चालू घडामोडी - ०४ मे २०१८

Date : 4 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हा भारतीय तरुण होणार व्हॉट्सअॅपचा सीईओ :
  • व्हॉट्सअॅप या अग्रगण्य मेसेजिंग अॅपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी भारतीय तरुणाचे नाव आघाडीवर आहे. मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा यांची व्हॉट्स अॅपच्या सीईओपदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नीरज अरोरा हे गेल्या सात वर्षांपासून व्हॉट्स अॅपमध्ये कार्यरत आहेत.

  • व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांनी चार दिवसांपूर्वी कंपनीला रामराम ठोकला होता. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. व्हॉट्स अॅपच्या सीईओपदी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत नीरज अरोरा यांचे नाव आघाडीवर आहे. मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा हे गेल्या सात वर्षांपासून व्हॉट्स अॅपमध्ये कार्यरत आहेत. ते व्हॉट्स अॅपमध्ये सध्या बिझनेस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत. टेकक्रंच या वेबसाईटच्या वृत्तानुसार सध्या ते व्हॉट्स अॅप चौथ्या क्रमांकावर आहेत. व्हॉट्स अॅपमधील ‘ऑल थिंग्स बिझनेस’ या विभागाचे ते प्रमुख आहेत.

  • नीरज अरोरा हे दिल्ली आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. पदवी घेतल्यानंतर २००६ साली त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए इन फायनान्स अँड स्ट्रॅटेजी केले. दिल्ली आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर ते २००० साली अॅसिलिओन या कंपनीत नोकरीला लागले. यानंतर त्यांनी टाइम्स इंटरनेट लिमिटेडमध्येही काम केले. जवळपास १८ महिने ते तिथे कार्यरत होते.

  • याशिवाय ते पेटीमच्या संचालक मंडळातही होते. यानंतर विविध कंपन्यांमध्ये काम केल्यावर २००७ मध्ये ते गुगलमध्ये गेले. डिसेंबर २००७ ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत ते गुगलमध्ये कार्यरत होते. गुगलमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंट मॅनेजर यापदावरुन ते प्रिन्सिपल कॉर्पोरेट डेव्हलपमेंट या पदावर पोहोचले. गुगलनंतर ते व्हॉट्स अॅपमध्ये रूजू झाले.

आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार :
  • नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरूवात झाली आहे. हा वितरण सोहळा आज (गुरुवार) सकाळपासूनच चर्चेत राहिला. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत काही पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जात आहेत. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद अनुपस्थित राहणार असल्यानेच विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.

  • याविषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर मराठी कलाकार प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी हा पुरस्कार अखेर स्विकारला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. त्यामुळे हा बहिष्कार मागे घेतल्याचे चित्र दिसून आले.

  • एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी या सावळ्या गोंधळाबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘भारतातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये या पुरस्काराचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेतानाचा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा असतो.

  • पण तोच क्षण जर डावलला जात असेल तर ही वागणूक अपमानास्पद आहे असं वाटतं,’ अशा शब्दांत प्रसाद ओकने संताप व्यक्त केला. तर आतापर्यंत जी प्रथा सुरू होती ती याच वर्षी अचानकपणे मोडण्याचं कारण काय असा प्रश्न मंदार देवस्थळीने उपस्थित केला होता.

तब्बल १५ वर्षानंतर 'हा' संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार :
  • वेलिंग्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंड क्रिकेट संघ 2003 नंतर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. न्यूझीलंड क्रिकेट एक टी-20 सामना खेळण्यासाठी पाकिस्तानच्या निमंत्रणावर सध्या विचार करत आहे. जर न्यूझीलंडने या दौऱ्याला मान्यता दिली तर तब्बल 15 वर्षानंतर त्यांचा पाकिस्तान दौरा असणार आहे.

  • कराचीमध्ये 2002 साली न्यूझीलंड संघाच्या हॉटेलवर आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता.

  • 'सध्या न्यूझीलंड क्रिकेट पाकिस्तानकडून आलेल्या प्रस्तावावर विचार करत आहे. तसंच सुरक्षा एजन्सी, सरकार आणि खेळाडूंशी विचार विनिमय सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही पीसीबी उत्तर देऊ.' अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे.

  • पीसीबीने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना पाकिस्तानमध्ये टी-20 सामना खेळण्यासाठी आग्रह धरला आहे. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच नकार दिल्याने आता पीसीबीचं न्यूझीलंड लक्ष लागून राहिलं आहे.

