मुंबई : तात्काळ पासपोर्ट यापुढे अक्षरशः तात्काळ मिळणार आहे. अवघ्या तीन दिवसात तात्काळ पासपोर्ट हाती देण्याची सुविधा परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
तात्काळ पासपोर्टसाठी क्लास वन श्रेणीतील अधिकाऱ्याकडून सत्यप्रत प्रमाणपत्र आणण्याची अट परराष्ट्र मंत्रालयाने शिथील केली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी तुम्हाला तात्काळ पासपोर्ट मिळू शकेल. तात्काळ पासपोर्ट काढण्यासाठी साधारण 3 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत.
अर्थात, आधार कार्डासोबत नियमाप्रमाणे ठरलेल्या विविध 12 प्रमाणपत्रांपैकी कोणत्याही दोन प्रमाणपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे. या सर्व कागदपत्रांची योग्य पूर्तता झाल्यानंतर पासपोर्ट तयार होऊन पोलिस रिपोर्ट मागवण्यात येईल.
दुसरीकडे, अकुशल कामगारांना केशरी पासपोर्ट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टचं शेवटचं पान कोरं ठेवण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे.(source :abpmajha)
नवी दिल्ली - ‘ओबामा केअर’च्या धर्तीवर देशातील दहा कोटींहून अधिक गरीब व दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी राष्टÑीय आरोग्य संरक्षण योजना (आयुष्यमान भारत) हे मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाचे प्रमुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मोदी केअर जगभरातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानली जात आहे.
काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने ग्रामीण रोजगारासाठी मनरेगा ही महत्त्वपूर्ण योजना सुरु केली होती, तर आमच्या सरकारने ग्रामीण भागातील गोर-गरिबांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी मोदी केअर योजना सुरु केली आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर सांगितले.
निवडणुकीच्या धामधुमीच्या वर्षांत मांडलेल्या अर्थसंकल्पावर मोदी यांचीच सर्वत्र छाप दिसते. सवलतींना फाटा देणाºया अर्थसकल्पात कर्जमाफीची योजना नाही. मोदी हे क्षणिक लोकप्रिय अर्थसंकल्पाच्या बाजुने नाहीत, असे स्पष्ट करीत जेटली म्हणाले की, यात राजकीय दृढता आणि जनतेच्या आकांक्षेनुरुप नेतृत्वाच्या संकल्पाचे प्रतिबिंब आहे. सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्याचा मोदी यांचा विचार दिसतो, असे वाटत असले तरी अर्थसंकल्पातून मात्र तसे कोणतेही संकेत मिळत नाहीत.
मे २०१४ मध्ये आखलेल्या रूपरेखेनुसार मोदी-जेटली मार्गक्रमण करीत आहेत, हाच संदेश यातून देण्यात आल्याचे जाणवते. मार्च २०१९ पर्यंत ग्रामीण भागांत एक कोटी घरे उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना, आठ कोटी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा यांवरून मोदी यांचा लवकर निवडणुका घेण्याचा पक्का मनसुबा दिसतो. याशिवाय ते चार कोटी घरांना मोफत वीज जोडणी देणार असून, यासाठी १६००० कोटी रुपये खर्च करणार आहेत.(source :Lokmat)
डर्बनः दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्सनी विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर आणि शतकवीर कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी एका बाजूने किल्ला लढवणारा अजिंक्य रहाणेही या विजयाचा एक शिल्पकार आहे. अत्यंत शांत आणि संयमी अर्धशतकी खेळी करणाऱ्या या शिलेदारानं कालच्या सामन्यात एक अशी किमया केली, जी आजवर फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीलाच जमली आहे.
शिखर धवन बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. त्यावेळी भारतानं दोन विकेट्स गमावून 67 धावा केल्या होत्या. विराट कोहली टिच्चून फलंदाजी करत होता, पण त्याला भक्कम साथीदाराची गरज होती. ती ओळखूनच तंत्रशुद्ध रहाणेनं खेळ केला. पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्यानं 86 चेंडूत 79 धावा फटकावल्या. विराटला अधिकाधिक संधी देण्याचा त्याचा प्रयत्नही वाखाणण्याजोगाच होता.
अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीतील हे 24 वं अर्धशतक आहे आणि सलग पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये या पठ्ठ्याने अर्धशतक साजरं केलंय. सलग पाच अर्धशतकं झळकवण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावावर होता. आता त्यांच्यासोबत अजिंक्य रहाणेचं नावही जोडलं गेलंय. विराटने ही किमया दोन वेळा केली आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 270 धावांचं आव्हान भारतानं 46व्या षटकातच पूर्ण केलं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताच्या फलंदाजीची सूत्रं आपल्या हाती घेतली होती. वनडे कारकिर्दीतील 33वे शतक फटकावणारा विराट कोहली आणि 79 धावांची शानदार अर्धशतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी रचली आणि तिथेच टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.(source lokmat)
हवाना/ क्यूबा : क्यूबाचे पहिले पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष फिदेल कास्त्रो यांचा मुलगा डायझ-बॅलर्ट यांनी गुरुवारी आत्महत्या केली. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. ते 68 वर्षांचे होते.
डायझ-बॅलर्ट यांना गेल्या काही महिन्यांपासून नैराश्येने ग्रासले होते. गुरुवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केली.
डायझ बॅलर्ट हे त्यांच्या वडिलांप्रमाणे दिसत असल्याने यांना ‘फिदेलीटो’ असंही म्हटलं जात होतं. नैराश्येने ग्रासल्यामुळे त्यांना काही काळ रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने, डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची मुभा दिली.
पण त्यानंतरही त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण गुरुवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केली.
दरम्यान, डायझ हे उच्च विद्याविभूषित होते. तसेच त्यांची आपल्या वडिलांप्रमाणेच क्यूबाच्या टॉप वैज्ञानिकांमध्ये गणना होत असे. विशेष म्हणजे, ते क्यूबाच्या राष्ट्रीय परिषदेचे सल्लागार सदस्यदेखील होते.(source :abpmajha)
नवी दिल्ली - येत्या काही महिन्यांत ८ राज्य विधानसभांच्या आणि पुढील वर्षी होणाºया लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा चौथा व शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी लोकसभेत सादर केला. सरकारने या अर्थसंकल्पास ‘दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले खंबीर पाऊल’ म्हटले तर विरोधकांनी त्यावर ‘कल्पनाशून्य कसरत’ अशी टीका केली.
जेटली संसदेत अर्थसंकल्प मांडत असताना राजस्थान व पश्चिम बंगालमधील पाचही पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा दारुण पराभव होत असल्याच्या बातम्या येणे हा सूचक संकेत होता. न भूतो.. अशा बहुमताने केंद्रात सत्तेवर बसविणाºया मतदारांचा भ्रमनिरास वाढत असल्याची चुणूक नरेंद्र मोदी व अमित शहा यांना गुजरातमधील सत्ता शाबूत राखताना झालेल्या दमछाकीने आलीच होती. यातूनच जेटलींच्या अर्थसंकल्पात पाचपैकी चार वर्षे गेली आहेत व एकच वर्ष हाती आहे याची जाणीव प्रकर्षाने जाणवली.
अर्थसंकल्प लोकानुनयी असणार नाही तर देशाचे हित साधणारा असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलेच होते. त्यामुळे या अर्थसंकल्पात ‘छप्पर फाडके’ अशा कोणत्याही भपकेबाज घोषणा करण्यात आल्या नाहीत. तरी शेतीला संजीवनी दिल्याखेरीज आणि ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावल्याखेरीज अर्थव्यवस्थेस शाश्वत उभारी येणार नाही हे सूत्र पकडून शेती, शेतकरी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, लघू व मध्यम उद्योग आणि पायाभूत सुविधा यासाठी भरीव तरतुदी जेटलींनी केल्या.
अपेक्षेहून जास्त करवसुली आणि निर्गुंतवणुकीतून मिळालेली जास्त रक्कम हाती असूनही अर्थमंत्र्यांना ही तारेवरची कसरत करताना वित्तीय शिस्त थोडीशी मोडावी लागली. वित्तीय तुटीचे ३.३ टक्के हे ठरविलेले उद्दिष्ट गाठता येत नाही हे दिसल्यावर ते वाढवून ३.५ टक्के केले गेले.
