चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ सप्टेंबर २०१९

Date : 4 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विश्वचषक  नेमबाजी स्पर्धा : मनू-सौरभचा ‘सुवर्णभेद’ :
  • युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी दमदार पुनरागमन करत आयएसएसएफ विश्वचषक रायफल आणि पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत सांघिक मिश्र गटात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने अभूतपूर्व अशी कामगिरी करत विश्वचषक स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली.

  • यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा यांनी याच गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. अखेरच्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामुळे भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण नऊ पदके जिंकत अव्वल स्थान प्राप्त केले. या स्पर्धेत अन्य कोणत्याही देशाला एकापेक्षा अधिक सुवर्णपदकाची कमाई करता आली नाही.

  • महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अपूर्वी चंडेला हिने दीपक कुमारच्या साथीने खेळताना भारताला मिश्र एअर रायफल प्रकाराचे सुवर्णपदक मिळवून दिले. अंजूम मुदगिल आणि दिव्यांश सिंग पनवार यांना या प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी भारताच्याच यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा या जोडीवर १७-१५ अशी सरशी साधली. मनू-सौरभ जोडी सुरुवातीला ३-९ अशा पिछाडीवर पडली होती. त्यानंतर त्यांनी ७-१३ आणि ९-१५ असे पुनरागमन केले. मग पुढील सर्व लढती जिंकून या दोघांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. या जोडीने पात्रता फेरीतही ४०० पैकी ३९४ गुणांची कमाई केली होती.

आदिवासींना आता तातडीने जातवैधता :
  • मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीमधील विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना तातडीने जातवैधता प्रमाणपत्रे मिळण्यासाठी आणखी सात जात पडताळणी समित्या कार्यरत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यानुसार पालघर, नाशिक, धुळे, किनवट, गोंदिया, यवतमाळ व चंद्रपूर अशा सात ठिकाणी नवीन समिती कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

  • राज्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० नुसार शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व शासकीय सेवा यामध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांचा लाभ घेण्याकरिता उमेदवाराने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराने प्रवेशाच्या वेळीच त्याचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

  • राज्यात सध्या कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील मोठय़ा प्रमाणावरील प्रलंबित प्रकरणे, त्यासंदर्भातील तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे आणि नव्याने प्राप्त होणारी शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर प्रकरणे इत्यादींचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या अतिरिक्त समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • त्यानुसार सध्या कार्यरत असलेल्या ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व गडचिरोली या आठ  समित्यांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या आठ पडताळणी समित्यांव्यतिरिक्त पालघर, नाशिक, धुळे, किनवट, यवतमाळ, गोंदिया आणि चंद्रपूर अशा एकूण सात ठिकाणी नवीन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची कार्यालये सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा गतीने निपटारा होऊन विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर अर्जदारांना वेळेत प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच निवडणूक व सेवाविषयक प्रकरणांचाही वेळेत निपटारा होण्यास मदत होणार आहे.

आठ अ‍ॅपाची हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलात दाखल :
  • पठाणकोट : अमेरिकी बनावटीची आठ अ‍ॅपाची स्टील्थ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मंगळवारी दाखल करण्यात आली. सीमावर्ती भागातील दहशतवादासह सुरक्षेची अनेक आव्हाने सामोरी येत असताना भारतीय हवाई दलाची मारक क्षमता त्यामुळे वाढली आहे. बोईंग कंपनीने तयार केलेली ही हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा करार चार वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यात अ‍ॅपाची एएच ६४ ई प्रकारची २२  हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचे ठरले होते.

  • हवाई दल प्रमुख धनोआ यांनी यावेळी सांगितले की, ‘अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या हेलिकॉप्टर्सचा मोठा फायदा अपेक्षित आहे. तसेच भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकण्यात आलेले हे पाऊल आहे. या हेलिकॉप्टर्समुळे हवाई दलाची क्षमता वाढणार असून ही हेलिकॉप्टर्स भारताच्या पश्चिम सीमेवर तैनात केली जाणार आहेत.’  भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले होते त्यानंतर सहा महिन्यांनी ही हेलिकॉप्टर्स हवाई दलात सामील करण्यात आल्याने आता भारताची मारक क्षमता वाढली आहे.

