चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०६ जुलै २०१९

Date : 6 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
निवृत्तीसंबंधी एम.एस.धोनीचे मोठे विधान :
  • भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये या सामन्यापेक्षा भारताचा अव्वल फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. धोनी चौथा वर्ल्डकप खेळत असून ही त्याची शेवटची स्पर्धा आहे असा अंदाज काहीजणांनी वर्तवला आहे.

  • या दरम्यान एबीपी न्यूज चॅनलच्या पत्रकारने धोनीला गाठून त्याला थेट निवृत्तीसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर धोनीने त्याच्या नेहमीच्या शैलीमध्ये मी कधी निवृत्त होणार हे मला सुद्धा माहित नाही असे उत्तर दिले. मी कधी निवृत्त होणार हे मला सुद्धा माहित नाही. पण उद्याच्या सामन्याआधी मी निवृत्त व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे असे धोनी म्हणाल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

  • धोनीने या विधानामधून भारतीय संघ किंवा व्यवस्थापनावर निशाणा साधलेला नाही. प्रसारमाध्यमात सतत त्याच्या निवृत्तीची चर्चा करणाऱ्यांवर धोनीने अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे वृत्त वाहिनीने म्हटले आहे.

विज्ञान संशोधनातील गुंतवणुकीत भारत मागे :
  • विज्ञान संशोधनातील गुंतवणुकीत चीनने आक्रमक धोरण ठेवले असून तुलनेने भारतात ‘लालफितीचा कारभार’ असल्याने अनेक अडचणी येत आहेत त्यात वैज्ञानिक व सरकार यांच्यात पुरेशा संपर्काचा अभावही आहे, अशी टीका नोबेल विजेते वैज्ञानिक क्लॉस व्हॉन क्लिटझिंग यांनी केली आहे.

  • संशोधन व विकास यात चीन हा अमेरिकेखालोखाल जास्त खर्च करीत आहे, असे अमेरिकेच्या ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन व नॅशनल सायन्स बोर्ड’  या दोन संस्थांनी दिलेल्या माहितीतून २०१८ मध्ये दिसून आले आहे.

  • १९८५ मध्ये ‘इंटिगर क्वांटम हॉल इफेक्ट’च्या शोधासाठी नोबेल मिळवणारे क्लिटझिंग यांनी सांगितले की, भारत व चीन हे जगातील दोन मोठे उदयोन्मुख देश आहेत पण संशोधन क्षेत्राचा विचार करता चीन जास्त आक्रमक आहे. संशोधन क्षेत्रात त्यांची गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात आहे. चिनी अर्थव्यवस्थेचा भर हा विज्ञान व नवप्रवर्तनावर आहे. पायाभूत सेवा व विकास यात त्यांची गुंतवणूक खूप मोठी आहे.

  • ६८ व्या लिंडाव नोबेल मानकरी परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, वर्षभराच्या कुठल्याही कालावधीचा विचार करता चीनने भारतापेक्षा अधिक पेटंट नोंदवले आहेत. शिवाय त्यांच्या शोधनिबंधांची संख्याही जास्त आहे.

संरक्षण विभागाला सर्वाधिक, कोणत्या क्षेत्राला किती तरतूद :
  • नवी दिल्ली : मोदी सरकार 2 चा पहिला अर्थात 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मांडला. यंदा 27 लाख 86 हजार 349 कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 13 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. संरक्षण खात्याला सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे, तर कृषी विभागाच्या तरतुदीमध्ये 75 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

  • देशाद्वारे घेण्यात आलेल्या कर्जावरील व्याज हा भारत सरकारचा मुख्य खर्च आहे. 2019-20 च्या अर्थसंकल्पात सरकारने सहा लाख 60 हजार 471 कोटी रुपयांची तरतूद व्याजासाठी केली आहे. गेल्या वर्षी पाच लाख 87 हजार 570 कोटी रुपये व्याजरुपी खर्च झाले.

  • संरक्षण खात्याला सर्वाधिक (तीन लाख 5 हजार 296 कोटी रुपये) तरतूद करण्यात आली आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या नऊ टक्के ही रक्कम आहे. विविध प्रकारच्या सबसिडी (अनुदान) साठी तीन लाख 1 हजार 694 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • कृषी विभागासाठी करण्यात येणारी तरतूद 75 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. या विभागाला आता एक लाख 51 हजार 518 कोटी रुपये देण्यात आले आहेत. निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता यातून दिसत आहे.

एक, दोन, पाच, दहासोबत वीस रुपयांचं नाणंही लवकरच चलनात, अर्थमंत्र्यांची घोषणा :
  • नवी दिल्ली : एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नव्या नाण्यांच्या मालिकेसोबतच वीस रुपयांची नाणी बाजारात आणण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. अंध व्यक्तींनाही सहजपणे ओळखता येतील, अशा पद्धतीची या नाण्यांची रचना असेल.

