चालू घडामोडी - ०४ ऑगस्ट २०१८

Date : 4 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे केंद्र 'द इंडिया क्लब' जमिनदोस्त होणार नाही :
  • लंडन-भारतीय स्वातंत्र्यचळवळीत महत्त्वाच्या घडामोडीची साक्षीदार असणारी द इंडिया क्लबची इमारत जमिनदोस्त होणार नाही असे आश्वासन भारताला देण्यात आले आहे. वेस्टमिनिस्टर सिटी कौन्सीलने या जागी हॉटेल बांधण्यासाठी इमारत पाडण्यास परवानगी देणार नाही असे स्पष्ट केले आहे. या जागी मार्स्टन प्रॉपर्टीज ही इमारत एक अत्याधुनिक हॉटेल बांधण्याच्या विचारात होती.

  • हा क्लब पाडला जाऊ नये असा वेस्टमिनिस्टर सिटी कौन्सीलमध्ये एकमताने निर्णय घेण्यात आला. इंडिया क्लब ही एका सांस्कृतीक संस्था आहे. भारताशी तिचे ऐतिहासिक संबंध आहेत. मनोरंजन आणि सांस्कृतीक विविधतेसाठी या इमारतीचे मोठे योगदान आहे असे क्लबचे व्यवस्थापक फिरोजा मार्कर यांनी सांगितले.

  • भारत-ब्रिटन यांच्यातील मैत्री आणि वेस्टमिनिस्टरमधील बहुरंगी संस्कृतीची ओळख म्हणून या इमारतीकडे पाहिले जाते. ही इमारत जपली जावी यासाठी आम्ही आमची मोहीम चालू ठेवू असेही मार्कर यावेळी म्हणाले.

  • 1921 साली अॅनी बेझंट यांनी इंडिया लिगची स्थापना केली होती. त्याचे रुपांतर क्लबमध्ये झाले. 1946 साली द इंडिया क्लब हे भारतीय रेस्टोरंट लंडनच्या मध्यभागी असलेल्या स्ट्रँड कॉन्टीनेन्टल हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर सुरु झाले.

एससी-एसटींसाठी बढत्यांमध्ये आरक्षण हवे; सर्वोच्च न्यायालयात धरला आग्रह :
  • नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांमधील बढत्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचा-यांसाठी २२.५ टक्के आरक्षण असायलाच हवे, अशी आग्रही भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी मांडली. हा वर्ग हजारो वर्षांपासून प्रचंड अन्याय, अत्याचार सहन करत असून, त्यामुळे त्याची प्रगतीही खुंटली आहे. त्यासाठीही त्यांना पदोन्नतीतही आरक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केले.

  • बढत्यांमध्ये क्रिमिलेयरना आरक्षण ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली नागराज खटल्यात दिलेल्या निकालामुळे अडथळे येत आहेत. अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी सांगितले की, बढत्यांमध्ये आरक्षण ठेवणे योग्य की अयोग्य, यावर कोणतीही टिप्पणी करणार नाही. मात्र, नागराज खटल्याच्या निकालाचा फेरविचार होणे आवश्यक आहे, अशी केंद्राची भूमिका आहे.

  • नागराज खटल्याच्या निकालाला आव्हान देण्यात आल्यानंतर हा खटला गेल्या वर्षी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला होता. सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या प्रकरणाच्या सुनावणीस शुक्रवारी प्रारंभ झाला. या खंडपीठामध्ये न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. संजय किशन कौल व न्या. इंदू मल्होत्रा यांचाही समावेश आहे.

गुगलच्या चुकीमुळेच तुमच्या मोबाईलध्ये ‘UIDAI’चा नंबर :
  • मुंबई : देशभरातल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलध्ये अचानकपणे सेव्ह झालेला ‘UIDAI’चा टोल फ्री क्रमांक ही गुगलची चूक असल्याचं समोर आलं आहे. गुगलने याबाबत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. त्यामुळे ‘UIDAI’चा नंबर सेव्ह होणं हा सायबर हल्ला नाही तर गुगलची चूक आहे, हे आता स्पष्ट झालं आहे.

  • देशभरातल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये काल (3 ऑगस्ट) आधारचा नंबर सेव्ह झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर ‘UIDAI’ने आपण याबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचं स्पष्ट केलं. पण आता गुगलने आमच्याच चुकीमुळे हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह झाल्याचं मान्य केलं आहे.

  • गुगलने काय म्हटलं आहे : ‘यूआयडीएआय आणि इतर 112 हेल्पलाईन नंबर अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये 2014 साली कोड करण्यात आले होते, अशी माहिती आमच्या इंटरनल सर्व्हेत समोर आली आहे. हा नंबर एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आला की डिव्हाईस बदलल्यानंतरही हा नंबर पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होतो. लोकांना यामुळे त्रास झाला याबाबत आम्हाला खेद आहे, असं म्हणत या सर्व प्रकरणावर गुगलने माफीनामा सादर केला.

