चालू घडामोडी - ०४ मार्च २०१८

Date : 4 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत आणि व्हीएतनाममध्ये सामंजस्य करार :
  • नवी दिल्ली- व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई क्वांग तीन दिवासंच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज भारत आणि व्हीएतनाम या दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये व्यापार, कृषी, अणुऊर्जा अशा विविध विषयांचा समावेश आहे.

  • त्रान यांच्या भारतभेटीच्यावेळेस बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन होईल आणि सार्वभौमत्त्वाचा सन्मान राहिल अशा मुक्त, स्वतंत्र, भरभराटीस येणाऱ्या इंडो-पॅसिफिक प्रदेशाची निर्मिती करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील असे वक्तव्य केले आहे. चीनच्या या प्रदेशातील हातपाय पसरण्याच्या वृत्तीला ही मोठी चपराक म्हणावी लागेल.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्रान क्वांग यांची भेट झाल्यावर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनामध्ये भारताने व्हीएतनामची भारताच्या अॅक्ट इस्ट धोरणात महत्त्वाची भूमिका असून आग्नेय आशियांशी असलेल्या संबंधांमध्येही त्याचे महत्त्व मोठे आहे असे म्हटले आहे.

  • तत्पुर्वी नरेंद्र मोदी आणि क्वांग यांनी दोन्ही देशांनी संरक्षण, पर्यटन, ऊर्जा, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषय या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष क्वांग यांची भेट घेतली असून तत्पुर्वी सकाळी क्वांग यांचे राष्ट्रपती भवन येथे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.

  • क्वांग काल शुक्रवारी भारतात आले असून त्यांनी बिहारमध्ये बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगयालाही भेट दिली. आज संध्याकाळी ते भारत- व्हीएतनाम उद्योग फोरमला उपस्थित राहातील.

भारताकडे स्नूकरचे पहिले विश्वविजेतेपद, पाकिस्तानवर दणदणीत विजय :
  • दोहा : पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या भारतीय जोडीने माघारल्यानंतरही मुसंडी मारताना अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करीत पहिल्या आयबीएसएफ स्नूकरचे सांघिक विश्वविजेतेपद पटकविले.

  • काल रात्री झालेल्या ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ फ्रेममध्ये ०-२ ने माघारल्यानंतर मनन चंद्राने तिस-या फ्रेममध्ये भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. पंकजने शानदार कामगिरी करीत विजय मिळवून दिला.

  • चौथ्या फ्रेममध्ये बाबर मसिह विरुद्ध अडवाणी संकटात सापडला होता. त्यानंतरही त्याने मुसंडी मारून २-२ अशी बरोबरी साधून दिली. चंद्रा-मोहम्मद आसीफ यांच्यात पाचव्या आणि निर्णायक फ्रेम अनेकदा दोलायमान स्थिती निर्माण झाली. पण संयमी खेळ करणाºया भारतीय खेळाडूने मोक्याच्या क्षणी विजय मिळवून दिला.

  • दुहेरी लढतीत अडवाणी-चंद्रा यांनी बाजी मारली. त्यानंतर एकेरीचे दोन्ही फ्रेम जिंकून जेतेपद खेचून आणले. या विजयासह अडवाणीच्या विश्वविजेते पदाची संख्या १९ झाली आहे.

  • अडवाणीचा शानदार खेळ फायनलमध्ये भारताची सुरुवात खराब झाली. बाबरने पहिल्या फ्रेममध्ये चंद्रावर ७३-२४ असा सोपा विजय मिळविला. आसीफने अडवाणीला ६१-५६ ने नमवून पाकला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दुहेरीत अडवाणीने चंद्राच्या साथीने पाकिस्तानला नमवले.

भारत-पाक फाळणीला जिना नाही, नेहरु-पटेल कारणीभूत - अब्दुल्ला :
  • श्रीनगर : जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला यांनी भारत-पाकिस्तान फाळणीबाबत वक्तव्य करुन वाद उकरुन काढला आहे. फाळणीला जिना नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल कारणीभूत आहेत, असं वक्तव्य फारुक अब्दुल्लांनी केलं.