  • सात मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक, दोन, पाच, दहा आणि वीस रुपयांच्या नव्या नाण्यांच्या सीरीजचं अनावरण केलं होतं. आता ही नाणी बाजारात आणण्याची घोषणा सीतारमण यांनी केली.

  • वीस रुपयांच्या नाण्याची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. या नाण्याला बारा कडा असतील, म्हणजेच हे नाणे बहुकोनी असेल. तांबं, जस्त आणि निकलपासून या नाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

  • सर्व किमतीच्या नाण्यांवर अशोकस्तंभ छापण्यात आला असून त्याखाली 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य लिहिलेलं असेल. एका बाजूला देवनागरीत भारत, दुसरीकडे इंडिया हा शब्द इंग्रजीत लिहिलेला आहे.

  • दहा रुपयांचं नाणं चलनात आल्यानंतर जवळपास दहा वर्षांच्या कालावधीनंतर ही नवीन नाणी बाजारात आणण्यात आली आहेत. दरम्यानच्या काळात दहा रुपयांची 13 वेगवेगळ्या प्रकारची नाणी बाजारात आली. त्यामुळे काही जणांनी ही नाणी खोटी असल्याचं सांगत नाकारल्याचे दावेही केले गेले.

देशातील प्रत्येकाला घर देण्याची सरकारची योजना, 2022 पर्यंत 1.95 कोटी घरं बांधणार :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत देशातील प्रत्येकाला घर देण्याची सरकारची योजना आहे. देशात 2022 पर्यंत 1.95 लाख कोटी घरं बांधणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. रेंटल हाऊसिंग अर्थात घर भाड्याने देण्यासंदर्भात कायद्यांमध्ये नव्या सुधारणा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या अनेक जाचक नियमांना बदलण्यासाठी पाऊल उचलणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

  • आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकरी, महिला, शिक्षण, लघुउद्योजक, रोजगार अशा अनेक घटकांसाठी विविध योजना आणि तरतुदींची घोषणा त्यांनी केली. अन्नदात्याला ऊर्जादाता करण्यासाठी कृषी आणि दूध उद्योगासाठी योजना आखणार असल्याचे देखील निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

  • सामान्य माणसाला 45 लाख रुपयांपर्यंतचे घर विकत घेतल्यास 3.50 लाख रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त असणार आहे. सध्या ही सवलत दोन लाखांपर्यंत आहे, मात्र त्यासाठी घराच्या किमतीची मर्यादा नाही. 2022 पर्यंत म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देशातील प्रत्येक कुटुंबाला वीज जोडणी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. ज्यांना कनेक्शन घेण्याची इच्छा नाही त्यांना यातून वगळलं जाईल, असेही त्या म्हणाल्या. आरोग्यदायी समाजाअंतर्गत आयुष्मान भारत, सुपोषित महिला आणि मुलं तर नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

  • १७८५: डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.

  • १८८५: लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.

  • १८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.

  • १९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.

  • १९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.

  • १९३९: जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरले सुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.

  • १९४७: रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.

  • १९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.

  • २००६: चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.

जन्म 

  • १७८१: सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८२६)

  • १८३७: प्राच्यविद्या संशोधक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९२५)

  • १८६२: मानववंशशास्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९३७)

  • १८८१: विदर्भातील संत गुलाबराव महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९१५)

  • १८९०: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९३६)

  • १९०१: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून१९५३)

  • १९०५: राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)

  • १९१४: डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) चे संस्थापक विन्स मॅकमोहन सिनियर यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १९८४)

  • १९२०: अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९५)

  • १९२७: लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट२००१)

  • १९३०: दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणि पद्मविभूषण डॉ. एम. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म.

  • १९३५: चौदावे अवतार दलाई लामा यांचा जन्म.

  • १९३९: भारतीय क्रिकेट खेळाडू मनसूद यांचा जन्म.

  • १९४६: अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा जन्म.

  • १९४६: अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांचा जन्म.

  • १९५२: मराठी साहित्यिक रेखा शिवकुमार बैजल यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय राजकारणी आणि वकील वंदना चव्हाण यांचा जन्म.

  • १९७५: अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते ५० सेंट यांचा जन्म.

  • १९८६: तम्ब्लर चे संस्थापक डेव्हिड कार्प यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८५४: जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७८९)

  • १९८६: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०८)

  • १९९७: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९२१)

  • १९९९: कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९३९)

  • २००२: भारतीय उद्योगपती धीरुभाई अंबानी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३२)

  • २००४: ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष थॉमस क्लेस्टिल यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.