चालू घडामोडी - ०३ जून २०१८

Date : 3 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
MHT CET 2018 चा निकाल जाहीर :
  • MHT CET Result 2018 : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पीसीबी गटात अभिजित कदम याने 200 पैकी 188 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  • पीसीएम गटात 200 पैकी 195 गुण मिळवत आदित्य अभंग पहिला आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थाना 3 जून रोजी त्यांच्या लॉग इनमध्ये पाहता येणार आहे.

  • पीसीबी गटात जान्हवी मोकाशी 200 पैकी 183 गुण मिळवत मुलींमध्ये प्रथम आली आहे. तसेच पीसीएम गटात मोना गांधी हीने 200 पैकी 189 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

  • निकाल कसा पाहाल - http://dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना लॉग इन करावं लागेल

  • लॉग इन केल्यानंतर जन्म तारख किंवा अर्ज क्रमांक अशी मागितलेली माहिती टाकल्यानंतर तुमचा निकाल दिसेल रात्री बारा वाजल्यानंतर वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे.

जे बोलायचं ते नागपुरातच बोलणार - प्रणव मुखर्जी :
  • नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सहभागावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. याचदरम्यान आपल्याला जे काही बोलायचं, ते नागपुरातच बोलू, अशी प्रतिक्रिया प्रणव मुखर्जींनी दिली आहे.

  • एबीपी समुहाचं बंगाली वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रणव मुखर्जींनी आपलं मत मांडलं. याबाबत आपल्याला अनेक प्रकारचे पत्र आणि फोन कॉल आले, मात्र मी कुणालाही उत्तर दिलं नाही, असंही प्रणव मुखर्जींनी सांगितलं.

  • काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते, ज्यामध्ये जयराम रमेश, सी के जाफर शरीफ, रमेश चेन्निथला यांनी प्रणव मुखर्जींना कार्यक्रमाला न जाण्याबाबत सल्ला दिला आहे.

  • नागपुरात आरएसएसच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

  • तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्व असतं. नागपुरात 14 मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून 800 तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 7 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.

भारतीय वंशाचा २२ वर्षांचा तरुण कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरच्या स्पर्धेत :
  • हैदराबाद : ज्या तरुण वयात मुले कॉलेज जीवनाचा आनंद घेतात, त्या वयात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील एका भारतीय वंशाच्या तरुणाने चक्क कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. या २२ वर्षीय तरुणाचे नाव आहे शुभम गोयल. कॅलिफोर्नियातील गव्हर्नरपदाच्या निवडणुकीसाठी तो रिंगणात आहे.

  • शुभम हा मूळचा उत्तरप्रदेशचा. त्याच्या आई करुणा गोयल मेरठच्या आहेत. तर, वडील विपुल यांची लखनौमध्ये स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी आहे. शुभमने कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र आणि सिनेमाचा अभ्यासक्रम केला आहे. सध्या तो कॅलिफोर्नियामध्येच राहतो. कॅलिफोर्नियात रस्त्यावरील गर्दीपुढे शुभम गोयल मेगाफोनद्वारे भाषणे करतो आणि आपण या पदासाठी योग्य का आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो.

  • डेमोक्रॅट गव्हर्नर जेरी ब्राउन यांच्याविरोधात आपण कसे जिंकू शकतो, हेही तो या नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समाजात मोठा बदल घडून येईल आणि शिक्षणासंबंधी समस्या समाप्त होतील, असा त्याला विश्वास आहे. 

देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ मणिपूरमध्ये, राष्ट्रपतींची केंद्रीय मंत्रिमंडळ प्रस्तावाला मान्यता :
  • भारतातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ मणिपूरमधील इंफाळमध्ये उभारण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने तयार केलेल्या प्रस्तावाला आपली मान्यता दिली आहे.

  • ‘राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक २०१८’ ला राष्ट्रपती कार्यालयाने मंजुरी दिल्याचं समजतं आहे. २३ मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने क्रीडा विद्यापीठ उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

  • क्रीडा क्षेत्रातील अद्ययावतं शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, प्रशिक्षण यांसारख्या सर्व सुविधा नवीन विद्यापीठात तयार केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

  • केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्या-वहिल्या अर्थसंकल्पात या क्रीडा विद्यापीठाचा प्रस्ताव समोर ठेवला होता. यासाठी केंद्र सरकारकडून ३२५.९० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मणिपूरमधील पश्चिम इंफाळ जिल्ह्यातील कौत्रुक भागात हे विद्यापीठ उभारलं जाणार आहे.

