चालू घडामोडी - ०४ ऑक्टोबर २०१७

Date : 4 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तिघा संशोधकांना नोबेल :
  • गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना पदार्थविज्ञानाचे नोबेल आज जाहीर करण्यात आले असून रेनर वाईस, बेरी बॅरिश, किप थॉर्न या तीन संशोधकांना हा पुरस्कार देण्याचे नोबेल समितीने जाहीर केले.

  • पदार्थविज्ञानाचे हे १११ वे नोबेल आहे, गुरुत्वाकर्षणाच्याही लहरी असतात, या आइनस्टाइनने वर्तवलेल्या शक्यतेवर गेल्या वर्षी शिक्कामोर्तब झाले.

  • गेली अनेक वर्षे सर्व जगभरामध्ये गुरुत्वीय लहरींच्या शोधाच्या दिशेने प्रयत्न चालविले होते त्याला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत लायगो (लेसर इंटरफेरोमिटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी) प्रकल्पामध्ये यश मिळाले.

  • लायगोच्या ज्या उपकरणाद्वारे या लहरींचा शोध लावण्यात आला ती उपकरणे अमेरिकेमध्ये लिविंगस्टन, लुझियाना आणि हॅनफोर्ड, वॉशिंग्टन या ठिकाणी उभी करण्यात आली आहेत.

  • १९८० साली विख्यात संशोधक रायनेर वाएस, रिचर्ड फेइन्मन, किप थॉर्न यांनी लायगोची कल्पना मांडली होती. या कल्पनेतून विकसीत झालेल्या एल आकाराच्या उपकरणाने गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचे अस्तित्व शोधले. 

राजकीय पक्षांच्या अस्तित्वालाच अण्णा हजारे यांचे थेट आव्हान :
  • लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध सत्याग्रह करण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय पक्षांच्या थेट अस्तित्वालाच आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • राजकीय पक्षांना मान्यता देणारा १९५१चा लोकप्रतिनिधी कायदाच घटनाबाह्य असल्याचा दावा करून त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही त्यांनी सुरू केल्याचे समजते.

  • ‘निवडणूक लढविण्यासाठी राजकीय पक्षांना चिन्हे कशाला हवीत, राज्यघटनेतील ८४ व्या कलमामध्ये निवडणुकीसंदर्भातील नियम आणि पात्रता दिल्या आहेत, पण त्यामध्ये राजकीय पक्षांची स्थापना किंवा त्यांच्यासाठी चिन्हे आरक्षित करण्याबाबत काहीही नमूद केलेले नाही.

  • त्याचा गैरफायदा घेऊन पक्षांच्या नावावर अनेक भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक निवडून येत असून म्हणून चिन्हेच रद्दबातल करण्याची मागणी माझी आहे, यापूर्वी मी निवडणूक आयोगाला पत्रे लिहिलीत; पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही.

  • आता मात्र सर्वोच्च न्यायालयातच १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यला आव्हान देण्याचा विचार आहे,’ असे हजारे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘नव्या महाराष्ट्र सदना’मध्ये जमलेल्या आपल्या कार्यकर्त्यांंशी बोलताना सांगितले.

वाढती असहिष्णुता धोक्याची : सुशीलकुमार शिंदे
  • सहिष्णू अशी आपल्या राज्याची ओळख असून समता, समानता, सहिष्णू अशी निर्माण केलेली ओळख पुसण्याचे काम सुरू असून त्यामुळे सर्वत्र असहिष्णुता वाढत आहे, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी चिंचवड येथे केली.

  • चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते, अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय़ पाटील अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील होते.

  • ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार व उज्ज्वला शिंदे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, प्रारंभी ‘जन्म घ्यावे कोटी कोटी अशा माऊलीच्या पोटी...’, ही कविता चंद्रकांत वानखेडे यांनी सादर केली. त्यांनतर यशवंत-वेणूचा अनुबंध उलगडला.

  • शिंदे यांच्यासह माजी आमदार उल्हास पवार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी यशवंतरावांचे अनेकविध पैलू उलगडले, व्यासपीठावर सुदाम भोरे, पुरुषोत्तम सदाफुले, रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ उपस्थित होते. 

  • शिंदे म्हणाले, ‘‘मी पुरस्कार स्वीकारणे बंद केले आहे. खरे तर पुरस्कार हे तरुणांना द्यायला हवेत, आज केवळ यशवंतरावांच्या प्रेमापोटी येथे आलो आहे.