  • जिना यांनी पाकिस्तानाची निर्मिती केली, असं जग मानतं, मात्र त्यात तथ्य नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानचा जन्म झाला, असं अब्दुल्ला म्हणाले. जम्मूतील 'चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'ने चेंबर हाऊसमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

  • 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगळं मुस्लिम राष्ट्र तयार करण्याचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा एका आयोगाची स्थापना करण्यात आली. भारताचं विभाजन करण्याऐवजी अल्पसंख्याकांना विशेष अधिकार देण्याचा शिफारस या आयोगाने केली. जिनांनी आयोगाची शिफारस मान्य केली. पाकिस्तानाच्या निर्मितीच्या निर्णयापासून ते मागे फिरले, मात्र जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल आणि मौलाना आझाद यांना हा निर्णय मान्य नव्हता' असा दावा फारुक अब्दुल्लांनी केला.

  • 'त्यावेळी तिरस्काराची बीजं पेरली गेली, मात्र त्याची किंमत आजपर्यंत देशाला चुकवावी लागत आहे. धर्म, जात आणि क्षेत्र यांच्या आधारावर आपण कधीपर्यंत लोकांमध्ये फूट पाडत राहणार?' असा सवालही फारुक अब्दुल्लांनी उपस्थित केला.

  • राजकीय पक्ष खुर्ची वाचवण्यासाठी लोकांमध्ये धर्म आणि क्षेत्राच्या आधारे दुही माजवत आहे. काश्मिरमध्ये पीडीपी 'अल्ला'च्या नावे मतं मागते, तर जम्मूत भाजप 'रामा'च्या नावावर. जर वरच्याने (देव) माणसाची निर्मिती करताना फरक केला नाही, तर धर्माच्या आधारे त्यांच्यात फूट पाडणारे आपण कोण? असा प्रश्नही अब्दुल्लांनी विचारला.

देशातील 68 टक्के जनतेवर एनडीएचं राज्य, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य :
  • मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त भारतचा जो नारा दिला होता, तो प्रत्यक्षात येताना दिसत आहे. 2014 साली यूपीएचं देशातील जवळपास 35 टक्के लोकसंख्येवर राज्य होतं, तर एनडीएचं केवळ 22 टक्के लोकसंख्येवर.. मात्र एनडीएचं सध्या जवळपास 68 टक्के जनतेवर राज्य आहे, तर यूपीएचं केवळ 8 टक्के जनतेवर राज्य आहे.

  • देशातील सद्यपरिस्थितीत काँग्रेस आणि यूपीएतील मित्रपक्षांचीही हीच परिस्थिती आहे. 2004 साली काँग्रेससोबत असलेल्या डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या त्रिपुरात भाजपने झेंडा फडकावला आहे. डाव्यांचा पक्ष आता केवळ केरळपर्यंतच मर्यादित राहिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा जुना मित्रपक्ष तृणमुल काँग्रेसही सध्या वेगळा आहे. मात्र तृणमुलकडेही पश्चिम बंगाल हे एकच राज्य आहे.

  • तामिळनाडूतील डीएमके हा पक्षही काँग्रेससोबत होता, मात्र मोदींच्या रणनितीने जयललितांच्या निधनानंतर तामिळनाडूतील दोन्ही गट भाजपच्या जवळ आले आहेत. आरजेडी आणि समाजवादी पार्टीही काँग्रेसचे मित्रपक्ष होते, मात्र त्यांच्याकडे सध्या एकही राज्य नाही.

  • सतत पराभवाचे धक्के सहन करत असलेला काँग्रेस पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकाकी आहे. तर मित्रपक्षांचीही हीच अवस्था आहे. दुसरीकडे मोदींच्या नेतृत्त्वात विजयरथावर सवार झालेल्या भाजपला रोखण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे.