'या' देशात Facebook आणि Whatsapp वापरण्यासाठी द्यावा लागणार टॅक्स :
  • लंडन- व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर करण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत. पण एक असा देश आहे जिथे या सोशल नेटवर्किंग साइट्स वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, आफ्रीकी देश युगांडामध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि वायबरसारखे सोशल मीडिया अॅप्स वापरण्यावर टॅक्स लावला आहे.

  • फेक न्यूज व गॉसिप्सवर लगाम लावण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हा नवा नियम तेथे 1 जुलैपासून लागू होणार आहे. या नव्या नियामानुसार, सोशल मीडियाचा वापर केल्यावर तेथे 200 शिलिंग म्हणजेत दिवसाला साडेतीन रूपये टॅक्स द्यावा लागेल. 

  • युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसवेनी यांनी मार्च महिन्यात सोशल मीडिया लॉमध्येही बदल केले. सोशल मीडियाचा वापर करून गॉसिप आणि फेक न्यूज पसरविल्या जात असल्याचं मत त्यांनी मांडलं होतं. सोशल मीडिया टॅक्सच्या माध्यमातून जमा केलेल्या रक्कमेचा वापर ते फेक न्यूजपासून देशाला वाचविण्यासाठी होईल, असं त्यांनी अर्थ मंत्रालयाला पत्राद्वारे सांगितलं होतं. तसंच सोशल मीडियाच्या वापरातून मिळणाऱ्या वाढीव टॅक्सद्वारे देशावरील कर्ज कमी करण्यासही हातभार लागेल, असंही ते म्हणाले. 

  • दरम्यान, नागरिकांकडून टॅक्स नेमका कसा जमा करावा, याबद्दल तेथिल इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या संभ्रमात आहेत. सोशल मीडिया व्यतिरिक्त सरकारने मोबाइन मनी ट्रान्झॅक्शनवरही 1 टक्का टॅक्स लावला आहे. 

देहरादूनचं क्रिकेट मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सज्ज, ‘हे’ दोन संघ खेळणार पहिला सामना :
  • देहरादूनचं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज झालेलं आहे. हिमालय पर्वतरांगांमधील देहरादूनच्या रायपूर भागामध्ये हे नवीन मैदान निर्माण करण्यात आलेलं आहे.

  • २३ एकराच्या जागेवर वसलेलं, २५ हजार प्रेक्षकांना सामावून घेईल एवढी आसनक्षमता असलेलं हे मैदान, भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळवलं जाणारं २१ वं मैदान ठरलं आहे. मात्र या नव्याकोऱ्या मैदानात भारतीय संघाऐवजी, अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातले टी-२० सामने खेळवले जाणार आहेत.

  • अफगाणिस्तानात असलेला दहशतवादाचा धोका लक्षात घेऊन गेल्या काही महिन्यांपासून, अफगाणिस्तानचा संघ आपल्या घरच्या मैदानावरचे सामने भारतात खेळतो. सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी अफगाणिस्तानच्या संघाला दिल्लीतील छोटं मैदानं उपलब्ध करुन देण्यात आलं होतं. मात्र भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्याआधी होणाऱ्या या टी-२० मालिकेसाठी देहरादूनच्या मैदानाची निवड करण्यात आलेली आहे.

  • देहरादूनची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी असल्याचं कळतंय, यामुळे दोन्ही संघातील फिरकी गोलंदाजांना याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या नव्याकोऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानावर कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

  • १९४०: डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.

  • १९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.

  • १९५०: मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्‍नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.

  • १९७९: मेक्सिकोच्याअखातात इहटॉक या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.

  • १९८४: ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.

  • १९९८: जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ‍या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.

जन्म

  • १८३९: प्रसिद्ध उद्योगपती, व्यापारी, कारखानदार, देशभक्त जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा नवसारी सुरात यथे जन्म.

  • १८९०: खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९८८)

  • १८९२: लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८६)

  • १८९५: चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीक्कर यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६३)

  • १९२४: तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म.

  • १९३०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म.

  • १९६६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांचा जन्म.

मृत्यू

  • १६५७: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १५७८)

  • १९३२: उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५९)

  • १९५६: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८८१)

  • १९८९: इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९०२)

  • १९९०: इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२७)

  • १९९७: चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)

  • १९७७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ आर्चिबाल्ड विवियन हिल यांचे निधन.

  • २०१४: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर१९४९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.