  • ‘तुमचा मोबाईल हॅक झाला नाही. ‘UIDAI’चा सेव्ह झालेला नंबर तुम्ही डिलीट करु शकता. आम्ही नवीन अॅन्ड्रॉईड सेटअपमध्ये हा नंबर येऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत,’ असं गुगलने म्हटलं आहे.

  • यूआयडीएआयचे स्पष्टीकरण : "अनेकांच्या मोबाईलमध्ये 1800 300 1947 हा नंबर UIDAI नावाने विनापरवानगी सेव्ह झाला आहे. हा नंबर आधारचा नंबर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा नंबर UIDAIचा टोल फ्री नंबर नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. आधारचा हेल्पलाईन नंबर '1947' असून तो अद्यापही सुरू आहे. तसंच हा नंबर लोकांच्या फोनमध्ये सेव्ह करण्याचे कोणतेही आदेश आम्ही टेलिकॉम कंपन्यांना दिलेले नाहीत," असं स्पष्टीकरण  ‘UIDAI’ने दिलं होतं.

भारतातील लोकसभा निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाची भीती : 
  • मुंबई : भारतात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत रशियाकडून हस्तक्षेप करण्याची शक्यता ऑक्सफर्ड तज्ञांनी व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे तज्ञांनी हा दावा अमेरिकी खासदारांसमोर केला.

  • भारत आणि ब्राझीलसह अन्य काही देशांमध्ये आगामी काळात निवडणूका होणार आहेत. मीडियाच्या माध्यमातून रशिया या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करु शकतं, असं तज्ञांचं म्हणणं आहे.

  • अमेरिका निवडणुकीतही हस्तक्षेपाचे आरोप : रशियाच्या हॅकर्स आणि गुप्तहेर यंत्रणांनी 2016 साली अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करून डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून येण्यास मदत केली, असा आरोप करण्यात आला होता.

  • याप्रकरणी, अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने 13 रशियन नागरिकांविरोधात काही दिवसांपूर्वी आरोप निश्चित केले. बेकायदेशीरपणे अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप या लोकांवर करण्यात आला.

  • तंत्रज्ञानाचा वापर करून धोका देणं आणि खोट्या ओळखीचा वापर करणं, अशा स्वरूपाचे आरोप तिघांवर आहेत. याशिवाय 3 रशियन कंपन्यांवरही आरोप आहेत.

राज्य सरकारचे कर्मचारी तीन दिवसीय संपावर जाणार :
  • मुंबई : ‘आता सकारात्मक नको निर्णयात्मक व्हा आणि निर्णय घ्या,’ असं म्हणत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप जाहीर केला आहे. सातव्या वेतन आयोगासह इतर विविध मागण्यांसाठी 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट असा तीन दिवसीय संप घोषित करण्यात आला आहे.

  • सातवा वेतन आयोग, रिक्त पदं भरती, पाच दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष करा या प्रलंबित मागण्यांसाठी संप करण्यात येत आहे. तब्बल दीड लाख अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीत संपाबाबतचा निर्णय घेण्यात आला.

  • ‘अंतरीम वेतनवाढीची वेळ निघून गेली आहे. आता ऑक्टोबर 2018 चा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे दिला तरच सरकारच्या प्रस्तावाचा विचार करू,’ असं संघटनांचं म्हणणं आहे.

  • ‘राज्यभरात 1 लाख 80 हजार पदं रिक्त आहेत. त्यामुळे 72 हजारांच्या नोकरभरतीला मेगाभरती म्हणत सरकार दिशाभूल करत आहे. ही मेगाभरती नसून लघुभरती आहे,’ अशी टीका कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे.

  • एकीकडे राज्यात मराठा आंदोलन धुमसत असताना  आता राज्य कर्मचाऱ्यांनीही संपाची घोषणा केल्याने सरकारच्या अडचणींत वाढ झाली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.

  • १९२४: सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९४७: जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.

  • १९८४: अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले.

  • १९९३: राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली खारदुंग ला ही खिंड आपल्या चार सहकार्‍यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.

  • १९९८: फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • २००१: मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.

  • २००७: नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.

जन्म

  • १७३०: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

  • १८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२)

  • १८३४: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)

  • १८४५: कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)

  • १८६३: पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म.

  • १८८८: भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६५)

  • १८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८)

  • १९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९८७)

मृत्यू

  • १८७५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८०५)

  • १९३७: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)

  • १९७७: नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९)

  • १९९७: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचे निधन. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५)

  • २००३: नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट१९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.