चालू घडामोडी आणि दिनविशेष - 08 ऑगस्ट 2023

Date : 8 August, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा: भारताची उपांत्य फेरीत धडक
  • कमालीच्या वेगवान झालेल्या सामन्यातील अखेरच्या सत्रात प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाचा प्रतिकार मोडून काढत भारताने सोमवारी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत ३-२ असा विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
  • भारत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत अपराजित राहिला असून, तीन विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह १० गुणांनी गुणतालिकेत आघाडीचे स्थान मिळवले आहे. भारताचा अखेरचा सामना बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. अन्य एका सामन्यात मलेशियाने जपानचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. 
  • कोरियाविरुद्ध सहाव्याच मिनिटाला निलकांत शर्माने मैदानी गोल करून भारताला आघाडीवर नेले. या पहिल्याच सत्रात किम सुंगह्युनने कोरियाला बरोबरी करून दिली. कोरियाला यानंतर गोलसाठी ५८व्या मिनिटाची वाट पाहावी लागली. यांग जिहुनने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यापूर्वी दुसऱ्या सत्रात हरमनप्रीत सिंगने कॉर्नरवर गोल करून भारताला आघाडीवर नेले. मध्यंतरानंतर मनदीपने उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच ३३व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी भक्कम केली. मात्र, सामन्यातील अखेरचे सत्र कमालीचे वेगवान झाले. यातही कोरियाच्या वेगवान चाली आणि काही वेळा धडकी भरवणारी आक्रमणे थोपवताना भारताच्या बचावफळीची कसोटी लागली.
  • सामन्याची अखेरची दहा मिनिटे श्वास रोखणारी ठरली. यामध्ये कोरियाने दहा पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्यापैकी केवळ एकच त्यांना सत्कारणी लावता आला. भारताचा बचाव आणि गोलरक्षक श्रीजेशची भूमिका निर्णायक ठरली. या अखेरच्या मिनिटांच्या खेळात भारताला एक पेनल्टी कॉर्नर आणि एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. या स्ट्रोकवर कर्णधार हरमनप्रीतला गोल करण्यात अपयश आले. मात्र, बचाव फळीच्या निर्णायक कामगिरीने भारताचा विजय साकारला.
राज्यातील आठ कोटी नागरिकांना लाभ! ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
  • ‘शासन आपल्या दारी’ हा ऐतिहासिक प्रकारचा हा उपक्रम आहे. दीड कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमात लाभ घेतला आहे. या उपक्रमांद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राज्यातील सात ते आठ कोटी नागरिकांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.   
  • पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी या वेळी उपस्थित होते. 
  • ‘या उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ देण्यात आला आहे. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिले आहेत. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही सहा हजार रुपयांची भर घालणार असल्याने १२ हजार रुपये इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.
  • बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात ७०० ठिकाणी सुरू केला आहे. पोटदुखी होणाऱ्यांना तेथे मोफत उपचार देण्यात येतील. केवळ राज्यातील नागरिकच नव्हे, तर राज्यातील विकास पाहून पोटात दुखणाऱ्यांसाठी देखील योजना आणल्या आहेत’, असा टोला विरोधकांचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी लगावला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्याला केवळ एक रुपयात पीक विमा सुविधा दिली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेंतर्गत कुटुंब लखपती होईल अशी योजना सुरू केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.’ उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने होत आहेत. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही.
अलीगड: राम मंदिरासाठी ४०० किलोंचे कुलूप!
  • हाताने तयार करण्यात येणाऱ्या कुलपांसाठी प्रसिद्ध असलेल्या अलीगडमधील एका वयोवृद्ध कलाकाराने अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ४०० किलोग्रॅम वजनाचे कुलूप तयार केले आहे. हे मंदिर पुढील वर्षी जानेवारीत भाविकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे.श्रीराम मंदिराचा विचार करून शर्मा यांनी तयार केलेले कुलूप १० फूट उंच, साडेचार फूट रुंद आणि ९.५ इंच जाड असून, त्याला ४ फूट लांब किल्ली आहे.
  • हे कुलूप तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन लाख रुपये खर्च आला आणि आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जन्मभराची मिळकत त्यासाठी लावली.‘जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप’ तयार करण्यासाठी भगवान श्रीरामांचे निस्सीम भक्त असलेले सत्यप्रकाश शर्मा यांनी अनेक महिने परिश्रम घेतले.
  • या वर्षीच हे कुलूप भेट म्हणून राम मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा त्यांचा मनोदय आहे.हे कुलूप कुठे वापरले जाऊ शकते हे आम्हाला पाहावे लागेल, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चांद्रयान ३ चंद्राच्या आणखी जवळ पोहचलं, ९ ऑगस्टला पुढील कक्षेत प्रवेश करणार
  • चांद्रयान ३ ही भारताची महत्वकांक्षी मोहीम आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. शनिवारी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. चांद्रयान चंद्राभोवतीच्या १७०x४३१३ या कक्षेत फिरत आहे. ९ ऑगस्टला चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती इस्रोने दिली आहे.
  • १४ जुलैला इस्रोच्या चांद्रयान ३ ने चंद्राकडे झेपावलं होतं. पृथ्वीच्या कक्षेत फेरीत मारल्यानंतर ५ ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ९ ऑगस्टला चांद्रयान आणखी आतल्या कक्षेत ढकललं जाईल. १७ ऑगस्टला चांद्रयान चंद्रापासून १०० किलोमीर उंचीवर स्थिरावेल. नंतर २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.
  • दरम्यान, इस्रोने रविवारी चांद्रायानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चंद्रावरील पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे. चांद्रयान ३ ही भारताची चंद्राच्या अध्ययनासाठी पाठवलेली तिसरी मोठी मोहीम आहे. यापूर्वी पहिल्या मोहीमेत यश आलं होतं. तर दुसऱ्या मोहीमेत विक्रम लँडरचा अपघात झाल्याने अपयश आलं होतं.
लोभस आणि सुंदर! चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर चांद्रयानाने पाठवला पहिला फोटो
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चांद्रयान ३ या तिसऱ्या मानवविरहीत चांद्रयानाने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो जारी केला आहे. चांद्रयान ३ हे शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहचलं. त्यानंतर आता इस्रोने चंद्राचा पहिला फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता अपेक्षा अशी आहे की चांद्रयान ३ या महिन्याच्या २३ तारखेपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.
  • शनिवारी म्हणजेच ५ ऑगस्टच्या दिवशी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. पृथ्वीपासून तीन लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर यानाला चंद्राच्या स्थिर कक्षेत आणलं आहे. १४ जुलै २०२३ रोजी सतीश धवन स्पेस सेंटरमधून LVM-3 रॉकेटच्या साह्याने चांद्रयान-3चं प्रक्षेपण झालं होतं. आता या यानाने पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराळातील तीन लाख किलोमीटर अंतर व्यापलं आहे. या यानाने १ ऑगस्ट रोजी पृथ्वीभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण केली होती आणि चंद्राच्या दिशेने आपला ट्रान्स-लूनर प्रवास सुरू केला होता.
  • १ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले. याला ट्रान्सलुनर इंजेक्शन म्हणतात. यापूर्वी, चांद्रयान अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते. २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल.
  • चांद्रयान-३ मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि तेथे १४ दिवस प्रयोग करतील. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे शोधून काढणार आहे. चंद्राच्या मातीचाही अभ्यास करणार आहे.

