चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जुलै २०१९

Date : 2 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वाजपेयींनीही घेतला होता POK मध्ये एअर स्ट्राइकचा निर्णय पण : 
  • भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा बालाकोट एअर स्ट्राइकसारखा पाकिस्तानी लष्कराकडून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करायचा होता. एका नव्या पुस्तकातून हा खुलासा झाला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.

  • १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवरील हल्ल्यानंतर वाजपेयींनी सुद्धा एअर स्ट्राइकचा विचार केला होता. यासंबंधींच्या बातम्या या आधी सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहेत. ज्यांना याबद्दल माहित होते त्यांनी कधीही या योजनेचा खुलासा केला नाही. २८ जूनला राजधानी दिल्लीत माजी नौदल प्रमुख अॅडमिरल सुशील कुमार यांच्या ‘अ प्राइम मिनिस्टर टू रिमेंबर’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यामध्ये एअर स्ट्राइकचा उल्लेख आहे.

  • जैशच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केल्यानंतर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी लष्कराच्या ऑपरेशन्स रुममध्ये माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांची भेट घेतली होती. काय आणि कसे प्रत्युत्तर द्यायचे त्यावर सर्व चर्चेचा भर होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांसाठी चालवला जाणारा मोठा तळ उद्धवस्त करण्याची योजना आखण्यात आली होती.

जपानकडून स्मार्टफोनच्या सुटय़ा भागांची दक्षिण कोरियाला होणारी निर्यात बंद :
  • युद्धकाळात जपानच्या काही कंपन्यांनी कोरियाच्या लोकांना सक्तीने कंपन्यात काम करायला लावल्याच्या प्रकरणातील जुना वाद चिघळला असून जपानने दक्षिण कोरियाला चिप, स्मार्टफोन सुटे भाग यांची निर्यात बंद केली आहे. ४ जुलैपासून हा निर्णय अमलात येत आहे. ही बातमी येताच सॅमसंगचा  शेअर  ०.७४ टक्के तर एलजीचा २.५२ टक्क्य़ांनी घसरला आहे. इलेक्ट्रॉनिक व मोबाईल सुटे भाग तयार करणाऱ्या जपानी कंपन्यांचे शेअरही घसरले आहेत.

  • दक्षिण कोरियाच्या न्यायालयांनी युद्धकाळात ज्या जपानी कंपन्यांनी कोरियन लोकांकडून सक्तीने काम करवून घेतले त्यांनी नुकसान भरपाई द्यावी असा निकाल दिला असून जपानने मात्र हा प्रश्न दशकापूर्वीच दोन्ही देशात राजनैतिक संबंध सुरू होताना संपला होता असा दावा केला आहे. जपानच्या आर्थिक, व्यापार व उद्योग मंत्रालयाने सांगितले,की दक्षिण कोरियाला काही महत्त्वाच्या भागांची निर्यात थांबवण्याचा निर्णय हा आंतरराष्ट्रीय संबंधांना अनुसरूनच घेतला आहे.

  • जपानने दक्षिण कोरियावर नवीन र्निबध घातले असून त्यात, तीन रसायने व इतर उत्पादन तंत्रज्ञान देण्यास मनाई करण्यात आली आहे. दक्षिण कोरियाला जर चिप व स्मार्टफोनचे सुटे भाग निर्यात करायचे असतील तर त्याआधी परवानगी घेणे जपानी कंपन्यांना भाग आहे. चिपच्या निर्मितीत उपयोगी असलेल्या फ्लोरिनेटेड पॉलिमाइड या रसायनावर  बंदी घालण्यात आली आहे. १९६५ मध्ये दोन देशात याबाबत करार झाला होता. स्थानिक व जपानी उद्योग यांनी भरपाईसाठी स्वेच्छा निधी उभारला असल्याचे स्पष्टीकरण जपानने दिले होते.

सर्वोच्च न्यायालयात १६ जुलैला सुनावणी :
  • आर्थिकदृष्टय़ा दुर्बल उमेदवारांना नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १६ जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे.

  • या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणे आवश्यक असल्याचे सांगून न्या. शरद बोबडे व न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने याचिकांच्या सुनावणीसाठी १६ जुलै ही तारीख निश्चित केली. खुल्या श्रेणीतील गरीब उमेदवारांना नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमधील प्रवेशांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी नकार दिला होता. तथापि, या कायद्याची वैधता तपासून पाहण्यास न्यायालयाने होकार देऊन त्याबाबतच्या याचिकांवर केंद्र सरकारला नोटीस जारी केली होती.

  • सामान्य श्रेणीतील गरिबांना आरक्षणाचा फायदा देणारे घटनादुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने संमत केले आहे. लोकसभा व राज्यसभा यांनी अनुक्रमे ८ व ९ जानेवारीला ते पारित केले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.

  • या कायद्यामुळे आरक्षणाचे प्रमाण सध्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या ५० टक्के आरक्षणापेक्षा जास्त होणार आहे.

जम्मू काश्मिरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवण्यास राज्यसभेत मंजुरी :
  • नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवण्यास राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला होता. लोकसभेपूर्वीच राज्यसभेत या प्रस्तावावर मोहर उमटली. यासोबतच जम्मू काश्मिर आरक्षण विधेयकाला राज्यसभेत मान्यता मिळाली. या विधेयकाला यापूर्वीच लोकसभेत मंजुरी मिळाली होती.

  • केंद्र सरकार जम्मू काश्मिरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांनी आखून दिलेल्या नीतीमत्तेवर चालत आहोत. लोकतंत्र,  मानवता आणि काश्मिरत्व (जम्हूरियत, इन्सानियत और कश्मीरियत) ही आमची नीती असल्याचं शाह राज्यसभेतील चर्चेदरम्यान म्हणाले. काश्मिरी पंडित लवकरच काश्मिरातील मंदिरांमध्ये पूजा करतील, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

  • 'काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. देशापासून काश्मिरला कोणीही तोडू शकणार नाही, अशी हमी मी नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने सदनातील सर्व सदस्यांना देऊ इच्छितो. दहशतवादाला अजिबात थारा न देण्याचं आमचं धोरण आहे.' असं शाहांनी राज्यसभेत स्पष्ट केलं.

दिनविशेष :
  • जागतिक युएफओ (UFO) दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५०: बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.

  • १८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.

  • १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.

  • १९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

  • १९९४: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.

  • २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.

  • २००२: स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.

जन्म 

  • १८६२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म.

  • १८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.

  • १८८०: श्रेष्ठ गायक, नेट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)

  • १९०४: फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर१९९६)

  • १९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.

  • १९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.

  • १९२६: विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५६६: जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५०३)

  • १७७८: फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन. (जन्म: २८ जून १७१२)

  • १८४३: होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन. (जन्म: १० एप्रिल१७५५)

  • १९५०: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)

  • १९६१: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८९९)

  • १९९९: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२०)

  • २००७: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)

  • २०११: कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)

  • २०१३: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.