चालू घडामोडी आणि दिनविशेष - 08 नोव्हेंबर 2023

Date : 8 November, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मॅक्सवेलआधी ‘या’ धडाकेबाज फलंदाजांनी वर्डकपमध्ये द्विशतक ठोकलंय
  • ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न भूतो न भविष्यति अशी कामगिरी करत अविश्वसनीय द्विशतक ठोकले. या द्विशतकासह त्याने अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिरावला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाला ७ बाद ९१ अशा बिकट परिस्थितीतून बाहेर काढलं आणि ७ बाद २९३ पर्यंत मजल मारली. यापैकी २०१ धावा त्याने एकट्याने काढल्या. एक पाय जखमी असतानाही त्याने मोठा लढा देत संघासाठी विजयश्री खेचून आणली. या विजयासह मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तसेच विश्वचषक स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. मॅक्सवेलने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील मोठा विक्रमही मोडित काढला.
  • मॅक्सवेलने या सामन्यात १२८ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २०१ धावा फटकावल्या. या द्विशतकासह त्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. तसेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा तो जगातला तिसरा फलंदाज ठरला आहे. मॅक्सवेलआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल या दोन धडाकेबाज फलंदाजांच्या नावावर आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या एका सामन्यात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम गप्टीलच्या नावावर आहे.
  • ख्रिस गेल हा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा जगातला पहिला खेळाडू आहे. त्याने २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरोधात ही कामगिरी केली होती. गेलने १४७ चेंडूत १० चौकार आणि १६ षटकारांच्या मदतीने २१५ धावा फटकावल्या होत्या. त्याच विश्वचषक स्पर्धेत जगाला आणखी एक द्विशतकवीर मिळाला. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने वेस्ट इंडिजविरोधात द्विशतक ठोकलं होतं. गुप्टीलने १६३ चेंडूत २४ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने तब्बल २३७ धावा फटकावल्या होत्या. त्याने गेलचा २१५ धावांचा विक्रमही मोडला.

खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक धावा

  • मॅक्सवेलने गुप्टिल किंवा गेलचा विक्रम मोडला नसला तरी त्याची खेळी या दोघांपेक्षा श्रेष्ठ ठरते, कारण खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने हे द्विशतक ठोकलं आहे. गुप्टिल आणि गेल हे दोघेही सलामीवीर होते. तर मॅक्सवेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. भारताच्या कपिल देव यांनी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना अशीच खेळी करून संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. त्यांची ही खेळी आयसीसीच्या इतिहासात अजरामर ठरली. त्याचीच पुनरावृत्ती ग्लेन मॅक्सवेलने मंगळवारी मुंबईत केली. मॅक्सवेलने कपिल देव यांचा नाबाद १७५ धावांचा विक्रम या खेळीद्वारे मोडला.
‘अल्प युद्धविरामा’चा विचार करण्यास तयार; इस्रायलच्या पंतप्रधानांची भूमिका
  • हमासबरोबर सुरू असलेल्या युद्धामध्ये ‘अल्प विराम’ घेण्यास तयार असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सोमवारी रात्री ‘एबीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत उशिरा स्पष्ट केले. हमासच्या तावडीतून ओलिसांची सुटका करण्यासाठी अल्प विराम घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
  • गाझामधील पॅलेस्टिनींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी युद्धविराम घ्यावा असे आवाहन केले जात आहे, पण नेतान्याहू यांनी त्यास नकार दिला होता. हमासने सर्व ओलिसांची सुटका केल्याशिवाय कोणताही युद्धविराम घेणार नाही अशी भूमिका इस्रायलकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, हमासच्या तावडीतून पाच ओलिसांची सुटका झाली असून त्यामुळे उरलेल्या ओलिसांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
  • हमासबरोबरचे युद्ध संपल्यानंतर गाझामधील एकंदर सुरक्षेची जबाबदारी इस्रायलवरच असेल असे नेतान्याहू यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यामुळे इस्रायल गाझा पट्टीमधून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
  • या युद्धामध्ये आतापर्यंत १०,३२८ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ४,२३७ मुलांचा समावेश आहे अशी माहिती गाझामधील आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. दुसरीकडे गाझा पट्टीमध्ये इंधनाचा पुरवठा झाला नाही तर सर्व सेवा कोलमडून पडतील असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी मदत कार्यालयाकडून देण्यात आला आहे. गाझा पट्टीत आतापर्यंत मदत आणि वैद्यकीय सामग्री घेऊन ५६९ ट्रक आले आहेत. मात्र त्यामध्ये इंधनाचा समावेश नाही. इंधनाचा वापर हमासच्या अतिरेक्यांकडून केला जाईल असे कारण देत इस्रायलने गाझामध्ये इंधनपुरवठा रोखून धरला आहे.
भारतातील वन्यजीव संशोधकांनी शोधली रंगीत पाल
  • भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामीळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगररांगांमधील घनदाट जंगलात ही पाल त्यांना आढळून आली. पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी अमित सैय्यद आणि त्यांच्या चमूतील दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात अनेक वर्ष शोध घेत होते. साधारणपणे समुद्र सपाटीपासून १२४५ मीटर उंच असणाऱ्या या डोंगर भागातील घनदाट जंगलात २०१३ पासून संशोधनाचे काम चालू होते. या जंगलात अनेक लहानमोठे हिंस्त्र प्राणी आहेत. येथे राहण्याची, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे झाडाखाली राहात जेवढे सामान सोबत नेले, तेवढ्यावरच संशोधकांनी गुजराण केली.
  • २०१५ ला अमित सैय्यद व त्यांच्या चमुला यश आले आणि ही पाल सापडली. त्यानंतर या पालीवर प्रयोगशाळेत संशोधन करून त्याच्या सर्व अवयवांचा, त्याच्यावर असणाऱ्या खवल्यांचा व जनुकीय अभ्यास अमितने सुरू केला. शास्त्रीय अभ्यासातून नक्की झाले की ही पाल नवीन असुन वन्यजीवशास्त्रात याची अजूनही नोंद नाही. अमित सैय्यद यांनी या पालीला आपल्या वडिलांचे नाव द्यायचे ठरवले. प्रो. रशीद सैय्यद हे अमितचे वडील असून ‘निमाम्स्पिस रशिदी’ असे या पालीचे नाव ठेवण्यात आले.
  • नुकतेच या पालीवरील संशोधन ‘एशियन जर्नल ऑफ कंजर्वेशन बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकेत प्रसिद्ध झाले.‘निमास्पिस रशिदी’ ही पाल त्याच्यावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या रंग छटांमुळे दिसायला अतिशय सुंदर दिसते. या संशोधनामध्ये अमित सैय्यद, सॅमसन किरूबाकरण, राहुल खोत, थानीगैवल ए, सतीशकुमार, आयान सय्यद, मासूम सय्यद, जयदीत्या पूरकायास्ता, शुभंकर देशपांडे आणि शवरी सुलाखे हे सहभागी होते.
इब्राहिम जादरानने झुंजार शतक! विश्वचषकात अशी कामगिरी करणारा ठरला अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू
  • अफगाणिस्तानच्या इब्राहिम जादरानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. विश्वचषक २०२३ च्या ३९व्या सामन्यात इब्राहिमने १३१ चेंडूत शतक झळकावले. त्याचे वनडे कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. त्याच वेळी, इब्राहिम एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. याआधी, अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी समिउल्लाह शिनवारीची होती, त्याने २०१५ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 96 धावांची खेळी केली होती. इब्राहिमने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४३ चेंडूत १२९ धावांची नाबाद खेळी खेळली.

अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

  • १२९* – इब्राहिम जादरान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई, २०२३
  • ९६ – समिउल्ला शिनवारी विरुद्ध स्कॉटलंड, ड्युनेडिन, २०१५
  • ८७ – इब्राहिम झद्रान विरुद्ध पाकिस्तान, चेन्नई, २०२३
  • ८६ – इकराम अलीखिल विरुद्ध वेस्ट इंडिज, लीड्स, २०१९
  • ८० – हशमतुल्ला शाहिदी विरुद्ध भारत, दिल्ली, २०२३
  • ८० – रहमानउल्ला गुरबाज विरुद्ध इंग्लंड, दिल्ली, २०२३

अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके

  • ६- मोहम्मद शहजाद
  • ५ – रहमानउल्ला गुरबाज
  • ५- रहमत शाह
  • ५ – इब्राहिम जादरान