  • एएच ६४ ई अ‍ॅपाची हेलिकॉप्टर्स ही जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टर्स मानली जातात ती सध्या अमेरिकी लष्करातही वापरली जात आहेत. भारतीय हवाई दलाच्या भविष्यकालीन गरजांची पूर्तता या हेलिकॉप्टर्समुळे होणार आहे. टेहळणी, सुरक्षा, शांतता मोहिमा, सर्व प्रकारच्या स्थितीत हल्ले अशा सर्वच बाबीत त्यांची कामगिरी चांगली आहे. बोईंग कंपनीने म्हटले आहे की, ही हेलिकॉप्टर्स खरेदी करणारा भारत हा सोळावा देश असून अधिक प्रगत अशी हेलिकॉप्टर्स भारताला देण्यात आली आहेत.

  • ‘भारतीय हवाई दलासाठी अ‍ॅपाची हेलिकॉप्टर्स ही महत्त्वाची ठरतील तसेच भारतीय लष्करी दलांच्या आधुनिकीकरणाच्या गरजांची पूर्तता करण्यात मोठी भूमिका पार पाडण्याची बोईंग कंपनीची तयारी आहे,’ असे  बोईग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यासाठी रवाना :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय रशिया दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी येथे पाचव्या ईस्टर्न इकोनॉमिक फोरम व दोन्ही देशांमधील २० व्या वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होतील.

  •  

  • पंतप्रधान मोदी रशियातील प्रमुख शहर व्लादिवोस्तोकला उद्या (४ सप्टेंबर) सकाळी पोहचतील व पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी ते भारतात परततील. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते या दौऱ्या मागे दोन प्रमुख उद्देश आहेत. पंतप्रधान मोदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पाचव्या ईस्टर्न इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. यानंतर पंतप्रधान मोदी भारत आणि रशिया दरम्यान होणाऱ्या २० व्या वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होतील.

  • शिखर संमेलनानंतर दोन अशा घोषणा होणार केल्या जाण्याची शक्यता आहे, ज्या भारत आणि रशियाचा संबंधांना नवी दिशा देतील. ईस्टर्न इकोनॉमिक फोरमला रशियाने २०१५ मध्ये सुरू केले होते यात माजी उद्योग मंत्री २०१८ मध्ये सहभागी झाले होते. तर माजी परराष्ट्रमंत्री २०१७ मध्ये सहभागी झाले होते.

साखरेच्या इथेनॉल खरेदीला केंद्र सरकारचे प्राधान्य :
  • नवी दिल्ली : आत्तापर्यंत थेट उसापासून बनवलेल्या इथेनॉलच्या खरेदीला प्राधान्य दिले जात होते. आता साखरेपासून बनवलेले इथेनॉलही केंद्र सरकार खरेदी करणार आहे. तेल कंपन्यांसाठीही साखरेपासून बनवलेले इथेलॉन, बी हेवी, सी हेवी इथेलॉन असा प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानमुळे साखर कारखान्यांना आर्थिक लाभ होऊ शकेल.

  • महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून तेथील साखर उद्योगाचे महत्त्व लक्षात घेऊन मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या महत्त्वपूर्ण निर्णयाला मान्यता दिली.

  • आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत करण्यासाठी सलग दोन आठवडे केंद्र सरकारने निर्णय घेतले आहेत. गेल्या आठवडय़ात साखरेच्या निर्यातीला सहा हजार कोटींचे अनुदान जाहीर केले होते.

  • केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरातही वाढ केली आहे. ‘सी हेवी’ इथेनॉलचे दर ४३.४६ वरून ४३.७५ रुपये, बी हेवी इथेनॉल ५२.४३ वरून ५४.२७ रुपये करण्यात आला आहे. उसाचा रस, साखरेपासून बनवलेल्या इथेलॉनचा दर ५९.४८ रुपये प्रति लिटर इतका असेल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

  • १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

  • १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.

  • १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.

  • १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

  • १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.

  • २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

  • २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला.

जन्म 

  • १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)

  • १८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)

  • १९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५)

  • १९०५: मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २००३)

  • १९१३: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. एन. हक्सर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)

  • १९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००३)

  • १९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म.

  • १९४१: केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म.

  • १९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०१५)

मृत्यू 

  • १९९७: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती याचं निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

  • २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री याचं निधन. (जन्म: ५ जानेवारी १९२२)

  • २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)

  • २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५२)

  • २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.