 

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा - भारतीय महिला ‘अ’ संघ पराभूत :
  • महिला विभागातील अग्रमानांकित भारताच्या ‘अ’ संघाला रविवारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला पोलंडने १.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले.

  • भारत ‘अ’ संघातील कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि तानिया सचदेव या अनुभवी खेळाडूंचे सामने बरोबरीत सुटले. मात्र, आर. वैशाली पराभूत झाली. ‘ब’ संघाने स्वित्र्झलडवर ४-० अशी, ‘क’ संघाने इस्टोनियावर ३-१ अशी मात केली.

  • खुल्या विभागात, भारताच्या ‘अ’ संघाने ब्राझीलला ३-१ असे पराभूत केले. भारताच्या ‘ब’ संघाला अझरबैजानने २-२ असे बरोबरीत रोखले. डी. गुकेशची सलग आठ विजयांची मालिका खंडित झाली. ‘क’ संघाने पेराग्वेला ३-१ असे नमवले.

नितू अन् अमितचा ‘गोल्डन पंच’; बॉक्सिंमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई :
  • बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताला दोन सुवर्णपदकांची कमाई झाली. महिलांच्या ४८ किली वजनी गटात नितू घांगसने सुवर्णपदक पटकावले. तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात आता १५ सुवर्णपदकं झाली आहेत.

  • नितूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी-जेडचा पराभव केला. २१ वर्षीय नितूच्या शानदार हल्ल्याला डेमी-जेडकडे कोणतेही उत्तर नसल्यामुळे तिला सहज विजय मिळाला. तिने यावर्षी भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले. नितूच्या विजयामुळे भारताला एकूण ४१वे पदक मिळाले.

  • नितूनंतर पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये अमित पंघालने सुवर्णपदक जिंकले. अमितने पुरुषांच्या फ्लायवेट गटातील अंतिम फेरीत इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे त्याचे पहिले-वहिले सुवर्णपदक ठरले. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

  • १६वर्षीय अमितला गेल्या वर्षी ऑलिंपिकमध्ये सुरुवातीच्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने कोणतीही चूक न करता अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. नितू आणि अमितच्या पदकांमुळे भारताची एकूण पदक संख्या ४३ झाली असून त्यात १५ सुवर्ण, ११ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.

चिनी जहाज श्रीलंकेत नेण्यास विरोध;  भारताकडून सुरक्षिततेचा मुद्दा :
  • उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्याला वाहिलेले चीनचे जहाज ‘युआन वँग ५’ची हंबन्टोटा बंदरातील संभाव्य भेट स्थगित करावी, अशी विनंती श्रीलंकेने चीनला केली आहे. या जहाजाच्या श्रीलंका भेटीविषयी भारताने चिंता व्यक्त केली आहे. मात्र, या प्रकरणी चीनच्या दूतावासाने श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन चर्चेची मागणी केली.

