चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ जुलै २०१९

Date : 4 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘चांद्रयान-२’चं प्रक्षेपण प्रत्यक्षात पाहण्याची संधी, जाणून घ्या कशी कराल नाव नोंदणी :
  • भारताचा महत्वकांशी प्रकल्प असणारे चांद्रयान-२ लवकरच आकाशात झेपावण्यास तयार आहे. लाँचिंगसाठी तयार आहे. १५ जुलै रोजी रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटामधून येथून प्रक्षेपण होणार आहे. इस्त्रोमार्फत करण्यात येणाऱ्या या लॉचिंगचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे लॉचिंग सर्वसामन्यांना श्रीहरीकोटा येथून प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

  • ‘चांद्रयान-२’ चं लॉचिंग पाहण्यासाठी आज रात्री १२ वाजल्यापासून म्हणजेच ४ जून सुरु होताच नावनोंदणी सुरु होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी इस्त्रोकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क किंवा तिकीट आकारण्यात येणार नाही. श्रीहरीकोट्टा येथील दोन लॉचिंग पॅडपैकी एकावरुन हे प्रक्षेपण होणार आहे. याच लॉचिंग पॅडपासून काही अंतरावर असलेल्या मैदानासारख्या रॉकेट स्पेस थीम पार्कमधून हे लॉचिंग साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. इस्त्रोच्या ट्विटवर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.

  • चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे. लाँचिंगनंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्राच्या कक्षात शिरल्यानंतर यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आसपास ठरलेल्या जागी उतरणार आहे.

सैन्य दलातील शंभर पदांसाठी २ लाख महिलांचे अर्ज :
  • सैन्य दलातील (सीएमपी) जवानांच्या रिक्त असलेल्या 100 पदांसाठी तब्बल 2 लाख महिलांनी ऑनलाइन अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी सशस्त्र दलात महिलांचा समावेश केवळ अधिकारी वर्ग म्हणून केला जात होता. तसेच त्यांना पाणबुड्या आणि युद्धनौकांमध्ये सेवा बजावण्याची संधी देण्यात येत नव्हती. सैन्या दलाने पहिल्यांदाच एक ‘महिला प्रोवोस्ट युनिट’ तयार करण्यावर विचार सुरू केला आहे. यामध्ये दोन अधिकारी, तीन ज्युनिअर कमिशन अधिकारी आणि 40 सैनिक असणार आहेत. ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 8 जून पर्यंत सुरू राहणार आहे.

  • ‘सीएमपी’मध्ये सैनिक म्हणून महिलांची होणारी भर्ती हे उचलण्यात आलेले मोठे पाऊल आहे. 25 एप्रिलपासून या अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल 2 लाख महिलांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. या महिन्याच्या अखेरिस बेळगावमध्ये भर्ती प्रक्रिया पार पडणार आहे. पुढील 17 वर्षांमध्ये सैन्य दलात 1 हजार 700 महिलांना सामिल करून घेण्याची योजना तयार करण्यात आली आहे. याअंतर्गत दरवर्षी 100 महिलांना सैन्यदलात सामावून घेतले जाणार असल्याची माहिती सैन्य दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

  • दरम्यान, महिला जवानांना प्रशिक्षण दिल्यानंतर जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व क्षेत्रांमध्ये जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच महिला आंदोलकांना रोखण्यासाठी तैनात केले जाणार आहे. याव्यतिरिक्त बलात्कार आणि छेडछाडीसारख्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सीएमपी महिला जवान मदत करणार असल्याची माहिती एका अन्य अधिकाऱ्याने दिली. ज्यांना सैन्यदालात लढण्यासाठी जायचे आहे, अशा महिलांना लढाऊ जवानांच्या भूमिकेतही देशसेवा करण्याची संधी देण्यात यावी, असे मत एका महिला अधिकाऱ्याने व्यक्त केले.

'हा' विक्रम करणारे १९७२ नंतरचे फडणवीस ठरले पहिले मुख्यमंत्री :
  • नागपूर : राज्याचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी नवा विक्रम केला आहे. मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारे 1972 नंतरचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. (आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.) 1972 नंतर एका नेत्याने सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे.

  • दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 11 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यामध्ये वसंतरावांनी पाच वर्षांची एक सलग टर्म पूर्ण केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच 5 सलग वर्ष विधिमंडळाचे नेते राहू शकले आहेत. फडणवीस हे राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्रीदेखील आहेत.

  • मुख्यमंत्री होणे आणि पद टिकवण्यासाठी फडणवीसांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर फडणवीसांना पक्षातील आणि पक्षाबाहेरची मोठी आव्हाने होती. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी काही आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांना पक्षातील जुने नेते एकनाथ खडसे यांची महत्त्वकांक्षा, शेतकरी आंदोलनाची तीव्रता, मराठा आंदोलनाचे आवाहन, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ते पंढरपूरच्या विठ्ठल पूजेला जाऊ न शकणे इथपर्यंत बरीच आव्हाने पेलावी लागली होती. तरिही फडणवीस टिकले.