एकदिवसीय विश्वचषकात शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू

  • २० वर्षे १९६ दिवस: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड, कोलकाता, २०११
  • २१ वर्षे ७६ दिवस: रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध वेस्ट इंडिज, जयपूर, १९९६
  • २१ वर्षे ८७ दिवस: अविष्का फर्नांडो (श्रीलंका) विरुद्ध वेस्ट इंडीज, चेस्टर-ले-स्ट्रीट, २०१९
  • २१ वर्षे ३३०: इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई, २०२३
  • २२ वर्षे १०६ दिवस: विराट कोहली (भारत) विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, २०११
  • २२ वर्षे ३०० दिवस: सचिन तेंडुलकर (भारत) विरुद्ध केनिया, कटक, १९९६.

 

ट्विटरनंतर आता ‘मेटा’मधून नोकरकपातीची शक्यता, आठवड्याभरात एक हजार जणांच्या नोकऱ्या जाणार :
  • फेसबुकची पॅरेंट कंपनी ‘मेटा’मधून कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आठवड्याभरात या कंपनीतून जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, असं वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं दिलं आहे. मेटाचे जगभरात जवळपास ८७ हजार कर्मचारी आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपसह विविध प्लॅटफॉर्म्सवर हे कर्मचारी कार्यरत आहेत. या सोशल मीडिया कंपनीने जून महिन्यात अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली होती.

  • ‘मेटा’च्या कर्मचाऱ्यांमध्ये २०२३ या वर्षाच्या शेवटपर्यंत वाढ करण्यात येणार नाही, असं सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. मेटाच्या तिसऱ्या तिमाहीतील निराशाजनक निकालानंतर झुकरबर्ग यांनी ही घोषणा केली होती. २०२३ या वर्षामध्ये कंपनीचा गुंतवणुकीवर भर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

  • तिसऱ्या तिमाहीत मेटाचा नफा घसरून ४.४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. नफा ५२ टक्क्यांनी घसरल्यानंतर आता या कंपनीतून काही कर्मचाऱ्यांना डच्चू मिळणार आहे. मेटाच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल २५ टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर कंपनीला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे बाजारमूल्य ६०० अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे.

अमेरिकेत ‘मध्यावधी’साठी आज मतदान :
  • अमेरिकी काँग्रेसवर अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण राहणार की माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकनचे हे ठरवणाऱ्या मध्यावधी निवडणुकीसाठी अमेरिकेत आज, मंगळवारी मतदान होणार आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागा, सिनेटच्या ३५ जागा आणि ३६ राज्यांच्या गव्हर्नरपदासाठी निवडणुका होणार आहेत. 

  • अमेरिकेच्या अध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मध्यावधी होतात. ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक होईल. ३५ सेनेटर्सही निवडले जातील. मध्यावधी निवडणुकीतून अध्यक्षांच्या दोन वर्षांतील कामगिरीवर मतपत्रिकेतून अंशत: सार्वमत व्यक्त होत असते.  

  • अमेरिकेला सध्या तीव्र राजकीय ध्रुवीकरणाला तोंड द्यावे लागत आहे. ढासळती अर्थव्यवस्था, गर्भपाताचा हक्क आणि लोकशाहीच्या भवितव्याबाबत व्यापक चिंता व्यक्त केली जात असताना अमेरिकी संसदेची आगामी रचना कशी असेल, हे या निवडणुकीद्वारे निश्चित होईल.अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी प्रचार मोहिमेत मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी रिपब्लिकन पक्षावर, ‘निवडणुकीस नकार देणाऱ्यांनी मतपत्रिकांमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप केला, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी, वाढत्या डाव्या विचारसरणीला विरोध करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.

  • याँकर्स येथील सारा लॉरेन्स महाविद्यालयामध्ये रविवारी संध्याकाळी बायडेन यांनी पाच राज्यांतील चार दिवसांच्या प्रचार मोहिमेची सांगता केली. सभेत त्यांनी डेमोक्रॅटिक गव्हर्नर कॅथी हॉचूल यांचा जोरदार प्रचार केला. त्यांचा सामना रिपब्लिकनच्या ली झेल्डिन यांच्याशी आहे. निवडणूक नाकारणाऱ्यांसाठी कोणत्याही निवडणुकीचे दोनच निकाल असतात- एक तर ते जिंकतात किंवा त्यांची फसवणूक केली गेलेली असते, अशी टीका बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर केली. ट्रम्प यांनी मियामीमध्ये समर्थकांसमोर बोलताना प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांना उद्देशून ‘‘लॉक हर अप!’’ असे उद्गार काढले. अमेरिकी संसदेच्या मुख्य सभागृहावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा रिपब्लिकनांचा प्रयत्न आहे. सेनेटच्या ३५ जागा मिळवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

