चालू घडामोडी आणि दिनविशेष - 08 ऑक्टोबर 2023

Date : 8 October, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
शतकवीर भारत! आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची शंभरी पार करत घडवला इतिहास!
  • आशियाई क्रीडा स्पर्धा अर्थात एशियन गेम्समध्ये याआधी भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही ७० पदकांची होती. यंदा मात्र भारतानं तो आकडा केव्हाच पार केला आहे. एवढंच नाही, तर एक नवा इतिहास रचत भारतानं आता पदकांची शंभरी पार केली आहे. या कामगिरीच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मोठ्या सन्मानानं रोवला गेला आहे. गेल्या ६० वर्षांतली ही भारताची एशियन गेम्समधली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आता पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
  • शुक्रवारी भारताच्या भात्यात ८६ पदकं होती. काल दिवसभरात हॉकी (सुवर्णपदक), तिरंदादी (रौप्य व कांस्य पदक), ब्रिज (रौप्य), बॅडमिंटन (रौप्य) व रेसलिंग (३ रौप्य) अशा पदकांची लयलूट केली. आज सकाळी भारतीय खेळाडूंनी विजयी कामगिरी करताना तिरंदाजीत तीन, कबड्डीत दोन व बॅडमिंटन आणि पुरुष क्रिकेटमध्ये एक अशा पदकांची निश्चिती केली आहे. त्यामुळे आता भारताची पदकसंख्या शंभरीपार गेली आहे!

“आमचं स्वप्न सत्यात उतरेल याचा विचारही केला नव्हता”

  • “आम्ही चीनमध्ये आशियाई स्पर्धांसाठी येताना १०० पदकांचं लक्ष्य ठेवलं होतं हे खरं आहे. पण आम्ही असा विचार केला नव्हता की आमचं स्वप्न अशा प्रकारे सत्यातही उतरेल. आता आम्ही ते अगदी सहज साध्य करत आहोत. मी देशाच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. शिवाय, सपोर्ट स्टाफ, खेळाडूंचे प्रशिक्षक या सगळ्यांच्या मदतीनेच हे लक्ष्य साध्य करणं शक्य झालं आहे”, अशी प्रतिक्रिया भारताचे आशियाई स्पर्धेतील प्रमुख भूपिंदर सिंग बाजवा यांनी दिली.

याआधीची सर्वोत्तम कामगिरी..७० पदकं!