पट्टेवाला ते फौजदार ते केंद्रीय गृहमंत्री, सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष होणार :
  • नवी दिल्ली : तब्बल 21 वर्षानंतर काँग्रेस पक्षाला गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष मिळणार हे आता जवळपास नक्की आहे. विशेष म्हणजे हा मान एका महाराष्ट्रीयन व्यक्तीला मिळण्याचीही दाट शक्यता आहे. कारण राहुल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने सुशीलकुमार शिंदे यांचं नाव अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या नावामागे नेमकी काय काय गणितं असू शकतात यावर एक नजर टाकुयात.

  • काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचा शोध महाराष्ट्रापाशी येऊन थांबणार का, हे पद पहिल्यांदाच एका मराठी व्यक्तीला मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची जोरदार चर्चा सध्या राजधानी दिल्लीत रंगली आहे. कारण अध्यक्षपदासाठी सर्वात आघाडीवर नाव आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं. गांधी घराण्याचा सर्वात विश्वासू माणूस या निकषात सुशीलकुमार अगदी फिट बसतातच. पण इतरही अनेक गणितं त्यांच्या नावामागे असू शकतात.

  • सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. सध्या दलित व्होटबँक काँग्रेसपासून दुरावली आहे. यूपीमध्ये मायावती, महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर यांच्यासारखे नवे वाटेकरी निर्माण झाल्याने काँग्रेस या महत्त्वाच्या राज्यात आपला बेस गमावून बसली आहे. त्यामुळे दलित अध्यक्ष देऊन काँग्रेस एका मोठ्या वर्गाला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि सुशीलकुमार शिंदे हे दोघेही दलित नेते सध्या काँग्रेस हायकमांडच्या जवळचे मानले जातात. पण केंद्रीय मंत्रिपदाचा अनुभव, महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं असल्यानं शिंदे खरगेंपेक्षा सरस मानले जातात.

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल मराठीसह ६ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार :
  • नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे निकाल आता इंग्रजी सोबतच सहा प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करण्यात येतील. ही सुविधा या महिन्याच्या शेवटपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.

  • हिंदी, तेलगु, आसामी, उडिया आणि मराठी या भाषांमध्ये लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे निकालाच्या प्रती देण्यात येतील. 2017 मध्ये कोची येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल सामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचण्यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये देण्यात यावेत अशी सूचना केली होती.

  • त्यानंतर सरन्यायाधीशांच्या निर्देशानूसार सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्री विभागाने यासाठीची तयारी सुरु केली होती. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी देखील प्रादेशिक भाषांमध्ये निकाल देण्यासाठी सुरु प्रयत्न सुरु असल्याची माहिती काही पत्रकारांना दिली होती. यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.

  • सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या याचिकांच्या आधारावर या सहा भाषा निवडण्यात आल्या आहेत. म्हणजेच ज्या राज्यांमधून सर्वोच्च न्यायालयात जास्त याचिका येतात त्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषांची निवड करण्यात आली आहे. येत्या काळात इतर भाषांमध्येही निकालाच्या प्रती देण्यात येतील अशी शक्यता आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १०५४: वृषभ राशीत क्रॅब नेब्यूला दिसत असल्याचे चिनी लोकांना समजले. नंतर जॉन बेव्हिसने इ. स. १७३१ मधे त्याचे निरीक्षण केल्याची नोंद आहे.

  • १७७६: अमेरिकेने स्वत:ला इंग्लंडपासून स्वतंत्र्य घोषित केले.

  • १८२६: अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले.

  • १८८६: फ्रांसने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे भेट दिले.

  • १९०३: मोटर रेस स्पर्धे मध्ये भाग घेणारी डॉरोथी लेव्हिट ही पहिली इंग्लिश महिला ठरली.

  • १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकांतवासास प्रारंभ झाला.

  • १९३६: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

  • १९४६: फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९४७: भारत पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण करावेत असा ठराव ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आला.

  • १९९५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचे (GMRT) संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार प्रदान केला.

  • १९९७: नासाचे पाथफाइंडर हे मानवविरहित यान मंगळावर उतरले.

  • १९९९: लष्कराच्या १८व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.

जन्म 

  • १७९०: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १८६६)

  • १८०७: इटालियन सेनापती व राजकीय नेता जुसेप्पे गॅरीबाल्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १८८२)

  • १८७२: अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कुलिज यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९३३)

  • १८८२: एकेडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचे स्थापक लुईस बी. मेयर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९५७)

  • १८९८: भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९९८)

  • १८९७: भारतीय कार्यकर्ते अलारी सीताराम राजू यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे १९२४)

  • १९१२: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९९४)

  • १९१४: जनकवी भावगीत लेखक पी. सावळाराम यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९९७)

  • १९२६: विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ तथा वि. आ. बुवा यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २०११)

  • १९७६: जपानी मोटरसायकल रेसर दाइजिरो कातो यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल २००३)

  • १९८३: भारतीय-इंग्लिश पत्रकार अमोल राजन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७२९: मराठा आरमारप्रमुख (सेना सरखेल) कान्होजी आंग्रे यांचे निधन.

  • १८२६: अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १७३५)

  • १८३१: अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्रो यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १७५८)

  • १९०२: भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८६३)

  • १९३४: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८६७)

  • १९६३: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८७६)

  • १९८०: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १८९६)

  • १९८२: भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.

  • १९९९: विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.