कोहली महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू :
  • भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील चमकदार कामगिरीच्या आधारे कोहलीने हा पुरस्कार पटकावला. महिलांमध्ये पाकिस्तानची अनुभवी अष्टपैलू निदा दार या पुरस्काराची मानकरी ठरली. तिने हा पुरस्कार मिळवताना भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्माला मागे टाकले. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, ‘आयसीसी’ हॉल ऑफ फेमचे सदस्य, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि नोंदणीकृत चाहते यांच्या मतदानाच्या आधारे कोहली आणि दार यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

  • कोहलीला प्रथमच ‘आयसीसी’चा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळविण्यात यश आले. त्याने ऑक्टोबर महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये २०५ धावा केल्या. नेदरलँडविरुद्ध अर्धशतकासह कोहलीने पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) नाबाद ८२ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांना मागे टाकत महिन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला. या पुरस्कारासाठी निवड होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे कोहली म्हणाला.

  • कोहलीचा ‘तो’ षटकार अविस्मरणीय -पॉन्टिंग - ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना कोहलीने १९व्या षटकात हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर समोरील दिशेला मारलेला षटकार अविस्मरणीय आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग म्हणाला. रौफ जगातील सर्वात तेजतर्रार मारा करणाऱ्या गोलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याच्या गोलंदाजीवर कोहलीने मागील पायावर वजन असतानाही समोरील दिशेने षटकार मारला. ‘‘कोहलीने मारलेला फटका अविस्मरणीय असून त्या फटक्याची कायम चर्चा होत राहील. कोहलीच्या फटक्याची ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वोत्तम फटक्यांमध्ये गणना केली जाईल हे नक्की,’’ असे पॉन्टिंगने नमूद केले.

भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी सर्वच उत्सुक!; शेन वॉटसनचे मत :
  • भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले की, चाहत्यांमध्ये वेगळीच ऊर्जा असते. जगभरातील क्रिकेटरसिक या सामन्याची आतुरतेने वाट पाहात असतात. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना या दोन संघांमध्ये झाला, तर सर्वच जण या सामन्यासाठी उत्सुक असतील, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसनने व्यक्त केले.

  • भारत आणि पाकिस्तान यांच्यात या ‘अव्वल १२’ फेरीचा सामना झाला होता. ‘एमसीजी’वर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने उत्कृष्ट खेळी करत भारताला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला होता. आता हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याची शक्यता वाढली आहे.

  • ‘‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला, तर ते सर्वानाच आवडेल. ‘एमसीजी’वर झालेला सामना मला प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहता आला नव्हता. मी त्यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात समालोचन केले होते. मात्र ज्यांनी तो सामना स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहिला, त्यांनी हा सामना कधीही न विसरता येणारा होता, असे म्हटले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. आता पुन्हा हे संघ आमनेसामने आले, तर त्यासाठीही सर्व जण उत्सुक असतील,’’ असे वॉटसनने नमूद केले.

पूर्वकल्पना न देताच ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा कोर्टाचा आदेश? काँग्रेसचं मोठं विधान :
  • खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ‘भारत जोडो’ यात्रेचं आयोजन केलं आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. आता ही यात्रा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर पोहोचली आहे. काँग्रेसच्या या पदयात्रेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सोशल मीडियात निर्माण झालं आहे.

  • पण बंगळुरू येथील न्यायालयाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसकडून तयार करण्यात आलेल्या व्हिडीओजमध्ये ‘केजीएफ-२’ चित्रपटातील संगीत बेकायदेशीरपणे वापरल्याचा (कॉपीराईट) आरोप ‘एमआरटी म्युझिक’ कंपनीकडून करण्यात आला.

  • हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो यात्रे’ची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश ट्विटर कंपनीला दिला आहे. या घटनाक्रमानंतर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संबंधित आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

08 नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.