चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ जुलै २०१९

Date : 1 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुषमा स्वराज यांनी सोडला सरकारी बंगला, सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव :
  • प्रकृती अस्वस्थेचं कारण देऊन मोदी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी तातडीने आपले शासकिय निवासस्थानसुद्धा सोडले आहे. आपल्या पदावरून दूर झाले तरी पुष्कळदा नेते शासकिय निवासस्थान सोडत नाही. मात्र स्वराज यांनी तसं न करता आपलं निवासस्थान लगोलग सोडलंय. स्वराज यांच्याशिवाय माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही आपला सरकारी बंगला सोडल्याची माहिती आहे.

  • ट्विटरद्वारे स्वराज यांनी सरकारी बंगला सोडल्यानंतर याबाबत माहिती दिली आहे. ‘8, सफदरजंग लेन मार्गावरील माझा सरकारी बंगला मी सोडला असून मी तेथील पत्त्यावर व फोन नंबरवर उपलब्ध नसेल’, असं ट्विट स्वराज यांनी केलं आहे. सुषमा स्वराज यांनी घेतलेला हा निर्णय नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला असून त्यांच्या या निर्णयाचं नेटकऱ्यांनी स्वागत केलं आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, लोकसभेचा कार्यकाल संपल्यानंतर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या नेत्याला एका महिन्याच्या आतमध्ये सरकारी बंगला सोडणे बंधनकारक असते. त्यानुसार स्वराज आणि जेटली यांनी बंगले सोडले आहेत.

मन की बात : ‘जलसंकटावर मात करा’, पाणी वाचवण्यासाठी मोदींनी दिले ३ सल्ले :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ आजपासून पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ‘देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दात भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकालातील पहिल्याच ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी जल संरक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं.

  • सध्या देशाचा बहुतांश भाग जल संकटाचा सामना करत असल्यानं सर्वांनी जल संरक्षण करण्याची गरज असल्याचं आवाहन मोदींनी केलं. पाण्याचा प्रश्न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. असं मोदी म्हणाले.

  • लोकांचा सहभाग आणि सहाय्य यांच्या मदतीनं जल संकटावर मात करू, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ‘जन, जन जुडेगा जल बचेगा’ असा संदेश त्यांनी दिला. देशात केवळ 8 टक्के पाणी वाचवलं जातं, पाण्याची समस्या जाणून त्यावर विचार करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे असे आवाहन केले. पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

  • पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीनं घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 22 जूनला देशातील हजारो ग्रामपंचायतींनी जल संरक्षणाचा संकल्प केल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी झारखंडच्या हजारी बागमधील एका सरपंचाचा संदेशदेखील ऐकवला. पाण्याच्या संरक्षणासाठी लोकांनी #JanShakti4JalShakti या हॅशटॅगचा उपयोग करत सोशल मीडियावर आपला मजकूर अपलोड करावा, असे आवाहनही त्यांनी लोकांनी केले.

स्विस बँकांतील निधीत भारत ७४ व्या क्रमांकावर :
  • स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती स्विस नॅशनल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तेथे गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारताचा ७४ वा क्रमांक लागला असून ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान एक अंकाने घसरले आहे.

  • काळा पैसा ठेवणाऱ्यांसाठी स्वित्झर्लंड हे नंदनवनच मानले जाते.अर्थात ही आकडेवारी अधिकृत असल्याने यात काळ्या पैशाचा अचूक अंदाज येत नाही. शिवाय या आकडेवारीत अनिवासी भारतीय, भारतीय यांनी त्यांच्या परदेशातील संस्थांच्या नावाने  ठेवलेला पैसा समाविष्ट नाही. २०१८ मध्ये जगातून स्विस बँकांत ठेवण्यात आलेला निधी ९९ लाख कोटींनी कमी झाला असून ही घसरण ४ टक्के आहे. भारतीय संस्था व व्यक्ती यांनी स्विस बँकात ठेवलेला निधी ६ टक्क्य़ांनी कमी होऊन २०१८ मध्ये ६७५७ कोटी रूपयांवर आला आहे. गेल्या दोन दशकातील ही नीचांकी पातळी आहे.

  • स्विस  बँकेत अनेक देशातील संस्था व नागरिकांचा काळा पैसा ठेवलेला आहे. गेल्या वर्षी भारताचा ७३ वा क्रमांक लागला होता. वर्षभरापूर्वी भारताचा ८८ वा क्रमांक होता पण त्यानंतर तो ७३ पर्यंत आला. भारतीय व्यक्ती व संस्थांचा स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये गुंतवण्यात आलेल्या पैशाचा विचार करता भारत खालच्या स्थानावर आहे.स्वित्झर्लंडमध्ये गुंतवण्यात आलेल्या एकूण सर्व देशांच्या पैशाचा विचार करता त्यात भारतीय व्यक्ती व संस्था यांचा पैसा केवळ ०.०७ टक्के आहे.

  • ब्रिटन यात पहिल्या क्रमांकावर असून २०१८ अखेरीस तेथील व्यक्ती व संस्था यांचा जास्तीत जास्त निधी स्विस बँकात आहे. स्विस बँकांतील एकूण परदेशी निधीत ब्रिटनचा वाटा २६ टक्के आहे. त्यानंतर अमेरिका, वेस्ट इंडिज, फ्रान्स, हाँगकाँग यांचा क्रमांक पहिल्या पाचात आहे. स्विस बँकांतील पन्नास टक्के पैसा या पाच देशांचा आहे. पहिल्या दहा देशांचा या गुंतवणुकीतील वाटा दोन तृतीयांश आहे. पहिल्या पंधरा देशांचा वाटा ७५ टक्के, तर पहिल्या तीस देशांचा वाटा ९०  टक्के आहे.

