चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ जुलै २०१९

Date : 3 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सीबीआयचे देशभरातील ५० ठिकाणी छापे :
  • बँकांच्या वाढत्या एनपीएमुळे त्रस्त असलेल्या केंद्र सरकारने आता याबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सीबीआयने बँकांचे मोठ्याप्रमाणात कर्ज असलेल्या कर्जदारांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत मंगळवारी १२ राज्यांसह केंद्र शासीत प्रदेशातील जवळपास ५० ठिकाणी छापे मारले. सीबीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, पथकांनी १८ शहरांमध्ये कंपनी, संचालकांसह बँक अधिकाऱ्यांच्या घरी व त्यांच्या ठिकाणांवर छापे मारले.

  • सीबीआयने दिल्ली, मुंबई, ठाणे, लुधियाना, वलसाड, पुणे, पलानी, गया, गुडगांव, चंदीगढ, भोपाल, सुरत, कोलार आदी ठिकाणी छापेमारी केली. सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, बँक घोटाळ्यांच्या १४ नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. ही प्रकरण तब्बल ६४० कोटींच्या फसवणुकीची आहेत.

  • सीबीआयने ही कारवाई मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळास दोन महिने होण्याअगोदरच केली आहे. यावरून बँक गैरव्यवहारप्रकरणी सरकार किती गंभीर झालेले आहे हे दिसत आहे.

नुसरत जहाँ गुरुवारी रथयात्रेत सहभागी होणार :
  • तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ यांना कोलकाता येथील इस्कॉन रथयात्रेच्या विशेष पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले  आहे. इस्कॉनच्या सामाजिक सलोख्याच्या भूमिकेशी नुसरत जहाँ यांची भूमिका जुळणारी असल्याचे सांगून इस्कॉनने त्यांना निमंत्रण पाठवले होते ते नुसरत जहाँ यांनी स्वीकारले आहे. ही रथयात्रा गुरुवारी होणार आहे.

  • जहाँ यांनी निमंत्रण स्वीकारल्याबाबत त्यांना आम्ही धन्यवाद देतो, असे इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी म्हटले आहे. नुसरत जहाँ यांनी सर्वसमावेशक भारताचे प्रतिनिधित्व त्यांच्या भूमिकेतून केले असून त्यांनी पुढचा मार्ग दाखवला आहे, असे त्यांनी सांगितले.

  • इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस या संस्थेच्या वतीने १९७१ पासून रथयात्रेचे आयोजन केले जाते. या वेळी ४८ व्या रथयात्रेसाठी नुसरत जहाँ यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या रथयात्रेचे उद्घाटन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करणार आहेत. कोलकाता येथील जैन उद्योगपतीशी नुसरत जहाँ यांचा नुकताच विवाह झाला असून संसदेत शपथविधीसाठी येताना त्यांनी कुंकू लावून मंगळसूत्र घातल्याने त्यांच्यावर समाजमाध्यमातून टीका झाली होती. सर्वसमावेशी भारत हा जात, वंश व धर्माच्या पलीकडे आहे असे नुसरत यांनी टीकेला उत्तर देताना म्हटले होते. त्यांच्याविरोधात मुस्लीम धर्मगुरूंनी फतवाही जारी केला होता.

  • इस्कॉनचे प्रवक्ते दास यांनी सांगितले,की नुसरत जहाँ या नवभारताच्या खऱ्या प्रतिनिधी आहेत. सर्व धर्माविषयी आदर व एकमेकांच्या सणात सहभाग यातूनच भारत मोठा होईल. नुसरत जहाँ यांच्यासारख्या तरुणी पुढचा मार्ग दाखवित आहेत. देवाने सर्वानाच स्वातंत्र्य दिले आहे. ते कुणीही हिरावून घेऊ नये.

युरेनियम शुद्धीकरण मर्यादा ओलांडून इराणचा खेळ :
  • इराणबरोबरच्या २०१५ मधील अणुकरारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर आता त्या करारात घालून दिलेली युरेनियम शुद्धीकरणाची कमाल मर्यादा इराणने ओलांडली आहे. हे घातक लक्षण असून इराण आगीशी खेळत आहे असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी याआधी असे म्हटले होते, की इराणने युरेनियम शुद्धीकरणाची प्रक्रिया थांबवावी.

