चालू घडामोडी - ०५ मे २०१८

Date : 5 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मराठमोळी दीपा आंबेकर न्यूयॉर्कमध्ये न्यायाधीशपदी :
  • मुंबई : दीपा आंबेकर यांनी न्यूयॉर्कमध्ये मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे. न्यूयॉर्क महानगरातील क्रिमीनल कोर्टाच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर यांची नियुक्ती झाली आहे.

  • आंबेकर न्यूयॉर्कमधील पहिल्याच महाराष्ट्रीय, तर तिसऱ्या भारतीय स्त्री न्यायाधीश ठरल्या आहेत.

  • युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अ‍ॅन आर्बर विद्यापीठातून दीपा यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली होती. त्यानंतर अ‍ॅटलांटा शहरात निम्न आर्थिक स्तरातील लोकवस्तीच्या शाळेत त्या शिकवत होत्या. अ‍ॅक्सेन्चर या सल्लागार कंपनीत नोकरी करताना पगारातील पैसे वाचवून रटगर्स लॉ स्कूलमध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली.

  • लॉ फर्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून तब्बल 70 टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केलं. दोन हजार गरजू व्यक्तींच्या बाजूने दीपा यांनी खटले लढवले आहेत.

  • न्यूयॉर्क सिटी कौन्सिलमध्ये सिनियर लेजिस्लेटिव्ह कौन्सिल हे पदही त्यांनी भूषवलं होतं. त्यानंतर न्यूयॉर्कच्या महापौरांनी दीपा आंबेकर यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली.

नाराज विजेत्या कलाकारांना स्पीड पोस्टनं पाठवणार राष्ट्रीय पुरस्कार :
  • नवी दिल्ली -  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते मिळणार असल्याचे कळल्यानंतर 72 कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. पुरस्कारांच्या 64 वर्षांच्या या प्रथेला यामुळे गालबोट लागले असून, अनेक कलाकारही नाराज झाले आहेत.

  • मात्र, ज्या विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता, त्यांचे पुरस्कार व प्रमाणपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार व प्रमाणपत्र विजेत्या कलाकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पीड पोस्ट सुविधेची मदत घेण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. 

  • विजेत्यांनी कितीही सन्मानापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचे पुरस्कार त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयानं निश्चित केले आहे.  70 हून अधिक कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घातला.

  • या पार्श्वभूमीवर विजेत्यांचे पुरस्कार त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवावेत?, यावर विचारविनिमय करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विचारविनिमय केल्यानंतर केंद्र सरकारनं ठरवले की दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पीड पोस्ट सुविधेच्या मदतीनं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी न्या. गोयल :
  • नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवाद कायमचा गुंडाळण्याचा विचार केंद्र सरकारने बदलला असून, आता या लवादाच्या अध्यक्षपदी न्या. आदर्शकुमार गोयल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

  • लवादाच्या अध्यक्षपदावरून न्या. स्वतंत्रकुमार सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यानंतर लवादाचे कामकाज जवळजवळ ठप्प होते. लवादातील कर्मचाऱ्यांची ८० टक्के पदे डिसेंबरपासून रिक्त आहेत.

  • लवादावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता असलेले न्या. गोयल जुलैमध्ये निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयात २०१४ साली नियुक्ती होण्यापूर्वी गोयल ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. राष्ट्रीय हरित लवादाच्या कायद्यातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाचीच लवादाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करता येते.

आता महिन्यातून एकदाच भरा जीएसटी रिटर्न :
  • नवी दिल्ली - ग्राहकांनी खरेदी डिजिटल पेमेंटने केल्यास त्यांना १०० रुपयांपर्यंतचा इन्सेटिव्ह देण्याच्या विचार जीएसटी कौन्सिलने शुक्रवारी अमान्य केला. आता यापुढे महिन्याला एकदाच जीएसटी रिटर्न सादर करावा लागणार आहे.

  • त्याचप्रमाणे साखरेवर सेस लागू करण्याच्या प्रस्तावाला होकार न देता जीएसटी कौन्सिलने यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी काही राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीकडे हा प्रश्न सोपविण्यात आला आहे.