शेती, अनुषंगिक व्यवसाय व ग्रामीण पायाभूत सुविधा यांवर भर देऊन उपजीविकेची अधिकाधिक साधने ग्रामीण भागांतच उपलब्ध व्हावीत यासाठी विविध मंत्रालयांच्या माध्यमांतून १४.३४ लाख कोटी रुपयांची तरतूद केली गेली. यामुळे ३२१ कोटी मानवी दिनाएवढा रोजगार निर्माण होईल, ३.१७ लाख किमी लांबीचे ग्रामीण रस्ते बांधले जातील, खेड्यांमध्ये ५१ लाख घरे व १.८८ लाख स्वच्छतागृहे बांधली जातील व १.७५ कोटी कुटुंबांना वीज पुरविता येईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.(source lokmat)
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. केंद्र सरकारने शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागाल खूष करणारा अर्थसंकल्प मांडला पण त्याचवेळी टॅक्स स्लॅब म्हणजे कररचनेत कोणताही बदल न केल्याने नोकरदारांची निराशा केली. शिक्षण आणि आरोग्य अधिभारात 1 टक्क्यांनी वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे.
म्हणजे तुम्ही जे खरेदी कराल, त्या बिलावर 1 टक्के अधिभार असेल. पूर्वी हा अधिभार 3 टक्के असायचा तो आता 4 टक्के असेल. बजेटमध्ये सरकारकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाइल, लॅपटॉप यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणं महाग होणार आहेत. कारण, अर्थसंकल्पात मोबाइल फोनवरील कस्टम ड्यूटी वाढवण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
महाग झालेल्या वस्तू -- शिक्षण आणि आरोग्यावरील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार, मोबाईलवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांवरून वाढवून 20 टक्के करण्यात आल्याने आता मोबाईल खरेदी महागणार, सिगारेटसह तंबाखूजन्य वस्तू, परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज, कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज, सफोला तेल, सिगारेट, विडी, गॉगल्स, मनगटी घड्याळं, ऑलिव्ह ऑइल, सिगारेट लायटर, व्हिडिओ गेम्स, फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस, टूथपेस्ट, टूथ पावडर, सौंदर्यप्रसाधनं, ट्रक आणि बसचे टायर, चप्पल आणि बूट, सिल्क कपडा, इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंडफर्निचर, घड्याळं, एलसीडी, एलईडी टिव्ही, दिवे, खेळणी, व्हीडीओ गेम, क्रीडा साहित्य, मासेमारी जाळं, मेणबत्त्या, चटई
स्वस्त झालेल्या वस्तू, सेवा - अनब्रँडेड डिझेल, अनब्रँडेड पेट्रोल, आरोग्य सेवा, एलएनजी, प्रिपेएर्ड लेदर, सिल्वर फॉइल, पीओसी मशिन, फिंगर स्कॅनर, आइरिश स्कैनर, देशात तयार होणारे हिरे, सोलार बॅटरी, ई-टिकटवरील सर्विस टॅक्स कमी, काजू
जागतिक दिवस
जागतिक पाणथळ भूमी दिन
महत्वाच्या घटना
१८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
१९३३: अॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात झाली.
१९५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
१९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो हे ग्रह एका रेषेत आले.
१९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
१९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
जन्म
१७५४: फ्रान्सचे पंतप्रधान चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे १८३८)
१८५६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
१८८४: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)
१८९७: हॉवर्ड जॉन्सन कंपनीचे संस्थापक हॉवर्ड डीरिंग जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १९७२)
१९०५: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अॅन रँड यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च१९८२)
१९२२: भारतीय फील्ड हॉकीपटू कुंवर दिग्विजय सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९७८)
१९२३: केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार ललित नारायण मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)
१९७९: अभिनेत्री शमिता शेट्टी यांचा जन्म.
मृत्यू
१९०७: रशियन रसायनशास्त्रज दिमित्री मेंदेलिएव्ह याचं निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)
१९१७: लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)
१९३०: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १८७१)
१९७०: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल याचं निधन. (जन्म: १८ मे १८७२)
१९८७: स्कॉटिश साहसकथा लेखक अॅलिएस्टर मॅकलिन याचं निधन. (जन्म: २१ एप्रिल १९२२)
२००७: हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा याचं निधन. (जन्म: २७ डिसेंबर १९४४)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.