चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ सप्टेंबर २०१९

Date : 2 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी; राष्ट्रपतींनी ५ राज्यांचे राज्यपाल केले नियुक्त :
  • नवी दिल्ली - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०१४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ ३० ऑगस्ट २०१९ रोजी संपला आहे. 

  • तसेच माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. आरिफ मोहम्मद खान हा मुस्लीम चेहरा केरळसाठी देण्यात आला आहे. तिहेरी तलाक तसेच अनेक मुस्लीम हिताच्या निर्णयामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. काँग्रेसमध्ये असलेले आरिफ मोहम्मद खान अनेक काळ राजकारणापासून दूर होते. आरिफ मोहम्मद खान त्यांच्यासोबत तेलंगणाच्या राज्यपालपदी तमिलसाई सुंदरराजन, बंडारू दत्तात्रय यांना हिमाचल प्रदेश तर कलराज मिश्र यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. 

  • भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष राहिले होते. २००१ ते २००२ मध्ये उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. तर २००२ पासून २००७ पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

  •   २००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी हे आरएसएस संघटनेशी जवळीक आहे.  १९७७ मध्ये आणीबाणीला केलेल्या विरोधामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं.

जीएसटी संकलनात घट :
  • ऑगस्ट महिन्यातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन एक लाख कोटी रुपयांखाली घसरले असून, त्यामुळे मंदीसदृश वातावरणात सरकारी महसुलातही घट होत असल्याचे स्पष्ट झाले. ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन ९८ हजार २०२ कोटी रुपये नोंदवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील संकलनाच्या तुलनेत ते ४.५१ टक्के अधिक असले, तरी मासिक एक लाख कोटी रुपयांच्या सरकारी उद्दिष्टापेक्षा ते कमीच भरले.

  • गेल्या महिन्यात केंद्रीय जीएसटी महसुलाची रक्कम १७७३३ कोटी, राज्य जीएसटीची रक्कम २४२३९ कोटी आणि एकात्मिक (इंटिग्रेटेड) जीएसटीची रक्कम ४८९५८ कोटी रुपये (आयातीवर मिळालेल्या २४८१८ कोटी रुपयांसह), उपकर संकलनाची रक्कम ७२७३ कोटी (आयातीवर मिळालेल्या ८४१ कोटी रुपयांसह) इतकी होती, असे निवेदनात नमूद केले आहे.

  • ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन सहसा कमी असते. उत्सवी हंगामाच्या पाश्र्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यातील संकलनात वृद्धी होईल, असा अंदाज काही विश्लेषकांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलन ९३ हजार ९६० कोटी रुपये होते. मात्र संकलनातील तूट केंद्रासाठी डोकेदुखी ठरेल, कारण राज्यांसाठी हीतूट भरून काढण्याची जबाबदारी केंद्राचीच आहे.

  • जून-जुलै २०१९ या काळात जीएसटी संकलनातील तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना २७ हजार ९५५ कोटी रुपये अदा केल्याचे, असे अर्थ खात्यातर्फे जारी निवेदनात म्हटले आहे. करगळती थांबवण्यासाठी मंदीच्या छायेतील उद्योजकांकडून करवसुली सक्तीने करवून घेतल्यास, सरकारच्या प्रतिमेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

एनआरसी - माजी राष्ट्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींचीच नावे गायब :
  • आसामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्याची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीतून भारताच्या पाचवे राष्ट्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींचीच नावे गायब आहेत.

  • आसाममध्ये बांगलादेशातून होत असलेल्या घुसखोरीवर उपाय काढण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कार्यक्रम राबवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानंतर आसामध्ये एनआरसी अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली.

  •  एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख लोकांना वगळण्यात आले आहे. या यादीमधून भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या कुटुंबातील चार व्यक्तीची नावेच गायब आहेत. याबद्दल बोलताना फक्रुद्दीन अली अहमद यांचे पुतणे एस ए अहमद म्हणाले, एनआरसीच्या अंतिम यादीत कुटुंबातील चार व्यक्तीची नावेच नाहीत. सात सप्टेंबरनंतर आम्ही प्रशासनाकडे जाणार आहोत. त्यानंतर यादीत नावांचा समावेश करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा- सुवर्ण यशस्विनी :
  • यशस्वीनी सिंह देसवालने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युक्रेनच्या ऑलिना कोस्टिव्हायशवर मात करीत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. याचप्रमाणे ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेसाठी भारताचे नववे स्थान निश्चित केले.