  • दरम्यान, याआधी पाच वर्षांपूर्वी जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं ७० पदकं जिंकत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदनली होती. त्या वर्षी पदकांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी होता. त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत चौथ्या किंवा पाचव्या स्थानी राहिला. या वर्षी १०० पदकांसह भारत चीन, जपान व दक्षिण कोरियापाठोपाठ चौथ्या स्थानी आहे.
नागपूरकर ओजस देवतळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी या प्रकारात सलग तिसरे सुवर्णपदक
  • नागपूरच्या ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या वैयक्तिक कम्पाउंड या प्रकारात अंतिम सामना खेळत हे सुवर्णपदक जिंकले. ओजस जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वल असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे.
  • ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅट्रीक साधल्याने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे नागपुरकरांनी शहरात मोठा जल्लोश साजरा केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ओजस हा पहिलाच नागपूरकर आहे. ओजसने बुधवारी आर्चरी मिक्स टीम कम्पाउंड इव्हेंटमध्येही भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. तसेच गुरुवारी आर्चरी मेन्स कम्पाउंड टीम इव्हेंटमध्येसुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
  • इतिहासात प्रथमच नागपूरच्या खेळाडूनं आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजस देवतळेच्या आई-वडिलांशी संवाद साधून आनंद व्यक्त केला.
सैन्यदलात भरती, करा विनामूल्य अर्ज
  • सैन्यदलात भरती होत देशसेवा करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. दलात विविध जबाबदाऱ्या असतात. त्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जात असतात.
  • आता सैन्यदलाकडून टेक्निकल एन्ट्री स्कीमसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लष्करातील तांत्रिक, अभियांत्रिकी सेवांसाठी ही भरती केल्या जाते. प्रवेशासाठी उमेदवारांना जेईई २०२३ अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराने बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणितात किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करतांना किमान वय १६.५ वर्षापेक्षा अधिक आणि कमाल १९.५ वर्षापेक्षा जास्त असू नये.
  • प्रवेश अर्ज प्रक्रिया १३ ऑक्टोंबर ते १२ नोव्हेंबर पर्यंत आहे. यात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पदवी घेता येते. सैन्यदलाच्या जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईट वर अर्ज उपलब्ध होणार आहे.
आरोग्य विभागात २,८६२ अस्थायी पदांना मंजुरी; एकाच दिवशी १४ शासन निर्णय
  • नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाला जाग आली आहे. विभागाच्या विविध कार्यालयांतील २,८६२ अस्थायी पदांना युद्धपातळीवर मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने त्यासंदर्भातील १४ शासन निर्णय शुक्रवारी जारी केले आहेत. 
  • नांदेड रुग्णालयातील मृत्यूंमागे औषधांचा तुटवडा आणि अपुरा कर्मचारीवर्ग इत्यादी कारणे असल्याचे सांगितले जाते. आरोग्य विभागाच्या औषध खरेदीतील गोंधळ आणि अपुरा कर्मचारी वर्ग याविषयी विरोधक सातत्याने सरकारवर आरोप करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने शुक्रवारी २,८६२ अस्थायी पदांना मंजुरी दिली. त्यामध्ये परचर्या शाळा, प्लेग नियंत्रण पथके, जिल्हा परिषदांची प्राथमिक आरोग्य केंद्रे यांतील ही पदे आहेत. यामध्ये नाशिक मंडळातील २,१७३ अस्थायी पदांचा समावेश आहे.

‘मोठय़ा प्रमाणावर मृत्यू होत असल्याचा आभास’

