मुंबई : पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे एनडीटीव्हीचे मॅनेजिंग एडिटर रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी टीव्ही पत्रकारितेत योगदानासाठी रवीश कुमार यांना हा पुरस्कार मिळाला आहे. अरुण शौरी, पी साईनाथ यांच्यानंतर रवीश कुमार यांच्या रुपाने आणखी एका भारतीय पत्रकाराचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे.
यंदा हा पुरस्कार मिळवणाऱ्या पाच जणांमध्ये रवीश कुमार एकमेव भारतीय आहेत. रवीश कुमार यांच्यासह म्यानमारचे को सी विन, थायलंडच्या अंगहाना नीलपायजित, फिलिपाईन्सचे रमेंड आणि दक्षिण कोरियाचे किम जोंग यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रवीश कुमार यांना हा पुरस्कार पत्रकारितेत वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी दिला जात असल्याचं रॅमन मॅगसेसे कमिटीच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. रवीश कुमार यांचा कार्यक्रम 'प्राईम टाईम' हा जीवनातील खरे मुद्दे आणि सामन्यांच्या अडचणींवर भाष्य करतो, असं रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशनने म्हटलं आहे.
नवी दिल्ली : देशभरातील संघटित तसेच, असंघटित क्षेत्रांतील कामगारांसाठी समान किमान वेतनाची खात्री देणारा कायदा संसदेने मंजूर केला. राज्यसभेने शुक्रवारी कामगार वेतन संहिता विधेयकावर शिक्कामोर्तब केले. लोकसभेत हे विधेयक आधीच संमत झाले आहे. या कायद्यामुळे देशभरातील त्या-त्या क्षेत्रांतील कामगारांना एकसमान किमान वेतन ठरलेल्या मुदतीत मिळू शकेल.
कंपनीच्या मालकांकडून कामगारांचे किमान वेतन ठरवण्याचा अधिकार काढून घेण्यात आला असून आता हे वेतन केंद्र सरकार ठरवील. त्यामुळे कामगार कोणत्या कंपनीत काम करतो यावर त्याचे किमान वेतन अवलंबून
राहणार नाही. कामगार कोणत्या क्षेत्रांतील आहेत आणि त्यांचे कार्यकौशल्य किती आहे, यावर त्यांचे किमान वेतन ठरेल आणि कंपनी मालकांना ते वेळेत द्यावेच लागेल.
किमान वेतन मिळणे आणि हे वेतन वेळेत मिळणे; या दोन्ही बाबी कामगारांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या दोन्हींसाठी वैधानिक संरक्षण देणारा कायदा संसदेने केला असून देशातील ५० कोटी संघटित तसेच, असंघटित कामगारांना त्याचा लाभ मिळेल, असे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी राज्यसभेत सांगितले. राज्या-राज्यांमध्ये वेगवेगळे किमान वेतन दिले जात असून त्यात एकसूत्रता आणि समानता आणण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन केली जाईल.
यात, कामगार संघटनेचे प्रतिनिधी, मालक संघटनांचे प्रतिनिधी आणि राज्य सरकारांचा समावेश असेल. गरज असेल तर ही समिती तांत्रिक समितीही स्थापन करील, अशी माहिती गंगवार यांनी चर्चेच्या उत्तरात दिली. या कायद्यामुळे कामगारांना किमान वेतनाची शाश्वती मिळणार असल्याने त्यांना श्रमप्रतिष्ठाही मिळेल, असेही ते म्हणाले.
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी संध्याकाळी चांद्रयान-2 ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा चौथा टप्पा होता. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजून 27 मिनिटांनी चांद्रयान-2 च्या कक्षेत यशस्वीरित्या बदल करण्यात आला. चांद्रयान-2 पृथ्वीपासून किमान (पेरिजी) 277 किमी आणि कमाल (एपोजी) 89 हजार 472 किमी अंतरावर स्थिरावण्यात आले. आता 6 ऑगस्ट रोजी चांद्रयानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येणार आहे.
चांद्रयान 2 चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान 2 ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान 2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता पुढचा कक्षा बदल सहा ऑगस्टला करण्यात येणार आहे.
14 ऑगस्टला चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. 20 ऑगस्टला चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान 2 मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान 2 चा प्रयत्न असेल.
भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ २०२२ पर्यंत अंतराळामध्ये अंतराळवीर पाठवणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. भारताला अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य वर्षातच इस्रो पहिला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्याची तयारी करत आहे.
भारताच्या या अंतराळवीराला अँस्ट्रोनॉट नाही तर ‘व्योमनॉट’ असे म्हटले जाईल. भारताची ही मोहिम यशस्वी झाल्यास अंतराळात मानवरहीत मोहिम करणार भारत चौथा देश ठरेल. या आधी हा पराक्रम रशिया, अमेरिका आणि चीनने केला आहे.
व्योमनॉट्स’चा अर्थ काय - भारतीयांना अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत एका आठवड्यासाठी तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळ पाठवले जाणार आहे. अमेरिकेमध्ये अंतराळवीरांना ‘अॅस्ट्रोनॉट’ म्हणतात तर रशियामध्ये अंतराळवीरांना ‘कॉस्मोनॉट्स’ म्हणतात. चीनमध्ये अंतराळवीरांना ‘ताइकोनॉट्स’ असं म्हणतात. याच पार्श्वभूमीवर भारत आपल्या अंतराळवीरांना ‘व्योमनॉट्स’ या नावाने ओळखले जाणार आहे. ‘व्योमनॉट्स’मध्ये ‘व्योमन्’ हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ अंतराळ असा होतो. अनेकदा अकाश या अर्थानेही हा शब्द वापरला जातो. त्यामुळेच व्योमन् या शब्दापुढे अॅस्ट्रोनॉटमधील नॉट्स ही अक्षरे लावून ‘व्योमनॉट्स’ हा शब्द तयार झाला आहे. त्यामुळे शब्दाची फोड केल्यास साधारपणे अवकाशातील व्यक्ती असा याचा अर्थ होतो..
रियाध : पुरुष पालकांच्या परवानगीशिवाय परदेश प्रवासाला जाण्याची मुभा सौदी अरेबियातील महिलांना देण्यात आली आहे. महिलांना परदेश प्रवासासाठी पुरुषांची परवानगी आवश्यक असल्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सौदी अरेबियावर ताशेरे ओढण्यात आले होते.
सौदी अरेबियात सर्वच महिलांना कायदेशीर पातळीवर अल्पवयीन ठरवण्यात आले असून त्यांच्या पुरुष नातेवाईकांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत. सौदी अरेबियात मोटार चालवण्यास महिलांना असलेली बंदी गेल्या वर्षी उठवण्यात आली होती. या सुधारणा करूनही महिलांवर अनेक निर्बंध अजूनही आहेत. त्यात परदेश प्रवासासाठी पुरुषांची परवानगी हा एक नियम होता तो आता मोडीत काढला आहे. उम्मा अल कुरा या राजपत्रात म्हटले आहे की, अर्ज करणाऱ्या कुणाही सौदी नागरिकाला पासपोर्ट जारी करण्यात यावा.
ओकाझ या सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे की, २१ वर्षांवरील महिला व मुलींना पालक पुरुषांच्या परवानगीशिवाय पासपोर्ट मिळणार आहे. विवाह, परदेश प्रवास, पासपोर्ट, नूतनीकरण या सगळ्या बाबींसाठी तेथे महिलांना पुरुषांची परवानगी घ्यावी लागते. या निर्णयाने महिलांना मोठी स्वायत्तता मिळाली असून त्या आता मुक्त विहार करू शकतील असे मत अरब गल्फ स्टेट्स इन्स्टिटय़ूट या अमेरिकी संस्थेतील क्रिस्तीन दिवाण यांनी व्यक्त केले. सौदी अरेबियातील महिला कार्यकर्ती लुजेन अल हथलौल ही तुरुंगात असून तिने तिसावा वाढदिवस तेथेच साजरा केला.
महत्वाच्या घटना
१९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.
१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.
१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
१९६०: नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.
२०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
२००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
जन्म
१८८६: हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)
१८९८: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)
१९००: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)
१९१६: गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९७० – मुंबई)
१९२४: अमेरिकन कादंबरीकार लिऑन युरिस यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २००३)
१९५६: १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांचा जन्म.
मृत्यू
१९२९: फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५१)
१९३०: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८५४)
१९५७: पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)
१९९३: अध्यात्मिक गुरू स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: ८ मे १९१६)
२००७: लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३३)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.