवास सुरळीत होता. पाच महिन्यांपूर्वी इस्राएलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला होता, कारण त्यांच्या यानाचा वेग पुरेसा मंदावला नसल्याने ते कोसळले होते.

वाहतूक नियम अधिक कठोर :
  1. रस्ते नियमांचा भंग – जुना दंड १०० रु., नवीन दंड ५०० रु

  2. प्रशासनाचा आदेशभंग- जुना दंड ५०० रु, नवीन दंड २,००० रु.

  3. परवाना नसलेले वाहन चालवणे – जुना दंड – ५०० नवीन दंड- ५,००० रु.

  4. पात्र नसताना वाहन चालवणे- जुना दंड ५०० रु, नवीन दंड १०,००० रु

  5. वेगमर्यादा तोडणे – जुना दंड – ४०० रु, नवीन दंड – २,००० रु

  6. धोकादायक वाहन चालवणे, जुना दंड – १,०००, नवीन दंड ५,००० रु

  7. दारू पिऊन वाहन चालवणे – जुना दंड २,००० रु, नवीन दंड – १०,००० रु.

  8. वेगवान वाहन चालवणे- जुना दंड – ५०० रु, नवीन दंड – ५,००० रु

  9. विनापरवाना वाहन चालवणे – जुना दंड, ५,००० रु., नवीन दंड – १०,०००

  10. सीटबेल्ट नसणे – जुना दंड- १०० रु, नवीन दंड – १,००० रु

  11. दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – जुना दंड -१०० रु, नवीन दंड – २,००० रु

  12. अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – नवीन दंड – १०,०००

  13. विमा नसताना वाहन चालवणे – जुना दंड १,००० रु, नवीन दंड – २, ००० रु

  14. अल्पवयीन मुला-मुलींकडून गुन्हा - २५,००० रु. दंड व मालक – पालक दोषी. ३ वर्षे तुरुंगवास.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.

  • १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

  • १९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

  • १९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.

  • १९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

  • १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

  • १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.

  • १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

जन्म 

  • १७६६: इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४)

  • १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)

  • १८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.

  • १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)

  • १९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२)

  • १९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.

  • १९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)

  • १९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.

  • १९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.

  • १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)

  • १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.

  • १९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)

  • २००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.