‘जीएसटी’मध्ये नवीन सुधारणांची आज घोषणा :
  • वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीस दोन वर्षे पूर्ण होत असताना अर्थ मंत्रालयाने या अप्रत्यक्ष कर पद्धतीत काही सुधारणा करण्याचे ठरवले आहे. नवीन विवरणपत्र पद्धत,रोख खतावणी पद्धतीत सुसूत्रता, एकच कर परतावा वितरण प्रणाली यांचा त्यात समावेश असून याबाबतची घोषणा सोमवारी केली जाणार आहे.

  • केंद्रीय अर्थ व कंपनी कामकाज राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे सोमवारी विविध खात्यांचे सचिव व अधिकारी यांची बैठक घेणार असून जीएसटी द्विवर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही भूषवणार आहेत.

  • भारतीय अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी पद्धतीमुळे आमूलाग्र बदल झाले असून बहुस्तरीय करपद्धत, गुंतागुंतीची अप्रत्यक्ष कररचना यांची जागा साध्या, पारदर्शक, तंत्रज्ञानस्नेही करप्रणालीने घेतली आहे.

  • अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, १ जुलै पासून प्रायोगिक तत्त्वावर नवीन करविवरणपत्र प्रणाली राबवली जाणार आहे व ती १ ऑक्टोबरपासून अनिवार्य करण्यात येईल. छोटय़ा कर दात्यांसाठी ‘सहज’ व ‘सुगम’ विवरणपत्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. रोख खतावणीत बदल करताना सुसूत्रीकरण करण्यात येत असून त्यात वीस अर्थशीर्षांऐवजी आता पाच प्रमुख अर्थ शीर्ष राहणार आहेत.

  • कर, व्याज, दंड,  शुल्क व इतर बाबींसाठी एकच रोख खतावणी यापुढे राहील. एकच कर परतावा वितरण प्रणाली अमलात येणार असून त्यात केंद्रीय जीएसटी, राज्य जीएसटी व एकात्मिक जीएसटी तसेच उपकर यांचा वेगवेगळा परतावा सध्या सरकार मंजूर करीत असते, त्या ऐवजी एकत्रित परताव्याचा विचार केला जात आहे.

G-20 : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा मोदींसोबत सेल्फी, भन्नाट शब्दात केलं मोदींचं कौतुक :
  • ओसाका :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जी-२० शिखर संमेलनातून आज भारतात परतले. आज संमेलनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी विविध देशांच्या प्रमुखांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये विशेष आकर्षणाचं केंद्र ठरला तो ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींसोबत घेतलेला सेल्फी.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंधांवर दोघांनीही चर्चा केली. या भेटीनंतर मॉरिसन यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर केला. सेल्फी शेअर करताना त्यांनी 'कितना अच्छा है मोदी' अर्थात 'मोदी किती चांगले आहेत' असे कॅप्शन दिले आहे.

  • याच ट्वीटला रिट्विट करताना मोदींनी ' मित्र,  मी आपल्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील ऊर्जेविषयी विचार करत आहे' असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

दिनविशेष :
  • कृषिदिन / राष्ट्रीय वैद्य दिन

महत्वाच्या घटना 

  • १६९३: संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.

  • १८३७: जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.

  • १८८१: जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.

  • १९०८: एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.

  • १९०९: क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.

  • १९१९: कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात.

  • १९३३: नाट्यमन्वंतरच्या आंधळ्यांची शाळा नाटकाचा १ला प्रयोग झाला.

  • १९३४: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.

  • १९४७: फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.

  • १९४८: कायदेआझम मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्‍घाटन झाले.

  • १९४९: त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले.

  • १९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.

  • १९६१: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.

  • १९६२: सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.

  • १९६३: अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.

  • १९६४: न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.

  • १९६६: कॅनडा मधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजन चे प्रक्षेपण टोरांटो येथून सुरु झाले.

  • १९७९: सोनी कंपनी ने व्हॅकमन प्रकाशित केला.

  • १९८०: ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.

  • १९९१: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.

  • १९९७: सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताची कुंजराणी देवी यांना स्थान मिळाले.

  • २००१: फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.

  • २००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.

  • २००७: इंग्लंड मध्ये सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.

  • २०१५: डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जन्म 

  • १८८७: कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म.

  • १८८२: भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

  • १९१३: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)

  • १९३८: प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म.

  • १९४९: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचा जन्म.

  • १९६१: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)

  • १९६६: रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा जन्म.

  •  

मृत्यू 

  •  

  • १८६०: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८००)

  • १९३८: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान दादासाहेब खापर्डे यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)

  • १९४१: स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १८८० – विजयनगरम, आंध्र प्रदेश)

  • १९६२: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन.

  • १९६२: भारतरत्‍न, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य डॉ. बिधनचंद्र रॉय याचं निधन. (जन्म: १ जुलै १८८२ – पाटणा, बिहार)

  • १९६९: कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर यांचे निधन.

  • १९८९: कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ प्राचार्यग. ह. पाटील यांचे निधन.

  • १९९४: दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक राजाभाऊ नातू यांचे निधन.

  • १९९९: एम अँड एम चे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९०४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.