चालू घडामोडी - ०६ डिसेंबर २०१७

Date : 6 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रेल्वेच्या तिकीट बुकिंगआधीच कन्फर्मेशनची मिळणार माहिती :
  • नवी दिल्ली : रेल्वेचे तिकीट घ्यायच्या आधीच कोणत्या गाडीचे तिकीट मिळेल व कोणत्या गाडीचे तिकीट कन्फर्म असेल किंवा वेटिंग तिकीट मिळेल याची माहिती आता प्रवाशांना मिळणार आहे.

  • विमान प्रवासाच्या तिकिटाच्या धर्तीवर रेल्वेदेखील आपली बेवसाइट सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यात गेल्या वर्षीच्या तिकिटांच्या माहितीच्या आधारे तुम्हाला कोणत्या रेल्वेचे तिकीट कन्फर्म असेल किंवा कोणत्या रेल्वेतून तुम्हाला कमी खर्चात प्रवास करता येईल याची माहिती घेता येईल. या सुविधा नव्या वर्षाच्या सुरवातीपासून उपलब्ध व्हाव्यात अशा सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत.

  • गोयल सध्या मुंबईत रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याआधी त्यांनी सगळे विभागीय महाव्यवस्थापक आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाºयांची बैठक घेतली होती. तीत त्यांनी वेबसाइट सुरू करण्याचे आदेश दिले होते.

  • गोयल म्हणाले की विमान कंपन्यांसाठी अशी वेबसाइट बनू शकते तर रेल्वेसाठी का नाही? रेल्वेचे अधिकारी त्यांच्याकडील माहितीच्या आधाराने त्या प्रकारची सोय का देऊ शकत नाहीत? बेवसाईटला उशीर झाल्याबद्दल त्यांनी अधिकाºयांना खडसावले.

  • रेल्वे गेल्या पाच वर्षांच्या माहितीचे विश्लेषण या बेवसाइटसाठी करील. कोणत्या महिन्यात कोणत्या रेल्वेला प्रचंड गर्दी असते व कोणत्या वेळी कोणत्या रेल्वेला फार मागणी नसते याची माहिती ते घेतील. 

भारतात सामना खेळण्याआधी हवेची गुणवत्ता तपासली जावी, श्रीलंका संघाची मागणी :
  • नवी दिल्ली - दिल्लीमधील फिरोजशाह कोटला मैदानावर भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळल्या जात असलेल्या तिस-या कसोटी सामन्याचा आज अखेरचा आणि निर्णायक दिवस आहे. श्रीलंकेची या मालिकेतील कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. खराब कामगिरीशी संघर्ष करणारा श्रीलंका संघ दुसरीकडे प्रदूषणामुळे त्रस्त आहे.

  • मंगळवारी श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमल आणि भारतीय गोलंदाज मोहम्मद शम्मी यांना प्रदूषणाचा त्रास झाल्याचं दिसलं. दोन्ही खेळाडूंनी मैदानातच उलटी केली. दरम्यान श्रीलंका संघाचे मॅनेजर असांका गुरुसिन्हा यांनी मुंबई मिररशी बोलताना माहिती दिली आहे की, 'दोन्ही संघांनी आपापल्या ड्रेसिंग रुममध्ये ऑक्सिजन सिलेंडर लावले आहेत.

  • आपण एखाद्या ड्रेसिंग रुम नाही तर हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये असल्यासारखं वाटू लागलं आहे'. असांका गुरुसिन्हा बोलले आहेत की, 'खेळाडूंना श्वास घेण्यास त्रास होत असून चेंजिंग रुममध्ये ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर केला जात आहे. डॉक्टरांनी आम्हाला तसा सल्ला दिला आहे. इतकंच नाही भारतीय संघही त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा वापर करत आहे'.

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध, घोषणा ११ डिसेंबर रोजी; दिल्लीत भव्य समारंभ :
  • नवी दिल्ली : राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होईल. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि तिला कोणी आव्हान देऊ नये, यासाठी निवडीची घोषणा ११ डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय काँग्रेसच्या निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे.

  • घोषणा झाल्यानंतरच राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यानिमित्ताने दिल्लीत मोठा समारंभ होणार आहे. देशभरातील काँग्रेस नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • गुजरातमधील निवडणुका संपल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून, त्या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल.

  • काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मलापल्ली रामचंद्रन यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, सर्व राज्यांतून मिळून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तब्बल ८९ अर्ज आले होते. ते अर्थातच राहुल गांधी यांच्या नावाचे होते. सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, राहुल गांधी यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यांच्याशिवाय कोणीही या पदासाठी अर्ज केला नव्हता.