बाबासाहेबांच्या लंडनमधील स्मारकाचा प्रकल्प अपूर्णच :
  • डॉ. आंबेडकर हे लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना १९२० ते १९२२ या दरम्यान १०, हेन्री रोडवरील ज्या बंगल्यातील एका खोलीत राहत तो बंगलाच शासनाने ३६ कोटी रुपयांत खरेदी केला होता.

  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील ज्या घरात वास्तव्य होते ते राज्य शासनाने विकत घेतले खरे पण त्या घराचे बाबासाहेबांच्या स्मारकात रुपांतर होऊन त्याचे लोकार्पण होण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बंगल्याला १४ नोव्हेंबर २०१५ रोजी भेट दिली होती.

  • सामाजिक न्याय विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, सध्या शनिवार व रविवारी हा बंगला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

  • दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम सुरू असून बंगल्याची खरेदी आणि दुरुस्तीवर आतापर्यंत ३९ कोटी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

  • जुलै २०१७ च्या विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यातील ३ कोटी १५ लाख रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • लंडन स्कूल आॅफ ईकॉनॉमिक्समध्ये डॉ. आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्याचे प्रस्तावित होते, तथापि, त्यासाठीचा खर्च मोठा असल्याने त्या ऐवजी या स्कूलमध्ये दोन विद्यार्थी पाठवून त्यांचा खर्च करणे योग्य होईल या शक्यतेची तपासणी भारतीय उच्चायुक्तालयाकडून सुरू आहे.

सरकारच्या धरसोड धोरणांचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये :
  • रोजगारांमध्ये सातत्याने वाढ होत असणे हे देशाची अर्थव्यवस्था रुळावर असल्याचे संकेत असून मागील तीन वर्षांमध्ये सरकारने घाईगडबडीत घेतलेल्या काही निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृश लाट आली आहे.

  • मंदीच्या या लाटेमुळे वस्त्रोद्योग ते भांडवली उत्पादन क्षेत्र, बँकिंग ते आयटी, स्टार्ट अप ते ऊर्जा या सर्वच क्षेत्रांमध्ये अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे.

  • या सर्व प्रमुख क्षेत्रांतील नोकऱ्यांबाबतची एकत्रित माहिती उपलब्ध नसल्यामुळे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने सर्व क्षेत्रांतील माहिती एकत्रित करत रोजगारनिर्मितीमध्ये झालेल्या घसरणीचे विश्लेषण केले आहे.

  • वस्त्रोद्योग क्षेत्रात मागील तीन वर्षांमध्ये देशभरातील ६७ युनिट्स बंद पडले असून त्याचा फटका जवळपास १७ हजार ६०० कर्मचाऱ्यांना बसला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची फक्त कापूस आणि मानवनिर्मित फायबर वस्त्रोद्योग मिल्सबाबतची ही अधिकृत आकडेवारी आहे.

  • यामध्ये लहान स्तरावर उत्पादन घेणाऱ्या लघुउद्योगांचा समावेश करण्यात आलेला नसून या क्षेत्रातील अनेक लघुउद्योग बंद पडले असून, मोठय़ा प्रमाणात नोकऱ्यांचे नुकसान नोंदविले गेले आहे.

  • भांडवली उत्पादन करणारी प्रमुख कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी) ने ३१ मार्च २०१७ ला संपलेल्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये ‘धोरणात्मक निर्णय’ म्हणून जवळपास १४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले.

  • टीसीएसने १ हजार ४१४ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला, इन्फोसिस लिमिटेडने १ हजार ८११ कर्मचारी कामावरून कमी केले, तर टेक महिंद्रा लिमिटेडने १ हजार ७१३ कर्मचाऱ्यांमध्ये घट केली.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • राष्ट्रीय एकता दिन

  • स्वातंत्र्य दिन : लेसोथो

जन्म /वाढदिवस

  • म. वा. धोंड, मराठी समीक्षक : ०४ ऑक्टोबर १९१४

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • केशवराव भोसले, मराठी गायक : ०४ ऑक्टोबर १९२१

  • भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक : ०४ ऑक्टोबर २००२

ठळक घटना​​​​​​​

  • फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना : ०४ ऑक्टोबर १९५८

  • पोप पॉल सहावा अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला : ०४ ऑक्टोबर १९६५

  • स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले : ०४ ऑक्टोबर २००४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.