  • येथील वृत्तानुसार या चिनी जहाजाच्या हंबन्टोटा या बंदरातील अस्तित्वाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे भारताने श्रीलंकेला कळवले आहे. या जहाजातील उच्च तंत्रज्ञानामुळे उपग्रह, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग काढणे (ट्रॅकिंग) सहज शक्य आहे.

  • त्यामुळे भारताला चीनकडून हेरगिरीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने श्रीलंकेला या जहाजाच्या श्रीलंका भेटीच्या निषेधार्थ संदेश पाठवले होते. या जहाजाची यंत्रणा महत्त्वाच्या भारतीय संस्थांची हेरगिरी करण्याचा धोका आहे. त्याबद्दल भारताला चिंता वाटते.

‘इस्रो’च्या लघु उपग्रह मोहिमेत ‘विदा’ गमावल्याने अडथळा :
  • भारतीय अवकाश संशोधन संघटनेतर्फे (इस्रो) रविवारी महत्त्वाकांक्षी लघु उपग्रह प्रक्षेपण यान (एसएसएलव्ही) मोहिमेत ‘टर्मिनल’ टप्प्यात विदा गमावण्याचा (डेटा लॉस) अडथळा निर्माण झाला. या मोहिमेतील तीन टप्पे अपेक्षेनुसार सुरळीत पार पडले. मात्र ‘टर्मिनल’ टप्प्यात ‘डेटा लॉस’ झाल्यामागची कारणे शोधण्यात येत आहेत. अवकाशात एक भूनिरीक्षण उपग्रह आणि विद्यार्थ्यांनी विकसित केलेला उपग्रह पाठवण्यासाठी एसएसएलव्ही-डी१/ईओएस-०२ ने ढगाळ हवामानातही सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी नऊ वाजून १८ मिनिटांनी उड्डाण केले.

  • सुमारे साडेसात तास उलट गणनेनंतर ३४ मीटर लांब ‘रॉकेट’ने अवकाशात झेप घेतली. त्यानंतर या ‘रॉकेट’च्या स्थितीविषयी या मोहिमेच्या नियंत्रण केंद्राला शास्त्रज्ञांकडून माहिती देण्यात आली. ‘इस्रो’च्या प्रसारमाध्यम केंद्रांच्या उपलब्ध पडद्यांवर उपग्रह आपल्या सुनिश्चित मार्गाने जाताना दिसला. त्यानंतर मात्र ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ‘डेटा लॉस’ची माहिती दिली.

  • सोमनाथ यांनी श्रीहरिकोटा येथे उपग्रह प्रक्षेपणानंतर काही मिनिटांनी मोहीम नियंत्रण केंद्रास सांगितले, की या मोहिमेतील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांत अपेक्षेनुसार कामगिरी झाली. परंतु ‘टर्मिनल’ टप्प्यांत काही प्रमाणात विदा गमावला (डेटा लॉस) आहे. या आकडेवारीचे विश्लेषण आम्ही करत आहोत. या प्रक्षेपण रॉकेटच्या कामगिरीसह अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहांची माहिती आम्ही लवकरच देऊ.

  • सोमनाथ यांनी मोहीम नियंत्रण केंद्रात माहिती देण्याआधी, शास्त्रज्ञांचा उत्साह मावळला होता. आपापल्या संगणकाच्या पडद्याकडे पाहणारे ते गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होते. अद्याप या मोहिमेच्या यशाविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. ‘रॉकेट’च्या आकडेवारीचे विश्लेषण सुरू आहे. सतीश धवन अवकाश केंद्राच्या संगणक पटलांवर भू निरीक्षण उपग्रह व दुसरा ‘आझादीसॅट’ उपग्रह नियोजनानुसार रॉकेटपासून अवकाशात विलग होताना दिसले.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप; पगारातून कपात होणार ‘एवढे’ रुपये :
  • ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, त्याचे पैसे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात येईल. प्रतिध्वज ३८ रुपये एवढी रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणार आहे. याला रेल्वे कर्मचारी संघटनेने मात्र विरोध केला आहे.

  • “रेल्वे कर्मचाऱ्यांना जो ध्वज देण्यात येईल, त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३८ रुपये कापले जातील, असा आदेश जारी करण्यात आला आहे.”, अशी माहिती रेल्वेचे सीपीआरओ शिवम शर्मा यांनी दिली आहे. तर “हा ध्वज कर्मचारी लाभ निधीतून दिला जात आहे. त्याचे पैसे नंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्यात येईल आणि ही रक्कम कर्मचारी लाभ निधीमध्येच हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे पगारातून पैसे कापले जाऊ नयेत.”, अशी प्रतिक्रिया रेल्वेचे विभागीय मंत्री चंदन सिंह यांनी दिली आहे.

  • महत्त्वाचे म्हणजे हेच राष्ट्रध्वज मुख्य पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांना, तर बचत गटामार्फेत २० रुपयांना विकल्या जात आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारत आपला ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमही त्याचाच एक भाग आहे.

08 ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.