नवी दिल्ली : पर्यटनासाठी विदेश भ्रमंतीकडे ओढा वाढलेल्या भारतीय पर्यटकांनी या वर्षी देशांतर्गत माफक खर्चाच्या पर्यटनाला पसंती दर्शविली आहे. प्रवासासंबंधी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. निम्म्यापेक्षा अधिक भारतीय पर्यटक कमी खर्चाच्या देशी पर्यटनाकडे वळले असल्याचे ‘यात्रा’ या ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने सर्वेक्षण अहवाल जारी करताना म्हटले आहे.
या वर्षी पर्यटनाची तयारी केलेल्या ६८ टक्के भारतीयांपैकी निम्म्यापेक्षा अधिक पर्यटकांनी देशांतर्गत पर्यटनाची योजना आखली आहे. यापैकी ६४ टक्के पर्यटकांचे उत्तर देशी पर्यटन हेच होते. उन्हाळी सुट्यांत फक्त १० हजार ते २५ हजार रुपयांचा खर्च करण्यावर ४५ टक्के पर्यटकांनी भर दिला आहे.
रात्रीच्या हॉटेल वास्तव्यात एक हजार ते अडीच हजार खर्च करण्याची तयारी ४३ टक्के पर्यटकांनी दर्शविली आहे. देशाटन करताना खिशाचा विचार आलाच. हॉटेल खर्चाला फाटा देण्यावर भर देताना १५ टक्के पर्यटकांनी घरगुती वास्तव्याला अधिक पसंती दर्शविली. भारतात भेटी न दिलेली अनेक सुंदर स्थळे असून देशांतर्गत पर्यटनाकडे वाढता कल, निश्चितच उत्साहवर्धक असल्याचे ‘यात्रा’चे शरत धाल यांनी म्हटले.
काय सांगतो सर्वेक्षणाचा अहवाल...पर्यटकांची ऑनलाइन रिव्ह्यूवर निर्भरता वाढली आहे. बुकिंग करताना आकर्षक डिस्काउंटसह आधीच तयारी करण्यावर भर. पर्यटक १५ दिवस तर ४० टक्के पर्यटक किमान तीन महिने आधी बुकिंग करतात.
मुंबई : इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आजपासून सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये 2 ते 13 मे या कालावधीत एमएचटी-सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. दिवासाला दोन सत्रांमध्ये मध्ये ही परीक्षा आजपासून सुरु होत आहे.
राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा सेलच्या वतीने सीईटी परीक्षेचे नियोजन करण्यात येते. महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर राज्यांमधील विद्यार्थीही या परीक्षेला बसणार आहेत. महाराष्ट्राच्या 3 लाख 96 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
सीईटी सेलने उमेदवारांना परीक्षेदरम्यान काय करावे आणि काय करू नये? या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे ठरणार असून, विहित वेळेतच उमेदवारांनी केंद्रावर पोहोचावे, अशी माहिती सीईटी आयुक्त आनंद रायते यांनी दिली. परीक्षेसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे असून ते वैध असेल तरच उमेदवाराच्या मूळ कागदपत्रांवरील छायाचित्र आणि स्वाक्षरी वैध ठरणार असल्याचे रायते यांनी सांगितले.
अर्जदाराच्या ऑनलाइन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचा पत्ता याबाबत चुकीची माहिती भरली गेली असेल, तर हमीपत्राचा नमुना अर्ज भरुन परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्याची महत्त्वाची सूचना उमेदवारांना करण्यात आली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसाठी आवश्यक असल्याने, या वर्षी सीईटी कक्षामार्फत विद्यार्थी ही परीक्षा उत्तम पद्धतीने कसे देऊ शकतील, यासाठी हा प्रयत्न असल्याचे रायते यांनी सांगितले.
कौशंबी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९५४ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला उजाळा देत त्याचे खापर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर फोडले.
येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हा कुंभमेळ्यात आले होते. त्यावेळी ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत केवळ काँग्रेसचीच सत्ता होती. इतर पक्ष अस्तित्वातही नव्हते. त्यावेळच्या अनागोंदी कारभारामुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन हजारो लोक मारले गेले होते.
मात्र सरकारची प्रतिमा जपण्यासाठी चेंगराचेंगरीच्या बातम्या दाबल्या गेल्या. ही घटना घडली त्याचे वार्ताकन करण्याची हिंमत त्यावेळच्या प्रसारमाध्यमांनीही केली नाही, तसेच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावेही जाहीर केली गेली नाहीत की, त्यांना एक रुपयांची भरपाई मिळाली नाही. नेहरूंच्या असंवेदनशीलतेचा हा एक दाखलाच आहे, असे मोदी यांनी सांगितले.
कुंभमेळ्यात आपण अखेरच्या टप्प्यात आलो, त्यामुळे भाविकांच्या व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट करतानाच मोदी म्हणाले की, सरकार बदलले आणि व्यवस्थापनही बदलले.
विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले की, हे लोक जातीयवाद, वंशवादाला प्रोत्साहन देणारे आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांचे प्रतिनिधी एक तर जामीनावर आहेत किंवा तुरुंगात तरी, असे लोक देशाचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी सपा-बसपा युतीवर टीका केली. जे लोक गावातील गुंडाराज नियंत्रित करू शकत नाहीत ते दहशतवादाला काय रोखणार, असाही सवाल मोदी यांनी या वेळी केला.
