चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ सप्टेंबर २०१९

Date : 1 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तान भारताबरोबर चर्चा करण्यास तयार पण : 
  • जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून भारत-पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. एकाबाजूला पाकिस्तानकडून युद्धाचे इशारे दिले जात असताना आता पाकने काही अटींवर द्विपक्षीय चर्चेची तयारी दाखवली आहे. भारताबरोबर द्विपक्षीय चर्चा करण्यात आम्हाला काहीही अडचण नाही असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. पण त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत.

  • द्विपक्षीय स्तरावर भारताबरोबर चर्चा करण्याच्या प्रस्तावाचा आम्ही कधीही विरोध केलेला नाही. शाह महमूद कुरेशी यांचे विधान हा पाकिस्तानच्या भूमिकेत झालेला बदल आहे. कारण मागच्याच आठवडयात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारताबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही असे म्हटले होते.

  • आम्ही चर्चेला कधीच नकार दिलेला नाही पण भारताने चर्चा करण्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली नाही असे कुरेशी म्हणाले. काश्मीर प्रश्नावर भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी दुसऱ्या देशाने हस्तक्षेप करावा यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. त्यावर दुसऱ्या देशाने हस्तक्षेप केला तर ती खरोखर चांगली बाब असेल असे कुरेशी म्हणाले.

  • जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत असलेल्या राजकीय नेत्यांची सुटका केल्यानंतर चर्चेची प्रक्रिया सुरु करता येईल असे कुरेशी म्हणाले. काश्मीर मुद्दांमध्ये भारत, पाकिस्तान आणि काश्मिरची जनता हे तीन पक्ष असल्याचे शाह महमूद कुरेशी यांचे म्हणणे आहे. आता जम्मू-काश्मीरवर नाही तर पाकव्याप्त काश्मीरवर यापुढची चर्चा होईल असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

एनआरसीच्या अंतिम यादीत १९ लाख नागरीकांना नाही मिळाले स्थान :
  • आसामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध झाली. भारताचे नागरीक असूनही अनेकांना एनआरसीमध्ये स्थान मिळाले नसल्याचे आसाम सरकारने कबूल केले आहे. पण अशा नागरीकांनी घाबरुन जाऊ नये. ते परदेशी लवादाकडे दाद मागू शकतात असे आसाम सरकारने म्हटले आहे.

  • आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असेही सोनोवाल यांनी स्पष्ट केले.

  • एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख लोकांना वगळण्यात आले आहे. एनआरसीच्या अंतिम यादीत एखाद्याचे नाव नसले याचा अर्थ तो परदेशी नागरिक आहे असा नव्हे, कारण त्याबाबतचा निर्णय योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर परकीय नागरिक लवाद घेऊ शकतो. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी सरकार आहे. ज्यांचे नाव अंतिम यादीत नसेल त्यांना ते भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्याची पुरेशी संधी दिली जाईल, असेही सोनोवाल म्हणाले.

  • एनआरसी मसुदा गेल्या वर्षी ३० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामधून ४०.७ लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. एकूण ३.२९ कोटी अर्जदारांपैकी २.९ कोटी लोकांचाच समावेश करण्यात आला होता.

भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल :
  • महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.

  • सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला. त्यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्यपालपदी कोण येणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. यात माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची राज्यपालपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. पण, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगर सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला होता. तसेच 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. 1977 मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे.

  • महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि तेलंगाणाच्या राज्यपालपदाच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कलराज मिश्रा यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहेत. बंडारू दत्तात्रय हे हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल आहेत. आरीफ मोहम्मद खान यांची केरळच्या, तर तमिलीसाई सौंदराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो अयोध्या खटल्याचा निकाल :
  • नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या नोव्हेंबरमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्यात वादातील दोन तृतीयांश जमीन मिळालेल्या हिंदू पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयातील आपला युक्तिवाद संपविला आहे. त्यावरून ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • ७० वर्षे जुन्या अयोध्या खटल्यात २.७७ एकर जागेचा वाद आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निवाड्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात ६ आॅगस्ट रोजी सुनावणी सुरू झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा न्यायपीठात समावेश आहे. रामलला, निर्मोही आखाडा, अखिल भारतीय रामजन्मस्थान पुनरुत्थान समिती, हिंदू महासभेचे दोन गट, शिया वक्फ बोर्ड आणि गोपाल सिंग विशारद यांचे कायदेशीर वारस हे या खटल्यातील पक्षकार आहेत.

  • १९४९ च्या डिसेंबरमध्ये बाबरी मशिदीत मूर्ती स्थापन झाल्यानंतर १९५१ मध्ये गोपाल सिंग विशारद यांनी पहिली याचिका न्यायालयात दाखल केली होती. तेव्हापासून हा खटला सुरू आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्याआधीच न्यायालय निर्णय देऊ शकेल, असे बोलले जात आहे. धवन यांनी आपणास युक्तिवादासाठी किमान २० दिवस लागतील, असे म्हटले आहे. त्यांना २० दिवस दिले तरीही न्यायालयाकडे निर्णयासाठी एक महिना उरतो.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०६: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.

  • १९११: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

  • १९१४: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.

  • १९३९: जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.

  • १९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.

  • १९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना.

  • १९६९: लिबीयात उठाव- हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.

  • १९७२: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केले व जगज्जेता बनला.

  • १९७९: पायोनियर- ११ अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन गेले.

  • १९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.

  • १९९१: उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.

जन्म 

  • १७९५: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १८७२)

  • १८१८: कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८९२)

  • १८९५: मानव-सक्षम विमानांचे निर्मिते एंगलबर्ट जशचा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून १९५५)

  • १८९६: हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७७)

  • १९०८: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक के. एन. सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २०००)

  • १९१५: ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी यांचा जन्म.

  • १९२१: यष्टीरक्षक व फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म.

  • १९३०: भारतीय आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून २०१५)

  • १९३१: भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

  • १९४६: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युन यांचा जन्म.

  • १९४९: लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री पी. ए. संगमा यांचा जन्म.

  • १९७०: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि लेखक पद्मा लक्ष्मी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५८१: शिखांचे चौथे गुरू गुरू राम दास यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १५३४)

  • १७१५: फ्रान्सचा राजा  लुई (१४वा) यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १६३८)

  • १८९३: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५०)

  • २००८: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९१४)

  • २०१४: स्पॅनडेक्स चे   निर्माते योसेफ शेव्हर्स यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.