‘चीन पाच वर्षांमध्ये सर्वात मोठा आयातदार देश होईल’ :
  • चीन येत्या पाच वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठा आयातदार देश ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एका चिनी गुंतवणूकदार संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. आयातीच्या बाबतीत चीन पाच वर्षांमध्ये अमेरिकेला मागे टाकेल, असे या संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

  • गेल्या दहा वर्षांमध्ये चीनच्या आयातीचे प्रमाण दरवर्षी ६ टक्क्यांनी वाढले आहे. हे प्रमाण अमेरिकेपेक्षा जास्त असल्याचे चीनच्या एका वृत्तसंस्थेने वृत्तात म्हटले आहे.

  • चीन आणि अमेरिका जगातील दोन मोठे आयातदार देश आहेत. या दोन देशांमधील आयातीमधील तफावत २०१८ मध्ये कायम राहिल्यास आणि पुढील वर्षांमध्ये अमेरिकेच्या आयातीमध्ये दरवर्षी ०.१५ टक्क्यांनी घट झाल्यास २०२२ पर्यंत चीन हा जगातील सर्वात मोठा आयातदार देश होऊ शकतो, असे चायना इंटरनॅशनल कॅपिटल कॉर्पोरेशनने (सीआयसीसी) अहवालात म्हटले आहे.

  • या वेगाने चीनची आयात वाढली नाही, तरीही २०२५ पर्यंत चीन हा जगातील सर्वात मोठा आयातदार असेल, असेही सीआयसीसीने म्हटले आहे.

बिटकॉइनपासून दूर राहा, आरबीआयचा सल्ला :
  • मुंबई : सध्या गुंतवणूकदारांमध्ये बिटकॉइनबाबत आकर्षण वाढलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने मंगळवारी गुंतवणूकदारांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

  • आरबीआयने यापूर्वीही बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असं सांगितलं होतं. त्यावरुनच पुन्हा बँकेने गुंतवणुकदरांना बिटकाइनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे .

  • बिटकॉइनच्या मूल्यामध्ये वाढ आणि इनिशियल कॉइनच्या ऑफर्स (ICO)मधील अधिक वाढ झाल्याने, त्यावर बँकेने यावेळी चिंता व्यक्त केली होती.

  • दरम्यान, गेल्या आठवड्यात एका बिटकॉइनचे मूल्य तब्बल 11 हजार डॉलर्सवर पोहोचले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. बिटकॉइनचे नियंत्रण कोणत्याही मौद्रिक प्राधिकरणाच्या माध्यमातून होत नाही.

टू जी घोटाळा: २१ डिसेंबरला अंतिम निर्णय :
  • विशेष सीबीआय न्यायालय टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा अंतिम निर्णय २१ डिसेंबरला देणार आहे. याप्रकरणात माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि द्रमुकच्या राज्यसभा खासदार कनिमोळी हेही आरोपी आहेत. दोघेही सध्या जामिनावर आहेत.

  • सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ.पी.सैनी यांनी टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी निगडीत दोन वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी केली होती. एकाचा तपास सीबीआय तर दुसऱ्या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) होत आहे. न्यायालयात २६ एप्रिल रोजी याप्रकरणी शेवटचा युक्तिवाद झाला होता.

  • सीबीआयच्या मते ए. राजा यांनी टू जी स्पेक्ट्रमच्या वाटपात फेरफार केला होता. त्यामुळे सरकारला मोठे नुकसान सोसावे लागले होते.

  • स्वान टेलिकॉम प्रा. लि.ला टू जी स्पेक्ट्रम वाटप करण्याच्या मोबदल्यात डीबी ग्रूपकडून २०० कोटी रूपये कलैगनार टीव्हीकडे हस्तांतरित करण्यात आले, असे सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले होते. ईडीने मनी लाँड्रिंगशी निगडीत एक वेगळा गुन्हा दाखल केला असून यामध्ये राजा, कनिमोळी, द्रमुकचे सुप्रिमो एम. करूणानिधी यांची पत्नी दयालु अम्माल आणि इतरांनी कट रचला होता, असे म्हटले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

  • १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.

  • १८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.

  • १९१७: फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.

  • १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.

  • १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.

  • १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.

  • १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.

  • १९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म

  • १७३२: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)

  • १८२३: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९००)

  • १८५३: संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)

  • १९१६: गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)

  • १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)

  • १९२३: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २००२)

  • १९३२: पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००७)

  • १९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.

  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.

मृत्य

  • १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)

  • १९५६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल१८९१)

  • १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)

  • १९७६: पत्री सरकार चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १९००)

  • १९९०: मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान तुक़ू अब्दुल रहमान यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९०३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.