उद्योग व्यवसायात ठसा उमठविणा-या देशभरातील 44 उद्योजकांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान :
  • पणजी : देशभरातील विविध राज्यांतील उद्योग व्यवसायात आपला ठसा उमठविणा-या 44 उद्योजकांना भारतीय राज्य औद्योगिक विकास आणि गुंतवणूक महामंडळ परिषदेच्यावतीने (कोसीडीसी) पाचव्या राष्ट्रीय पुरस्काराने सायंकाळी शनिवारी येथील तारांकित हॉटेलमध्ये गौरविण्यात आले. या सोहळ्य़ात छाप पाडली ती कर्नाटकाने. या राज्यातील सर्वाधिक आठ उद्योजकांना हा पुरस्कार मिळाला, तर गोव्यातील पाच जणांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले. 

  • खासदार नरेंद्र सावईकर, आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्य़ेकर, औद्योगिक विकास महामंडळाचे चेअरमन ग्लेन टिकलो, कोसीडीसीच्या चेअरमन स्मिता भारद्वाज, ईडीसीचे उपाध्यक्ष संतोष केंकरे, व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र वेण्रेकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

  • कोसीडीसीच्या चेअरमन भारद्वाज म्हणाल्या की, राज्य स्तरीय आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून नव्या उद्योगांना चालना मिळत आहे. अशा पुरस्कारातून अनेक युवा वर्गाना प्रेरणा मिळत आहे. त्याचबरोबर उद्योजकांनाही पाठबळ मिळते. सध्या पंजाब नॅशनल बँकेमुळे बँकांची स्थिती आव्हानात्मक बनली आहे.

  • त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकास महामंडळाकडील कर्ज उद्योजकांना मोठे लाभदायक ठरणारे असून, दीर्घ मुदतीचे कर्ज योजनाही उद्योग व्यवसायासाठी पूरक आहेत. महामंडळे गुणवत्तेला वाव देत असून, त्यातून रोजगार निर्मितीलाही हातभार लावत आहेत. 

त्रिपुरा आणि नागालँडच्या विजयानंतर देशातील २१ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता :
  • ईशान्येतील तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल शनिवारी हाती आले. त्रिपुरा हा डाव्यांचा गड मानला जात होता. मात्र त्याला भगदाड पाडत भाजपाने तिथे सत्ता काबीज केली. तसेच नागालँडमध्येही भाजपाने एनडीपीपीसोबत युती करून तिथेही सत्ता आणली आहे. त्यामुळे आता भाजपाशासित राज्यांची संख्या २१ झाली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. त्यांनी केलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसते आहे. २०१४ मध्ये देशातील ३५ टक्के लोकसंख्येवर यूपीएचे राज्य होते. तर २२ टक्के लोकसंख्येवर एनडीएचे राज्य होते. मात्र सध्याचा विचार करता ७० टक्के लोकसंख्येवर भाजपा आणि एनडीएचे राज्य आहे. २१ राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजपा हा पहिलाच पक्ष ठरला आहे.

  • २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देशातील ७ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती. तर काँग्रेसकडे देशातील १३ राज्यांची सत्ता होती. आता मात्र काँग्रेसकडे पंजाब, कर्नाटक, मिझोराम आणि पुद्दुचेरी या चारच राज्यांची सत्ता आहे.

  • कर्नाटक विधानसभा निवडणुका जिंकण्याचा दावाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपा अशी काँटेकी टक्कर पुन्हा एकदा बघायला मिळेल. तिथे नेमके काय होणार? जनता कोणत्या पक्षाला कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७९१: व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.

  • १८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.

  • १८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.

  • १९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.

  • १९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.

  • १९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.

  • १९७४: पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.

  • १९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.

  • १९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.

  • २००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.

जन्म

  • १८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.

  • १८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च१९८५)

  • १९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४)

  • १९२२: गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री विना पाठक यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००२)

  • १९२६: अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.

  • १९८६: इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.

मृत्यू

  • १९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)

  • १९४८: भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८७२)

  • १९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)

  • १९७६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८८६)

  • १९८५: साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.

  • १९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.

  • १९९५: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)

  • १९९६: नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन.

  • १९९७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.

  • १९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.

  • २०००: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९२४)

  • २००७: भारतीय संसद सदस्य सुनील कुमार महातो यांचे निधन.

  • २०११: केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल अर्जुनसिंग यांचे निधन. (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.