चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ मे २०२२

Date : 9 May, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जॉन ली यांची हाँगकाँगच्या नेतेपदी निवड :
  • हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करणारे कट्टरवादी सुरक्षा प्रमुख जॉन ली यांची रविवारी प्रामुख्याने चीनधार्जिण्या समितीने केलेल्या मतदानात शहराचा यापुढील नेता म्हणून निवड करण्यात आली.

  • या निवडणुकीतील एकमेव उमेदवार असलेल्या ली यांनी झालेल्या मतदानापैकी ९९ टक्क्यांहून अधिक मते मिळवून ही निवडणूक जिंकली. मतदार असलेल्या सर्व, म्हणजे १५०० समिती सदस्यांची बीजिंगमधील मध्यवर्ती सरकारने काळजीपूर्वक छाननी केली होती.

  • ली हे १ जुलै रोजी सध्याच्या नेत्या कॅरी लाम यांची जागा घेतील. लाम यांची पाच वर्षांची कारकीर्द त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रचंड लोकशाहीवादी निदर्शने, जवळजवळ संपूर्ण मतभेद मोडून काढणारी दडपशाही, आरोग्य यंत्रणा कोलमडून टाकणारी अलीकडची करोना लाट यांनी गाजली. यामुळे, पाश्चिमात्य धर्तीचे स्वातंत्र्य असलेला आंतरराष्ट्रीय बिझिनेस हब म्हणून असलेली हाँगकाँगची प्रतिष्ठा डागाळली होती.

  • लाम यांनी एका निवेदनाद्वारे ली यांचे अभिनंदन केले आणि आपण निवडणुकीचा निकाल चीनला सादर करू असे सांगितले. केवळ चीनशी एकनिष्ठ असलेले ‘देशभक्त’ निवडून येऊ शकतील याची खात्री करण्यासाठी या निवडणुकीपूर्वी हाँगकाँगच्या मतदान कायद्यांमध्ये गेल्या वर्षी मोठे बदल करण्यात आले होते.

युक्रेन-रशिया संघर्ष थांबवण्याचे तातडीने प्रयत्न- मॅक्रॉन :
  • फ्रान्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी पुन्हा हाती घेतली. हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचे दुसरे पर्व आहे. फ्रान्ससह युरोपचे जागतिक स्तरावर आणखी चांगले नाव व्हावे, यावर आपला भर राहील. त्याआधी युक्रेन-रशिया युद्ध अधिक चिघळू नये म्हणून आपण तातडीने हालचाली करू, असा संकल्प मॅक्रॉन यांनी जाहीर केला.  

  • २४ एप्रिल रोजी मॅक्रॉन यांची पाच वर्षांसाठी फ्रान्सच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यांनी कडव्या उजव्या विचारसरणीच्या प्रतिस्पर्धी मरीन ली पेन यांचा पराभव केला होता. अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाती घेताना त्यांनी सांगितले, की फ्रान्स आणि युरोपसाठी ठोस कृती करण्याचा काळ आता आला आहे. मात्र, त्याआधी रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आता रोखावे लागेल. समृद्धीसाठी फ्रान्सला अधिक स्वावलंबी सार्वभौम देश बनवण्यावर आपला भर असून, आगामी शतकाच्या आव्हानांना सक्षमरित्या तोंड देण्यासाठी फ्रान्ससह युरोपची बांधणी करण्याचीही गरज आहे.   

  • एरवी सविस्तर भाषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मॅक्रॉन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा हाती घेताना संक्षिप्त आणि लिखित भाषण वाचले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना हस्तांदोलन, अभिवादन केले. पाहुण्यांशी संवाद साधला. या सोहळय़ावर करोनाचा परिणाम दिसला नाही. सध्या फ्रान्समध्ये सर्व कोविड प्रतिबंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर नसल्याने सोहळय़ात उत्साह जाणवत होता. या सोहळय़ास ५०० पाहुण्यांना निमंत्रित केले होते. त्यात राजकीय क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

  • राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांसह संस्था, संघटना, कामगार संघटनांच्या सहकार्याने संसद आणि सरकारचे कामकाज एकजुटीने चालावे. त्यामुळे सामाजिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्यासाठी प्रशासनाची चांगली कार्यपद्धती शोधून राबवली जाईल.

व्याज दरवाढीची वेळ आश्चर्यकारक’ :
  • रिझव्‍‌र्ह बँकेने अलीकडेच व्याजदरांत केलेली वाढ आश्चर्यकारक नव्हती़  मात्र, पण तिची वेळ आश्चर्यकारक होती, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 

  • ऑगस्ट २०१८ नंतर पहिल्यांदाच रिझव्‍‌र्ह बँकेने ४ मे रोजी रेपो दरात ४० बेसिस पॉइंटची वाढ केली, तसेच सीआरआर ५० बेसिस पॉइंट्सनी वाढवून ४.५ टक्के केला. युक्रेनमधील युद्धाचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर चलनफुगवटय़ाचा दबाव आल्याचे बँकेने म्हटले होते. 

  • ‘रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत व्याज दरवाढीची वेळ आश्चर्यकारक आहे, पण ही कृती मात्र नाही,  कारण हे होणारच होते, याचा लोकांनी विचार केला होता. मात्र, आर्थिक धोरण समितीच्या दोन बैठकांदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे आश्चर्य वाटले,’ असे सीतारामन एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या.

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ, उद्यापासून नवीन दर होणार लागू :
  • एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या (आपत्कालीन साखळी) ३३२ घटना घडल्या आहेत. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या आहेत. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • मध्य रेल्वेनं मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी भाडेवाढ केली आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिली आहे. संबंधित वाढ उद्यापासून म्हणजेच ९ मे २०२२ पासून २३ मे २०२२ दरम्यानच्या १५ दिवसांसाठी केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असणार आहे.

  • मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या ३३२ घटना घडल्या आहेत. यातील ५३ घटना ह्या योग्य कारणासाठी घडल्या आहेत. तर २७९ प्रकरणांत आरोपींनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. संबंधित आरोपींविरोधात भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बरेच गुन्हे अज्ञात आरोपींविरोधात आहेत. पकडलेल्या आरोपींकडून आतापर्यंत ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबई क्लासिक शरीरसौष्ठव ; पुण्याच्या महेंद्र चव्हाणला जेतेपद :
  • ‘भारत श्री’ सागर कातुर्डे आणि सुजन पिळणकर या नामांकित मुंबईकर शरीरसौष्ठवपटूंच्या अनुपस्थितीत पुण्याच्या महेंद्र चव्हाणने मुंबई क्लासिक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

  • महेंद्रने मुंबई आणि उपनगरच्या खेळाडूंचे आव्हान मोडीत काढत या किताबावर आपले नाव कोरले. संदीप सावळे या स्पर्धेत उपविजेता ठरला.

  • जुलै महिन्यात होणाऱ्या आशिया श्री स्पर्धेसाठी येत्या २२ मे रोजी हिमाचल प्रदेशात भारतीय संघाची निवड चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी महेंद्र चव्हाण, संदीप सावळेसह गणेश पेडामकर, अवधूत निगडे, रामा मायनाक, तौसिफ मोमीन, भास्कर कांबळी, आशीष लोखंडे, सुशांत रांजणकर आणि निलेश दगडे यांची निवड झाली आहे.

०९ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.