  • सोमवारी इराणने पहिल्यांदा करारात घालून दिलेली युरेनियम शुद्धीकरणाची मर्यादा ओलांडली होती. युरेनियम शुद्धीकरणाची मर्यादा ओलांडल्याच्या या वृत्तास आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दुजोरा दिला आहे. ट्रम्प यांनी वार्ताहरांना सांगितले,की युरेनियम शुद्धीकरणाची करारातील मर्यादा ओलांडून इराण आगीशी खेळत आहे.

  • परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांनी म्हटले आहे,की इराणने युरेनियमचे शुद्धीकरण थांबवावे. इराणकडे अण्वस्त्रे असणे हे जगाच्या दृष्टीने घातक असून अमेरिका इराणशी नवा करार करण्यास तयार आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेस असलेला धोका टाळता येईल. इराण जितक्या प्रमाणात राजनयाच्या मार्गापासून दूर जाईल व अण्वस्त्र कार्यक्रमाचा विस्तार करील तितके त्याच्यावर आर्थिक दडपण वाढत जाईल, तसेच तो देश इतरांपासून वेगळा पडत जाईल.

  • आण्विक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी इराणने आणखी काही पावले पुढे टाकली आहेत.  कुठल्याही अणुकरारात इराणला युरेनियम शुद्धीकरणाची परवानगीच द्यायला नको. २००६ पासून  संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने सहा ठराव संमत केले असून त्यात इराणला युरेनियम शुद्धीकरण व त्याची फेरप्रक्रिया करण्यास प्रतिबंधित केले आहे. तेव्हाची ती अट योग्यच होती व आताही योग्य आहे.

भारत उपांत्य फेरीत दाखल, पाकिस्तानचं काय होणार - वाचा काय आहेत निकष :
  • टीम इंडियाने बांगलादेशवर २८ धावांनी मात करत उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. रोहित शर्माचं शतक आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचा भेदक मारा या जोरावर भारताने बांगलादेशची झुंज मोडून काढली. बांगलादेशकडून शाकीब अल हसनने एकाकी झुंज दिली, मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरले.

  • या पराभवामुळे बांगलादेशच्या संघाचं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचं स्वप्न अखेर भंगलं आहे. मात्र बांगलादेशच्या या पराभवामुळे पाकिस्तानी संघासमोरच्या आशा अजुन कायम राहिल्या आहेत. मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानी संघाला मोठं दिव्य पार पाडावं लागणार आहे. पाकिस्तानचा संघ सध्या ९ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

  • त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानच्या संघासमोरचे निकष काय असतील जाणून घेऊयात….

  • १) न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात, न्यूझीलंडने इंग्लंडवर मात केली तर पाकिस्तानचा रस्ता सुकर होईल. न्यूझीलंडचा संघ सध्या ११ गुणांनिशी तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यास १३ गुणांनिशी न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल होईल. असं झाल्यास पाकिस्तानला बांगलादेशवर मात करावी लागणार आहे, ही कामगिरी करुन दाखवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल होऊ शकतं.

  • २) मात्र इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात इंग्लंडने बाजी मारली, तर १२ गुणांसह यजमान संघ उपांत्य फेरीत दाखल होईल. असं घडल्यास न्यूझीलंडने हा सामना किमान २००-२५० धावांच्या फरकाने हरावा आणि इतक्याच मोठा फरकाने पाकिस्तानने बांगलादेशवर मात करावी अशी प्रार्थना पाकिस्तानचा संघ आणि चाहते करत असतील.