  • अकोला : संभाजीनगर, नागपूरसारख्या शहरांमध्ये रुग्णांच्या सरासरी मृत्यूंचा दाखला देत मोठय़ा प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. काहींकडून राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण केले जाते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
‘मनरेगा’साठी १२६६ कंत्राटी अभियंत्यांची भरती
  • नियोजन विभागाने बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबवण्यासाठी १२६६ कनिष्ठ अभियंत्यांना (तांत्रिक सहायक) भरती केले आहे. नियोजन विभागाने रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मनरेगा’च्या राज्य नियामक मंडळाच्या बैठकीत बाह्यसंस्थेद्वारे भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • त्यानंतर १८ मे २०२३ च्या परिपत्रकान्वये नियोजन विभागासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाची सेवा ‘मे. एस.टु.इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड‘ या कंपनीची नेमणूक केली. या कंपनीने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मनरेगाच्या कामासाठी १२६६ ‘तांत्रिक सहायकां’ची भरती केली आहे. या सहायकांचे ऑगस्ट २०२३ च्या  वेतनापोटी चार कोटी ९२ लाख ३४ हजार ८४० इतकी रक्कम या कंपनीला देण्यात आली आहे. याची देयके सहायक लेखा अधिकारी यांनी काढली आहेत. या तांत्रिक सहायकांना महिन्यांला ४०,००० रुपये इतके वेतन ठरलेले आहे.
  • आर्थिक लाभ सहायकांचे वेतन, कंपनींचे शुल्क आदींचा विचार केला तर १२६६ सहायकांच्या मानधनासाठी ३,५०,६३,४२७  रुपये, भविष्य निर्वाह निधीत ५५,४८,२४५ रुपये, व्यवसाय कर तर भरती करणाऱ्या कंपनीला ८३,६९,९२३ रुपये अशी चार कोटी ९२ लाख ३४ हजार ८४० रुपये पहिल्या महिन्याचे देयक काढले आहे. यामध्ये कंपनीला ८३ लाखांपेक्षा जास्त आर्थिक लाभ होत आहे. नियोजन विभाग आणि भरती करणाऱ्या कंपनीच्या दरम्यान झालेल्या करारातील तरतुदीनुसार कंपनीस १६ टक्के इतके शुल्क म्हणून देण्यात येत आहे.
भरड धान्याशी निगडित उत्पादनांवरील जीएसटी ५ टक्क्यांवर
  • वेष्टनांकित भरड धान्याच्या पिठाच्या विक्रीवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) १८ टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के करण्यात आला आहे. शिवाय ७० टक्क्यांहून अधिक भरड धान्याचे मिश्रण असलेले सुटे पीठ विकल्यास त्यावर कोणताही कर आकाराला जाणार नसल्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवाकर परिषदेच्या नवी दिल्ली येथे शनिवारी पार पडलेल्या ५२ व्या बैठकीत घेण्यात आला.
  • उसाचे उप-उत्पादन आणि अल्कोहोल उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या काकवीवरील (मोलॅसिस) कराचा दर सध्याच्या २८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होईल आणि साखर कारखान्यांच्या हाती जादा पैसा शिल्लक राहणार असल्याने शेतकऱ्यांची देणी जलदगतीने देता येतील. पशुखाद्य निर्मितीच्या खर्चातही घट होईल. मद्य तयार करण्यासाठी एक प्रमुख कच्चा घटक असलेल्या एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल अर्थात ईएनएलादेखील जीएसटीतून सूट देण्यात आली आहे.
  • मात्र औद्योगिक वापरासाठी असलेल्या ईएनएवर जीएसटी कायम राहणार आहे, अशी माहिती जीएसटी परिषदेचे सदस्य असलेले छत्तीसगढचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंग देव यांनी दिली. ऑनलाइन गेमिंग, कॅसिनोवरील २८ टक्के जीएसटी पूर्वलक्ष्यी कर आकारणीचा मुद्दा दिल्ली आणि गोव्यासारख्या राज्यांनी उपस्थित केला होता. मात्र ही कर आकारणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने नसून यापूर्वीही ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोवर २८ टक्के जीएसटी आकारला जात होता, असे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले.

कंपन्यांना हमींवर १८ टक्के जीएसटी

  • पालक कंपन्यांनी त्यांच्या साहाय्यक कंपन्यांना दिलेल्या हमींवर १८ टक्के जीएसटी लागू होईल, तर कंपनीच्या संचालकाने वैयक्तिक हमी दिल्यास कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी माहिती महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी दिली. जेव्हा पालक कंपनीने तिच्या साहाय्यक कंपनीला कॉर्पोरेट हमी देते, तेव्हा एकूण रकमेच्या १ टक्क्यावर १८ टक्के जीएसटी लागू होईल.
महिला सशक्तीकरणासाठी राज्य सरकारचे नवे अभियान; राज्यातील एक कोटी महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न
  • ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्य सरकारने महिला सशक्तीकरण हे नवे अभियान जाहीर केले आहे. राज्यातील १ कोटी महिलांना या अभियानातून लाभ देण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, आमदार निधी, विविध शासकीय योजनांचा निधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी अभियानाच्या प्रचार, प्रचार व नियोजनासाठी वापरण्यात येणार आहे.
  • शासन आपल्या दारी हे मुख्यमंत्र्यांचे अभियान यशस्वी होत आहे. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मोठय़ा सभा मेळाव्याच्या नावाखाली होत आहेत. त्याच धर्तीवर आता महिलांसाठी विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात महिलांसाठीच्या योजना राबवणारे शासकीय सर्व विभाग एका छताखाली आणले जाणार आहेत. या अभियानाचा शासन निर्णय २० सप्टेंबर रोजी काढण्यात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी तो रद्द करण्यात आला. शुक्रवारी सुधारित शासन निर्णय जारी केला आहे.
  • त्यामध्ये या अभियानाची धुरा मुख्यमंत्री कार्यालयातील जनकल्याण कक्षाकडे देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी या अभियानाचे नोडल अधिकारी असणार आहेत. आरोग्य शिबिरे, प्रशिक्षिण शिबिरे, रोजगार मेळावे, सखी कीटवाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रोत्साहनपर पारितोषिके देणे असे कार्यक्रम या अभियानात असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यास २५ हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.