नवी दिल्ली : आचारसंहिता भंगाच्या दुसऱ्या प्रकरणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने बुधवारी निर्दोष जाहीर केले. दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २३ एप्रिल रोजी मध्य प्रदेशात शहडोल येथे केलेल्या एका भाषणाबद्दल निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली.
‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान आणि बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्या हवाई दलासाठी तुमचे पहिले मत समर्पित कराल का’, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना उद्देशून ९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील प्रचारसभेत केले होते.
यासंदर्भात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल झाली होती. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल, आचारसंहितेबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आणि आदर्श आचारसंहितेतील तरतुदी आदींची सखोल पडताळणी करण्यात आली. त्यात आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सशस्त्र दलांच्या कारवाईचा राजकीय प्रचारात वापर करू नये, अशा मागर्दशक सूचना आयोगाने मार्च महिन्यात सर्व राजकीय पक्षांना दिल्या होत्या.
शहडोलमधील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी ‘मोदी सरकारने आदिवासींसाठी नवा कायदा बनवला आहे. त्याअंतर्गत आदिवासींना गोळ्या घातल्या जातील असा उल्लेख आहे. तुमची जमीन, जंगल, जल हिरावून घेतात आणि वर म्हणतात की गोळ्या घातल्या जातील’ अशी विधाने केली होती. त्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
लंडन : श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची मेरिलिबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) पहिला ब्रिटिशेतर अध्यक्ष म्हणून घोषणा झाली आहे. एक वर्षांचा कार्यकाळ असलेल्या या पदावर तो १ ऑक्टोबर, २०१९पासून कार्यरत होईल. लॉर्ड्स येथे बुधवारी झालेल्या ‘एमसीसी’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सध्याचे अध्यक्ष अॅन्थनी व्रेफोर्ड यांनी संगकाराच्या नामांकनाची घोषणा केली.
‘‘एमसीसीचे क्रिकेटजगतील स्थान फार मोठे आहे. क्रिकेटसाठी, विशेषत: लॉर्ड्ससाठी २०२० हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे एमसीसीचे पुढील अध्यक्षपद मिळणे, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे,’’ असे संगकाराने सांगितले.
संगकाराचे ‘एमसीसी’शी नाते आधीपासून जोडले आहे. २०११मध्ये कॉलिन काऊड्रे व्याख्यानमालेत संगकाराने भाषण केले होते. या व्याख्यानात त्याने श्रीलंकेतील युद्धजन्य स्थिती आणि २००९मध्ये लाहोर येथे केलेला अतिरेक्यांचा हल्ला यासंदर्भात क्रिकेटचे महत्त्व विशद केले होते. २०१२मध्ये संगकाराला ‘एमसीसी’ने सन्माननीय आजीवन सदस्यत्व बहाल केले. याच वर्षी त्याचा ‘एमसीसी’च्या जागतिक क्रिकेट समितीवर समावेश करण्यात आला.
बंगळुरु : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम लवकरच सुरु होणार आहे. चांद्रयान-2 चं प्रक्षेपण 9 आणि 16 जुलैच्या दरम्यान होईल. इस्रोने बुधवारी (1 मे) ही घोषणा केली. जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाद्वारे श्रीहरिकोटामधून चांद्रयान-2 चं प्रक्षेपण होईल. 6 सप्टेंबरपर्यंत चांद्रयान-2 चंद्रावर पाऊल ठेवेल, असा अंदाज आहे. आतापर्यंत चार वेळा चांद्रयान-2 चं प्रक्षेपण टळलं आहे.
चांद्रयान-2 चे प्रामुख्याने ती भाग आहे, ज्यात ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोवरचा समावेश आहे. ऑर्बिटर आणि लॅण्डर जीएसएलव्हीला जोडलेले असतील. तर रोवर लॅण्डरच्या आत लावला आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर जेव्हा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लॅण्डर त्याच्यापासून वेगळा होऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील निर्धारित स्थानावर पोहोचेल. यानंतर रोवर यामधून बाहेर पडून चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन तिथले नमुने एकत्र करेल आणि त्याची माहिती इस्रोला पाठवेल. ही सगळी प्रक्रिया 6 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा इस्रोचा अंदाज आहे.
याआधी काही चाचण्या पूर्ण न झाल्याने इस्रोने चांद्रयान-2 लॉन्च केलं नव्हतं. भारताच्या पहिल्या चांद्रयानसोबत रोवर आणि लॅण्डर नव्हता. यंदा रोवर आणि लॅण्डरही चांद्रयान-2चा भाग आहे. इस्रोने चांद्रयान-2 याआधी 2017 आणि मग 2018 मध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली होती, पण ते शक्य झालं नाही. यापूर्वी 25 ते 30 एप्रिलच्या दरम्यान चांद्रयान-2 चं प्रक्षेपण होणार होतं.
महत्वाच्या घटना
१९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.
१९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.
१९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.
१९४५: दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.
१९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.
१९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
१९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.
१९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.
१९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.
१९९९: मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.
२००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अॅबोटाबाद येथे हत्या केली.
२०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
जन्म
१८९९: मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९९४)
१९२०: शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९८३)
१९२१: ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)
१९२९: भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९७२)
१९६९: वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म.
मृत्यू
१६८३:शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन.
१९६३: महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)
१९७३: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१०))
१९९८: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन. (जन्म: १८ मे १९१३)
२०११: अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: १० मार्च १९५७)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.