विधान परिषदेत मंत्र्यांची पूर्णवेळ उपस्थिती :
  • मुंबई : मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज बंद पडण्याचे अनेक प्रसंग उद्भवतात. मात्र, यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत मंत्री उपस्थित नसल्याच्या कारणामुळे एकदाही सभागृह तहकूब लागले नाही. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाजाचा वेळ वाया गेल्याचा प्रसंग विधान परिषदेत उद्भवला नसल्याचे संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

  • २० विधेयके पारित - या अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये एकूण २० विधेयके पारित करण्यात आली. एकूण १२ बैठकांच्या माध्यमातून एकूण ६८ तास ७ मिनिटे सभागृहाचे कामकाज झाले. मंत्री उपस्थित नसल्यामुळे कामकाज तहकूब करण्याची वेळ या अधिवेशनात आली नाही. अन्य कारणांमुळे १२ तास १४ मिनिटांचा सभागृहाचा वेळ वाया गेला. दररोज सरासरी ५ तास ४० मिनिटे सभागृहाचे काम चालले.

  • ९५ औचित्याचे मुद्दे  या अधिवेशनात एकूण ९५ औचित्याचे मुद्दे आले. त्यापैकी २९ मांडण्यात आले. ७७२ पैकी २०५ लक्षवेधी सूचना मान्य करण्यात आल्या. त्यापैकी ५८ ची सभागृहात चर्चा झाली. २५६ विशेष उल्लेखांपैकी १३८ सभागृहात मांडण्यात आले. आठपैकी दोन अल्पकालीन सूचनांवर सभागृहात चर्चा झाली.

  • विधानसभेची २० आणि परिषदेचे एक अशी एकूण २१ शासकीय विधेयके पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत संमत करण्यात आली. तर, अशासकीय विधेयकांच्या सात सूचनांपैकी चार स्वीकृत करण्यात आली तर दोन विचारार्थ आहेत. १६१ पैकी १२७ अशासकीय ठरावाच्या सूचना स्वीकृत करण्यात आल्या.

  • २८२५ तारांकित प्रश्न - या अधिवेशनात २८२५ तारांकित प्रश्न आले. त्यापैकी ९७२ प्रश्न स्वीकारण्यात आले. तर ३७ प्रश्नांची सभागृहात तोंडी उत्तरे देण्यात आली. नियम ९३ अन्वये आलेल्या १३१ पैकी ८१ सूचना आल्या. त्यावर सभागृहात १४ निवदने झाली तर १६ पटलावर ठेवण्यात आली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६०८: सॅम्यूअल बी. चॅम्पलेन यांनी कॅनडातील क्‍वेबेक शहराची स्थापना केली.

  • १८५०: ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.

  • १८५२: महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.

  • १८५५: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.

  • १८८४: डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.

  • १८८६: जर्मनीच्या कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.

  • १८९०: ओहायो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.

  • १९२८: लंडनमध्ये प्रथमतः रंगीत दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण झाले.

  • १९३८: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी २०२ किमी वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही अबाधित आहे.

  • १९९८: कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २०००: विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.

  • २००१: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

  • २००६: एक्स. पी. १४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.

जन्म

  • १६८३: इंग्लिश कवी एडवर्ड यंग यांचे जन्म.

  • १८३८: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १८९३)

  • १८८६: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक रामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९५७)

  • १९०९: कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅरिस्टर व्ही. एम. तथा भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००४)

  • १९१२: मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७७)

  • १९१४: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९९२)

  • १९१८:भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते व्ही. रंगारा राव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९७४)

  • १९२४: तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे ६वे राष्ट्राध्यक्ष सेल्लप्पन रामनाथन यांचा जन्म.

  • १९२६: लेखिका स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)

  • १९५१: न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू सररिचर्ड हॅडली यांचा जन्म.

  • १९५२: भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटन मिस्त्री यांचा जन्म.

  • १९७१: विकीलीक्स चे संस्थापक ज्युलियन असांज यांचा जन्म.

  • १९७६: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू हेन्‍री ओलोंगा यांचा जन्म.

  • १९८७: युवसेना जिल्हाअधिकारी जळगाव माननीय प्रितेश ठाकूर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३५०: संत नामदेव यांनी समाधी घेतली. (जन्म: २९ ऑक्टोबर १२७०)

  • १९३३: अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचे निधन. (जम: १२ जुलै १८५२)

  • १९३५: सिट्रोएन कंपनीचे संस्थापक आंद्रे सीट्रोएन यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८७८)

  • १९६९: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)

  • १९९६: हिंदी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.