  • २२ वर्षीय माजी कनिष्ठ विश्वविजेत्या यशस्विनीने आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत २३६.७ गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑलिनाने २३४.८ गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर सर्बियाच्या जस्मिना मिलाव्होनोव्हिचने २१५.७ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

  • अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असलेल्या यशस्विनीने पात्रता फेरीत एकूण ५८२ गुण मिळवले. वरिष्ठ गटासाठीच्या कारकीर्दीतील पाचव्या विश्वचषक स्पध्रेत खेळणाऱ्या यशस्विनीने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. पहिल्या फैरीपासून आघाडी घेणारी यशस्विनी मग ०.१ गुणांनी पिछाडीवर पडली. परंतु १६व्या फैरीपासून तिने पुन्हा आघाडी मिळवली. २१व्या फैरीला यशस्विनीने ९.७ गुण मिळवले, तर ऑलिनाने १०.९ गुण मिळवले. याचप्रमाणे पात्रता फेरीत अन्नू राज सिंगने ५७२ गुणांसह २१वे स्थान मिळवले, तर श्वेता सिंगने ५६८ गुणांसह ३१वे स्थान मिळवले. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवून गुणतालिकेतील अग्रस्थान टिकवले आहे.

जाणून घ्या का वाहतात गणपतीला दुर्वा :

  • गणांचा अधिपती म्हणजे गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. त्यामुळे अनेक जण त्याची मनोभावाने पूजा करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्याचा थाट पाहायलाच नको. २१ पत्री, २१ दुर्वा, विविध फळे आणि नैवेद्याचं ताट असं सारं काही गणपतीच्या आवडीचं या दिवसांमध्ये केलं जातं. विशेष म्हणजे गणपतीला दुर्वा प्रिय असल्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये दुर्वा या हमखास असतात. मात्र गणपतीला २१ दुर्वांचीच जुडी का अर्पण करतात हे जाणून घेऊयात

  • गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणपतीने त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली.

  • त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

  • दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

मुलाखतीशिवाय अमेरिकेचा व्हिसा रिन्यू करता येतो का :
  • प्रश्न- माझ्या अमेरिकेच्या व्हिसाची मुदत लवकरच संपणार आहे. माझ्या मित्राने गेल्या वर्षी त्याच्या व्हिसाचं मुलाखतीशिवाय नूतनीकरण (रिन्यू) केलं. मुलाखतीशिवाय व्हिसा रिन्यू करण्यासाठी नवी प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचं मी ऐकलंय. हे खरं आहे का? तुम्ही ती प्रक्रिया सांगू शकता का?

  • उत्तर- होय. 1 सप्टेंबर 2019 पासून अमेरिकेने भारतीयांच्या व्हिसा रिन्यू करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. हा बदल मुलाखती संदर्भात आहे. पण व्हिसा रिन्यू करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता तीच आहे. मुलाखतीशिवाय व्हिसा रिन्यू करण्यास पात्र ठरल्यास तुम्ही तुमचा पासपोर्ट, व्हिसासाठी गरजेची कागदपत्रं जमा करण्यासाठी देशातील अकरा व्हिसा अर्ज केंद्रांपैकी (व्हीएसी-व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर) एकाची निवड करून अपॉइंटमेंट घ्यावी. व्हिसा रिन्यू करण्यासाठी लागणारा वेळ कमी व्हावा, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. B1/B2, C1/D, H1B, L आणि F अशा सर्व प्रकारच्या व्हिसासाठी हा बदल लागू आहे.

  • मुलाखतीशिवाय व्हिसा रिन्यू करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, हे प्रथम तपासून पाहा. त्यासाठीचे निकष तुम्ही www.ustraveldocs.com/in/niv-visarenew.asp#qualifications वर पाहू शकता.

  • तुम्ही यासाठी पात्र ठरत असल्यास अर्जाचं शुल्क भरून व्हिएसीची निवड करा आणि ड्रॉप ऑफ अपॉइंटमेंटची वेळ निश्चित करा. मुंबईतील अमेरिकेच्या दूतावासाच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या व्यक्ती मुंबई, पुणे किंवा अहमदाबादपैकी एका व्हीएसीची निवड करू शकतात

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.

  • १९२०: म. गांधींचे ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन.

  • १९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.

  • १९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.

  • १९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

  • १९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.

  • १९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

जन्म 

  • १८३८:  भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुन १९१४)

  • १८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)

  • १८७७: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फेडरिक सॉडी यांचा जन्म.

  • १८८६: साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव माटे तथा श्री. म. माटे यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)

  • १९२४: केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियेल अराप मोई यांचा जन्म.

  • १९३२: स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०१२)

  • १९५३: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २००१)

  • १९६५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.

  • १९७१: भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.

  • १९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.

  • १९८८: भारतीय गायक इश्मीत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००८)

मृत्यू 

  • १९३७:  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन  यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८६३)

  • १९६०: वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.

  • १९६९: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह यांचे निधन. (जन्म: १९ मे १८९०)

  • १९७६: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९८)

  • १९९०: मराठवाड्याचा चालताबोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक न. शे. पोहनेरकर यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९०७)

  • १९९९: चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९११ – पाचल, राजापूर, रत्‍नागिरी)

  • २००९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै १९४९)

  • २०१४: भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती यांचे निधन. (जन्म: ७ मे १९४९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.