चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०९ जुलै २०२२

Date : 9 July, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका १८ ऑगस्टला :
  • इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यावर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.

  • अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, गिरीश महाजन, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या मतदारसंघांत निवडणुका होत असल्याने या नेत्यांना आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.  एकीकडे नागरिकांच्या इतर मागास प्रवर्ग(ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ नयेत , अशी सर्वपक्षीय भूमिका असताना राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतीसाठी येत्या १८ ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी केली.

  • राज्यात सत्तांतर होताच पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ नयेत अशी मागणी सर्वच पक्षांचे नेते करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी पुढील सुनावणी होणार असतानाच राज्य निवडणूक आयोगाने ९६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय १७ जिल्हयातील नगरपालिकाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये पावसाळय़ात निवडणुका घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार या निवडणुका होत आहेत.

शिंदे- फडणवीस दिल्लीत, आज मोदींची भेट :
  • महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची येथे भेट घेतली. शिंदे व फडणवीस शनिवारी दुपारी चारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.

  • शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यासंदर्भात ११ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले की,आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे  बहुमत आमच्या बाजूने आहे. या देशात संविधान, नियम, कायदे हेच सर्वोच्च असतात.

  • शिंदे गट व भाजप यांचे संयुक्त सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर व पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे दौऱ्यावर आले आहेत.

  • शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे व फडणवीस विमानतळावरून थेट महाराष्ट्र सदनात आले. दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे व फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील, हे पूर्वनियोजित होते. भाजपच्या दोन्ही केंद्रीय नेत्यांची संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. दिल्लीमध्ये विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे व फडणवीस हे दोघे थेट अमित शहा यांच्या भेटीला जाण्याची शक्यता होती. मात्र शहांकडे न जाता दोघेही महाराष्ट्र सदनात आले. त्यानंतर काही वेळाने फडणवीस एकटेच सदनामधून रवाना झाले. शिंदे मात्र नव्या महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांच्या विशेष कक्षातच होते. शिंदे यांना न घेताच फडणवीस सदनामधून बाहेर पडल्यामुळे शहांची भेट थोडी लांबणीवर पडली होती.

माझे मित्र आबे सान.. :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अतिशय जवळचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्याविषयी ब्लॉगवर व्यक्त केलेल्या उत्कट भावना.

  • शिंझो आबे- जपानचे अद्वितीय नेते, जागतिक कीर्तीचे एक उत्तुंग मुत्सद्दी राजकारणी, भारत-जपान यांच्यातील मैत्रीचे महान शिल्पकार- आज आपल्यामध्ये नाहीत. जपान आणि जगानेही आज एक अत्यंत द्रष्टा नेता गमावला आहे आणि, मी माझा एक अत्यंत प्रिय मित्र गमावला आहे.

  • मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना, २००७ साली पहिल्यांदा आबे यांना भेटलो. त्यांच्या-माझ्या पहिल्या भेटीपासूनच, आमची मैत्री कार्यालयीन सोपस्कार आणि शिष्टाचारांचे अडथळे पार करून त्याच्या पलीकडे गेली होती.

  • क्योटोच्या तोजी मंदिरात आमची झालेली भेट, शिंकानसेन (ट्रेन) मधून आमचा एकत्रित प्रवास, अहमदाबादला साबरमती आश्रमात आम्ही एकत्रित दिलेली भेट, काशीमध्ये दोघांनी मिळून केलेली गंगा आरती, टोक्योमधला भव्य चहा समारंभ.. आमच्या दोघांच्या भेटीतल्या अशा असंख्य अविस्मरणीय क्षणांची यादी खरेच खूप मोठी आहे... आणि, माऊंट फूजीच्या पायथ्याशी असलेल्या यामानाशी प्रांतातल्या त्यांच्या मूळगावी मला आमंत्रित करून, त्यांनी मला जो सन्मान दिला होता, त्याच्या स्मृती माझ्या मनात चिरकाल राहणार आहेत.

  • २००७ ते २०१२ या काळात, ते जपानचे पंतप्रधान नसतानाही, आणि अगदी अलीकडे, २०२० नंतरसुद्धा, माझे त्यांच्याशी असलेले स्नेहाचे घट्ट संबंध कायम दृढ राहिले.

भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटिश पंतप्रधान होईल का? जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झाली शक्यता :
  • बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नवीन पंतप्रधानांची निवड होईपर्यंत बोरिस जॉन्सन हेच काळजीवाहू पंतप्रधान राहणार आहेत. जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाची काही नावं आहेत. यामुळे भारतीय वंशाची व्यक्ती आगामी ब्रिटीश पंतप्रधान होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

  • हुजूर पक्षाचे नेतृत्व आणि पंतप्रधानपदासाठी अ‍ॅटर्नी जनरल सूएल्ला ब्रेव्हरमन, परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस, माजी परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट, संरक्षणमंत्री बेन वॉलेस, उपपंतप्रधान डॉमिनिक राब, माजी अर्थमंत्री ऋषी सूनाक, नवनियुक्त अर्थमंत्री नधीम झहावी यांची नावे चर्चेत आहेत. ब्रेव्हरमन यांनी नेतृत्वपदासाठी रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्या भारतीय वंशाच्या आहेत. अनेक बड्या नावांच्या चर्चेमुळे जॉन्सन यांचे उत्तराधिकारी कोण, याबाबत उत्सुकता आहे.

  • “मी स्वतःला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरवत आहे, कारण मला विश्वास आहे की २०१९ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी मी योग्य आहे. मला ब्रेक्झिटच्या संधींचा स्वीकार करायचा आहे. तसेच करकपातबाबत निर्णय घ्यायचे आहेत ” असे ब्रेव्हरमन यांनी पीटीआयला सांगितलं आहे.

  • दुसरीकडे, गृह सचिव प्रीती पटेल (५०) या देखील पंतप्रधान पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. त्या बोरिस जॉन्सन यांच्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी पदाचा राजीनामा देताना सूनाक आणि जाविद यांचं अनुसरण केलं नसले तरी त्या या पदासाठी दावेदार मानल्या जात आहेत. असं असलं तरी YouGov सर्वेक्षणात पटेल यांना फक्त ३ टक्के मतदान झाले आहे.

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा - प्रणॉयची उपांत्य फेरीत धडक :
  • भारताच्या एचएस प्रणॉयने शुक्रवारी जपानच्या कान्ता त्सुनेयामाला नमवून मलेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. प्रणॉयने आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना जागतिक क्रमवारीत १४व्या क्रमांकावरील त्सुनेयामाला रंगतदार उपांत्यपूर्व फेरीत २५-२३, २२-२० असे ६० मिनिटांत पराभूत केले. प्रणॉय-त्सुनेयामा लढतीत अखेपर्यंत कमालीची चुरस पाहायला मिळाली. प्रणॉयने दोनदा गेमचे गुण वाचवून आगेकूच करीत त्सुनेयामाला धूळ चारली. प्रणॉयने त्सुनेयामाविरुद्धच्या लढतींमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे.

  • मे महिन्यात भारतीय पुरुष संघाने जिंकलेल्या ऐतिहासिक थॉमस चषक जेतेपदात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या प्रणॉयचा पुढील फेरीत हाँगकाँगच्या आठव्या मानांकित एनजी का लाँग अँगसशी सामना होणार आहे.

  • ताय झूविरुद्ध सिंधू पुन्हा अपयशी - कट्टर प्रतिस्पर्धी ताय झू यिंगचा अडथळा ओलंडण्यात दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूला शुक्रवारी पुन्हा अपयश आले. त्यामुळे मलेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत तिचे आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरील चायनीज तैपेईच्या ताय झू हिने गेल्या आठवडय़ात मलेशिया खुल्या स्पर्धेत सिंधूला नामोहरम केले होते. या स्पर्धेत सिंधूने ५५ मिनिटांच्या संघर्षांनंतर १३-२१, २१-१२, १२-२१ अशी हार पत्करली. टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ताय झू हिच्याविरुद्ध सिंधूचा हा कारकीर्दीतील १७वा पराभव ठरला. या सामन्याचा पहिला गेम गमावल्यावर सिंधूने दुसरा गेम जिंकला होता. मात्र, तिसऱ्या गेममध्ये ती पुन्हा चांगला खेळ करण्यात अपयशी ठरली. २०१९मध्ये बॅसेल येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावताना सिंधूने अखेरचे ताय झू हिला हरवले होते. त्यानंतरचे सातही सामने तिने गमावले आहेत.

०९ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.