  • जीएसटी कौन्सिलची शुक्रवारी २७ वी बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, सध्या दर महिन्याला एकापेक्षा जास्त वेळा जीएसटी परतावा सादर करावा लागतो. त्याऐवजी महिन्यातून एकदाच हा परतावा सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

देशात रोजगारनिर्मिती ७ वर्षांच्या उच्चांकावर, सरकारला दिलासा :
  • नवी दिल्ली - भारताच्या सेवा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत असून, २0१८-१९ या वित्त वर्षाची सुरुवातही चांगली झाली आहे. नव्या आॅर्डर्समध्ये मोठी वाढ झाली असून, रोजगारनिर्मिती ७ वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले.

  • निक्केई इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) एप्रिलमध्ये वाढून ५१.३ झाला आहे. मार्चमध्ये तो ५0.३ होता. हा इंडेक्स ५0 च्या वर असल्यास विस्तार, तर ५0 च्या खाली असल्यास संकोच दर्शवितो.

  • देशातील सेवा क्षेत्रातील ४00 खासगी कंपन्यांकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे हा इंडेक्स तयार करण्यात आला आहे. भारतीय सेवा क्षेत्रातील घडामोडी वाढल्या असल्याचे एप्रिलच्या अहवालात दिसून आले आहे. याशिवाय रोजगारातही मार्च २0११ नंतर सर्वाधिक गतीने वाढ झाली आहे. गेल्या महिन्यातील रोजगारविषयक आकडेवारीवरून मोदी सरकारवर टीकेचा भडीमार झाला होता. या पार्श्वभूमीवर ताजी आकडेवारी सरकारला दिलासा देणारी आहे.

  • आयएचएस मार्किटच्या अर्थतज्ज्ञ आश्ना दोधिया यांनी सांगितले की, एप्रिलच्या तिमाहीत भारतीय सेवा क्षेत्राने चांगली

  • सुरुवात केलेली पाहणे हे उत्साहवर्धक आहे. या क्षेत्रातील आऊटपूटमध्ये वृद्धीला गती मिळाली आहे, तसेच मागणीच्या स्थितीतही सुधारणा झाली आहे.

टिपू सुलतान म्हणजे ‘टायगर ऑफ मैसूर’ कर्नाटक विधानसभा निवडणूक रणधुमाळीत पाक सरकारचा ट्विट :
  • कर्नाटक विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच पुन्हा एकदा टिपू सुलतानची चर्चा होते आहे. यावेळी ही चर्चा फक्त कर्नाटक राज्यापुरती मर्यादित नाही तर पाकिस्तानने या संदर्भातला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून त्यात टिपू सुलतान हा कसा महान प्रशासक होता याचे वर्णन करण्यात आले आहे.  या व्हिडिओत टिपू सुलतानची तुलना वाघाशी करण्यात आली आहे.

  • टिपू सुलनात मैसूरचा शासक होता इंग्रजांविरोधात लढताना त्याने वाघाच्या शौर्याने लढा दिला. त्यांना पहिले स्वातंत्र्य सेनानी मानले जाते. टिपू सुलतानच्या २१९ व्या पुण्यातिथीनिमित्त आम्ही हा व्हिडिओ प्रसारित करतो आहोत असेही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आणखी एका ट्विटमध्ये वाघासारखे शौर्य दाखवणाऱ्या टिपू सुलतानला आम्ही पुण्यतिथी निमित्त वंदन करतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

  • कर्नाटक सरकारने २०१५ या वर्षात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये टिपू सुलतानच्या जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये वाद झाला. टिपू सुलतान एक महान शासक होता म्हणून आम्ही त्याची जयंती साजरी करणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

  • १९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.

  • १९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.

  • १९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.

  • १९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

जन्म

  • १४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)

  • १८१८: कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १८८३)

  • १९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)

  • १९१६: ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)

मृत्यू

  • १९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९०)

  • १९२२: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचे निधन.

  • १९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.

  • १९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)

  • २००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.