  • 'आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. आम्ही सध्या तरी पाकिस्तानमध्ये खेळण्याचा विचार करु शकत नाही.' असं उत्तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिलं आहे.

  • दरम्यान, लाहोरमध्ये 2009 साली श्रीलंकन संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही.

बिल गेट्सनी केली ‘आधार’ची स्तुती :
  • वॉशिंग्टन : भारताच्या ‘आधार’ तंत्रज्ञानाने नागरिकांच्या ‘प्रायव्हसी’चा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही आणि हे तंत्रज्ञान अनुकरणीय असल्याने त्याचा इतर देशांमध्ये प्रसार करण्यासाठी आमच्या बिल अ‍ॅण्ड मेलिन्डा गेट््स फाउंडेशनने जागतिक बँकेस अर्थसाह्य दिले आहे, असे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट््स यांनी म्हटले आहे.

  • ‘आधार’चे मुख्य शिल्पकार मानले गेलेले इन्फोसिसचे संस्थापक नंदन निलेकणी हे याकामी जागतिक बँकेस सल्ला व मदत देत आहेत, असेही गेट््स म्हणाले. ‘आधार’मुळे प्रायव्हसीचा भंग होत असल्यावरून व्यक्त केल्या जात असलेल्या चिंतेविषयी गेट््स म्हणाले की, ‘आधार’ ही केवळ व्यक्तीची ओळख पटविण्याची बायो आयडी योजना आहे, यात कोणाच्या प्रायव्हसीचा भंग होण्याचे काही कारण नाही.

  • मात्र विविध कारणांसाठी वापरताना कोणता डेटा स्टोअर केला जात आहे व तो कोणाला उपलब्ध होत आहे, याची काळजी घ्यायला हवी. बँक खात्यांसाठी ‘आधार’चा उपयोग यादृष्टीने चांगल्या प्रकारे केला आहे.

  • ‘आधार’ ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी व्यवस्था असून भारतातील १०० कोटींहून अधिक नागरिकांनी ‘आधार’साठी नोंदणी केली आहे. 

'हे' असणार देशातलं शंभरावं विमानतळ :
  • नवी दिल्ली: लवकरच देशातील विमानतळांची संख्या शंभरवर जाणाराय. सिक्कीममधलं पाकयाँग विमानतळ जून महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. हे विमानतळ देशातलं शंभरावं विमानतळ ठरणाराय. स्पाईसजेट कंपनीला कोलकाता ते पाकयाँग दरम्यान विमान सेवा देण्याची परवानगी मिळालीय. 

  • सध्या देशातील सर्व राज्यांमध्ये विमानतळ आहे. मात्र सिक्कीम त्याला अपवाद आहे. 'जूनमध्ये पाकयाँग विमानतळ कार्यान्वित होईल. त्यामुळे सिक्कीम हवाई मार्गानं देशाशी जोडलं जाईल,' असं सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितलं. देशांतर्गत हवाई वाहतूकसेवेला चालना देण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जातोय. याच योजनेचा भाग म्हणून देशभरातील विमानतळांची संख्या पंचवीसनं वाढवली जाणाराय. 

  • मे/जून महिन्यापासून जमशेदपूर, दुर्गापूर, कुल्लू आणि पंतनगर इथून हवाई वाहतूक सुरू होईल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी ही माहिती दिलीय. याशिवाय 13 विमानतळांचं आधुनिकीकरण केलं जाणाराय. यामध्ये कानपूर, रौरकेला, बुर्नपूर, उत्केला, जेयपोरे या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय 23 विमानतळांना हॅलिपॅड सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन / कोळसा खाण कामगार दिन

महत्वाच्या घटना

  • १८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.

  • १९०४: अमेरिकेने पनामा कालव्याच्या बांधकामास सुरुवात केली.

  • १९१०: रॉयल कॅनेडियन नेव्ही ची स्थापना.

  • १९५९:  पहिले ग्रॅमी पुरस्कार आयोजीत केले गेले.

  • १९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय.

  • १९७९: मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

  • १९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.

  • १९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • १९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

  • १९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.

जन्म

  • १८४७: धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)

  • १९२८: इजिप्तचे ४थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.

  • १९२९: ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९९३)

  • १९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००९)

  • १९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा यांचा जन्म.

  • १९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक याचा जन्म.

  • १९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.

मृत्यू

  • १९३८: ज्युदो चे संस्थापक कानो जिगोरो यांचे  निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर  १८६०)

  • १९८०: आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन.

  • १९८०: युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: ७ मे १८९२)

  • १९८०: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर  यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९०५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.