चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०४ ऑगस्ट २०१९

Date : 4 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फाळणीच्या ७२ वर्षांनंतर पाकिस्तानने उघडले “या” ऐतिहासिक गुरूद्वाराचे दरवाजे :
  • १८३४ मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी उभारलेला आणि फाळणीच्या वेळी बंद करण्यात आलेला ऐतिहासिक छाओ साहेब गुरूद्वारा पाकिस्तान सरकारने तब्बल ७२ वर्षांनंतर शुक्रवारी खुला केला. पंजाब प्रांतातील झेलम जिल्ह्यात हा गुरूद्वारा असुन यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पाकिस्तानसह भारतीतील शिख बांधवही हजर होते.

  • पाकिस्तानातील गुरूद्वारा नानकाना साहिब येथुन सुरू झालेल्या नगर कीर्तन सोहळ्याच्या दोन दिवसानंतर हा गुरुद्वारा छाओ साहिब प्रवेशाचा कार्यक्रम झाला. नगर कीर्तनला शिख बांधव पंजाबमधील अतारी-वाघा बॉर्डरमार्गे भारतात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात सुखमनी साहिब यांचा पाठ आणि अरदास वाचनानंतर झाली. यावेळी लंगरचाही शुभारंभ करण्यात आला. उत्तरेकडे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ असलेल्या रोहताज किल्ल्याजवळ हा गुरूद्वारा आहे.

  • हा गुरूद्वारा ऐतिहासिक का - शिख समुदायाची शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्याविषयी अगाध श्रद्धा आहे. गुरू नानकजी एकदा तिल्ला जोगियन मंदिरात नाथपंथीयांना भेटण्यासाठी गेले होते. तिथुन परतीचा प्रवास करीत असताना छाओ साहिब गुरूद्वारा असलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी या परिसरात प्रचंड दुष्काळ पडलेला होता. लोकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नव्हते. यावेळी गुरू नानक येथे थांबले आणि प्रार्थना केली. त्यानंतर पाण्याचे तुषार येथुन बाहेर पडले, अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे हा गुरूद्वारा शिख समुदायासाठी महत्त्वाचा मानला जातो.

आता भारतीय पोस्ट सुरू करणार ‘ही’ नवी सेवा :
  • देशात ऑनलाइन खरेदीला मिळणारी पसंती पाहता आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना आता भारतीय पोस्टही टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांची संख्या ही फ्लिपकार्टवर असलेल्या विक्रेत्यांपेक्षाही दुप्पट आहे. दरम्यान, पोस्टाने विक्रेत्यांना आपल्याशी जोडण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे.

  • भारतीय पोस्ट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणेच आपल्या ई कॉमर्स पोर्टलवरून एसी, फ्रिज, टिव्हीपासून मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे सामान विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य ठेवले होते. 2016 मध्ये ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) या नावाने ते लॉन्च करण्यात आले होते.

  • सध्या या पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोर्टवरून खरेदी केलेली वस्तू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार असल्याची माहिती पोस्टातील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच हे सामान पोस्टमॅनच संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या अंबालामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणीही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • दरम्यान, सरकारने सुरू केलेली ही सेवा असल्याने यामध्ये फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता नाकारण्यात येत आहे. तसेच सामान ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही पोस्टाचीच असणार आहे. वस्तू विकत घेताना ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे पैसे भरता येणार आहेत. 

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन :
  • चित्रपट रंगभूमी व मालिकांमधील हरहुन्नरी अभिनेता श्रीराम कोल्हटकर यांचे आज पहाटे निधन झाले. डोंबिवलीत राहून नाट्यसृष्टीत कार्य करणाऱ्या त्यांच्या वडिलांचे म्हणजे भालचंद्र कोल्हटकर यांचे काही महिन्यांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते.

  • ‘आपला माणूस’, ‘एक अलबेला’ आणि ‘करले तू भी मोहब्बत’ अशा विविध चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांचा अभिनय चतुरस्त्र होता. डोंबिवलीच्या टिळक नगर हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांसोबत हिंदी सिनेसृष्टीतील त्यांचे सहकालाकारही शोकाकूल झाले आहेत.

  • अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सिनसृष्टीत शोककळा पसरली आहे. श्रीराम कोल्हटकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात अभिनय केला. ‘अ डॉट कॉम मॉम’, ‘आपला माणूस’, ‘करले तू भी मोहब्बत’, ‘एक अलबेला’, ‘उंच भरारी’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. तसेच त्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतही त्यांनी भूमिका साकारली. त्यांच्या वाट्याला काही निवडक भूमिका आल्या, पण त्यातही त्यांनी आपली विशिष्ट शैली दाखवून दिली.

देशातील २ हजार रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध :
  • देशभरातील सुमारे २ हजार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सध्या मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

  • राजस्थानातील अजमेर विभागातील राणा प्रतापनगर रेल्वे स्थानक हे मोफत इंटरनेट सेवा असलेले देशातील दोन हजारावे स्थानक ठरले, असे रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित चावला यांनी सांगितले.

  • आमचा चमू दिवसरात्र काम करत असून, दररोज या कामाच्या अंमलबजावणीची गती वाढत आहे. शुक्रवारी आम्ही ७४ रेल्वे स्थानक वायफाययुक्त केले आणि अजून काही स्थानकांवर मोफत वायफायची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे, असे चावला यांनी  सांगितले.

  • रेल्वेचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या रेलटेल या कंपनीने डिजिटलयुक्त फलाट तयार करण्यासाठी स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात १६०० स्थानकांवर ही सोय पुरवण्यात आली. आता उर्वरित स्थानकांवर इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रेलटेलने टाटा ट्रस्टची मदत घेतली आहे.

अयोध्या प्रकरणात मध्यस्थी निष्फळ होणे अपेक्षितच :
  • अयोध्या मुद्दय़ावर मध्यस्थी निष्फळ ठरेल हे मला माहीत होते, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. या प्रकरणात नेमलेल्या मध्यस्थ समितीने रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर तोडगा सुचवलेला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी अयोध्येला दिलेल्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी हे प्रतिपादन केले.

  • ‘मध्यस्थीतून काही निष्पन्न होणार नाही हे आम्हा सर्वाना माहीत होते. पण हे चांगले आहे. समजा या दृष्टीने प्रयत्न होत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे’, असे साधूंच्या एका मेळाव्याला संबोधित करताना योगी म्हणाले. महाभारतापूर्वीही मध्यस्थीचा प्रयत्न झाला होता, मात्र तो अपयशी ठरला, असे त्यांनी सांगितले.

  • राम मंदिरासाठी लढा देणारे परमहंस रामचंद्र दास यांच्या सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदित्यनाथ बोलत होते.

  • मंदिर- मशीद जमिनीच्या वादात मध्यस्थीच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले असल्यामुळे आपण या खटल्याची ६ ऑगस्टपासून दररोज सुनावणी करू, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले होते. या खटल्याची दररोज सुनावणी करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्यनाथ म्हणाले, की लोकांच्या भावनांचा आदर केला जाईल याची आपल्याला खात्री आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८५४: जपानच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.

  • १९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.

  • १९२४: सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९४७: जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.

  • १९८४: अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले.

  • १९९३: राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली खारदुंग ला ही खिंड आपल्या चार सहकार्‍यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.

  • १९९८: फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • २००१: मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.

  • २००७: नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.

जन्म 

  • १७३०: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

  • १८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२)

  • १८३४: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)

  • १८४५: कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)

  • १८६३: पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म.

  • १८८८: भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६५)

  • १८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८)

  • १९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९८७)

  • १९३१: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च २००२)

  • १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म.

  • १९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म.

  • १९७८: भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म.

मृत्यू 

  • १०६०: फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचे निधन. (जन्म: ४ मे १००८)

  • १८७५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८०५)

  • १९३७: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)

  • १९७७: नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९)

  • १९९७: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचे निधन. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५)

  • २००३: नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट१९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.