निधीची वळवावळवी

  • या अभियानासाठी प्रत्येक आमदारांच्या निधीतून २० लाख रुपये घेतले जातील. महापालिका, पंचायत समिती व नगरपंचायती यांच्याकडी राखीव ५ टक्के निधी तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांकडील राखीव १० टक्के निधी या अभियानासाठी वापरण्यास मुभा असणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून १ टक्के निधी वापरण्यास जिल्हाधिकारी यांना मंजुरी दिली आहे.

 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - मेधाली, वैभवला सुवर्ण :
  • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी डायव्हिंग प्रकारात मेधाली रेडरकर, तर स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या योगासन प्रकारात वैभव श्रीरामने महाराष्ट्राच्या सुवर्णपदकांत भर टाकली. तसेच डायव्हिंगमध्येच ऋतिका श्रीराम कांस्यपदकाची मानकरी ठरली. हे तिचे यंदाच्या स्पर्धेतील तिसरे पदक होते. महाराष्ट्राचे पदकतालिकेत तिसरे स्थान कायम असून, आतापर्यंत महाराष्ट्राने २६ सुवर्ण, २५ रौप्य आणि ४८ कांस्य अशी ९९ पदके मिळविली आहेत.

  • योगासन स्पर्धा प्रकारात वैभव श्रीरामने पारंपरिक आसन प्रकारात विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, एकपाद त्रिमुकूटत्तानासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन अशी आसने सहज करताना ६१.८४ गुणांसह सुवर्णपदक मिळविले. छकुली सेलोकरने महिलांच्या पारंपरिक योगासनात ६२.३४ गुणांसह रौप्यपदक मिळविले. छकुलीने विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, वामदेव त्रिपुरासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन ही पारंपारिक योगासने सादर केली.

  • जलतरणात चार बाय शंभर मीटर मिश्र फ्री-स्टाईल शर्यतीत महाराष्ट्राने ३ मिनिट ४७.६१ सेकंदांसह रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राच्या संघात वेदांत माधवन, अवंतिका चव्हाण, दिवा पंजाबी व हीर शहाचा समावेश होता.  

  • ज्युडो स्पर्धेत अपूर्वा पाटीलला ७८ किलोपेक्षा अधिक वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करला. मात्र ती कांस्यपदकाची मानकरी ठरली. त्यापूर्वी अपूर्वाने मणिपूरच्या रोशनी देवी आणि तमिळनाडूच्या देवधर शनीचा पराभव केला होता. उपांत्य फेरीत अपूर्वाला पंजाबच्या मनप्रीतने पराभूत केले. बॉक्सिंग प्रकारात मणिपूरच्या ओजीबालाकडून महाराष्ट्राच्या  आर्याला, तर पुरुषांच्या ६० किलो वजन गटात हरिवंशला सेनादलाच्या हितेश कुमारकडून एकतर्फी लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

‘यूपीएससी’तर्फे परीक्षा, भरतीची माहिती देणारे ‘अ‍ॅप’ कार्यान्वित :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) परीक्षा, भरतीसंदर्भातील माहिती देणारे मोबाइल उपयोजन (अ‍ॅप) कार्यान्वित करण्यात आले आहे. हे ‘अँड्रॉइड मोबाइल उपयोजन’ असून, त्याद्वारे ही महत्त्वाची माहिती इच्छुकांना सहज मिळू शकेल, अशी माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. ‘गुगल प्ले स्टोअर’वर ते उपलब्ध असेल.

  • आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे, की मोबाइलच्या माध्यमातून परीक्षा व भरती प्रक्रियेची सर्वंकष माहिती देण्यासाठी आयोगाने ‘यूपीएससी अँड्रॉइड अ‍ॅप’ सुरू केले आहे.

  • मात्र, याद्वारे कोणताही अर्ज भरता येणार नाही. हे ‘अ‍ॅप’  https://play.google.com/store/apps/details?id=com.upsc.upsc  या ‘लिंक’वरून घेता येईल. ‘यूपएससी’तर्फे प्रतिष्ठेच्या सनदी सेवा परीक्षेसह केंद्र सरकारी सेवातील विविध पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. हजारो उमेदवार या परीक्षांना बसतात.

रुपयाचा नवा नीचांक, ८२.३३ पर्यंत झालं अवमूल्यन; वर्षभरात १० टक्क्यांनी घटला रुपया :
  • गेल्या काही दिवसांपासून रुपयाचा उलट्या दिशेने सुरू असलेला प्रवास अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी रुपयानं नवा नीचांक गाठला आणि बाजारपेठेत चिंतेचं वातावरण पसरलं. शुक्रवारी रुपयानं १६ पैशांची मोठी घट नोंदवली. त्यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर थेट ८२.३३ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. रुपयाच्या अवमूल्यनाची अनेक कारणं समोर येत असली, तरी त्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींचं प्रमुख कारण दिलं जात आहे. याशिवाय, अमेरिकी बॉण्डचे दर, गुंतवणूकदारांमधला निरुत्साह हे घटकदेखील यासाठी कारणीभूत ठरल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

  • आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत ८२.३० इतका होता. याआधीच्या ८१.८९ दरावरून रुपया बाजार उघडताच ८२.१९ वर गेला आणि अजून खाली उतरत ८२.३३पर्यंत घटला. गुरुवारी तर ५५ पैशांनी रुपया उतरला होता. त्यामुळे दिवसेंदिवस रुपयाच्या होणाऱ्या अवमूल्यनामुळे बाजारपेठेत आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

  • वर्षभरात १० टक्क्यांनी घटला रुपया - गेल्या वर्षभरात रुपयानं तब्बल १० टक्क्यांची घट नोंदवल्याचं समोर आलं आहे. पीटीआयच्या हवाल्याने एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयनं सातत्याने परकीय गंगाजळीच्या विक्रीतून रुपयाचं अवमूल्यन रोखण्यासाठी प्रयत्न करूनही रुपयाचा उलटा प्रवास थांबवण्यात अपयश येत आहे.

हरमनप्रीत सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्तम हॉकीपटू :
  • भारतीय हॉकी संघाचा बचावपटू हरमनप्रीत सिंगची सलग दुसऱ्या वर्षी ‘एफआयएच’ सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली. यावर्षी ‘एफआयएच’चा पुरस्कार मिळवणारा हरमनप्रीत तिसरा भारतीय खेळाडू ठरला.

  • सलग दोन वर्षे सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार पटकावणारा हरमनप्रीत चौथा खेळाडू आहे. यापूर्वी टेऊन डी नूएर (नेदरलँड्स), जेमी डायर (ऑस्ट्रेलिया) आणि आर्थर व्हॅन डोरेन (बेल्जियम) यांनी सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळविला होता.

  • ‘‘हरमनप्रीत आधुनिक काळातील अव्वल हॉकीपटू आहे. तो उत्कृष्ट बचावपटू असून स्टिकमध्ये चेंडू खेळवत ठेवण्याचेही त्याच्यात कौशल्य आहे,’’ अशा शब्दांत ‘एफआयएच’ने हरमनप्रीतचे कौतुक केले आहे.

  • भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीतने यंदाच्या ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या १६ सामन्यांत १८ गोल केले. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या सहा सामन्यांत  त्याने आठ गोल केले होते.

भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा; अमेरिकेचा इशारा :
  • वाढते गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास करू नका, असे आवाहन  अमेरिकेने आपल्या नागरिकांना शुक्रवारी केले. भारतात प्रवास करण्याबाबतची नियमावली अमेरिकेने शुक्रवारी जारी केली. त्यानुसार प्रवास नियमावलीची पातळी दोन पर्यंत कमी केली. ती आधी चापर्यंत होती.

  • गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात फिरताना अतिसावध राहा, असे अमेरिकेने जारी केलेल्या प्रवास नियमावलीत म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गुरुवारी पाकिस्तानबाबतची प्रवास नियमावली जाहीर करून त्याला तिसऱ्या पातळीवर ठेवले होते. दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचारग्रस्त पाकिस्तानात प्रवास करणार असाल तर त्याबाबत पुनर्विचार करा, असा इशारा आपल्या नागरिकांना दिला होता.

  • दहशतवाद आणि अशांततेमुळे जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात (पूर्व लडाख आणि त्याची राजधानी लेह वगळता) प्रवास करू नका. सशस्त्र संघर्षांच्या शक्यतेमुळे भारत-पाकिस्तान १० किमी परिसरात प्रवास करू नका, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. भारतातील गुन्हे अहवालानुसार तेथे वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी बलात्कार हा एक आहे, असे अमेरिकेने नमूद केले आहे.

मानवी हक्कांसाठी झगडणाऱ्यांना शांततेचे ‘नोबेल’; बेलारूसचे बियालयात्स्कींसह रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संस्थांचा सन्मान :
  • शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार कैदेत असलेले बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅलेस बियालयात्स्की यांच्यासह मानवी हक्कांसाठी कार्यरत रशियन संघटना ‘मेमोरियल’ आणि युक्रेनची संस्था ‘सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’ यांना संयुक्तरीत्या शुक्रवारी जाहीर झाला.

  • रशिया आणि युक्रेनमधील मानवाधिकार संस्थांना शांततेचे नोबेल जाहीर होणे हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मोठा धक्का असल्याचे मानले जाते. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. नॉर्वेच्या नोबेल समितीच्या अध्यक्ष बेरिट राइस-अँडरसन यांनी ही घोषणा करताना सांगितले, की बेलारूस, रशिया आणि युक्रेन या शेजारी राष्ट्रांमध्ये मानवी हक्क, लोकशाही आणि शांततापूर्ण  साहचर्यासाठी झटणाऱ्या तीन उत्कृष्ट सेवाव्रतींचा समिती सन्मान करू इच्छिते.

  • रशियाची ‘मेमोरियल’ तसेच युक्रेनची ‘सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’या दोन संस्था आणि बेलारूसचे कार्यकर्ते अ‍ॅलेस बियालयात्स्की यांनी मानवी मूल्ये जपण्यासाठी लष्करी संघर्षांविरुद्ध आणि न्याय्य तत्त्वांच्या बाजूने सातत्यपूर्ण कार्य उभे केले आहे. या तिघांनी खऱ्या अर्थाने अल्फ्रेड नोबेल यांनी रुजवलेल्या शांतता आणि राष्ट्रांमधील बंधुभावाच्या मूल्यांना पुनरुज्जीवित केले आहे.

  • १९८०च्या दशकाच्या मध्यावर बेलारूसमधील लोकशाहीवादी चळवळीतील नेत्यांमध्ये अ‍ॅलेस बियालयात्स्की आघाडीवर होते. बेलारूससारख्या हुकुमशाही राजवटीत मानवी हक्क आणि नागरी स्वातंत्र्यासाठीची मोहीम त्यांनी अविरत सुरू ठेवली.

  • बियालयात्स्की यांनी मानवी हक्कांसाठी कार्य करणाऱ्या ‘विआस्ना’ या स्वयंसेवी संस्थेचीही स्थापना केली आहे. त्यांना २०२० मध्ये प्रति‘नोबेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लाईव्हलीहूड पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच वर्षी बियालयात्स्की यांना सरकारविरोधी निदर्शने केल्याबद्दल अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

०८ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.